आजोबांना बाळ होणार का गं? (कथा)

आजोबांनाही बाळ होणार का गं?
लेखन: योगिता शिंदे
चित्र: अदिती विजय कापडी 


रोजच्यासारखी आजही आईची स्वयंपाकघरात कामांची लगबग सुरू होती. आजोबांचा नाश्ता झाला, तसे ते त्यांच्या मित्रांबरोबर कट्ट्यावर गप्पा मारायला गेले. बाबा ऑफिसला जायच्या गडबडीत होता. आईचे काम घरूनच सुरू होते. आज दुपारी मिटींग होती, त्यामुळे ती आज कबीरशी छान गप्पा मारणार होती. कारण, मावशीला भेटून आल्यापासून कबीरची मध्येच विचारांची समाधी लागत होती.ही गोष्ट आईच्या लक्षात आली होती.
एरवी झोपाळ्यावर जोरजोरात झोपाळा हलवणारा कबीर शांत कसा हे बघून बाबानेही जाता जाता कबीरला विचारलेच, “कबीर, काय रे असा बसलायेस?”
“अं ...नाही. कंटाळा आला आहे!”असं म्हणून कबीर पुन्हा काहीतरी विचार करत बसला.


“बरं, पण मग असाच बसून राहणार आहे का?” आई काहीशी वैतागून म्हणाली.
“ए आई, एक विचारू का? तू रागावू नको हं प्लीज.?”
“नाही रे माझ्या सोन्या, विचार.” आईने कबीरला जवळ घेतलं.
“पोटात बाळ असलं की पोट मोठं होतं ना?”, कबीरने विचारलं. आईने होकारार्थी मान हलवली.
“ए आई, म्हणजे आजोबांनाही बाळ होणार का गं?” कबीरने असं विचारलं तेव्हा आईने चमकून बघितलं.
“नाही रे कबीर... अच्छा! हे सुरू आहे होय डोक्यात. आईने कबीरच्या डोक्यात हळूच टपली मारली.
“पण मग आजोबांचं पोटसुद्धा मावशीसारखंच मोठ्ठं आहे ना?” कबीर आईकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत म्हणाला.
“नाही रे ज्यांचं पोट मोठं असतं त्या प्रत्येकाला बाळ होतं असं नाही. काहीजणांची पोटं व्यायाम न केल्यामुळे पण सुटतात - म्हणजे मोठी होतात." आई हसत हसत म्हणाली.
“मावशीला आता बाळ होणार आहे ना?”, कबीर पुढे म्हणाला.
“हो रे. आता तुझ्यासोबत खेळायला बहीण किंवा भाऊ येणार.” आई हसत म्हणाली, “आणि कबीर, बाळ फक्त आईलाच होतं बरं का! "
“अच्छा.” कबीर कान देऊन ऐकू लागला, म्हणजे सगळ्या प्राण्यांची बाळं आईलाच होतात?” कबीरने विचारलं.

 
“हो काही प्राणी, पक्ष्यांची पिल्लं त्यांच्या अंड्यातून जन्म घेतात. तर काही पोटातून” आई कबीरच्या समोर बसत म्हणाली.
“पण मग त्या पिल्लांचा बाबा काय करतो?”, कबीरने आईच्या मांडीवर डोकं ठेवत विचारलं.
“अरे ,प्राणी, पक्ष्यांचा बाबा आपल्या पिल्लांचं रक्षण करतो, त्यांच्यासाठी छान छान खाऊ आणतो.”


“आणि माणसांचा बाबा?” कबीरच्या या प्रश्नावर तर आईला हसूच आलं.
“माणसांचा बाबापण आधी म्हणजे पुर्वीच्या काळी फक्त मुलांना खायला आणणे , रक्षण करणे असंच करायचा पण आता आईचं काम, बाबांचं काम असं काही नसतं. ज्याला वेळ असेल ते काम ती व्यक्ती करते. मात्र मुलांना सांभाळताना दोघांनाही एकमेकांची खूप मदत लागते.”
आई कबीरच्या डोक्यातून हात फिरवत म्हणाली.
“पण मग हे आईच्या पोटातलं बाळ बाहेर कसं येतं?” कबीरने उत्सुकतेने विचारलं.
आईला काही क्षण थांबलेलं बघून कबीर अधीरतेने म्हणाला, “पोट फाडून?”
“नाही रे! आईच्या शरीरात बाळवाट असते त्यावाटेने किंवा कधीतरी छोटी सर्जरीपण करावी लागते.” आई सुस्कारा टाकत म्हणाली.
“बाप रे! सर्जरी म्हणजे आईला खूप दुखत असेल ना?” कबीर आईच्या मांडीवरून डोकं बाजूला घेत म्हणाला, “हो ना ? प्रदीपकाकाच्या हाताची सर्जरी झाली तेव्हा त्यालासुद्धा किती त्रास झाला!” कबीर म्हणाला.
“हो रे होतो त्रास, पण आईला असं कबीरसारखं गुणी बाळ मिळतं ना. त्यामुळे आईला आनंदच होतो. मग आई सगळा त्रास विसरून जाते.” आई हसत म्हणाली.
“म्हणजे आता पियू मावशीलापण बाळ होईल. माझ्यासारखं गुणी” असं म्हणत कबीरनं आईला मिठी मारली. तेवढ्यात, “ कबीर...” अशी बिल्डींगमधल्या मित्रमैत्रिणींची हाक ऐकून, “म्हणजे आजोबांना बाळ नाही होणार. उद्यापासून त्यांनापण मी सूर्यनमस्कार घालायला सांगतो.” कबीर स्वतःशीच पुटपुटत खेळायला पळाला.
“बापरे! काय काय सुरू असतं एवढ्याशा डोक्यात.” असं पुटपुटत आईने सुस्कारा टाकला.

---०००---

चित्रकाराची इतर चित्रे instagram वर इथे बघता येतील