जेशूची गोष्ट

जेशूची गोष्ट
लेखकः मंदार शिंदे
चित्रेः गीतांजली भवाळकर

एकदा एका जेसीबीला आठवण आली आईची;
मान खाली घालून त्यानं मागणी केली सुट्टीची.
म्हणाला, “मालक, जाऊ द्या मला.. आठवण येते खूप.
आठवण काढण्यात विसरली बघा माझी तहान-भूक.”
पोट धरून मालक त्याचा खो-खो हसत सुटला,
“यंत्राला कुठं अस्त्या आई, खुळाच हैस की दोस्ता!
गप-गुमान कामावर चल, खड्डा खनायचा हाई.
काम करून पोट भरु, बोलायला येळ न्हाई…”



नाराज होऊन जेशूनं मग उलट प्रश्न केला,
“मालक, तुम्हाला नाही का आई? सांगा बघू मला.”
मालक म्हणाला, “जेशू बाळा, सगळ्यांना अस्त्या आई.”
जेशू म्हणाला, “मग का म्हणता, मलाच आई नाही?”

मालकानं मग विचाऽऽर केला, ढेरीवर फिरवत हात.
म्हणाला, “तुझा मुद्दा आत्ता आलाय माझ्या लक्षात.
आसंल बाबा तुझी बी आई, न्हाई कशाला म्हनू?
येवढा खड्डा खनल्यानंतर दोगं मिळून शोदू.”

जोरजोरात सोंड हलवत ‘नाही, नाही’ बोलला;
“खड्डा खणतो, मालक… पण मग सुट्टी द्या मला.
माझ्या आईला शोधण्यासाठी मीच एकटा जाईन;
काळजी नका करू मालक, लवकर परत येईन.”

मालकाचा पण जीव होता लाडक्या जेशू यंत्रावर;
सोंड त्याची थोपटत बोलला, “जा… मनासारखं कर !”



सुट्टी मिळणार म्हणून त्याचे हेडलाईट चमकू लागले;
दहा फुटांच्या खड्ड्याला आज दहाच मिनिट लागले.
काम संपवून जेशू निघाला आईचा घ्यायला शोध.
मालकानंपण केला नाही त्याला आता विरोध.
मोबाईलमधल्या गुगल बाईंशी केली त्यानं चर्चा,
आणि म्हणाला, “जेशू लेका, तू तर पुन्याकडचा!!
सांगलीपासून पुन्यापतुर अंतर लई न्हाई.
दोन-चार दिवसात पोचून जाशील, काळजी करायची न्हाई.”

जेशू म्हणाला, “काय मालक, चेष्टा माझी करता?
वाऱ्यासारखा जाईन मी, पोहोचेन बघता-बघता…”



निरोप घेऊन मालकाचा मग जेशू निघाला सुसाट;
मारुती रोडवर गर्दीमध्ये पण चुकला बिचारा वाट.
हरभट रोड, मेन रोड, गोल-गोल फिरत राह्यला.
कापड पेठ, गणपती पेठ, खूपच लेट व्हायला.
शेवटी एकदा दिसला त्याला आयर्विन पूल;
हॉर्न वाजवला, सोंड हलवली, “वाऊ… सो कूल!!”

आता मात्र जेशूनं चांगलाच स्पीड धरला;
डिग्रज गेलं, तुंग गेलं, भरभर रस्ता कापला.
पहिला टप्पा घेतला त्यानं, गाव होतं आष्टा.
“लांबचा पल्ला गाठायचाय, करून घेऊ नाष्टा.”



पोटात भर घालण्यासाठी गेला पेट्रोल पंपावर,
पण डिझेल भरायला पैसे कुठेत? काटाच आला अंगावर!
थरथर कापत जेशू राह्यला पंपाजवळ उभा.
डिझेलवाला दादा म्हणाला, “हायला जेशू? हिकडं कुटं भावा?”

ओळखीचा आवाज ऐकून जेशू भलताच खुश झाला;
डिझेलवाला दादा तर मालकाचा मित्रच निघाला.
टाकी फुल्ल करून त्यानं जेशूला बाजूला घेतलं.
“येकटाच कुणीकडं चाल्लास भावा?” काळजीनं त्याला इचारलं.

जेशू म्हणाला, “शोधायची आहे मला माझी आई.
आईशिवाय हल्ली मला मुळीच करमत नाही.”

पोट धरून डिझेलदादा खो-खो हसत सुटला.
“गाडीला कुटं अस्त्या आई, खुळाच हाईस की भावा!”

नाराज होऊन जेशूनं मग उलट प्रश्न केला,
“दादा, तुला नाही का आई? सांग बघू मला.”
डिझेलदादा म्हणाला, “भावा, समद्यास्नी अस्त्या आई.”
जेशू म्हणाला, “मग का म्हणतोस, मलाच आई नाही?”

डिझेलदादानं खाजवलं डोकं, बोलला, “खरं हाय.
जा बाबा, शोध आईला. ऑल द बेश्ट, भाय!”



पोटभर डिझेल भरून त्यानं मागं टाकलं इस्लामपूर;
हायवेवरच्या टोलनाक्याला पुन्हा त्याचा निघाला धूर.
इथं नव्हती चालणार ओळख, कशी मागावी सूट?
पैसे नाहीत तर टोलवाले काका म्हणाले, “चल, इथून फूट!!”

जेशू म्हणाला, “जाऊ द्या मला, आईकडे जायचंय.
वेळ थोडाच आहे आणि अंतर खूप कापायचंय…”



टोलकाका खुर्चीमध्येच खदाखदा हसत बसले,
“जेसीबीला आई असते, मलापण आजच कळले…”

नाराज होऊन जेशूनं मग उलट प्रश्न केला,
“काका, तुम्हाला नाही का आई? सांगा बघू मला.”
टोलकाका म्हणाले, “वेड्या मुला, सगळ्यांना असते आई.”
जेशू म्हणाला, “मग का म्हणता, मलाच आई नाही?”

टोलकाकांनी विचार केला, बसून केबिनच्या आत.
“चांगल्या कामासाठी जातोयस तर, मी नाही अडवत वाट…”

आनंदानं निघाला जेशू भरभर भराभरा;
आता त्याला थांबवेल कसा ऊन, पाऊस, वारा…
रस्त्यानं त्याला दिसत होते त्याचे भाऊबंद;
पण ओळख ना पाळख, बोलणार कसं? हसले मंद मंद.



डोक्यावरती सूर्य म्हणजे वाजले असतील बारा;
कराड गेलं, उंब्रज गेलं, पुढचं गाव सातारा.
साताऱ्यातून पुण्यापर्यंत अडचणी आल्या खूप;
पण मागं फिरेल तो जेशू कसला, धीटच होता खूप.

पत्ता शोधत पोचला जेव्हा कारखान्याच्या बाहेर;
त्याच्यासारखेच शेकडो जेशू, हेच त्याचं माहेर!
गेटवर होते वॉचमन काका, आले वही घेऊन.
कुठून आलास, नाव काय, घेतलं सगळं लिहून.
काम विचारलं तेव्हा म्हणाला जेशू हसत हसत,
“आई माझी नक्कीच असेल इथंच काम करत…”



वॉचमन काका खो-खो हसले, वही मिटवून घेत.
“कामाला इथं कामगार येतात, कुणाची आई नसते येत.”

जेशू म्हणाला, “काका, तुम्ही एकदा माझं ऐकाल काय?
आत जाऊन ‘जेशू आलाय’ एवढंच ओरडून सांगाल काय?”

वॉचमन काका हसतच होते, कुठून आलाय वेडा!
तरी म्हणाले, “तू म्हणतोस तर प्रयत्न करतो थोडा…”
आत जाऊन मग वॉचमन काका ओरडून बोलले जोरात,
“जेशू नावाचा कुणीतरी वेडा आलाय आपल्या दारात.
आई त्याची असेल इथं तर यावं तिनं पळत.
नाहीतर त्याला पाठवून देईन मी गेटवरुनच परत…”

एवढं बोलून वॉचमन काका जाण्यासाठी वळले;
गडबड-गोंधळ ऐकून मात्र जागेवरती थांबले.
कारखान्यातले सगळे लोक गेटकडे धावले.
हे काय चाललंय, नुसतं बघत वॉचमन काका थांबले.

गेट उघडून सगळ्यांनी जेशूला घेतला आत;
जेशूसुद्धा बागडत आला त्याच्या मूळ घरात.
“किती रे सुकलास, जेशू बाळा” बोललं कुणीतरी.
“दमतोस का रे खूप काम करुन?” विचारलं कुणीतरी.



एका आईला शोधण्यासाठी निघाला होता जेशू;
एवढ्या आयांना भेटून त्याला खरंच फुटलं रडू.
त्या आयांनी मग जेशूचे खूप-खूप लाड केले.
नट-बोल्ट, हेडलॅम्प, ऑईलिंग-ग्रिसिंग, स्वच्छ त्याला धुतले.

पोट भरुन गप्पा झाल्या, चौकशी-काळजी झाली;
आता जेशूला आठवलं, परत जायची वेळ झाली.
निरोप घेताना डोळ्यांत पाणी, ओठांवर होतं हसू.
सगळे म्हणाले, “पुन्हा ये बेटा… आम्ही इथंच असू! आम्ही इथंच असू!!”