फ्लाइंग एंजल (कथा)

 फ्लाइंग एंजल

लेखन: ज्योती गंधे

चित्रे: गीतांजली भवाळकर

सई जोरजोरात पळत होती. ग्राउंडला तिची ही तिसरी फेरी होती. प्रत्येक वेळेला तिचा वेग कमी न होता उलट वाढत होता.एक फेरी म्हणजे २५ मीटर तरी अंतर होते. पळत होती पण मनात मात्र परवाच्या नाटकाचेच विचार होते. 

शाळेच्या स्नेहसंमेलनातील ‘शेवटी जय खऱ्याचाच’ या नाटकात तिने राजकन्येच्या दुष्ट मैत्रिणीची भूमिका केली होती. खरं तर सई एक अत्यंत चांगली मुलगी होती. तिला हा रोल देताना कुलकर्णी बाई म्हणाल्या होत्या, “सई,आपण नसतो तसे दाखवण्यातच खरं अभिनय कौशल्य.” सईला खरं तर नव्हतं आवडलं पण, आईदेखील तेच म्हणाली आणि तिने तो रोल रंगवण्यासाठी तिला खूप मार्गदर्शन केलं. खरंच सईने ती भूमिका इतकी सुंदर केली की, अभिनयाचं  बक्षीसही तिला मिळालं. तसं कौतुक झालं तिचं पण “छान काम केलंस”असं एका वाक्यात.दुसरं वाक्य लगेच अन्वीबद्दल असायचं, “राजकन्या म्हणून अन्वी किती शोभून दिसली नाही!? गुलाबी गाऊन किती छान दिसत होता तिला. लांबसडक मोकळे केस, चमचमणाऱ्या खड्यांचा मुकुट, फारच सुरेख शोभत होता. खरीखरी राजकन्याच दिसत होती.”

सारखं हेच  ऐकून सईला फारच राग येत होता. विशेषतः देशपांडेबाईंनी तिच्या अभिनयाचं कौतुक केल्यावर तर सई खूप खुश झाली होती. त्यांनी तिच्या प्रत्येक  दृश्यातल्या अभिनयाची इतकी स्तुती केली की ऐकताना तिला खरंच खूप भरून येत होतं ऐकताना. आईने घेतलेली मेहनत, त्यावेळी आई समजून सांगत असलेले बारकावे आणि बाईंच कौतुक सगळं कसं तेच होतं आणि त्यामुळे तिला आणखीनच छान वाटत होतं. बाई म्हणाल्या होत्या, “आता बक्षीस मिळाल्यावर गेला न राग बाईंवरचा ?” “नाही हो बाई, मी नव्हते रागावले तुमच्यावर.” तिला आणखीही काही बोलायचे होते, पण तेवढ्यात अन्वी आली आणि बाई जणू विसरूनच गेल्या सई तिथे आहे ते. त्यांनीदेखील अन्वीचंच कौतुक सुरु केला. आताही तिला तेच आठवलं आणि मनातल्या मनात धुसफुसत आणखीनच जोरजोरात पाळायला लागली. आज का कुणास ठाऊक, पण बाबांबरोबर ती वॉकला म्हणून आली आणि चालायच्या ऐवजी रनिंग करायला सुरवात केली. बाबा अवाक् होऊन पहात राहिले होते.

शेवटी सई एकदाची थांबली आणि बाबांजवळ धापा टाकत बसली. बाबा म्हणाले, “सई, बाळा, काय मस्त धावतेस तू! ह्या इतक्या जीर्ण झालेल्या बुटांमध्येही एवढा स्पीड? तु नेहमी नेटाने धावणार असशील तर, तुला आपण नवे धावण्यासाठीचे बुट घेऊ शकतो.” सईला धावून बरं वाटलं होतं. तिने होकार दिला आणि खरंच बाबा संध्याकाळी तिला घेऊन गेले आणि बुट घेऊन आले. “आता रोज माझ्याबरोबर येत जा.” असं म्हणून तिला रोज न्यायला लागले.

सईचे बाबा स्वतः एक खेळाडू असल्याने तिला टिप्सही देऊ लागले. तिची आई एक डायेशिअन होती. त्यामुळे तिने सईसाठी मस्त डाएटही प्लान केला. “याप्रमाणे तिचं डाएट पाळायचंच आणि रुटीनही काटेकोर सांभाळायचच.” हे आईबाबांनी पक्कं ठरवून टाकलं.

हळू हळू सई खूपच रमली. सकाळी न उठवता उठायला लागली, कोचने सांगितलेले सर्व व्यायाम मनापासून करू लागली. आई तिचं डाएट छान सांभाळत होती. सई कधी भुकेने व्याकूळ झाली नाही, की अतिखाण्यामुळे जडावली नाही. नेहमी अगदी फ्रेश असायची आणि तेही चांगल्या मूडमध्ये! अभ्यासपण सई खूप छान करायला लागली. कायम उत्साहात आणि सगळी कामे मनापासून. धावण्यासाठी एवढे कष्ट घेत होती तरी कंटाळा कशाचाच केला नाही तिने.  युनिट टेस्टमधले सईचे मार्कही वाढले होते. सईलापण छान वाटत होतं की तिनेही कधी तक्रार केली नाही, की कंटाळा केला नाही.

बाबांनी तिला मिल्खासिंग, पी.टी.उषा, ललिता बाबर अशा कित्येक भारतातल्या तसेच जमैकाच्या उसेन बोल्ट,अमेरिकेच्या मायकेल जॉन्सन अशा भारताच्या बाहेरच्या धावपटूंचीदेखील माहिती द्यायला सुरवात केली. त्यांच्या कष्टाची माहिती झाल्यावर सईला अजून मेहनत करावीशी वाटे. आता धावत असताना सईच्या डोळ्यासमोर सगळे धावपटू येत. त्यांच्या कष्टाची, यशाची आठवण यायची आणि तिला आणखी जोर चढायचा.

एक दिवस शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिला बोलावलं. तिथे शाळेचे क्रीडाशिक्षकही होते. शाळेतून जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करायची होती. सरावाला सुरवात झाली. अखेरीला २००मीटर्स व ४००मीटर्स व रिले रेससाठी तिची निवड झाली. आणखीनच जोरात सराव, व्यायाम, डाएट सगळ काही फारच नियमितपणे व आणखीनच मनापासून सुरु झालं.

अपेक्षेप्रमाणे सईला सर्व क्रीडाप्रकारात व तिच्यामुळे शाळेला रिले प्रकारातही सुवर्ण पदके मिळाली. सईची राज्यस्तरीय टीममध्येही निवड झाली. खूप खुश होते सारे जण. आई,बाबा,तिचे कोच, क्रीडाशिक्षक, मुख्याध्यापक,आणि अर्थातच सई. सईच्या डोळ्यापुढे फक्त त्या स्पर्धा येत होत्या. आपण कसे पळालो, कसं एकेकाला मागे टाकत गेलो, आणि २००मीटर्समध्ये तर आपण शालेय रेकोर्ड केलं म्हणे. खूप छान वाटत होतं तिला. खूप दमल्यामुळे तिला खूप छान झोप लागली, पण स्वप्नातही ती धावत होती आणि पदकं घेत होती.

दुसऱ्या दिवशी आईने तिला उठवलं. तिने बघितलं आईबाबा तयार आहेत आणि आईने पटकन तिला आवरायला सांगितलं. पण शाळेचा गणवेश न घालता शाळेचा ट्रॅकसूट घालायला सांगितलं. सई तयार झाली. आज आईबाबापण तिच्याबरोबर येणार होते. तिने “का?” असं विचारलं तर “सहजच” असं दोघांनी हसत हसत सांगितलं.

ते शाळेत पोचले तर कोणीच वर्गात नव्हतं, सगळे व्हरांड्यात उभे होते. शाळेच्या गेटच्या आत तिच्या एवढच तिचं कट आउट होतं आणि लिहिलं होतं: Hearty Welcome & Congratulations!  Sai! Flying Angel of the school! आणि सगळे ओरडत होते,  ‘सई!सई!’.  सईचं लक्ष आपल्या वर्गाकडे गेलं. सगळ्यांबरोबर मोठ्या मोठ्या आवाजात अन्वी पण ओरडत होती, सई, सई.’

सईने तिच्याकडे बघताच अन्वी परत आणखीनच मोठ्याने ओरडली, ‘सई, सई,’ आणि अंगठा दाखवत 'थम्ब्ज अप'ची खुण केली. सईला स्वतःची लाज वाटली, कारण नाटक प्रकारापासून ती अन्वीशी नीट बोलली नव्हती. आता तिला जाणवलं की लोक अन्वीचं कौतुक करत होते. पण ती कधीच सई काय, कोणाशीच गर्वाने वागली नव्हती. उलट ती तिच्या खास मैत्रिणीशी, सईशी नेहमीसारखीच वागत होती. आता ही सईचं वागणं विसरून, निर्मळ मनाने तिचं कौतुक करत होती. सईचं मन एकदम स्वच्छ झालं. तिनेही तेवढ्याच उत्साहाने अन्वीकडे बघत हात वर केला, हलवला. तिनेही अंगठा दाखवत 'थम्ब्ज अप'ची खुण केली आणि पुढे जाऊ लागली. कधी एकदा अन्वीला भेटतो असं तिला झालं. आईबाबांनी ‘आपल्या मुळच्या, साध्या सरळ सई’ला पाहिलं आणि एकमेकांकडे पाहिलं, एकमेकांकडे पाहून ते हसले.

सईच्या मनातील वादळ शमलेलं पाहून त्यांनाही मनापासून शांत वाटलं. त्यामुळे  दोघाच्याही डोळ्यात सई विषयीच्या कौतुकाचं, अभिमानाचं पाणी तरळत होतं.