राख (कविता)

राख

कवियित्री: सई सावंत, वय१६ वर्षे, पुणे

चित्र: आयुषा पाटील, इयत्ता सहावी, अक्षर नंदन

 

निळसर आभाळ, हिरवीगर्द वनराई
आणि लालेलाल सवितेचा चिमुटभर प्रकाश
निरागस फुलांचे रंगीत ताटवे
त्यात काळे भ्रमर शोभतात निरामय
पाखरांचा चिवचिवाट आणि मनसोक्त डरकाळी
सुगरणीच्या घरट्यात फुलले मदनाचे रंग
असं तरारून बहारलेलं रम्य जंगल एक...


संपलं....जळून खाक झालं
चर् चर् आवाज होतोय
राखेची पाऊलवाट तुडवतीये
बोचरी आहे ती निर्विकार शांतता
राखाडी झाले ते रंगीत जीवन
राखाडी आभाळात विलसला चंद्र राखाडी
राखाडी फांदीवर डोलते घरटे राखाडी
त्यातली चिमुकली सुगरण तिचीही राख झाली..
एकक रंग लुप्त आणि निष्प्राण झाला.

-----------------------------------

 श्रेय अव्हेर: सदर कविता अटक मटकपर्यंत पोचावल्याबद्दल गौरी औलकर यांचे आभार. तसेच सोबतचे चित्र अमेझॉन जळल्यानंतर आभाताईंच्या वर्गात मुलांनी काढली होती त्यापैकी एक आहे.