थापाड्या अजगर (गोष्ट)

थापाड्या अजगर
लेखनः डॉ. विशाल तायडे
चित्रः गीतांजली भवाळकर

संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळायला आला होता. जंगलात झाडांच्या सावल्या लांबवर पसरलेल्या होत्या. सगळीकडे शांतता होती. नदीकाठी एकट्या सदू अजगराची तेवढी लगबग सुरू होती. आपलं अवाढव्य आणि लांबलचक शरीर सांभाळताना तो घामाघूम झाला होता. आपली मान वळवत झाडातून डोकावणाऱ्या सूर्याकडे त्याने पाहिले. “अरे बापरे! आता हा सूर्य लवकरच मावळणार असं दिसतंय. त्यापूर्वी आपलं काम आवरायला पाहिजे.” तो स्वतःशीच म्हणाला आणि पुन्हा त्याने आपली हालचाल वाढवली.

कारणही तसंच होतं. आज सदूने आपल्या काही खास मित्रांसाठी पार्टी ठेवली होती. तो जंगलातल्या नदीकाठच्या वडाच्या झाडाखाली राहत असे. तिथेच त्याने सगळ्यांना बोलावले होते. पार्टीसाठी सदूने नदीतून कित्येक मासे पकडून आणले होते. तेही वेगवेगळ्या जातीचे. झाडाखाली त्याने माशांचा छानसा ढीग करून ठेवला होता. फिशपार्टी कोणीच चुकवणार नाही याची त्याला खात्री होती.

अपेक्षेप्रमाणे थोड्याच वेळात त्याचे मित्र गोळा झाले. बारक्या तरस, काळतोंड्या माकड, नकटा कोल्हा आणि डूचक्या लांडगा. ही टोपणनावं सदुनेच त्यांना दिली होती. या मित्रांनीही त्याचं एक टोपणनाव ठेवलं होतं. थापाड्या अजगर! त्याचं कारणही तसंच होतं. सदू अजगराला थापा मारायला खूप आवडतं. तो अशा काही गोष्टी सांगायचा की, ऐकणारा थक्क होऊन जात असे. त्याच्या मित्रांनाही त्याच्या या सवयीची सवय झाली होती.

सगळे मित्र माशांच्या ढिगाभोवती गोल रिंगण करून बसले. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले होते. सदूने इशारा करताच पार्टी सुरू झाली. प्रत्येकाने एक-एक मासा तोंडात टाकत गप्पांना सुरुवात केली.
“सदू, या इथे नदीकाठी तू केव्हापासून राहतोस?” कोल्ह्याने काहीतरी बोलायला हवे म्हणून विचारले.
“पाच पिढ्यांपासून! होय, आम्ही पाच पिढ्यांपासून इथे या नदीकाठच्या वडाच्या झाडाखाली राहत आहोत.” सदूच्या थापा सुरू झाल्या होत्या. मित्रांच्याही ते लक्षात आले होते, पण त्यांना आज सदू अजगरामुळे फुकटात मासे खायला मिळाले होते. त्यामुळे त्यांना सगळं निमूटपणे ऐकून घेणे भाग होते.
“वा! वा! फार गौरवशाली इतिहास आहे तुमच्या अजगर घराण्याचा.”, एक मासा तोंडात टाकत काळतोंड्या माकड म्हणाले.
“मग काय? आमच्या खापरपणजोबांमुळे एकदा या जंगलावर आलेलं संकट टळलं होतं.” सदू म्हणाला.
“ते कसं बरं?”, नकट्या कोल्ह्याने विचारलं.
मग सदूने एक मासा तोंडात टाकला. नंतर आपलं लांबलचक शरीर गाड्यांचे टायर एकावर एक रचल्यासारखे गोळा करून घेतलं. आता हा काहीतरी मोठी थाप मारणार हे मित्रांच्या लक्षात आलं होतं. सदू पुढे बोलू लागला, “फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा या नदीला महाभयंकर पूर आला होता. पुराचं पाणी जंगलात शिरून होत्याचं नव्हत झालं असत, पण माझे खापर पणजोबा एक बहादूर अजगर होते. माझ्यापेक्षाही धिप्पाड आणि लांब. त्यांनी क्षणाचाही विचार न करता नदीच्या पुराचं पाणी पिऊन टाकलं आणि या जंगलाला वाचवलं होतं. आलं लक्षात ?”

हे ऐकून खरं तर सगळ्यांना हसू फुटत होतं, पण सदूचे मासे खाऊन त्याच्यावरचं हसणं बरं दिसलं नसतं म्हणून ते गप्प बसले. उलट “वा, वा” म्हणून मित्रांनी स्वतःच्या तोंडात एक-एक मासा टाकला.
मग काय सदूलाही चेव चढला. त्याने पुढे सांगायला सुरुवात केली, “तुम्हाला आमच्या घराण्याविषयी काही माहितीच नाही.” मित्रांनी नकारार्थी माना हालवल्या.
मग सदूने सुरू केलं, “माझे काही भाऊबंद तर अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेले आहेत.”
हे ऐकून बारक्या तरसाला ठसकाच लागला. काळतोंड्या माकडाला तर हसूच आवरेना.
त्याला हसताना पाहून सदूला राग आला. “काळतोंड्या, काय झालं तुला हसायला? मी काय थाप मारतोय का? तुम्हा माकडांना काय माहीत आम्हा अजगरांचा इतिहास? तुमचे तर सारे आयुष्य या जंगलात झाडांवर उड्या मारण्यात जाणार आहे.”
सदूचा राग पाहून माकडाने कसं-बसं आपलं हसू आवरलं, पण अजगराचा राग काही शांत झालेला नव्हता. तो पुन्हा कडाडला, “थांब, तुला पुरावाच देतो.” मग तो लांडग्याकडे वळाला, “ए डुचक्या, चल, तुझा मोबाईल काढ आणि इंटरनेट सुरू कर.”
इतक्या वेळ लांडगा त्यांच्या बोलण्यात न पडता निमूटपणे मासे खात होता. तो एका डोळ्याने आंधळा असल्यामुळे सदू त्याला डुचक्या म्हणत असे.
अजगराच्या रागाचा फटका आपल्याला बसू नये म्हणून त्याने पटकन खिशातून आपला मोबाईल बाहेर काढला आणि इंटरनेट सुरू केलं.
“हं, चल. यू-ट्यूबवर जाऊन ऍनाकोंडा असं टाक.” लांडग्याने निमूटपणे तसं केलं. क्षणभरात मोबाईलच्या स्क्रीनवर भला मोठा अजगर झळकला. अजगराच्या वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिप दिसू लागल्या. मग त्यातल्या एका क्लिपकडे इशारा करीत सदू म्हणाला, “हां, हा व्हिडिओ ओपन कर.”
लांडग्याने तसं करताच एक महाकाय अजगर वळवळताना दिसू लागला. तो सदूपेक्षा कितीतरी मोठा होता. सगळे मित्र मासे खायचं विसरून अगदी आवक होऊन ते पाहत होते.
“पाहिलंस, काळतोंड्या! हा माझा चुलतभाऊ आहे.” सदूने जाहीर केले.
खरं तर तुझा चुलतभाऊ अमेरिकेत कसा? हे माकडाला विचारायचं होतं, पण पार्टी तर दूर राहील, आपल्यालाच अजगराच्या शेपटीचा तडाखा खावा लागेल या भीतीमुळे तो शांत बसला. मग त्यांच्या मनातली शंका ओळखून सदूनेच सांगायला सुरुवात केली. “आता तुमच्या मनात आलं असेल की, माझा चुलतभाऊ अमेरिकेत कसा? बरोबर?”
मित्रांनी फक्त अर्धवट मनात हालवल्या. मग आपली लांबलचक जीभ बाहेर काढून सदूने एक भला मोठा मासा उचलला आणि आपल्या घशामध्ये सोडला. तो मासा तरसाच्या आकाराचाच असावा. मासा अजगराच्या पोटात हळूहळू जाताना सगळ्यांना दिसत होता. तरसाने मोठा आवंढा गिळला.
मासा पोटात गेल्याची खात्री झाल्यावर सदू बोलू लागला, “गड्यांनो, त्याचं असं आहे बघा. आमचे काका लहान असताना चुकून इथे या नदीकाठी आलेल्या जहाजात शिरले. ते जहाज पुढे अमेरिकेला गेलं. जहाज तिथल्या ऍमेझॉन नदीच्या परिसरात पोहचल्यावर ते हळूच जहाजातून सरपटत बाहेर पडले आणि तिथल्या जंगलात गायब झाले. त्यांना तिथलं हवामान मानवलं. मग काकांनी तिथेच राहायचा निर्णय घेतला. त्यांनी तिकडे आपलं नावही बदलून ‘ऍनाकोंडा’ ठेवलं. हा या व्हिडिओत दिसतो ना तो माझा चुलतभाऊ आहे. सख्खा चुलतभाऊ! आलं लक्षात ?”

आता मित्रांना होकारार्थी माना हालविण्याशिवाय पर्यायच नव्हता. अमेरिकेतील ऍमेझॉन नदीच्या परिसरात असलेल्या जंगलात महाकाय ऍनाकोंडा साप असतो हे नकटा कोल्हा ऐकून होता. त्यामुळे सदू थापा मारतोय हे त्याच्या लक्षात आलं होतं, पण काही बोलता त्याने एक मासा तोंडात टाकला.
“अरे! हे तर काहीच नाही. अमेरिकेत ऍनाकोंडावर माणसांनी अनेक चित्रपट बनवले आणि रग्गड पैसा कमावला आहे. काळतोंड्या, ते चित्रपटही तू यू ट्यूबवर पाहू शकतोस.”
काळतोंड्या डोळे बंद करून माशाचा आस्वाद घेत होता. आपले नाव ऐकताच त्याने डोळे उघडले आणि “हो, हो” केले.
“एवढं मोठ्ठं ऍमेझॉन जंगल, पण तिथे खरी दहशत आमचीच आहे. ऍनाकोंडाचं नाव काढताच भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळतं. तसं आम्हाला जगभर सारेच भितात. आता इथे आपल्या जंगलातच बघा ना, तुम्ही भलेही सिंहाला जंगलाचा राजा समजत असाल, पण तोही आम्हाला घाबरतो. समजलं का? माझ्याजवळ येण्याची कोणाची हिंमत नाही. आता तुम्ही माझी दोस्त मंडळी आहात म्हणून तुम्हाला मी जवळ घेऊन बसलोय. नाहीतर एकदा एका सिंहाला माझ्या शेपटीच्या एकाच फटक्यात याच नदीत बुडवून टाकलं होतं, माहीत आहे का?”
आता तर मात्र अजगराचं अतीच झालं होतं, कारण सगळ्या प्राण्यांना माहीत होतं की, काही वर्षांपूर्वी जंगलात फिरताना अजगराने सिंहाच्या छाव्यावर हल्ला केला होता. त्यानंतर राजा सिंहोबाने अजगराला जंगलात यायलाच बंदी घातली होती. तेव्हापासून अजगराला इथे या नदीकाठी राहावं लागत होतं. पण आपल्याला काय करायचं? असा विचार करत नकट्या कोल्ह्याने माशांच्या ढिगावर नजर फिरवली. ढीग खूप कमी झाला होता. नकट्याच्या लक्षात आलं की, बारक्या तरस त्यांच्या गप्पात लक्ष न घालता फक्त माशांवर ताव मारण्यात मग्न होता. त्याचं एकामागे एक तोंडात मासे टाकणे सुरू होते. अर्धा ढीग तर या बारक्यानेच संपवला असेल आणि आपण बसलो या मूर्ख अजगराच्या थापा ऐकत. बरं, स्वतः अजगराला मासे खाण्यात फार काही रस नव्हता. आतापर्यंत त्याने फार तर फार एक- दोन मासे खाल्ले असतील. त्याला फक्त आपल्या गप्पा ऐकणारे कोणीतरी पाहिजे होते.

बोलता-बोलता सदू मान उंचावून इकडे-तिकडे पाहत होता. जणू तो आणखी कोणाची तरी वाट बघत असावा. काळतोंड्याने विचार केला की, आपण नेहमीचे सगळे मित्र तर इथे जमलो आहोतच. मग याने आणखी कोणाला बरं बोलावलं असेल?
न राहवून त्याने अजगराला विचारलंच, “सदू, तू कोणाची वाट पाहत आहेस? आणखी कोणी येणार आहे का पार्टीला?”
“हं, माझ्या एका दूरच्या भावालाही मी बर्थ डे पार्टीला बोलावलं होतं, पण तो अजून का आला नाही काही कळेना?”
“तुझा भाऊ? त्याला कधी पाहिलं नाही?” बारक्या पहिल्यांदा काही बोलला. आपण त्यांच्या गप्पात काही लक्ष देत नाही असंं वाटायला नको म्हणून त्याने तोंड उघडलं होतं.
“हो, बरोबर आहे. तो इथे नसतोच. तो पलीकडच्या जंगलात राहतो. त्या अमेरिकेतल्या ऍनाकोंडाचा सख्खा भाऊ. स्वभावाने जरा रागीट आहे, पण तुम्हाला काही करणार नाही. त्याला खूप कामं असतात. उशीरा का होईना, पण तो नक्की येईल.” मग तो माकडाकडे वळून म्हणाला, “काळतोंड्या, जरा या वडाच्या झाडावर चढून बघ बरं, तो येताना दिसतोय का ते?”
लगेच माकडाने हातात वडाची एक पारंबी धरून झाडावर झेप घेतली. सगळीकडे नजर फिरवून तो पुन्हा खाली आला.
“नाही, बाबा. लांबपर्यंत कोणीच येताना दिसलं नाही.”
“बरं, बरं आपण आणखी काही वेळ वाट पाहू. तर मी काय सांगत होतो बरं?” त्याने आठवण्याचा प्रयत्न केला.
“तू काही सांगत नव्हता, तर तू थापा मारत होता.” नकटा कोल्हा अजगराला ऐकू येणार नाही अशा बेताने हळूच कुजबुजला. तरसाला ते ऐकू गेलं. तो मोठ्याने हसला. त्यामुळे अजगराचं लक्ष त्याच्याकडे गेलं. ते पाहून नकट्या कोल्ह्याचं धाबं दणाणलं. बापरे! बारक्या तरस बोलून गेला तर आपली काही खैर नाही. पण अजगर आपल्याच धुंदीत होता. त्याने बारक्याच्या हसण्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
मग विषय बदलत कोल्हाच पटकन म्हणाला, “काय तुम्ही अजगर मंडळी. ग्रेटच! खरं तर जंगलाचा राजा तुम्हालाच करायला पाहिजे. त्या मूर्ख सिंहाला उगीचच सगळे राजा म्हणतात.” कोल्हा तसा धूर्तच. तो अजगराच्या मनातलं बोलला होता.
पण त्यामुळे अजगराची कळी खुलली.

“अरे! आमच्या शौर्याचे जगभरात एकापेक्षा एक किस्से आहेत. एक गोष्ट तर मी तुम्हाला सांगायचंच विसरलो.” सदू पुन्हा आपल्या शरीराचा स्वतःभोवती विळखा घालून बसला.
“आता हा आणखी नवीन काय पुडी सोडणार आहे देव जाणे.” लांडग्याच्या मनात येऊन गेलं.
“तुम्हाला चीन देश माहीत आहे का?” अजगराने पुन्हा सुरुवात केली.
सगळ्यांच्या तोंडावर प्रश्नचिन्ह होते. त्यांनी नकारार्थी मान हालवली.
“अरे, काय तुम्ही? जरा जगाची माहिती ठेवत जा. तो मोबाईल काही फक्त फेसबुक आणि व्हॉट्स ऍप वापरायला नसतो. इंटरनेटवरून जगाची इतर माहितीही घेत चला.”
त्यावर सगळ्यांनी हो, हो म्हणत माना हालवल्या व एक-एक मासा तोंडात टाकला.
सदू पुढे बोलायला लागला. “चीन नावाचा एक मोठा देश आहे. आपल्या आशिया खंडातच येतो तो. हिमालय पर्वताच्या अलीकडे आपण आणि पलीकडे चीन आहे. या चीनमध्ये एक मोठी भिंत आहे. तिला “चीनची भिंत” म्हणून सगळे ओळखतात. खूप मोठी आहे ती. वीस हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांब पसरलेली. तिच्याकडे पाहिलं तर तुम्हाला एखाद्या अजगराचीच आठवण येईल. आताची थाप काहीतरी खासच आहे, याची मित्रांना कल्पना आली होती. तेही लक्ष देऊन ऐकू लागले. मग थापाड्या अजगर पुढे म्हणाला, “प्राचीन काळी ही भिंत आमच्यासाठी बांधली होती. हवं तर बघ रे बारक्या गूगलवर सर्च करून.”
बारक्या तरसाने माशाचा घास गिळत गूगल सुरू केलं. सर्चमध्ये “चायना वॉल” टाकल्यावर लांबलचक भिंतीचे फोटो आले. खरोखर एखाद्या लांब अजगरासारखी ही भिंत वाकडी-तिकडी पसरलेली होती. क्षणभर चारही मित्रांना थापाड्या अजगराचे म्हणणे खरेच असावे, असे वाटले.

त्याचवेळी पाठीमागच्या झाडीतून “फुस्स, फुस्स” असा आवाज आला. सदूने लगेच ओळखले.
“अरे, माझा भाऊ आला वाटतं.” तो असं म्हणेपर्यंत एक काळाकुट्ट आणि भयंकर वाटणारा अजगर वडाच्या झाडावरून लटकत खाली येत होता. तो सदूपेक्षा मोठा होता. त्याच्या अंगावर पिवळसर पट्टे होते. त्याचे डोळे पाहूनच एखाद्याला धडकीच भरावी. त्याने झाडावर लटकतच थापाड्या अजगराची गळाभेट घेतली आणि त्याच्या कपाळाचे चुंबन घेत त्याला “हॅपी बर्थ डे” केलं. थापाड्याला खूप आनंद झाला.

तो म्हणाला, “चल भावा, आज मी तुला खास या पार्टीला बोलावलं आहे. सकाळपासून नदीमधून चांगले मासे शोधून काढले. तुझ्या आवडीचे पापलेट मासे पकडून आणले आहेत. या माझ्या मित्रांना भेट आणि कर मासे खायला सुरुवात.”
असं म्हणत दोघांनीही त्या चार मित्रांकडे पाहिलं. ते गोल रिंगण करून बसले होते, मात्र आता त्यांच्या समोरचा माशाचा ढीग संपला होता. एक-दोन लहानसे मासे एवढे शिल्लक होते. ते पाहून थापाड्याची तळपायाची आग मस्तकात गेली.
“गाढवांनो, मला गप्पांमध्ये गुंतवून तुम्ही सगळे मासे खाऊन टाकले तर. तुम्हाला म्हटलं होतं ना की माझा भाऊही पार्टीला येणार आहे ते.”
त्या भावालाही संताप अनावर झाला होता. तो मोठ्या आशेने माशांवर ताव मारायला आला होता. त्याने आपली लांबलचक जीभ बाहेर काढत उरलेले दोन मासे गट्टम केले.
मग तो थापाड्याला म्हणाला, “भावा, त्रागा करू नकोस. मी या चौघांनाही खाऊन टाकतो. खूप दिवसांपासून माकडाचं आणि तरसाचं मास खाल्लेलं नाही. यांनी मासे संपवून मला ती संधी मिळवून दिली आहे.”
त्या महाभयंकर अजगराचे बोलणे ऐकून चौघांचेही धाबे दणाणले. बापरे! मासे इतके महाग पडतील असे वाटले नव्हते, असं मनाशी म्हणत चौघांनी एक क्षणही दवडू न देता तिथून धूम ठोकली.
थापाड्या “अरे, थांबा-थांबा. भाऊ गंमत करतोय.” असं म्हणत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करीत होता, पण तिथे थांबण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. पळता-पळता बारक्या म्हणाला, “थापाड्याचा भाऊही थापाड्याच दिसतोय.”
त्यावर नकट्या कोल्हा उत्तरला, “नको रे बाबा यांच्यावर विश्वास ठेवायला. पळा जोरात.”

 

ही कथा आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल श्री फारूक काझी यांचे विशेष आभार