आम्ही गोष्ट लिहून रायलो ६ - पूर

पूर

लेखन: सोनाली वाघमारे, वर्ग ६ वा, जि. प. उ. प्राथमिक शाळा,गोवरी, जिल्हा चंद्रपूर
चित्र: विशाल माने

आमचं घर मातीचं आहे. कुडाच्या भिंती आहे, मोडकतोडका टिनाचा दरवाजा आहे. घरात एक टिवी, एक कपाट आणि 2 बाजा आहेत. बाकी चिल्लर सामान आहे. आमच्या गावातून नाला वाहते. पाऊस पडला तर तो भरत नाही लवकर, पण भरला तर लवकरच रिकामा बी होते. दरवर्षी पावसात आमच्या भिंतीला वल(ओल)धरते. भिंती कमजोर होते. कुठं कुठं खचते बी. मी अन आई आम्ही कुड लिपत रायतो सारख.

ह्या वर्षी लगीतच पाणी पडला. नाला 4 वेळ आला. त्यादिवशी रातभर पाणी पडत होता.
आमची एक भिंत इतली वल्ली झाली की ते पडलच म्हणून आम्ही परेशान होतो.
समद घर वल्ल झालतं, कोठ बी जागा नोयटी बसाले. बाजा टाकल्या, तर नाव चादरी ब्लॅंकेट वले झाले.


मग आम्ही समदे टिवी अन कपाट एक बाजूले लावलो, अन त्या बाजूच्या कोपऱ्यात गुंडाळून बसलो. बहीण अन मी आई बाबाच्या मधात मुळकुटी मारून बसलो होतो. लाईट तर कवाच गेलती. आईनं एक टेंबा पेटवून ठेवला होता, त्याच्याच उजेडात जे दिसलं ते पायत होतो. कोणता साप,विंचू कीडा आला गिन तर, म्हणून बाबा काडी जवळ घेऊन बसले होते. पाणी थांबेना. इतक्यात जोराचा वारा आला, अन धपकन आवाज झाला. आमच्या घराची एक भिंत पडली. पाणी घरात घुसल.

आईनं अन मी समद चिल्लर सामान, भांडे,कपडे पोत्यात,प्लास्टिकच्या थैलीत भरून ठेवले होते. आता ते आम्ही बसलो त्या जागी वडावून घेतले. दोन्ही बाजा पक्क्या लावून दिल्या त्याच्या समोर. आमले बसायले आता जागाच नोयटी.
मग आमी शेजारच्या काकू कड गेलो अन त्याईच्या घरी बसून रायलो.


कवा रात्र सरते, कवा दिस उजाडंल, कवा पाणी थांबंल अस झालं होतं. डोळ्याले डोळा लागला नाही रातभर, मले रडू ये. कावून आम्ही गरीब हाओ? कावून आमले घर नाही असे वाटे.

मी आइले मनलं, "आमद एक बी ड्रेस नग आमाले! कांदा भाकर खाऊ. पुस्तक पेन बी नसाल तरी आमी करु कस बी. पण, एक खोली पक्की बांधू. आमी दोघी बी सुट्टीत कामाले येतो तुझ्यासंग, पण खोली पायजे ."

आईच्या मनात बी तसंच काही येत असेल, बाबकडं पायत ते मनली, "खोली असती तर असं दुसर्याच्या घरात आडोशाला कशापायी रायलो असतो? दारू पिऊन पैसे उरला तर बांधू खोली."

बाबा काय बी बोलला नाही. मले त वाटलं हे दोघं आता दुसऱ्याच्या घरात बी झगडून घेते का का?
पण, बाबा गप बसला म्हणून बरं झालं. मी पण पुन्हा शबुद नाय काढला.



सकाळी घराकडे पायलं तं घर नोयतच. फकस्त घराच्या खुणा होत्या. पाणी थांबला होता.

त्या दिशी आई,बाबा कामावर गेले नाही, मी अन माझी बहिण बी शाळेत गेलो नाही.  घर उभं कराचं होतं. भिंती लिपाच्या होत्या.
दिसभरात काम कराच होतं.

तीन दिस कष्ट करून आमी कसंबसं घर उभं केलं.

बेघरात आमचं नाव आता तरी येईल असं वाटे!