फ्रेंडशिप डे (कथा)

फ्रेंडशीप डे
लेखन: ऋषिकेश दाभोळकर
चित्र: रोहिणी शुक्ल 

(कथेच्या शेवटी श्री. बाळासाहेब लिंबिकाई यांनी केलेले मुलांसोबतचे सहभागी-वाचन उपलब्ध आहे)

स्वराने त्या बंगल्याच्या फाटकापुढली बेल वाजवली. 

गल्लीच्या एकदम टोकाचा बंगला. तिथं एकटे आजोबाच राहायचे. त्यांना ‘खडूस’ असंच नाव मुलांनी दिलेलं होतं. खेळताना चुकून जरी का बॉल त्यांच्या आवारात गेला तर चिक्कार ओरडा खावा लागे. म्हणून मुलं तिथं खेळतच नव्हती. उगीच कुणी लेक्चर ऐका! गल्लीच्या एका बाजूला बंगले होते, तर दुसऱ्या बाजुला स्वराची सोसायटी. पूर्वी मुलं सोसायटीच्या आवारात खेळत, पण आता पार्क केलेल्या गाड्यांनीच आवार भरल्याने मुलांना रस्त्यावर खेळावं लागे.  

पण त्या दिवशी मात्र, स्वराने धीर करून फाटकावरची बेल वाजवली. तीही फक्त आपल्या पियुसाठी! पियु म्हणजे तिचं मांजर. ती बराच वेळ झाला आजोबांच्या बंगल्यात शिरून बसलं होती. आता संध्याकाळ झाली, तरी पियु न परतल्याने स्वराला काळजी वाटू लागली होती. तिला आजोबांचा स्वभाव माहीत होता. आता आपल्याला पियु परत मिळणार की नाही, अशा भितीने शेवटी स्वराने आजोबांशी बोलायचं धाडस दाखवलं होतं. आता आजोबा येऊन आपल्याला ओरडणार याचीसुद्धा तिने मनोमन तयारी केली होती.

दोनदा बेल वाजवून झाल्यावर, दारातून आजोबा बाहेर येताना दिसले. जरा अशक्त वाटत होते. दाढी वाढली होती. अंगाभोवती शाल होती. फाटकापाशी येत ते खेकसले, “काये?”
“माझी पियु आली आहे इथे. तिला घेऊन जायला आलेय”, स्वराने एका दमात सांगून टाकलं.
“कोण पियु?”
“माझी मांजर.”
“हं आलीय. आत आहे, जा घेऊन”, असं म्हणून आजोबांनी फाटक उघडलं. आजोबा जवळ आल्यावर, स्वराला एकदम जाणवलं की त्यांना बोलताना दम लागतोय आणि आजारीही दिसताहेत. 

त्या भागातील कुणालाही त्या फाटकातून आत जाताना, स्वराने कधीच पाहिलं नव्हतं. आजोबांच्या घरात जाणारे आपल्या मित्रमैत्रीणिंपैकी आपण पहिलेच आहोत याची तिला खात्री होती. आत शिरल्यावर तिचं पहिलं लक्ष गेलं ते कोपऱ्यातल्या एका छोट्याश्या तळ्याकडे.
“ओह, वॉव! तुमच्याकडे एक तळं आहे आणि त्यात कमळंपण! मी जवळ जाऊन बघु?"
आजोबांनी तिच्याकडे पाहिलं. क्षणभर विचार केला आणि म्हणाले, “त्या डबक्याच्या फार जवळ जाऊ नकोस. निसरडं आहे ते. कमळं झाली बघुन की घरात ये.” असं म्हणून आजोबा पुन्हा बंगल्यात शिरले. 

स्वराला आश्चर्यच वाटलं. ती ओरडा खायच्या तयारीने आली होती, पण तिथे तिच्या अपेक्षेपेक्षा वेगळंच घडत होतं. ती जरावेळ बागेत रेंगाळली. खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं होती तिथे. एका कोपऱ्यात मांडव होता, त्यावर कसलीशी वेलही चढवली होती. इतक्यात तिच्या पायाला काहीतरी चावलं. बघते तर तिथे खूप मुंग्या होत्या. मग मात्र पाय झटकतच पळत ती घरात शिरली. 
“काय झालं?”
“मुंग्या”
“ते टेबलवर ‘कैलास जीवन’ आहे ते लाव” स्वराने ते लावलं. एकदम गारेगार वाटू लागलं. आत्ता कुठे तिची नजर घराकडे गेली. अतिशय विस्कटलेलं घर होतं. सगळीकडे पसारा होता. आजोबांनी प्यायलेल्या चहाचे कप एका टेबलवर साचले होते. सिंक भांड्यांनी भरलं होतं. घरात अंधार होता. आजोबाही आजारी वाटत होते. न राहवून स्वराने विचारलं, “आजोबा, तुम्हाला बरं नाहीये का?”
“हं, दोन दिवस जरा ताप येतोय. जाईल तो. टेस्ट केलीय करोना नाहिये.”
“गोळ्या घेतल्यात?”
आजोबा काही बोलले नाहीत. त्यांनी उलट स्वरालाच प्रश्न केला, “नाव काय तुझं?”
“स्वरा”
“किती वर्षांची आहेस?”
“अकरा”
“हं. तुझं मांजर, काय नाव म्हणालीस? हा! पियु, ते बघ बिछान्याखाली आहे.”


स्वराने बिछान्याखाली पाहिलं. पियु अंग चाटत बसली होती. एकदम स्वराच्या काय डोक्यात आलं काय माहीत, तिने आजोबांना विचारलं, “तुम्हाला गोळ्या आणून देऊ?”
“गोळ्या आहेत, पण त्या जेवणानंतर घ्यायच्या असतात.”
“मला थोडासा स्वयंपाकपण येतो, तुम्ही काही खाल्लंय का?”
आजोबा काहीच बोलले नाहीत. तिने फ्रीजमध्ये पाहिलं फ्रीजमध्ये फक्त दूध होतं. एकही भाजी दिसेना.

स्वराला कुठून शक्ती आली काय माहीत. आजोबांना दंडाला धरून तिने बिछान्यावर हलकेच बसवलं. म्हणाली, “बसा इथे शांतपणे, मी आलेच.”

ती बाहेर पळाली आणि थोड्याच वेळात परतली. तिच्या हातात एक पिशवी होती. तिने त्यातून टोमॅटो, कांदे, लसूण बाहेर काढले. या सगळ्या गोष्टी तिने स्वत:च्या घरून आणल्या होत्या. तिने आजोबांबद्दल सांगितल्यावर, तिच्या आईबाबांनी कौतुकाने या गोष्टी तिला पिशवीत भरून दिल्या. पुढल्या २० मिनिटांत आजोबांपुढे वाफाळते टोमॅटो सूप होते. आजोबांना काहीही बोलू न देता ती म्हणाली, “आजोबा, बसा आणि सूप संपवा. तोवर मी ही खोली आवरते.”

एरवी मुलांवर आरडाओरडा करणारे आजोबा मुकाट्याने बसून सूप पिऊ लागले. 

स्वराने आधी खिडक्या उघडल्या. कपड्यांच्या घड्या घातल्या, सगळे कप उचलून सिंकमध्ये नेऊन घासले. बिस्किटांच्या पुड्यांची आवरणं कचऱ्याच्या डब्यात टाकली. तोवर आजोबांचं सूप संपलं होतं. त्यांना गोळ्या दिल्या. झोपवलं. पांघरूण घातलं. पियु तोवर स्वराच्या पायात घुटमळू लागली होती. तिला घेऊन स्वरा बाहेर पडली.

-----

सकाळी सकाळी पियुने जेव्हा फाटकाची बेल वाजवली, तेव्हा एका बेलमध्येच आजोबा दारात आले. कालच्यापेक्षा किंचित फ्रेश दिसत होते. स्वराकडे बघून हसले वगैरे नाहीत, पण काही न विचारता दार उघडलं त्यांनी. आता शिरता-शिरताच ठाम स्वरात स्वरा म्हणाली, “आजोबा, डब्यात थालिपीठं आहेत. आईने गरमागरम केली आहेत. आणि आई तुमच्यासाठी जेवण पण बनवणार आहे. मी आणून देईन.”
आजोबा काहीतरी बोलणार, इतक्यात पुन्हा स्वराच म्हणाली, “काही बोलू नका, खाऊन घ्या. मी हे करणारच आ-हे-य!”
आजोबा गालातल्या गालात हसले की काय, असा स्वराला भास झाला.
खाता खाता आजोबा म्हणाले, “स्वरा, शाळा नाही का तुला?”
“हल्ली शाळा ऑनलाईन असते. अकरा वाजता सुरू होतील वर्ग.”
“काय दिवस आलेत! आवडते का अशी शाळा?”
“हॅ! कशी आवडेल? मित्रमैत्रीणी सोबत नाहीत, गप्पा नाहीत, एकत्र डबा नाही, भांडणं नाहीत, ताईंचा ओरडा नाही, व्हॅनमधला दंगा नाही. म्हणजे ऑनलाईन तासांना कंटाळा नाही येत, पण ती काय शाळा नाही!”
“खरंय. शेवटी माणसाला माणूस लागतो.”
“मग तुम्ही का बरं एकटं रहाता?”
आजोबांनी चमकून पाहिलं स्वराकडे. काही बोलले नाहीत. डब्यातलं थालीपीठ खात राहिले. स्वराला एकदम आपण ‘काहीतरी चुकीचं बोललो का?’ असं वाटू लागलं. ती काहीच बोलली नाही. आजोबांचा डबा खाऊन झाला. स्वरा “दुपारी येते परत" इतकंच बोलून डबा घेऊन निघून गेली.

---

“ये ये, तुझीच वाट बघत होतो.”
स्वरा जेव्हा फाटकापाशी आली, तेव्हा बेल वाजवायच्या आधी आजोबांचा आवाज आला. आता गेल्या महिनाभरात ती अनेकदा आजोबांकडे गेली होती. बागेत झाडांना पाणी घालत आजोबा उभे होते आणि ते चक्क हसत होते. 
“आयला! आजोबा, तुम्ही हसताय! गंमतच आहे” आजोबा हे ऐकून आणखी मोठ्याने हसू लागले. म्हणाले, “आगाऊ आहेस, चल आत तुझ्यासाठी एक गंमत आहे.”

गंमत म्हटल्यावर स्वरा अधीरपणे पळत आत शिरली. घरात कसलातरी वेगळा वास पसरला होता. मागोमाग आजोबा आले, म्हणाले, “बस तिथे खुर्चीत” ती खुर्चीत बसेस्तोवर, आजोबा हातात एक प्लेट घेऊन आले. त्यात शिऱ्यासारखा एक पदार्थ होता. “हे सांदण, आपल्या बागेतल्या फणसाचं आहे.”
“सांदण काय असतं? मी खाल्लं नाहीये कधी”
“बघ खाऊन”
स्वराने एक घास खाल्ला आणि तिला ते खूपच आवडलं. “वॉव! कसलं भारी आहे! तुम्ही आता एकदम बरे झालाय हे दिसतचंय, पण आज काय स्पेशल?”

“आज म्हटलं तर दोन स्पेशल गोष्टी आहेत. आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे.”
“कसलं भारी! कुठे आहेत आजी? मी कधी पाहिलं नाहिये त्यांना.”
“ती बघ” त्यांनी भिंतीवरल्या एका फोटोकडे बोट केलं “तिला जाऊन आता चौदा वर्ष तीन महिने अकरा दिवस झाले"
स्वराला काही कळेचना यावर काय बोलावं. आजोबा एकटे रहातात म्हणजे आजी वारल्या असतील असा अंदाज होताच. पण, गेलेल्या लोकांचा असा वाढदिवस कोणी करत असेल, तर अशा बड्डेला ‘हॅप्पी बड्डे’ म्हणायचं का, हेच तिला कळेना. तिने हळूच आजोबांकडे पाहिलं पण ते अजिबात दु:खी वगैरे पोज देत नव्हते.

स्वरा थोडावेळ सांदण खात गप्प बसून राहिली. मग तिच्या काय डोक्यात आलं कोण जाणे, ती त्या भिंतीवरल्या फ्रेमकडे गेली आणि मोठ्याने बोलू लागली, “हॅप्पी बड्डे आजी! तु मला नाही ओळखत किंवा आजोबांनी तुला माझ्याबद्दल सांगितलंही असेल माहीत नाही. मी स्वरा. समोरच्या सोसायटीत रहाते. मला तुझ्याबद्दल काहीच माहीत नाही. पण आता एक गोष्ट कळली आहे, की तुला फणसाचं सांदण खूप आवडायचं. बरोबर ना? आजोबांनी ते झक्कास केलं आहे. तुला वासावरून कळलं असेलच म्हणा. माझी ना आजोबांबद्दल एक तक्रार आहे. ते नेहमी एकटेच रहातात. गेल्या आठवड्यात आजारी होते, तरी कोणालाही हाकारलं नाही त्यांनी. पियु इथे आली म्हणून मला कळलं तरी. त्यांच्या टेबलवर तुमच्या मुलीचा फोटो मी पाहिलाय. तिच्या लग्नातला फोटो दिसतोय. या दुसऱ्या फोटोत तिच्या मागे आयफेल टॉवर आहे म्हणजे ती पॅरीसला रहाते वाटतं. ती इथे आली, की मी तिच्याकडे ही तक्रार करणार आहेच.” मागून आजोबा हे बोलणं ऐकताहेत हे स्वराला कळत होतं, पण ती मागे न बघताच पुढे बोलू लागली, “आता तु इथे त्यांच्यासोबत असतेस, हे कळल्याने मला जरा बरं वाटतंय. तरी त्यांना म्हणावं काही हवं असेल तर माझ्याशी बोलत जा! मी लहान असले आणि मला सगळं कळत नसलं, तरी मी ऐकू तरी शकते ना! शेवटी ‘माणसाला माणूस लागतंच’. काय? हो की नाही, आजी?” असं म्हणून तिने आजोबांकडे पाहिलं, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांनी स्वराला जवळ घेतलं. त्यांच्या अंगाला फणसाचा वास अजूनही येत होता. 

काही काळ शांततेत गेल्यावर स्वराला काहीतरी आठवलं आणि ती म्हणाली, "आजोबा, दुसरी स्पेश्शल गोष्ट कोणती?”
“असं काय करतेस आज फ्रेंडशीप डे नाही का? मला खूप खूप वर्षांनी एक नवी मैत्रीण मिळाली आहे. तिच्यासाठी ही भेट आहे.”, असं म्हणून आजोबांनी चक्क एक फ्रेंडशीप बँड स्वराच्या हातात अडकवला. 
----

आता आजोबा अजिबात एकटे नसतात. स्वराच नाही तर तिचे काही मित्रमैत्रीणी आजोबांशी गप्पा मारायला, त्यांच्या बागेत काम करायला येतात. आजोबा त्यांच्या तरूणपणी खूप ठिकाणी फिरलेले, त्यामुळे तिथले किस्से-कहाण्या ऐकायला मिळतातच, शिवाय मुलांना कैऱ्या, गरे, कधी जांभळंही मिळू लागली.

आजोबा अजूनही एकटेच राहतात, पण त्या ‘फ्रेंडशीप डे’पासून आजोबांना एकटं मात्र कधीच वाटलं नाही!

-0-0-0-0-0-

मुलांसाठी कृती:
तुमच्या आसपास असे एकटे रहाणारे आजी आजोबा आहेत का?
त्यांना काही मदत हवी आहे याची चौकशी कराल का? मदत हवी असेल तर ती तुम्ही किंवा तुमच्या पालकांमार्फत करण्याचा प्रयत्न कराल का?
मदत नको असेल, तरी त्यांच्यासोबत एखादी संध्याकाळ तुम्ही घालवू शकाल का?

---

कथेचे सहभागी अभिवाचन
वाचन: बाळासाहेब लिंबिकाई 
सहभागी मुले: विनया लिंबिकाई वय साडे सहा वर्ष | सुश्रुत लिंबिकाई वय सात वर्ष | सूनया लिंबिकाई वय साडेनऊ वर्ष

टीप:अटकमटकचा मॉनिटरच गोष्ट लिहीत असल्याने, याचं संपादन करायचं कुणी हा प्रश्न होता. अशावेळी गोष्टीच्या संपादनात फारूक काझी यांनी मोलाची मदत केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार!