आजी-आजोबांच्या वस्तू - ४ (टाईपरायटर)

--------
लेखक - ऋषिकेश 
-
--------

काल दादा घरी नव्हता तर कॉम्प्युटरवर मस्तपैकी गेम्स खेळत बसलो होतो. आबा कधी मागे येऊन उभे राहिले कळलंच नाही. माझ्या तीन लेवल्स पार झाल्यावर मी मागे वळून पाहिलं, तर आबा अगदी चष्मा लावून स्क्रीनकडे कौतुकाने पाहत होते. मला गंमत वाटली, म्हटलं "आबा, इतकं काय बघताय? फक्त गेम आहे तो."
"अरे, आमच्या लहानपणी नव्हते असे खेळ. मजाय तुमची. "
"तुम्हाला बघायचाय खेळून? "
"हो! "
आजोबांनी प्रयत्न केला पण त्यांना काही जमेना. मला जाम मजा आली. ते एकदम गोंधळले होते. त्यांना चिडवून घेतलं.
आजोबा म्हणाले, "चिडव तू मला! आता प्रॅक्टिस करून हरवेन बघ तुला महिनाभरात. " इतक्यात आजोबांना काहितरी आठवलं, "बघ आलो कशाला नि काय करत बसलो! मी आलो कारण मला माझं पाकिटावर नाव घालायचंय. हाताने लिहिलं असतं पण आपल्या अक्षरापेक्षा छापील अक्षर असलं की सरकारी पत्राला जास्त वजन येतं असा अनुभव आहे."
"पाकीट म्हणजे एन्व्हलप ना?"
"हो रे बाबा. करतोस का नाव पत्ता टाईप? मग आपण पाकिटावर प्रिंट करूया"
"मला टायपिंगच येतं फक्त, पाकिटावर प्रिंट कसं करायचं ते फक्त दादालाच माहीत आहे. मी टाईप करून ठेवतो. मग दादा आला की काढा प्रिंट"
"हं ठीक आहे. घरात टाईपरायटर ठेवलाय का तुझ्या बाबाने? तो असेल तर तुझ्या दादासाठी थांबायला नको. तो गाव उंडारून कधी येईल कोण जाणे! "
तसा मी हुशार आहे "टाईपरायटर म्हणजे ते पेपर घालून टायपिंग करतात तेच यंत्र ना?"
"हो तेच ते"
"आपल्याकडे आहे टाईपरायटर?"
"होता खरा! अजूनही असेल, चल आईला विचारूया तुझ्या! तुझी आई उत्तम टायपिस्ट होती बरं का! बाबाला मात्र कधी जमलं नाही. असो."
मी आणि आबा किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरात गेलो. मी लगेच आईला विचारले, "आई, आपल्याकडे टाईपरायटर आहे का?"
"का रे आता कुठे मध्येच आठवला तुला?"
"अगं त्याला नाही मलाच!" आबा पुढे आले, "म्हटलं असेल बाहेरच तर बघू थोडं तेल-पाणी करून ठेवतो बसल्या बसल्या"
"अहो, हे आले की काढायला सांगते माळ्यावर असेल."
"तो आल्यावर कशाला? आम्हीच काढतो की. तेवढीच दुपार मस्त जाईल, चल रे"
आबा मग स्वतः माळ्यावर चढले. कसले ग्रेट आहेत ते!! आणि हनुमानासारखा तो टाईपरायटर खाली आणला.

एका खोक्यात असला तरी त्या टाईपरायटरवर जरा धूळ जमा झाली होती. आजोबांनी तो फडक्याने नीट पुसून काढला.
"आबा, आता हा वापरायचा कसा?"
"हा टाईपरायटर कार्बनच्या एका पट्टीमुळे प्रिंट करतो. याला ही जी बटणं आहेत ना ती आतून धातूच्या ठश्यांना जोडलेली असतात."
"म्हणजे? मला नाही कळलं"
"हं.. हे बघ.. हा कार्बनचा रोल. यावर तू जे काही ठेवशील, लिहिशील त्याची आकृती मागच्या कागदावर उमटेल. टाईपरायटरमध्येही जेव्हा तू बटण दाबतोस तेव्हा त्याचा ठसा या कार्बनच्या पट्टीवर जोरात आपटतो आणि कागदावर अक्षर उमटतं. आपण टाईपरायटर चालू करूया म्हणजे कळेल तुला" आजोबांनी टाईपरायटर उघडला. मला म्हणाले, " हं, आता एक एक बटण दाबून बघ."
मी एक एक बटण दाबत होतो. जे बटण दाबलं जायचं नाही तेव्हा आतमधल्या पट्ट्यांवर, आबा थोडं तेल टाकत. मग हळू हळू सगळी बटण नीट दाबली जाऊ लागली.
"पण मग हे सगळे पार्टस काय आहेत?"
" थांब आपण कंप्युटरवर पार्टसची माहिती आहे का बघुयात. ही बघ. आपला टाईपरायटर जरी या चित्रातल्या यंत्रापेक्षा जरा प्रगत असला तरी तुला त्याच्या वेगवेगळ्या भागांची कल्पना येईल." आजोबांनी मोबाईलवर पुढील चित्र दाखवले:


"तू रिबिन म्हणजे कार्बनची पट्टी तर बघितली आहेसच. प्लॅटन म्हणजे धावपट्टी. ही पट्टी पेपरला मागून आधार देते. जेव्हा आपण बटण दाबतो तेव्हा हे टाईपबार्स म्हणजे टंकपट्ट्या उचलल्या जातात आणि समोरच्या बाजूला आपटतात आणि आपला ठसा रिबिनीवर उमटवतात. रिबिन आणि धावपट्टी यांच्यामध्ये पेपर असल्याने अक्षरं पेपरवर उमटतात. तू जसजसं टाईप करत जातोस तसतसं ही धावपट्टी पुढे पुढे सरकत जाईल अशी रचना केली असते. पान संपलं की तुला हे हँडल दाबून धावपट्टी परत पहिल्या जागी आणायला लागते."
"म्हणजे हे असं दर वेळी करत बसायचं?"
"हो"
"त्यापेक्षा आमचा कॉम्प्युटर बरा" मी आजोबांना चिडवायला म्हटलं. पण आजोबांना हे माहीत होतं बहुतेक, तेच म्हणाले, "हो रे! आता टाईपरायटर वापरण्यापेक्षा संगणक उत्तमच. पूर्वी हाताने लिहावं लागत असे. प्रत्येकाचं अक्षर काही एकसारखं नसे, शिवाय लिहिण्यात आणि अनेक प्रती - म्हणजे कॉपीज - काढण्यात वेळ जाई. त्यावेळी या सगळ्या व्यापापेक्षा टाईपरायटर चांगला होता. पुढे संगणक आल्यावर इतर अनेक फायदे झाले. मुख्य म्हणजे लिहिलेलं साठवून ठेवता येणं, छपाईच्या आधी वाचून चुका दुरुस्त करता येणं हे त्यातलं मुख्य. त्यामुळे आता टाईपरायटर वापरणं गरजेचं राहिलं नाही हे खरंच. पण ते मजेचं आणि आवडीचं असूच शकतं की! हो की नाही?"
"हो तर! मला तर फार आवडलं हे यंत्र. गंमत म्हणून किंवा घरच्याघरी टाईप करायला चांगलं आहे. यावेळच्या माझ्या वाढदिवसाचं इन्व्हिटेशन कार्ड मी टाईप करणार आहे!" मी एकदम मोठ्या माणसांसारखं बोललो. आबा मोठ्याने हसले आणि पाठीवर थाप मारली.
"पण आबा, याच्या बार्सवर ही अक्षर उलट का हो? आणि हा 'रिबिन व्हायब्रेटर' कशासाठी?"
"तू ठसा बघितला आहेस का?"
"ठसा म्हणजे?"
"म्हणजे स्टँप. पोस्टाचा नाही. स्टँपिंगवाला"
"होऽ बघितला आहे."
"त्यात कस उलट अक्षरं असतात. ती कागदावर सरळ होऊन उमटतात तसंच हे. अन् व्हायब्रेटर कार्बनपट्टीला वरखाली करतो. कार्बनची पट्टी सतत हवेच्या संपर्कात आली तर लवकर सुकते. म्हणून फक्त ठसा जवळ आला की हा व्हायब्रेटर रिबिन वर करतो."


"आबा, एक गंमत बघितलीत का?"
"काय रे!"
"यावरची बटणं आणि आपल्या काँप्युटरच्या कीबोर्डची बटणं सारखीच आहे. म्हणजे सारख्याच क्रमाने आहेत!"
"अरे वा!", आजोबा खूश होत म्हणाले, "चांगलं लक्ष आहे की तुझं. या रचनेला क्वर्टी - QWERTY - कीबोर्ड म्हणतात"
"क्वर्टी? पण हे असं का. सरळ एबीसीडी असं क्रमाने का नाही ठेवली?"
"त्याची गंमतच आहे. सुरवातीला अक्षरं आता आहेत तशी नव्हती. मात्र इंग्रजी यंत्राची अक्षरांची क्वर्टी (QWERTY) ही मांडणी वापरणार्‍याच्या गैरसोयीसाठी मुद्दाम झाली!"
"म्हणजे? "
"आधीच्या यंत्राने फार भराभर टंकन करता येत असे. पण तितक्या वेगात आणि त्या रचनेत टंकन केले तर यंत्राच्या पट्ट्या एकमेकांत अडकत असंत. मग अनेक प्रयोग झाले, त्यात असं लक्षात आलं की अक्षरे अशी गैरसोयीची मांडल्यामुळे माणसाला शक्य त्या सगळ्यात जास्त वेगाने टंकता येत जरी नसला तरी वेग फार मंदावतही नाही. मात्र तो इतका होतो की, त्यामुळे यंत्राच्या पट्ट्या अडकणे कमी होते. मग तीच मांडणी रूढ झाली, सवयीची झाली, आणि पुढे संगणकाच्या कळफलकावरही आली. "

आजोबांनी मला एक कागद दिला. मी मग आजोबांच्या मदतीने त्या टाईपरायटरमध्ये कागद घातला. तिथे दोन पट्ट्या होत्या त्याने कागद धावपट्टीवर घट्ट बसला. मग मी माझं नाव, आईचं नाव, बाबांचं नाव, आबा-आजींची नावं सगळं टाईप करून बघितली. बोटं कशी ठेवायची तेही आजोबांनी दाखवलं.

आता आबा पुढे झाले आणि त्यांनी त्यांच्या पाकिटावर किती झरझर नाव टाईप करून घेतलं! आता आज आम्ही पोस्टात जाणार आहोत ते पाकीट पाठवायला!!

-o-o-o-o-o-

आधीच्या भागात: मोजमापे

चित्रस्रोत: सर्व छायाचित्रेआंतरजालावरून साभार. सर्व चित्रे क्रिएटिव्ह कॉमन्स प्रताधिकाराअंतर्गत उपल्ब्ध आहेत