'तो' काम आणि 'ती' काम

'तो' काम आणि 'ती' काम

लेखनः संज्ञा घाटपांडे-पेंडसे | चित्रेः अनघा इनामदार


आज फायनली आम्ही आमचा आवडता वार्षिक उद्योग करणार होतो - तो म्हणजे ‘घर सफाई’. दिवाळी जवळ आली की आम्हाला असले धंदे सुचतात. आजच्या दिवशी दादा सारखा महाआळशी माणूससुद्धा नाकाला फडकं-बिडकं बांधून, झाडू घेऊन सकाळपासूनच ‘धूळ हटाव घर चमकाओ’ मोहिमेला लागतो. 

आमची मोहीम आम्ही सुरू करणार, इतक्यात मीनल मावशीचा फोन आला. “हो हो! येऊ दे की.आम्ही घरीच आहोत सगळेजण आज”, आई म्हणाली. त्यावरूनच मी गेस मारला, की ऋषिका येणार. वा! म्हणजे फुल राडा! ऋषिका माझी सख्खी मावसबहीण. पलीकडच्या गल्लीतच राहते. त्यामुळे आम्ही एकमेकाकडे पडीक असतो. तिला सगळे 'ऋषी ऋषी' म्हणून चिडवतात, कारण ती थोडी ‘मुलगा’ च आहे. म्हणजे कानाबरोबर कापलेले केस, (एकदा दिवाळीत सोसायटीतल्या पोरांना कॉपी करताना या महाराणींनी हातातच लवंगी फोडायचा प्रताप केल्यामुळे ह्यांचे केस जळाले. तेव्हापासून धोका ओळखून मीनलमावशीनी ते 'मश्रुम कट' मध्येच ठेवले.) अंगात मुलासारख्या  खिसेखिसेवाल्या पँटस् आणि ढगळ टीशर्ट. खास तिच्यासाठी आणलेल्या नवीन स्कर्ट आणि फ्रॉक्सचा ती आठवड्याभरात निकाल लावायची. कधी मारामारीत, तर कधी तारेत अडकून. एकदा तर कुत्र्याच्या पिल्लाला मांडीत घेऊन खेळवताना त्यानी स्कर्टमध्येच शू केली! यक! ऋषिका माझ्याच वयाची असली, तरी जरा 'गीता- बबिता' टाईप असल्याने, मी तिच्याशी पंगा घ्यायला जात नाही. उगाच एखादी फाइट पडली, तर दात घशात जायचे. पण माझ्या मित्रांसमोर, मी तिला घाबरत नाही असं दाखवायला लागतं, नाहीतर मुलीकडून मार खाल्ला म्हणून बेइज्जती व्हायची.

मी आणि ऋषी मिळून जगातलं कुठलंही काम करू शकतो. आमची टीमच खतरा आहे. तिच्यासोबत घरसफाई मोहीम तर सुपरफास्ट होईल. मी मनातल्या मनात कामाचा सिक्वेंस ठरवायला लागलो. 

आम्ही मोहिमेला सुरुवात केली आणि तासाभरातच सगळ्यांना भुका लागल्या. आई किचनमध्ये शिरणार, तोच बेल वाजली. २ कांदे चिरायचं काम माझ्याकडे सोपवून ती दार उघडायला वळली. ऋषिकाला बघून मला जो आनंद झाला, तो मागे ‘अँकर आजी’ला बघून मावळला. (आम्ही तिच्या आजीला ‘अँकर आजी’ म्हणतो, कारण तिचा जीव ‘अँकर’सारखा (म्हणजे होडीच्या नांगरासारखा) जुन्या काळातच अडकलेला आहे. तिच्या प्रत्येक वाक्याची सुरुवात ‘आमच्या काळात’पासूनच होते. ती अजिबातच आमच्या आजीसारखी 'कूल' नाहीये. प्रत्येकाला प्रत्येक बाबतीत ‘ ग्यान बाटायची’ तिला खोडच आहे. मी आजीकडे बघून ‘मारकी म्हैस’ लुक दिला आणि ऋषीकडे बघून 'यो' ची खूण केली. “हा किचनमध्ये काय करतोय एकटा?”, आल्याआल्या तिनी किलकिल्या डोळ्यांनी ‘स्पायगिरी’ सुरू केली.  “आज जरा दिवाळी स्पेशल आवराआवारी मोहीम काढलीय आम्ही!”, आई उत्साहाने म्हणाली. “ये हुई ना बात! मीपण येणार.", ऋषिका हवेत उडी मारत ओरडली. “ह्याला कांदा चिरायचं काम दिलंय. भूक लागली ना सगळ्यांना” आई माझ्याकडे बोट दाखवत म्हणाली. 


“आण ते कांदे इकडे मी देते चिरून. पोराला कशाला बायकी काम देतेस?”, आजीने हुकूम सोडला. “अहो काकू, आमच्याकडे 'बायकी-पुरुषी' असं काही नसतं! सगळी कामं सगळ्यांची असतात. पोटसुद्धा सगळ्यांना असतं ना”, आईने ‘करारा जबाब’ दिला. आजीनं मानेला नापसंती दर्शक झटका दिला. दादापण एकदा असलंच काहीतरी बरळला होता, तेव्हा शिक्षा म्हणून बाबानी त्याला भाजी बनवायला लावली आणि भलीमोठी कामाची यादी देऊन त्याची हालतच खराब केली. वरून पुन्हा “ ‘बायकी- पुरुषी’ असल्या कल्पना घरात आणशील, तर दोन्ही जेंडर्सची काम करायला लावीन.", असा दम पण दिला. दादाला ओरडा बसल्यामुळे, मला तर आतून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.  पण मग दादाच्या डोळ्यातून पाणी आलं, तेव्हा मला थोडं वाईट वाटलं. आईनी मग दादाला जवळ घेऊन प्रेमानी समजावलं. नंतर दादा स्वतःहून सॉरी म्हणाला होता. आईने असं उत्तर दिल्यामुळे मी एकदम अभिमानाने आजीकडे ‘व्हीलनिश’ लुक दिला. बाकी काही मला माहीत नाही, पण मी कांदा चिरतो ते एकदम भारीतलं काम आहे, फालतू नाही हे नक्की!

“ए अरण्या, आण इकडे. मी सॉलिड चिरते कांदा.”, ऋषिका किचनमध्ये शिरत म्हणाली. आम्ही ४ कांदे दोघात वाटले आणि जमिनीवरच सुरी ताट घेऊन बसकण मारली. 
कांदे चिरता चिरता मी ऋषिला ऑबझर्व्ह केलं. आम्ही दोघेही तसे सेमच होतो. (थोडी 'मसल पॉवर' वगळता. आजी मला चवळीची शेंग म्हणते, कारण माझी फिगर स्लिम-ट्रिम आहे.) तिलाही दोन हात होते, मलाही दोन हात होते. तिला डोकं आणि त्यात मेंदू होता. मलाही होता. ती छान कांदा चिरत होती, मी पण छानच चिरतो. आणि मुख्य म्हणजे आम्हाला दोघांनाही कांदा चिरताना रडू येत होत. 

आम्हाला व्याकरण शिकवताना 'तो' मुलगा आणि 'ती' मुलगी अस शिकवलेलं; पण कामाच लिंग 'ते'च होत. पण त्या आजीच्या मते कामाला 'जेंडर' होतं - ‘तीचं’ काम आणि ‘त्याचं’ काम वेगळं होत. आजीच्या मते 'अवघड' काम पुरुषाचं. मग आजी ३-३ कळश्या भरून पाणी का आणायची? दिवसभर जात्यावर दळण का दळायची? (म्हणजे अस तीच सांगायची) ती कामं तर आजोबांची होती. 'मसल पॉवर'वाली. मला वाटतं मोठी माणसंच 'जेंडर'मध्ये कन्फ्युज आहेत.  जगातल्या सगळ्याच गोष्टी 'ते' असत्या तर बरं झालं असतं. भानगडच नको!

“‘बायकी पुरुषी’ असलं काही नसतं बरंका, ऋषी. तू, अर्णव आणि दादा सगळे सेमच आहात. सगळेच फायटर आहात तुम्ही. छोट्या मोठ्या फरकाकडे आपण नाही लक्ष द्यायचं.” आई ऋषिला प्रेमळ धपाटा घालत म्हणाली. हा डायलॉग आजीसाठी होता खरंतर. आम्हाला कळत नाही का? आम्ही पण सीरियल बघतो. त्यात नाही का ‘इंडायरेक्ट’ बोलतात. म्हणजे बोलायचं एकाला असतं, पण ते तसं बोलता येत नाही, मग वेगळ्यांनाच बोलतोय अस दाखवत ओरडून बोलायचं. म्हणजे ज्याची पेटायची, त्याची पेटते बरोबर. आई एक्स्पर्ट आहे यात.

मरू दे! आई-आजीच्या  ‘कॉल्ड -वॉर’मध्ये पडण्यापेक्षा मी कांद्यावर काँसन्ट्रेट करायचं ठरवलं, कारण जाम भूक लागलेली. ऋषिकाला आईनी शिडीवर चढून माळ्यात शोधाशोध करायला बोलवलं. दादा पोहे धूत होता. बाबांनी स्वत:ला ‘टी -ब्रेक’ जाहीर केलेला. आमची आजी तोंडात फुटाणे टाकत ‘अँकर आजी’ ला ‘२१ व्या शतकात आपण कसं जगायला पाहिजे’ यावर धडे देत होती. सगळेजण आपापली कामं चोख करत होते, त्यामुळे कुठेच कसला गोंधळ नव्हता. माझ्याही डोक्यात आता पिक्चर क्लिअर होत होतं. मी बाहीने डोळे पुसत बायकी आणि पुरुषी कामाचा धडा मनातल्या मनात पुसून टाकत होतो.