करोना व्हायरसची गोष्ट

करोना व्हायरसची गोष्ट
लेखनः सूनृता सहस्त्रबुद्धे | चित्रेः मैत्रेयी मुजुमदार
 


याचं नाव आहे करोना व्हायरस. त्याला फिरायला आवडतं. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे, एका देशातून दुसऱ्या देशात! आपण एकमेकांना टाळी देतो, किंवा शिंकतो तेव्हा तो पटकन एकाकडून दुसऱ्याकडे उडी मारतो आणि निघतो फेरफटका मारायला! तो इतका म्हणजे इतका छोटा असतो की साध्या डोळ्याला तर तो दिसूच शकत नाही! एखाद्या ढब्बाड्या भिंगातूनच तो दिसतो.

 

तो जेव्हा आपल्या शरीराच्या बाहेर असतो तेव्हा तो फारसं काही करू शकत नाही. पण, जेव्हा तो आपल्या शरीरात जातो, तेव्हा मात्र त्याला दंगा करायला प्रचंड आवडतो. तो आपल्या शरीरातल्या पेशींवर दादागिरी करतो आणि आपल्या शहाण्या पेशींना वेड्यासारखं वागायला लावतो. त्यामुळे मग आपल्याला आजारी पडायला होऊ शकतं.

आजारी माणसांच्या किंवा म्हाताऱ्या माणसांच्या शरीरात दादागिरी करणं व्हायरसला जरा सोपं पडतं. ही माणसं त्यामुळे पटकन आजारी पडू शकतात.

सध्या जगात त्यांनी बऱ्याच माणसांच्या शरीरात घुसखोरी केलीये. अजून माणसांना त्यांनी त्रास देऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी मिळून काही गोष्टी करायच्या ठरवल्या आहेत:
१. आपण जेव्हा जगात वावरतो तेव्हा कोणाकडून तरी व्हायरस आपल्याकडे येऊ शकतो. आपल्याला तो दिसत नसल्यामुळे तो आपल्याकडे आलेला आपल्याला कळत नाही. म्हणून आपण ठरवलंय, की करोना व्हायरसचा हा धांगडधिंगा कमी होईपर्यंत आपण जरा थोडे दिवस घराबाहेर पडायचं नाही. म्हणजे आपल्याकडे व्हायरस येण्याची शक्यता कमी होईल!

२. जगातल्या काही ठिकाणी करोना व्हायरस जास्त पसरला आहे. जी माणसं अशा ठिकाणी प्रवास करून आली आहेत त्यांना थोडे दिवस इतर कोणाला भेटायला परवानगी द्यायची नाही असंही आपण ठरवलं आहे. यालाच लोकांना 'quarantine ' मध्ये ठेवणं असं म्हणतात. त्यांच्याबरोबर व्हायरस आला आहे का नाही, याची तपासणी केल्यावरच त्यांना इतरांना भेटायची परवानगी मिळेल.

३. घरात किंवा बाहेर वावरताना आपण अनेक गोष्टींना सतत हात लावत असतो. घराचं दार, कडी, लिफ्टचं दार, दुकानातून आलेल्या वस्तू. इथे वेगवेगळ्या लोकांचे हात लागलेले असतात. तिथेच आपला हात लागतो आणि मग तो हात आपल्या नकळत नाकात, तोंडात, डोळ्यात जाऊ शकतो. करोना व्हायरसला शरीरात शिरायचे हे सगळ्यात बेस्ट मार्ग आहेत. करोना व्हायरस न शिरता जरी इतर जंतू आत शिरले, तरी आपण आजारी पडू शकतोच, आणि एकदा आजारी पडलो की तर मग करोनाला आपल्याकडे येणं अजूनच सोपं! म्हणून, सतत साबण लावून हात धुवायचे !

अटक मटक चवळी चटक.... हे गाणं दोनदा पूर्ण म्हणेपर्यंत हात धुवायचे हां! तरच ते स्वच्छ होतात!

मग, युद्धात उतरायला तयार? साबण आणि पाणी घेऊन सज्ज व्हा! आईबाबा बाहेर फिरायला जाऊ म्हणाले, तर त्यांना थांबवा! थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे, मग आपण परत मज्जा करायला मोकळे!

--------------

याचं सुरेख अभिवाचन आपल्या एका ताईने म्हणजे 'स्मिता पाटील' यांनी केलं आहे. ऐकायचं असेेेलच.. चला ऐकूया:

------------

या कथेच दृकश्राव्य अभिवाचन आपल्या आणखी एक वाचक स्वप्नाली जाधव यांनी केलं आहे. ज्या मुलांना ऐकण्यासोबत काहीतरी बघावंसं वाटतं त्यांच्यासाठी या अभिवाचनाचा वापर करता येईल

-------------

सूचना: सदर लेखन कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला नसून, मुलांना या आजाराचे कारण आणि करायच्या योजना याबद्दल माहिती समजावी म्हणून ती सोप्या शब्दात देण्याचा प्रयत्न केला आहे.