जानकीचं चित्रं (कथा)

जानकीचं चित्रं

लेखन: मृण्मयी काळकर
चित्रे: विशाल माने, ऋषिकेश

त्या इमारतीत अनेक मुलं रहात.  साधारण एकाच वयाची, ८ – १० वर्षाची.  ऋत्विक, साम, वेद, आरुषी आणि जानकी यांची मात्र अगदी पक्की- घटगट्टी होती.  एकही दिवस एकमेकांशी खेळल्याशिवाय जायचा नाही त्यांचा. शाळेत घडलेली प्रत्येक गोष्ट सांगायचेच ते एकमेकांना.  

एकदा काय झालं, आरूषीची शाळेतली मैत्रीण रजा होती बरेच दिवस.  का रजा राहिलिये याची आरुषीला खूप उत्सुकता. आरुषीकडे काही तिच्या घरचा फोन नंबर नव्हता, पत्ताही नेमका माहीत नव्हता. तिने काय केलं माहिये? नुकतंच आरुषीच्या बाबाने तिला ‘कार्बन’ पेपरची जादू शिकवली होती. मैत्रिणीचा खूप अभ्यास बुडेल, तिला खूप लिखाण करावं लागेल म्हणून या पठ्ठीने कार्बन शाळेत नेला व प्रत्येक वहीत तो वापरून लिखाण केलं.  शाळेत हे अजिबात चालणार नव्हतं, घरून नं विचारता अशी वस्तू आणून ती वापरणं. जेव्हा मुलांना हे कळलं आणि मॉनिटरपर्यन्त गेलं तेव्हा मात्र आरुषी घाबरली. पटकन कार्बन कागद कचरापेटीत टाकला तिने. अश्शी फजिती झाली तिची. घरी आल्याआल्या ती जानकीकडे गेली हे सगळं सांगायला.  

जानकीकडे मात्र एकदम आनंदाची बातमी होती.  आज तिला शाळेतल्या भिंतीवर लावण्याजोगं एक भलं मोठं चित्र तयार करायला सांगितलं होतं.  त्यामुळे ती खूप खूश होती. रंगकाम हे जानकीचं अगदी म्हणजे अगदीच आवडीचं काम. जानकीने आईला सांगितलं होतं, “या बाळूला आता अजिबात येऊ द्यायचं नाही हं! आई माझ्याजवळ.  तो खूप मस्ती करतो. माझं चित्र अजिबात खराब व्हायला नकोय मला. आठवतं का? मागच्या वेळी माझी चित्रकलेची परीक्षा होती, तेव्हा माझ्या वहीवर हाss एवढा रंग सांडून ठेवला होता त्याने?”  आई जानकीला म्हणाली,” हे बघ, तू एका खोलीत हवा तेवढा पसारा कर आणि काम झालं की दार लावून घेत जा. बाळू लहान आहे, त्याला काय कळणार काय महत्त्वाचं आणि काय नाही? त्याला फक्त खेळायचं असतं, जे दिसेल त्याच्याशी. “

मग जानकीने आरुषी आणि आईसमोर जाहीर केलं, “उद्यापासून मी खाली खेळायला अजिबात जाणार  नाही. शाळेतून आले की, रा्रीपर्यन्त मी फक्त आणि फक्त चित्र काढणार.” हे ऐकून आरुषीने आईला आणि आईने आरुषीला असा हताश लुक दिला.  आई म्हणाली, “ अगं! उद्यापासून नं? मग आज खेळून घे भरपूर. जा. जानकी आणि आरुषी गेल्या जिन्यावरून धावत थेट समोरच्या बिल्डिंगमधल्या वेदकडे.

खरंच दुसर्‍या दिवसापासून जानकी कामाला लागली.  घरी येऊन हात पाय धुऊन आईने केलेला खाऊ खाऊन, दूध प्यायले की ती एकदम ताजतवानी व्हायची.  मग एका आख्ख्या खोलीचा ताबा तिने घेतला होता. ती शाळेतून घरी येई, तेव्हा लहानगा श्वेत गाढ झोपलेला असायचा.  मग उठला की त्याला नेहमीचा सवयीचा ताईचा आवाज ऐकू आला नाही, की तो ता...ता...ता करत तिला शोधायचा. तिच्या खोलीच्या दाराबाहेर बसून खट्-खट्, टण्-टण्, फट्-फट् असे काहीतरी वस्तू हातात घेऊन आवाज करत राहायचा.  पण जानकीने एकदा ठरवलं की ठरवलं. रात्री जेवणासाठी आईने हाक मारेपर्यंत ती चित्र काढण्यात मग्न असायची.


(चित्र: ऋषिकेश)

२-४ दिवस गेले आणि तिच्या मित्र-मैत्रिणींना तिच्याशिवाय काही करमेना.  ऋत्विक आणि आरुषीला तर शाळेत, बिल्डिंगमध्ये घडलेली प्रत्येक गोष्ट जानकीला सांगायची असे.  संध्याकाळी खाली सायकल चालवताना ते सगळे जानकीच्या खोलीच्या खिडकी खाली उभे राहून जोरजोरात सायकलची घंटी वाजवायला लागले.   शेवटी जानकी आली खिडकीजवळ. “जानकी ये की खाली अर्ध्या तासासाठी, इतका काय भाव खाते?’’ जानकी मात्र निश्चयाला पक्की होती. म्हणाली,” आता अगदी मूड आलाय रे...आणि ३-४ दिवसात होईलच माझं चित्र पूर्ण.” साम म्हणाला, “मग आम्हाला तरी येऊ देत तुझ्या घरी.  आम्ही गप्पा मारू, तू चित्र काढ.” जानकी म्हणाली, “ अरे, खोलीत जागाच नाहीये तुम्हाला बसायला. आणि असं गप्पा मारता मारता नाही बाबा येत, मला काम करता.” सगळे तोंड वाकडं करून गेले निघून, काय करणार! जानकीने अगदी आई-बाबालाही दाखवलं नव्हतं, ती काय काढतेय ते.  

शेवटी पाच दिवसांनी तिचं चित्र अगदी हवं तसं तयार झालं.  पण चित्राच्या आजूबाजूला हाss एवढा रंगांच्या बाटल्यांचा, रंगीत पेन्सिलींचा, तेली खडूंचा पसारा होता.  तो अावरायचा तिला खूपच कंटाळा आला होता. ती आईला म्हणाली, ”आई, मी तुला चित्र बघायला देईन, पण एकाच अटीवर.  मला पसार्‍यावरून अजिबात काहीच बोलायचं नाही.” आई हसून म्हणाली,”प्रॉमिस, मी काहीच नाही बोलणार पसार्‍यावरून.”  “पण श्वेत नक्की झोपलाय नं?” जानकीने दार हळूच उघडत विचारलं. “हो” आई म्हणाली. आई आत आली आणि आनंदाने एकाच वेळी हसायला आणि रडायलाही लागली.  जानकीला खूप आश्चर्य वाटलं. तिने आईला विचारलं, ”आई, अगं रडतेस का अशी? काय चुकलंय माझं या चित्रात?” हे ऐकून मात्र आईला हसू फुटलं. इतकं सुंदर चित्र काढलं होतं जानकीने.  शाळेची मोठी इमारत आणि आजूबाजूला खेळणारी मुलं. बाजूने हिरवी, एकसारखी झाडं. खूप रंगीबेरंगी आणि आकर्षक झालं होतं ते. कधी एकदा शाळेत नेऊन ताईंना आणि वर्गातल्या मित्र-मैत्रिणींना दाखवते असं झालं होतं जानकीला.  फक्त ते चित्र साधारण ४ चार्ट पेपर एकत्र जोडून तयार केलं होतं. आता मात्र तिला बाबाची मदत लागणार होती, आणि बाबा तर रात्री खूप उशिरा येणार होता, कारण तो मुंबईला गेला होता. शिवाय रात्री तो खूप थकलेला असणार होता.  शेवटी जानकीने मनाशी काहीतरी ठरवलं आणि ती लवकर झोपली. आईला खूप आश्चर्य वाटलं, कारण रोज, रोज नं चुकता आईची जानकीच्या एका कानातून दुसर्‍या कानात जाणारी वाक्य ठरलेली, “ अगं, १०:३० वाजलेत रात्रीचे, लवकर झोप. सकाळी शाळा आहे.”  आज तर ती ९:३० वाजताच अंथरुणात गेलेली. आईला आनंद मात्र झाला. चला, कधीतरी हिने आपलं ऐकलं!


(चित्र: विशाल माने)

पहाटे ६:०० वाजता जानकी उठली.  उठल्या उठल्या तयारीला लागली. ब्रश-आंघोळ पण आटपली.  आई-बाबा श्वेत सगळेच अजून झोपले होते. ७.०० वाजेपर्यंत ती अगदी गणवेश घालून तयार झाली होती.  आई उठून तिला विचारणार इतक्यात ती बाबाला उठवायला लागली.

“बाबा प्लीज आज माला तुझी मदत हवीये, आणि ती ही आत्ताच.”  बाबा काही उठायला तयार होईना. मग जानकी आईला म्हणाली, “आई, आज नं माला घरातलाच काहीतरी खाऊ दे डब्यात.”

 “का?  आज काय वाढदिवस आहे का कोणाचा?”  

“आई, प्लीज माझ्या मदतीला ये, स्वयंपाकघरात नको वेळ घालवूस”, जानकी म्हणाली.

आई लगेच तयार झाली.  दोघींनी मिळून ते चित्र नेण्यासाठी वर्तमानपत्र जोडली, खालून एक, वरून एक असं मोठं पाकीट तयार केलं.  एक मोठी गुंडाळी करून ते ३-४ ठिकाणी बांधलं पण ही एवढी गुंडाळी न्यायला मात्र काहीच नव्हतं. शेवटी जुने साडीचे फॉल घेऊन आईने ते उचलून न्यायला एक वळकटी तयार केली.  आता जानकीला हायसं वाटलं आणि ते चित्र घेऊन ती शाळेत गेली. मुलं यायच्या आत स्कूल बसमध्ये चढून वरच्या सामान ठेवायच्या लांबलचक खणात ते ठेवून दिलं. शाळेत जाताना सगळ्यात शेवटी उतरून ते ताईंच्या हातात नेऊन दिलं.  ताईंनी ते मुख्याध्यापकांच्या खोलीत नेलं. पुढे आठ दिवस त्याचं काही झालं नाही. आई रोज घरी आल्यावर जानकीला विचारायची,”अगं, काय झालं? आवडलं का तुझं चित्र ताईंना? काय म्हणाल्या त्या?” जानकीकडे काहीच उत्तर नसायचं.  बरं शाळेत ताईंना एकदा विचारलं तिने पण ताई म्हणाल्या, “आता मी ते मुख्याध्यापकांना दिलंय, मला काही माहित नाही.”

मग पुढच्या महिन्यात एके दिवशी, शाळेतून बाबाला फोन जातो. तेव्हा बाबा ऑफिसमध्ये असतो.  शाळेतून इतकंच सांगतात – शनिवारी ठीक स. १०:३० वा. शाळेत या.  आता बाबाला येतं टेंशन. शाळेत का बोलावलं असेल? जानकी तर एकदम शहाणी मुलगी.  आजपर्यंत कधीच शाळेतून ‘भेटायला या’ असा फोन आला नव्हता. तो कामात मग्न झाला, तरी त्याला सारखं वाटत होतं – आईला फोन करावा की नाही? उगीचा तिला पण टेंशन येईल.  त्यापेक्षा थेट शाळेत जाऊ बघावं आधी.

शुक्रवारी रात्री आई आठवण करते बाबाला. उद्या बोलावलंय नं शाळेत १०:३० वाजता, तेव्हा बाबाला आश्चर्यच वाटतं.  तो खूप विचारायचा प्रयत्न करतो – का बोलावलं आहे, पण आई काही पत्ता लागू देत नाही. तिला बाबाला चकीत करायचं असतं.


(चित्र: विशाल माने)

दुसर्‍या दिवशी बाबा चक्क लवकर उठून तयार होतो.  जानकी तर सकाळीच शाळेत गेलेली असते. श्वेत, आई, बाबा तिघंही शाळेत पोचतात.  मुख्याध्यापक हसत स्वागत करतात तेव्हा बाबाचं टेंशन जरा कमी होतं. आता त्याला उत्सुकता वाटायला लागते.  काय असेल आज? बाकी कोणी पालक तर दिसत नाहीयेत. मग जानकीला वर्गातून बोलावणं पाठवतात. जानकीला पण आई, बाबा, श्वेत सगळ्यांना शाळेत बघून नवल वाटतं.  तिघांना शाळेच्या मुख्य इमारतीत नेतात, आणि चित्र लावलेल्या भिंतीसमोर आई-बाबा-जानकीचं अभिनंदन करतात. सगळी मुलं टाळ्यांचा कडकडाट करतात.

जानकी घरी येते ती ओरडत आणि नाचतच.  मग पळतच आरुषीकडे जाते. दोघी मिळून साम, वेद, ऋत्विककडे जातात.  ते पण जानकीचं खूप कौतुक केरतात. थोड्या वेळाने आईने बाल्कनीतून पाचही जणांना बोलावून घेते घरी – गरमागरम केळं घालून केलेला शिरा खाण्यासाठी.