आम्ही गोष्ट लिहून रायलो ७ - शेवंता आजी

शेवंता आजी
लेखक: रेवती जुनघरी, वर्ग ५ वा जि. प. उ. प्राथमिक शाळा,गोवरी, जिल्हा चंद्रपूर
चित्र: विशाल माने


आमच्या गावात शेवंता आजी रायते. तिले सगळा गाव मानते.  एक डाव ते इलेक्शनले बी उबी झालती पण पडली. शेवंता आजीचं वैशिष्ट सांगाचं म्हणजे तिच्या गोष्टी. तिच्यावानी गोष्ट अख्या गावात कोणी बी सांगू शकत नाय.
हिवाळ्यात आमच्या गावात रातच्याले बदकम्मा खेळतेत तेलगू बाया अन् आम्ही सगळे पायतो शेकोटीजवळ बसून.

 
शेकोटीजवळ चार लोक बसले, का शेवंता आजीची गोष्ट सुरू होते. 'भाजीत मीठ जास्त पडलं' एवढं सांगाचं असलं, तरी आजी त्याले तिखट मीठ मसाला लावून १०मिनिट तरी ते गोष्ट सांगे. सगळा सिनेमा डोळ्यांपुढं येते तवा.
एक वेळा शेवंता आजीले कोणतरी मनलं, गुलबकावलीची कथा सांग म्हणून. ते कथा किती दिस चालली असंंल म्हणता? ८ दिस रात्रभर. १० वाजेपासून तर १ वाजेपर्यंत! आजी कथा रोज कथा सांगे, तवा कुठं संपली ते कथा. 

मले तर कथा ऐकता ऐकता झोप लागे, पण कथा बी ऐकुशा लागे. समदा राजवाडा, राजे, लोक, बगीचा, जंगल, परी नावनाव नजरेपुढं येतं. रातच्याला झोपेत त मी म्हणे, आजीचे डायलाग बडबड करो तवा. आजीच्या कथेत गावातल्या म्हणी राहाच्या. मले तर शाळेतल्या एक बी म्हणी आठवत नाय, पण आजीच्या कथेतल्या समद्या म्हणी याद आहेत. आजीवानी कथा कोणी बी नाय सांगत आमच्या शाळेतले शिक्षक पण नाय.

आमची टीचर म्हने कथा सांगणं कला हाय, समद्यास्नी नाय जमत, कथा सांगतानी रंगवून सांगणं, समद्याले बसवून ठेवणं अन 2/3 तास सतत बोलत रायनं मजाक नोहे. मले तर आता शेवंता आजीवाणी कथाकार होवायचं आहे.


तसा आजवर शाळेत कथा सांगण्यात मजाच नंबर पयला रायते, पण ह्या नंबर मले टिकवून ठेवाचा आहे.

मी तर कवा हिवाळा येते, अन् कवा शेकोटी पेटते, याची लय वाट बघत रायतो. मले हिवाळा, शेकोटी, शेवंता आजीच्या कथा अन् म्हणी लय आवडते.