खादाड सुरू (गोष्ट)

खादाड सुरू
लेखन: गुलाब बिसेन, कोल्हापूर
चित्रे: दिव्या गवासने


सकाळची आंघोळ आटोपून भार्गव अंगणातल्या बदामाच्या झाडाखाली खेळत बसला होता. दसर्‍याच्या खरेदीसाठी मम्मासोबत जायला मिळणार, म्हणून स्वारी खूपच खूश होती. खेळण्यांतील वाघ, हत्ती, जिराफ, झेब्रा, गेंडा या प्राण्यांना बागेतील झाडांमध्ये उभे करून तो ‘जंगलचा राजा....वाघ माझा’ हा खेळ खेळत होता. एक एक करत प्रत्येक प्राण्याची जागा त्याने सेट केली. परंतु, त्याला त्याचा आवडता घोडा कुठे दिसेना. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली.
“इथे लपून बसलास होय रे, लबाडा!” असं म्हणत त्याने कुंडीच्या मागे पडलेला घोडा उचलला. घोड्याला झाडांमध्ये उभा करून खेळाला सुरूवात करणार, एवढ्यात त्याला वाळलेल्या पानांमध्ये काहीतरी वळवळताना दिसले.

तो घाबरतच त्याकडे बघू लागला. क्षणार्धात एक काटेरी देहाचा, असंख्य पाय असलेला एक अक्राळ विक्राळ किडा वळवळत पानांच्या बाहेर आला. असा काटेरी, असंख्य पायांचा किडा तो पहिल्यांदाच बघत होता. त्याच्याकडे येणारा तो किडा बघून भार्गवची घाबरगुंडी उडाली.
“मम्मा, राक्षस! मम्मा राक्षस!” म्हणत तो ओरडू लागला.
“अरे, थांब थांब!” या अनपेक्षित आवाजाने तो अधिकच घाबरला. त्याची दातखीळ बसून, तो जागेवरच लटलटू लागला.
“कोण आहे? कोण आहे?”, भार्गव घाबर्‍या आवाजात पुटपूटला.
“अरे, पुढे बघ. इथे खाली खाली.”
आवाजाच्या दिशेन बघतमम्मा राक्षस, मम्मा राक्षस”, भार्गव परत किंचाळला.
“अरे, मी सुरू आहे. सुरू सुरवंट. मी काही राक्षस-बिक्षस नाही. घाबरू नकोस.” भार्गवकडे पुढे पुढे सरकत सुरू सुरवंट बोलला.
“कोण आहेस तू? आणि घाबरू नको तर काय करू? राक्षसाचा जुळा भाऊच वाटतोस तू!”


“अरे, हो. पण घाबरू तर नको मला. माझे हे काटेरी रूप मी बदलले की, सर्वांना हवाहवासाच असतो!”
“ते कसं काय?” भार्गव विचारात पडून म्हणाला.
काय झालं भार्गव? का किंचाळलास?” मगाचा भार्गवचा किंचाळण्याचा आवाज ऐकूण मम्मा अंगणात आली.
“काही नाही मम्मा. माझ्या डोक्यावर अचानक झाडाचं पिकलेलं पान पडलं. त्यालाच मी दचकलो.”
“बरं, बरं. शांतपणे खेळ.” असं म्हणत मम्मा घरात निघून गेली.
“काय म्हणत होतास रे सुरू?” न आठवल्यासारखं भार्गव म्हणाला.
“अरे, मी खरं सांगतोय. मी तुम्हा सर्वांना हवाहवासाच असतो.”
“कसं काय?” भार्गवचा परत प्रश्न.
“चल मग माझ्यासोबत.” सुरू मागे वळत म्हणाला.
भार्गवही काहीही न बोलता, सुरू कुठे जातो ते बघू लागला. लिंबाच्या झाडाखाली आल्यावर सुरू वर चढत म्हणाला,हे बघ भार्गव.”
भार्गव लिंबाच्या झाडाला खोडापासून शेंड्यापर्यंत बघू लागला. मम्माने गेल्या पावसाळ्यात लावलेल्या लिंबाच्या झाडावर सुरूचे काही मित्र पानं मटकावत बसले होते. काळे, भूरे, तपकीरी रंगांचे. सुरवटांनी बागेतील कढीपत्ता, लिंबू आणि सिताफळाचे झाड भरून टाकले होते. कोण उलट, तर कोण सुलट बाजूने पानं खाण्यात दंग होते.
“असं आहे होय. म्हणूच काल मम्मा पप्पांना म्हणत होती की, कढीपत्त्याच्या झाडावर खूप अळ्या पडल्यात म्हणून.” , भार्गव तोंडातच पुटपुटला.
“अरे खादाडांनो, थांबा थांबा. हे काय करताय तुम्ही?”, सुरूच्या मित्रांवर भार्गव ओरडलाच.
“काय म्हंजे? अरे, जेवतोय आम्ही.” सुरूचा एक मित्र दुसर्‍या पानाकडे सरकत म्हणाला.
“अरे, ते झाड माझ्या मम्माने लिंबांसाठीलावलं होतं. तुम्ही त्याची पानं फस्त केलीत, तर लिंबं कशी लागणार झाडाला?” भार्गवने आपली चिंता व्यक्त केली.
“सर्वच्या सर्व पाने नाही खाणार आम्ही. हा खाण्याचा आमचा कार्यक्रम अजून थोड्या दिवसांतच संपेल.” पाने मटकावीत सुरू म्हणाला.
पुढे भार्गवने लांबूनच सिताफळाच्या झाडाचे निरीक्षण केले. सिताफळाचे निरीक्षण करताना पानांआड त्याला छोटे छोटे फूगे चिकटलेले दिसले.
“सुरू, हे रे कसले फुगे? तुम्हीपण आम्हा मुलांसारखं फुगे खेळताय की काय?” पानांकडे बोट दाखवत भार्गव म्हणाला.
“अरे, ते फुगे नाहीत. ते कोष आहेत. महिना दिड महिना पानं खावून आम्ही स्वत:भोवती एक कोष तयार करून स्वत:ला त्यात कोंडून घेतो.” सुरूने विस्ताराने सांगितले.


भार्गव चकीत होऊन सारं कानात साठवत होता.
“मग पुढे काय होतं रे सुरू?” भार्गवने उत्सुकतेने विचारलं.
“पुढे होय. आम्ही त्या कोषात काहीही न खाता दोन आठवडे मुक्काम करून फुलपाखरू होऊन बाहेर पडतो.”
“वॉव! किती भारी ना.” भार्गव गुदगुल्या झाल्यागत म्हणाला.
“मग काय? मी फुलपाखरू झाल्यावर माझ्याशी खेळायला आवडेल ना तुला? घाबरणार नाहीस ना मला बघून?” , सुरूने विचारलं.
“हो तर. मला तुझ्याशी खेळायला जाम मज्जा येईल. आणि घाबरायचा तर विषयच नाही.” भार्गव सुरूला सांगू लागला.

एवढ्यात पप्पांनी आत बोलावल्याचा आवाज आला.
“चल मग, मी पण निघतो. मला पटापटा पाने खाऊन पुढच्या प्रवासाची तयारी करायची आहे. परत भेटूच आपण.” सुरू म्हणाला.
“नक्की. प्राॅमिस.” म्हणत भार्गवही उड्या मारत आत निघून गेला.
.......................

दसरा संपून दिवाळीची चाहूल लागली. दिवाळीसाठी आकाशकंदील बनवण्यात पिंकीदिदी आणि पप्पांना भार्गव मदत करत होता. रंगीत कागद, कात्री, डिंकाचा पसारा हाॅलमध्ये पडला होता. पप्पांनी मापानुसार कापून दिलेल्या कागदी पट्ट्या चिकटवण्याचं काम भार्गव करत होता.
एवढ्यात अचानक एक सुरेख फूलपाखरू खिडकीतून आत येत भार्गवच्या अवतीभवती घिरट्या घालू लागलं. भार्गव आकाश कंदिल बनवण्यात व्यस्त असल्याने त्याचे फूलपाखराकडे लक्षचं नव्हते.
“पप्पा, बघा ना किती सुंदर फूलपाखरू आहे!” पिंकीदिदीच्या आवाजाने भार्गवचे लक्ष त्याच्याकडे गेले. तसा तो फूलपाखरू भार्गवकडे हसर्‍या चेहर्‍याने बघू लागला. भार्गवला अचानक मागे बागेत सुरू सुरवंटासोबत झालेली भेट आठवली.
“सुरू, तु आलास?” भार्गव फूलपाखराकडे बघत म्हणाला. मग सुरूही गालातल्या गालात हसला आणि त्याच्याभोवती गिरक्या घेवू लागला.


“किती सुंदर दिसतोस तू. तूझं म्हणणं खरं आहे. तू सगळ्यांनाच हवा हवासा वाटतोस.” भार्गव पुटपूटला.
“काय बडबड सुरू आहे भार्गव!” पुटपूटणार्‍या भार्गवकडे संशयाने बघत पिंकी दिदी म्हणाली.
“काही नाही गं दिदी. फूलपाखरू किती सुंदर आहे नाही?”
भार्गव गालातल्या गालात हसला. मग सुरूनेही स्मित दिलं आणि आपले नाजूक पंख फडफडत खिडकीतून बाहेर उडून गेला. तसा आकाशकंदील बनवायचं काम मध्येच सोडून भार्गवही सुरूसोबत खेळायला बागेत पळून गेला.