आम्ही गोष्ट लिहून रायलो ८: अस्वल

अस्वल
लेखन: प्रगती जुनघरी, वर्ग ६ वा,  जि. प. उ. प्राथमिक शाळा,गोवरी, जिल्हा चंद्रपूर
चित्र: विशाल माने

 

अस्वल काळ्याकाळ्या रंगाची रायते. तिच्या अंगावर जाडजाड, लांबलांब केस असतेत. ते म्हणे गादगुल्या लावून, हासू हासू मारते.
अस्वलेले बोर, मोह ,मध लय आवडते म्हणे.

मोहाच्या टायमले गावातले काही बाया माणसं मोह येचाले जातेत. त्याईचे झाड ठरवून राहते म्हणे. समदे सकाळी उजडच्या आनदीच मोह येचाले निघते. टोपलीत एक-एक मोह जमा करून आणतेत, अन् घरी वारू घालतेत. मस्त वास येते मोहाची. ताज्या मोहाची पुरणपोळी करतेत. मस्त लागते. 

लोक आमच्या गावात किस्सा सांगतेत. एक बाई म्हणे, सकाळी मोह येचाले गेली. बाहेर अंधारच होता. ते बाई म्हणे आपल्या झाडाजवळ गेली, तर तिले कोणतरी दुसरी बाई मोह एचतानी दिसली. ते बाई घोंगड पांघरून होती.

अंधाराच्यान ते काळी काळी घोंगड पांघरलेली, मोह एचणारी बाई पाहीन ह्या बाईले राग आला. पदर खोचून माराले धावली ते! रागामंदी धावतच अन् बोंबलतच गेली म्हणे, "कोण होव तू! उठते का नाय माझ्या झाडाखालून!!" अन् तिनं म्हणे जोरात दोन्ही हाताने त्या बाईच्या पाठीवर धपकन मारलं.

का होत आहे हे काई त्या झाडाखालच्या बाईला समजलं नाही, ते अचानक झालेला हमला पाहून घाबरून पराली. जशी ते बाई उठून परतानी ह्या बाइले दिसली, ते बाईची बी घाबरून दातखिळीच बसली. "आव माय! आव माय!! आस्वल होती ते", असं समद्या गावले तिनं मंग सांगलं.

खरं वाटत नाय,पण खोटं बी वाटत नाय.