हसरी भिंत (कथा)

हसरी भिंत

लेखन: आर्या जोशी
मुखपृष्ठावरील चित्र: आभा भागवत
कथेतील इतर चित्रे: कु.अमृता अविनाश मराठे, 
इयत्ता दहावी, भारतीय विद्या भवन- परांजपे विद्या मंदिर, पुणे 

 

टिनू आणि मिनी खूप घट्ट मित्र- मैत्रिणी. टिनूचं नाव तेजस आणि मिनीचं नाव मीनाक्षी, पण लाडाची नावंच जास्त आवडीची होती दोघांच्या. टिनू सातवीत जाणार होता आणि मिनी पाचवीत जाणार होती. शेजारी रहायचे, खूप खूप खेळायचे. त्या दोघांच्या घराच्या अंगणात फक्त एक भिंतच होती. दोघांचे आई -बाबाही भिंतीपलीकडून एकमेकांशी छान गप्पा मारत असत. ही भिंत टिनू आणि मिनीच्या कुटुंबाच्या प्रेमाचा भागच होती.

सुट्टी सुरू झाली तशी चार पाच दिवस मजेत गेले. नंतर मात्र दोघांची टकळी सुरू झाली. “आई, रीतेश गेला आहे त्याच्या मामाकडे, जबलपूरला. साक्षी जाणार आहे छंदवर्गाला. कुणाकडे जाणार खेळायला आता मी?” इति टिनू.
मिनीचीही भुणभूण सुरू झाली. “माझी खेळणी खेळून मला कंटाळा आला आहे. दुपारी तुम्ही आम्हाला उन्हात बाहेर खेळू देत नाही. त्यातच आपल्या समोरच्या रस्त्याचं कामही चालू आहे म्हणून ‘धुळीत जाऊ नका’ असं आजी म्हणते. टीव्हीवर फारतर एखादं कार्टून पाहू देता! काय करायचं काय आम्ही? आत्ताच कंटाळा यायला लागला आहे.”

ही कुरकूर इतक्या लवकर संपणारी नाही, हे दोन्ही आई बाबांच्या लगेच लक्षात आलं. त्यांची घरं इतर घरांपासून थोडी लांब असल्याने, मुलांना खेळायला दररोज कुणाकडे पाठवणंही तसं सोपं नसणार होतं. आता काय करायचं? कंटाळा नावाच्या राक्षसाला कसा पळवून लावायचा ? 

“आपल्याला ही भिंत रंगवायची होती नं रे, दिनकर” मिनीचे बाबा टिनूच्या बाबांना म्हणाले.
“हो रे! पण इतकी वर्ष घोकतोय नुसते.आपली मुलं आता मोठी झाली, तरी भिंत अजून तशीच राहिली आहे आपली रंगवायची.”, दिनकर म्हणजे टिनूचे बाबा म्हणाले.
“चला तर मग ! लेकरांना हाच उद्योग देऊया सुट्टीचा. मुलंही रमतील आणि आपलं बालपणापासूनच स्वप्नंही पूर्ण होईल” टिनूच्या बाबांनी होकार दिला. झालं तर मग! भिंत दोन्ही बाजूंनी रंगवायची असं ठरलं.

टिनू आणि मिनीला दोन्ही बाबांनी बोलावलं आणि भिंत रंगवण्याची कल्पना सांगितली.
टिनूचा बाबा म्हणाला “आम्ही दोघे छोटे असल्यापासूनच इथे शेजारी राहतोय. आम्हाला खूप काय काय करावंसं वाटायचं; पण अभ्यास, शाळा आणि खेळ यामधे ते राहूनच गेलं.”
मिनीचा बाबा म्हणाला, “हो नं! क्रिकेट आमचा जीव की प्राण. दोन्ही घरांच्या किती काचा आपण फोडल्या नाही का?” सगळे हसले. “त्यातच ती भिंत रंगवायचं दरवर्षी ठरवायचो पण राहूनच जायचं. आता मात्र आम्ही दोघांनी ठरवलंय की, हा छानसा उद्योग तुम्हाला सोबत घेऊन करूयाच!”

हे ऐकून मुलं खुशच झाली. मुलं आणि बाबा एकत्र जाऊन दुकानातून सामान घेऊन आले. रंग, ब्रश, कोळसा असं सगळं सामान घरात आलं. भिंतीवर चित्रं काय काढायची, हेही चौघांनी बसून ठरवलं.
“झालं! आता महिनाभर सगळं घर - अंगण रंगून काढणार तर हे”, मिनीची आई म्हणाली.
टिनूच्या आईने तर जाहीरच केलं, “आधीच पाणी कपात आहे. त्यात दोनदा अंघोळी नकोत हं तुमच्या! दिवसभर रंगात बुडा आणि संध्याकाळीच धुतो तुम्हाला गाय बैलासारख्या!” सगळे खो खो हसले.

टिनूच्या घराच्या बाजूच्या भिंतीवर पक्षी, झाडं असं काढायचं आणि मिनीच्या घराच्या भिंतीवर फुलं,पान,फुलपाखरं. टिनूला गाड्या,रोबो असंही काही काढायचं होतं पण ते जरा त्याला अवघड वाटत होतं.
एकीकडे ही तयारी सुरू असतानाच त्यांच्या घरासमोरच रस्त्याचं काम सुरू होत. भर उन्हात काम करणारी ती माणसं पाहून, टिनू आणि मिनीला वाईट वाटलं. ते कामगार रहात होते ती घरं म्हणजे रस्त्याच्या कडेला बांधलेले तंबूच होते. रस्त्यावरची खडी, मोठमोठी मशीन्स, सिमेंट कालविणारं यंत्र, ते डोक्यावर नेणार्‍या बायका, खडी पसरणारे पुरूष हे कष्ट उन्हात करत होते. त्यांची छोटी मुलं तिथेच रस्त्यात, भर उन्हात, खेळत होती. टिनू आणि मिनी त्यांना रोज पहात होते. आजोबा दुपारी वैतागत, “काय शिंची कटकट आहे.दुपारी निवांत झोपही येऊ देत नाहीत हे. सारखा आवाज त्या मशिनचा. यांची पावसाळ्याआधीची कामं म्हणजे आमची वामकुक्षीही होत नाही”.

आता भिंत रंगवायला घ्यायची तर! मुलं, आई,बाबा असे सगळे अंगणात गोळा झाले होते.
“सुरेश, आपण आधी भिंत घासून गुळगुळीत करू थोडीफार. मग पांढरा रंग लावू. वाळला पूर्ण की मग आरेखन करू!” टिनूचे बाबा म्हणाले. “चालेल रे दिनकर, तू म्हणशील तसं! मला तसंही हे काही कळत नाही”
रस्त्याच्या कडेला खेळणारी दोन मुलं घराच्या फाटकातून हे पाहत होती. हा सर्व संवाद ऐकत होती. टिनू, मिनी आणि आई बाबा सर्वजण उत्साहाने कामाला लागले. दोन्ही बाजूंनी भिंत पत्र्याने घासली गेली आणि मग त्यावर पांढरा रंग दिला गेला. तीन दिवस तर यातच गेले. दोन्ही आईबाबा आपापले व्याप सांभाळून हा उद्योग करत होती.

बाहेर कुतूहलाने रोज उभी असलेली मुलं पाहून टीनू आणि मिनीला गंमत वाटे. टिनू आणि मिनीला वाटलं की यांना पण बोलावलं तर भिंत रंगवायला आपल्याबरोबर? पण त्यांची आपली ओळख नाही. भाषाही येत नाही, त्यात ती जरा शेंबडी फाटक्या कपड्यातली वाटतात. पण टिनूची आजी हे पाहत होती.मुलांच्या मनातले विचार तिने ओळखले. आजी म्हणाली, “चला रे जरा मुलांनो”. संध्याकाळी कामं संपवून बाया बापडे रस्त्याच्या कडेला बसले होते. आजी मुलांना घेऊन तिकडे गेली आणि कंत्राटदाराशी बोलू लागली. त्याला हिंदीत बोलता येत होतं, पण कामगारांना हिंदी येत नव्हतं. आजीही तोडक्या मोडक्या हिंदीत बोलू लागली त्याच्याशी. “हमारी मुलं चाहते है की तुम्हारी मुलं भिंत रंगवनेको आये हमारे घर! तुम्हारे मुलं रोज आता है हमारे अंगणमें वो बघनेको!”
आजीचं हिंदी ऐकून मुलं हसलीच. आजीच्या हिंदीमिश्रित मराठीवर मालिकांची छाप पडली आहे हे मुलांना लगेचच कळलं!
टिनू म्हणाला, “अंकल, आप अपने बच्चोंको भेजो हमारे घर भिंत कलर करनेको?”
कंत्राटदाराला आता समजायला लागलं की आजीला काय सांगायचं आहे ते. कामगार लोक हे सगळं पाहत राहिले होते. त्यांना हिंदी किंवा मराठीही कळत नव्हतं. ते आपापसात वेगळ्याच भाषेत बोलत होते.
शेवटी कंत्राटदाराने त्यांना मुलांचा आणि आजीचा हेतू समजावून दिला. रोज अंगणात डोकावणारी मुलंही धावत मिनीजवळ येऊन उभी राहिली.


रविवारची सकाळ गजबजली. कामगारांची सहा मुलं अंगणात आली. तीन टिनूकडे आणि तीन मिनीकडे. रंगाचे डबे,ब्रश अशी गंमत त्यांनी कधीच पाहिली नव्हती.दिनकर काकाने दोन्ही भिंतींवर कोळशाने चित्र काढून ठेवली होती. मुलं आधी जरा बुजली.
“आओ नं आगे”, टिनू म्हणाला.,पण मुलांना समजेना त्याची भाषा. शेवटी टिनूने दोन मुलांना हाताला धरून पूढे आणलं. बाबांनी दाखवल्याप्रमाणे ती मुलं संकोचून ब्रश हातात घेऊन उभी राहिली.
भाषा येत नव्हती पण दिनकरकाका काय करतोय हे मुलांनी नजरेनेच जाणलं. दिनकरकाकाने संकोचून उभ्या असलेल्या रंगाचा हात धरला आणि भल्यामोठ्या फुलाची पाकळी त्याला रंगवायला शिकवली. पहिल्यांदाच हातात ब्रश धरलेला रंगा पाहतच राहिला.
“क्यों कैसा लग रहा है?” बाबांचा प्रश्न, पण रंगा भान हरपून पाहतच राहिला होता.
“आगे जाओ ! अरे जरा पुढे जा आणि करायला लाग रंगकाम”. कामगार मुलांना आजोबा म्हणाले.
पण भाषा येत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनीही मिनीच्या वयाच्या एका मुलाच्या हातात ब्रश दिला!
“तुमको आता है नं रंगवनेको? क्या पहिल्यांदाच करताय?” अर्थातच आजी.
हा सर्व प्रसंग पाहून, ही मुलं आपली भिंत खराब तर नाही नं करणार? अशी मिनीने टिनूला शंका बोलून दाखवली!
“हो की गं!!! पण आता?”
“बाबा, अहो बाबा! यांना शिकवणार कसं तुम्ही आता?
“टिनू तूसुद्धा रंगकाम कर त्यांच्याबरोबर आणि मिनी तूही ये चल”
बाबांनी या मुलांना एकदा रंग भरून दाखवले. आणि काय आश्चर्य मुलं भराभर रंग भरू लागली. फुलांना लाल, गुलाबी, पानांना हिरवा, पोपटी, पक्षी रंगीबेरंगी. मुलांच्या हातांना,गालाला,केसांनाही रंग लागले होते. हळूहळू भिंत हसायला लागली. टिनूचीही आणि मिनीचीही.

मिनीचे बाबा म्हणाले, “आत्ता जसं जमेल तसं करा.नंतर फिनिशिंग करू आपण!’
ही मुलं आठवडाभर रोज आली न चुकता. ती आपापसात त्यांच्या भाषेत बोलत आणि हसत. त्यांना टिनू मिनी आणि घरातल्याही सर्वांशी बोलावंसं वाटे पण भाषा येत नव्हती.मग ती नुसतीच हसत.
दुसर्‍या दिवशी आई मदतीला आली. “आओ मैं सिखाती हूं”, म्हणत आईने आणखी दोन मुलांना ब्रश रंगात बुडवून रंग बाहेर जाऊ न देता रंगवायचं कसं ते शिकवलं”
“आई, यांचा रंग बाहेर जातो आहे गं’ मिनी पुटपुटली…
“असू दे ग. पहिल्यांदाच करत असणार ती मुलं हे सगळं. जमेल हळूहळू त्यांनाही गं!”

ती मुलं कधीकधी त्यांची धाकटी भावंडही कडेवर बसून आणत सगळ्या रंगारी वीरांना कधी मिनीची आई पन्हं करून देई, तर कधी टिनूची आई वाटीकेक देई. कधी पोहे तर कधी तिखट शेंगदाणे खाऊ.
“इसको नं पन्हं बोलते है! ये कैरीसे बनवतो हम! अच्छा है नं?”, आजीने मुलांना विचारल! मुलांच्या घटाघट पिण्यावरूनच खरंतर टिनू मिनीला कळलं की त्यांना ते आवडलय. पण असं का पितात ही? भांड्याला तोंड न लावता वरूनच? कसं ओघळलय बघ. चिकट!
मिनी आईला म्हणाली, “अग त्यांच्याकडे अशीच पद्धत असते पाणी प्यायची.”
“पण हे पाणी कुठे आहे? हे तर पन्हं!”
“हो गं राणी पण ते हे पहिल्यांदाच पीत असणार गं.”
रोज असा काही ना काही संवाद होई. पोहे केले त्यादिवशीही कामगार मुलं पोह्याची फक्की तोंडात मारून खात होते.ते पाहून टिनूने त्यांना शिकवलं. “ऐसे नहीं ऐसा खाओ.”, म्हणत नीट चमचे हातात धरून खायलाही शिकवलं.
हळूहळू दोन्ही बाजूंनी भिंत रंगत आली. मुलांचीही परस्परांशी दोस्ती झाली आणखीनच.
एक दिवस कामगार मुलांपैकी रंगाची आई टिनू आणि मिनीसाठी पळसाच्या पानात बांधलेली करवंद घेऊन आली. तिला भाषा येत नव्हती, पण तिने अंगणाची कडी वाजवून खुणेने कुणालातरी बाहेर बोलावलं. टिनूची आई बाहेर आली आणि रंगाच्या आईने तिच्या हातात ती करवंद ठेवली. हसून ती निघून गेली. टिनू आणि मिनीने करवंद कधी खाल्लीच नव्हती यापूर्वी. पण उत्सुकतेने चिकट चिकट म्हणतही दोन्ही मुलांनी तोंडं लाल होईपर्यंत करवंद खाल्ली.
“यांनाही माणुसकी असते बघ” टिनूची आजी म्हणाली.

या सगळ्या धांदलीत टिनू आणि मिनी आपण भिंत रंगवणार आहोत हे विसरुनच गेले.या कामगार मुलांना भिंत रंगवताना हरखून गेलेलं पाहूनच त्यांना खूप आनंद झाला होता. त्यामुळे ती दोघं फक्त पाहत रहात की समोर काय घडतं आहे. दोन्ही भिंती या कामगारांच्या सहा मुलांनीच रंगवल्या. अधूनमधून संध्याकाळी कामगार आईबाबाही फाटकापलीकडे उभं राहून ही गंमत पाहून जात.

शेवटच्या दिवशी मिनीची मावशी आली होती.तिने या सहाही मुलांच्या हाताच्या अंगठ्यांना रंग लावून त्यांचे छाप चित्रांखाली उमटवून घेतले.जणू काही या निरागस चित्रकारांच्या सह्याच त्या!! मावशीने हे सर्व फोटो सर्वांना पाठविले.सर्वांनी टिनू आणि मिनीचं खूप कौतुक केलं.

हे काम संपतानाच रस्त्याचं कामही संपलं आणि कामगारांनी पालं हलवली. निघताना ती मुलं आवर्जून या दोघांना टाटा करून गेली. त्यांना बोलता येत नव्हतं पण निरोपाचा क्षण त्यांनाही कठीण गेला असावा. बाबांनी या सगळ्या मुलांचा एक ग्रुप फोटोही काढला. मिनीला त्यातल्या एका कामगार महिलेने तिच्या गळ्यात होती तशी एक निळ्या छोट्या मण्यांची माळ भेट दिली.

कामगार वर्ग निघून गेला. रस्ताही आता गुळगुळीत झाला. कामगारांची मुलं थोड्याच दिवसांसाठी आली आणि गेलीही.मात्र त्यांची आठवण आता टिनू आणि मिनीच्या घरांच्या अंगणात भिंतीवर छान रंगून बसली आहे!.

 

भित्तीचित्रं म्हटली की आभाताईंच्या शिवाय दुसरे नाव डोळ्यांपुढे आले नाही. त्यांनीही कथावस्तू समजताच, चित्र इथे प्रकाशित करायला अगदी लगोलग परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. सदर चित्र आभाताईंनी मनशक्ती केंद्र चाकण येथे शिबीरातील मुलांसोबत साकारले आहे