फुलझाड (रूपक कथा)

फुलझाड

लेखन: गुलाब बिसेन, कोल्हापूर

चित्रकार: सुवर्णा भदाणे

 

किसनपूरूरनावाचे एक टुमदार गाव होते. त्या गावाबाहेर मंदिराशेजारी एक सुंदर रंगीबेरंगी फुलाचे झाड होते. त्या झाडाला वर्षभर रंगीबेरंगी फुले लागायची. झाड मंदिराशेजारी असल्याने मंदिरात येणारे भाविकभक्त देवाच्या चरणांवर त्याची फुले वाहायचे. झाड बारमाही फुलांनी लगडलेले असल्यामुळे झाडांवर फुलांचा मकरंद खाणारे भुंगे आणि पक्ष्यांची सतत मांदियाळी असायची.

 

गावात राहणार्‍या शाळकरी मुलेमुली झाडाखाली पडलेली फुले वेचुन आणत. फुलाला असणार्‍या सुगंधामुळे त्या फुलांचे गजरे करून मुली डोक्याला लावायच्या , तर कधी शाळेत जयंती पुण्यतिथींना हार - तुरे बनवायच्या. कधी कधी झाडाची फुले तोडुन देवाला वाहायच्या. उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हामुळे ही मुलं फुले वेचायला येताना झाडाला घालायला पाणी घेवून यायचे. त्यामुळे भर उन्हातही हे झाड हिरवेगार आणि फुलांनी लगडलेले असायचे.

 

फुलपाखरे पक्षी, किडे आणि मुलेमुली यांच्या सतत येण्याने झाड हळुहळु कंटाळलं. "इथं मेलं एकांत नावाची गोष्टच नाही. सारखं कोण न कोण असतोच फुलांच्या मागे.", ते स्वत:शीच पुटपुटायचे. एकदा त्याने सर्वांना कंटाळून आपल्या कळ्यांना फुल होण्यापासून थांबवलं. त्यामुळे झाडाला फुले यायची थांबली. कळ्या झाडावर जशाच्या तशा राहुन शेवटी न उमलताच गळू लागल्या. त्याचा फटका फुलपाखरे , पक्षी आणि मुलामुलींना बसू लागला. झाडाला फुलेच नसल्याने मकरंद खाणारे किडे , पक्षी झाडावर यायचे थांबले. मुलंमुलीही हळुहळु यायच्या बंद झाल्या. 

 

सर्वांनी आपला मोर्चा दुसर्‍या झाडांकडे वळवला. झाडाला आता मोकळं मोकळं वाटु लागलं. सगळं कसं शांत शांत! एकांतच एकांत! कुणाची कटकट नाही की फटफट नाही. अशा एकांताची झाड कित्येक दिवसापासून वाट बघत होता. आता तो एकटा निवांत राहु लागला. असेच झाडाचे थोडे दिवस मजेत गेले. परंतु उन्हाच्या कडाक्याने आठवडाभरातच पाण्याअभावी झाडाची पाने सुकु लागली. हळुहळु झाडाची हिरवळ नष्ट होवू लागली. एकटेपणाही त्याला सतावू लागला. पाण्याअभावी कोरडा पडलेला तलाव जसा सुकुन जातो, तसं झाड सुकत गेलं. त्यामुळे झाडाला आपली चूक हळुहळु लक्षात येवू लागली. पाण्याशिवाय जीवन नाही हे त्याला कळुन चुकले. पण तो काय करणार? उन्हाच्या झळांमुळे जमिनीतील पाणीही खूप आत गेल्याने त्याला ते पाणी मिळवणेही अशक्य होवून गेले. झाड खूपच चिंताग्रस्त झालं. यातून काही मार्ग निघावा असे त्याला वाटु लागले. पण मार्ग कोण काढणार ? कारण हे संकट झाडाने स्वत:च अंगावर ओढवून घेतलं होतं. 

 

शेवटी त्याने ठरवले, "आपली सर्व शक्ती एकवटुन आपल्या संपूर्ण कळ्या शेवटच्या फुलवूया." असा त्याने निर्धार केला. दुसर्‍या दिवशी पहाटेच त्याने आपली संपूर्ण शक्ती एकवटुन झाडावरील संपूर्ण कळ्या एकदाच्या फुलवल्या. कळ्या फुलताच त्यातून पहाटेच्या मंद झुळकेसोबत सुगंध हवेत दरवळु लागला. भुंगे आणि पक्ष्यांना चाहुल लागताच, त्यांनी झाडाच्या दिशेने धाव घेतली. झाडाला फुले लागल्याची वार्ता क्षणार्धात वार्‍याच्या झुळकेसोबत वार्‍यासारखी पसरली.

पक्षी, भुंगे आणि मुलं आनंदाने नाचत झाडाकडे धावत आली. मुलांनी सोबत झाडाला घालायला पाणी आणले. झाडाला पाणी घातलं. मुली झाडाभोवती फेर धरून आनंदाने नाचु लागल्या. आठवडाभर तहानलेलं झाड पाणी पिऊन तृप्त झालं. सगळीकडे आनंदाची उधळण बघुन झाड आनंदाने डोलु लागलं.