आम्ही गोष्ट लिहून रायलो ५ - तेंदूपत्ता

तेंदूपत्ता

लेखक- स्वप्निल बोबडे, वर्ग ७ वा  जि. प. उ. प्राथमिक शाळा,गोवरी, जिल्हा चंद्रपूर

चित्र: प्रज्ञा ब्राह्मणकर

उन्हाळ्यात गावातले लोक तेंदूपत्ता तोडाले जाते, त्याच्या सोबत लहान पोर बी जाते. सकाळ झाली की चहा पिवून सगळे पोतं धरून जंगलाच्या वाटेन निघते. ऊन होवाच्या आधी समदे वापस येते. सगळ्यांच्या डोक्यावर मोठं मोठे पोते, गाठोडे भरून तेंदूपत्ता असते.
अंघोळ,जेवण करून घरातले समदे लोक मग तेंदूपत्ता निवडले अन त्याचे मुडके बांधाले बसते.  ८० पानाचा एक मुडका रायते. मोठया पानाच्या मुडक्याले चांगले पैसे पडते. लहान पानांचे मुडके फेकून देते ठेकेदार.

काही मुडके खोलून बी पायतो आतमंदी लहान पान गिन तर नाय टाकलं म्हणून. आता समदे पान सारख कशी रायल? रायतेत काही लहान, पान तोडतानी ते बी तोडल्या जातेते ,मग का फेकून देवावे त्यायले , लोक टाकते एक दोन चार पान त्या मुडक्यात. तसे मुडके ठेकेदाराच्या नजरेतून सुटले तर बरं,नाहीत तो घेत नाही,घेतले तर पैसे बराबर देत नाही.

मी पण आमच्या आई बाबा संग पानाले जातो. मोठी पान भराभर तोडतो, घरी मुडके बी बांधू लागतो, पान भराभर येचतो, समदे मुडके मोजून पोत्यात भरून घेतो. मुडके विकाले बाबासंग जातो.
मोठी रांग रायते . कवा कवा तर नंबर लागले लय टाइम होते. आपला नंबर आला का काळजात धस्स होते, ठेकेदार खोट तर काढणार नाय, मुडके फोडून तर पायणार नाही, पैसे बराबर देईल की नाही? लय विचार येतेत. अख्खा दिवस समद्या लोकायन ह्या पैशासाठी मेहनत केली असते,ते समदे पैस्याची वाट पायत रायते. चार पैसे झालं तर कनच्या बी कामी येतेत.

आमी समदे तेंदू पत्याच्या दिवसाची वाट पायतो.