मिशाचोर

अनुवादः प्राची देशपांडे

चित्र: दिव्या गवासने

मूळ कविताः सुकुमार राय, बोल ताबोल (४६ कवितांचा संच, प्रथम १९२३ साली बंगालीत प्रकाशित)  

***********************
 

हेड ऑफिसचे मोठे साहेब, माणूस भल्ताच मऊ

त्यांचे असे डोके फिरेल, कोणास होते ठाउ?


बसले होते खुर्चीत आपल्या मस्त मजेत टेकून

पेंगता पेंगता पाहता काय तर क्षणात गेले भडकून!


ताडकन उठून, हातपाय आपटून डोळे वटारले गोल

म्हणतात कसे, "मेलो, मेलो, गेला माझा तोल!"


कोणी म्हणे "पोलीस! कोणी "डॉक्टर बोलवा चटकन!"

कोणी म्हणे, "जपून रे बाबा, चावायचे कचकन!"


घाबरून गडबडून पळू लागले सगळे सैरावैरा

साहेब ओरडले, "अरे, माझ्या मिशाचोराला धरा!"


मिशा चोरल्या! कैच्याकै! आहे तरी का शक्य?

आहेत की त्या ओठावरच, जागच्या जागी सज्ज!


आरसा आणून समजूत घातली, करून दिली खात्री

या पहा मिशा, जशास तशा, कुणी न लावली कात्री


साहेब चिडले, अजून भडकले, करू लागले गर्जना

कुण्णाचेही ऐकणार नाही, ओळखतो सर्वांना


"खराट्यासारख्या, घाणेरड्या या, मिशा नव्हेतच मुळी

अशा मिशा ठेवत असे शामरावांचा गवळी


‘याच तुमच्या मिशा’ म्हणून खोटे बोलता चक्क

भल्ला थोरला दंड लावीन, बजावून ठेवतो पक्कं.


आवाज चढवून ठसका लागता, वहीत लागले लिहू

उगीच लाड पुरवून सगळे झालेत भल्तेच आगाऊ


हापिसातली वानरं कुठली, डोक्यात यांच्या भुसा

कुठे हरवल्या मिशा माझ्या, करा की रे चौकशा!


वाटतं यांच्याच मिशा धरून ताकधिनाधिन नाचून

एकेकाच्या टाळक्यांवर कुदळ द्यावी ठेचून


मिशा तुमच्या आमच्या म्हणे! नसतोच त्यांचा मालक

उलट त्यांचेच आपण असतो, चोख त्यांची ओळख!