मला तुम्ही सगळे खूप आवडता! (कथा)

मला तुम्ही सगळे खूप आवडता!
लेखन: वैशाली भिडे
चित्रे: वैभवी शिधये

“हे काय हे! रोज आपलं शाळेची घंटा झाली की डोळे मिटून एक मिनिटभर शांत बसायचं. कुणाशी काहीसुद्धा बोलायचं नाही. अगदी ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ म्हणे. मला नाही आवडत असं बसायला.” रागावलेला ईशान ताईंजवळ असलेल्या स्टूलावर बसून मनाशी बोलत होता. खूपदा आठवण करूनसुद्धा सूचना न पाळणाऱ्या मुलांसाठी ताईंनी ती जागा ठरवून ठेवली होती आणि ईशान दिवसातून १-२ वेळा तरी स्टूलावर बसलेलाच असायचा.

आजपण ताई जरा जास्तच रागवल्या होत्या. ईशानच्या डोळ्यांनी ते अचूक हेरलं होतं. कारणही तसंच होतं. घंटा झाल्यावर सगळा वर्ग नेहमीप्रमाणे एक मिनिट डोळे मिटून शांत बसला असताना, ताईंना एक मंजूळ शीळ ऐकू आली. खिडकीच्याबाहेर असलेल्या कांचनच्या झाडावरून तो आवाज ऐकू येत होता. एक छोटासा पक्षी इकडून तिकडे उड्या मारत होता. मुलांनी डोळे उघडले की त्यांना दाखवता येईल, असा ताई विचार करत होत्या; पण ईशानची मात्र चुळबूळ चालली होती. आजूबाजूच्या मित्रांबरोबर कुजबूज पण चालू होती. ताईंनी त्याला न बोलण्यासाठी खुणावलं. पण छे! तो ऐकेल तर ना! त्यामुळे ताईंनी डोळ्यांनीच रागावून त्याला लगेचच आपल्याजवळ बोलावून घेतलं होतं.

सगळ्यांनी डोळे उघडताक्षणी ताईंनी तोंडावर बोट ठेवून आवाज न करण्याची खूण केली आणि हळूच खुणेनेच खिडकीबाहेर बघायला सांगितलं. तो होता नाचरा नावाचा पक्षी. त्याची जपानी पंख्यासारखी दिसणारी शेपूट बघून सगळ्यांना खूप मजा वाटली. मग ताईंनी त्याची थोडी माहिती सांगितली. वरद म्हणाला, “मला बाबांनी सांगितलं आहे की तो एका जागी फार काळ बसतच नाही सारखा इकडून तिकडे उड्या मारतो, म्हणून त्याचं नाव नाचरा.” सगळ्यांच्या गप्पा छान रंगल्या होत्या.

ईशानचं ताईंकडे पुन्हा लक्ष नव्हतं कारण त्याच्या मनात विचार येत होते, “आज ताई पुन्हा आईशी बोलतील, मग आई घरी जाईपर्यंत वर्गात लक्ष देण्याबाबत एक भलं मोठं लेक्चर देईल. हे सगळं संध्याकाळी बाबा घरी आले की त्यांना सांगेल. मग बाबापण रागवतील. खरंतर मागच्या आठवड्यातच बाबा यू. एस. हून आले आहेत. याहीवेळी त्यांनी माझ्यासाठी काही खेळणी आणली आहेत.  पण मला कंटाळा येतो त्यांच्याशी खेळून. सारखं आपलं आय पॅड वर प्राण्यांची माहिती बघायची, नाहीतर ग्रह, तारे, अवकाश बघायचं. मी हे पाहिलं तर नासामध्ये जायला मिळेल असं म्हणतात. पण, मला कमला नेहरू बागेमधल्या रॉकेटमध्ये बसायला किती आवडतं. जर मी तीन गोष्टी नीट ऐकल्या तरच मला रॉकेटची सफर असं ठरलंय. हे काय बरं! मला नाही आवडला हा नियम. अरे देवा, उद्याच बागेत जायचं ठरलंय की. त्यासाठी मी २५० तुकड्यांचं पझल पूर्ण करणार आहे. होतच आलंय अगदी, पण आई आता हे सगळं सांगणार बाबांना. मग माझं बागेत जाणं रद्द. श्शी! पण मग आईलाच खूश केलं तर? जर आज सगळा डबा संपला, गेल्या गेल्या गृहपाठ पूर्ण केला, फळ्यावर तिने लिहिलेला जास्तीचा अभ्यास पूर्ण केला तर आई हे बाबांना सांगणार नाही. पण, हे सगळं केलं तरी मी चांगला मुलगा नाहीच्चे ना! कोणाच्याच मनासारखा वागत नाही. ताई पण किती रागावल्या आहेत माझ्यावर. मी कोणालाच आवडत नाही.”

ईशानला खूपच वाईट वाटत होतं. तेवढ्यात, “ईशान! ईशान! ऐकतोयस ना?”, ईशान एकदम भानावर आला.
“हो ताई!”
“आता गटात बैस आणि सगळ्या सूचना नीट ऐक” ताईंनी ईशानला बजावून पाठवलं.

ताईंनी मग सगळ्यांना आठवण करून दिली. "चला चला....आज महिनाअखेर आहे ना, म्हणजे आपला साधनं मांडणीचा दिवस." असं म्हणून मग ताईंनी मेकॉनो, छोट्या विटा, जोडो ठोकळे, गोष्टीची पुस्तकं, चित्रकोडी, डॉमिनो, जोड्या लावा खेळ, वर्गीकरण तक्ता असे वेगवेगळे खेळ बाहेर काढले. प्रत्येकाला बसण्यासाठी छोटी बस्करं काढली. वेदांत, आयुष, मीरा, ओम, अमीर, ऋग्वेद यांची मांडणीसाठी मदत घेतली.

“सगळ्यांचं लक्ष आहे का माझ्याकडे आज एक गमतीची मांडणी पण करणार आहे. ... तसे सगळ्या मुलांनी कान टवकारले.  “ऐका बरं का लक्षपूर्वक, ज्यांना कुठलीही साधनं न खेळता नुसत्या गप्पाच मारायच्या आहेत, तर तसं सुद्धा चालणार आहे. त्यांनी माझ्याजवळ असलेल्या ५ बस्करांवर बसायचं आहे. फक्त एक छोटीशी अट आहे हं... एकमेकांशी बोलताना एक वीत आवाजात बोलायचं म्हणजे, शेजारच्या मुलाला ऐकू येईल एवढ्याच आवाजात बोलायचं आहे. म्हणजे आजूबाजूच्या मुलांना तुमच्या आवाजाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची."
“म्हणजे ताई काही न करता नुसत्या गप्पा मारल्या तर चालणार आहेत?”, ईशान थोडा आश्चर्याने म्हणाला.
“हो, चालणार आहे!”, ताई म्हणाल्या. 

लगेचच ताईंच्या शेजारील बस्करांवर, ईशान, आकाश, विराज, सुहास आणि कबीर पटकन येऊन बसले. अव्हेंजर, स्पाईडर मॅन, ट्रान्स्फॉरमर... कोणाची पॉवर किती? ह्यामधे ईशान एकदम भरभरून बोलत होता.

तेवढ्यात विराज ताईंजवळ आला, “ताई मी तुमच्याबरोबर गप्पा मारू का ?”
“हो चालेल की” ताईंनी त्यांची वही बाजूला ठेवली. “हं बोल”
“ताई तुम्हाला वर्गात सगळ्यात जास्त कोण आवडतं”
“मला ना, सगळी मुलं आवडतात”
“पण रुद्र बरेचदा गृहपाठ पूर्ण करत नाही, आभा आणि लीला सारख्या बोलत असतात त्यामुळे त्यांचं वहीमधलं लेखन अपूर्ण रहातं, सागरला तर अजून नीट लिहितासुद्धा येत नाही आणि मनोज, अवधूत, हर्ष हे वर्गात किती पळापळी करतात. मग हे सगळे कसे आवडतात”.

“तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे, पण फक्त अभ्यास बरोबर जमला की छान असं काही नाही. आता हेच बघ, रूद्र प्राण्या पक्ष्यांची किती छान माहिती सांगतो, आभा आणि लीला किती छान नाच करतात आणि मनोज, अवधूत मातीकामातून किती वेगवेगळ्या वस्तू बनवतात, हर्ष तर गटासमोर येऊन किती छान गाणं म्हणतो.” ताईंनी बघितलं, शेजारीच बसलेला ईशान हे ऐकत होता, त्या मग विराजला म्हणाल्या, “आता ईशानचं बघ, सारख्या गप्पा मारतो, वर्गात लक्ष देत नाही. रोज रोज मला त्याला रागवावं लागतं. पण तो गोष्ट किती छान सांगतो, तुम्हाला आवडते ना त्याची गोष्ट ऐकायला”.
"ताई, त्याने गड आला पण सिंह गेला ची गोष्ट किती छान सांगितली होती” आता सुहास पण गप्पांमधे सामील झाला.
“आणि ताई त्यानं सांगितलं होतं तानाजी मालूसरे सगळ्या पालेभाज्या खायचा, म्हणून तो एवढा शूर होता”. विराजला एकदम आठवलं. “तेव्हापासून मी सगळ्या पालेभाज्या खातो”.
“हो, हो, तेव्हा पासून मी पण सगळ्या भाज्या खातो, मला अव्हेंजरसारखी पॉवर हवी आहे ना” सुहास एकदम खुलून म्हणाला.

तसं ताईंनी ईशानकडे बघितलं, रोज रोज शिक्षेच्या स्टूलावर बसणा‍ऱ्या, ईशानने ताईंना विचारलं, “ताई मी खरंच तुम्हाला आवडतो?”

“अर्थात, मला तू खूप आवडतोस.” असं म्हणून ताईंनी ईशानला जवळ घेतलं.  

लगेचच विराज हसून सगळ्यांना म्हणाला, “ मला ताईंनी सांगितलं आहे, मला तुम्ही सगळे खूप आवडता.”