जंगल आजी १: ससोबा की आयतोबा?

लेखन: डी.व्ही.कुलकर्णी
चित्र: प्राची केळकर भिडे | छायाचित्र: मितेश सरवणकर
---------------------------------------

गोष्ट  पहिली: ससोबा की आयतोबा?

त्या दिवशी आजी पहाटेच निघाली. अगदी तुरुतुरु चालू लागली. झाडावरच्या राघू पोपटाच्या काही लक्षात येईना. ही  एवढ्या सकाळी कुठे चालली? बरं, रणबीरने तर आताच बांग दिली होती. राघू  पोपट अंगणातील कोंबड्याला 'रणबीर' म्हणतो. का? तर तो राजबिंडा दिसतो म्हणून!

त्याने झाडावरूनच गल्लीतल्या मोती कुत्र्याला आवाज दिला, “अहो संरक्षणमंत्री, एवढ्या पहाटे आजी कुठे निघाल्या आहेत ते पाहा.” खरं म्हणजे मोती  कुत्र्याचं दुसरं नाव आहे ‘टायगर’. गल्लीतील पोरे त्याला टायगरच म्हणतात, परंतु राघू पोपटाला ते मान्य नाही. ‘वाघांची संख्या कमी झाली म्हणून काय झालं, अगदी मोती कुत्र्याला टायगर म्हणण्याची वेळ आलेली नाही’ असंच त्याच मत आहे. मनीमाऊचा पाठिंबा अर्थातच राघूला आहे. वाघाची मावशी म्हणून आधीच ती रुबाब करते. ती म्हणते, “आमचा वाघ्या तो वाघ्या. कुठे इंद्राचा ऐरावत…”

मोती कुत्रा अर्थातच चिडतो. “बच्चमजी, झाडावर आहेस म्हणून! नाहीतर बघून घेतलं असतं.”, असा दम तो राघू पोपटाला भरतो. आजदेखील तो राघू पोपटावर उचकला होता, परंतु आजीसाठी धावणं गरजेचं होतं. आजी रोज आपली प्रेमानं भाकरी खाऊ घालते, तेव्हा तिच्यासाठी आळस झटकून उठलंच पाहिजे.

“आजी ,कुठे निघालीस?”, मोती कुत्र्याने विचारलं.
“काही नाही रे! जरा लेकीची आठवण आली. तिच्याकडे जाऊन येते. नंतर ऊन होईल म्हणून पहाटेच निघाले. लेकीकडे जाईन तूप-रोटी खाईन. धष्टपुष्ट होईन. मगच परत येईन.”
“आजी, मी येतो तुला गावच्या वेशीपर्यंत सोडायला”
“नको. जाईन मी एकटी.”
“नको. येतो मी. चोरांचा काय भरवसा?”
आजीला खूप कौतुक वाटलं. “धन्य रे बाबा तुझी! कलियुगात देखील तुझं इमान टिकून आहे.”


चित्र: प्राची केळकर भिडे 

आजी लेकीकडे निघाली. गाव मागे पडलं. काठी टेकत प्रवास सुरू झाला. झाडी दाट झाली. जंगल सुरू झालं. आजीला वाटेत एका झाडाजवळ ससा भेटला.मऊशार हिरवळीवर लोळत पडला होता.
“काय रे सशा , काय चाललंय?”
सशाने छानसा आळस दिला आणि म्हणाला, “काही नाही आजी! जेवण झालं. आता वामकुक्षी घेईन म्हणतोय.”
आजी हसली. सशाच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाली, “तू कधी रे सुधारणार? एवढी कासवाबरोबर शर्यत हरलास, तरी तुझ्यात सुधारणा होत नाही.”
“आजी, मी नाही हरलो! आमचे खापरपणजोबा हरले.’’
“तेच ते रे”
“त्यानंतर मी कासवाशी शर्यतच नाही लावली. त्याच्याबरोबर धावलोच नाही. सांगितली आहे कोणी झंजट? शेंगाच खाल्ल्या नाहीत तर टरफल येणार कुठून?”


आजी मोठ्याने हसली.म्हणाली, “छान! तुझ्या खापर पणजोबा सारखाच तूदेखील भित्रा आणि पळपुटा आहेस.”
“काय झालं?”
“अरे, शर्यत हरल्यानंतर जनलज्जेला घाबरून, तुझा पणजोबा थेट चंद्रावर पळून गेला.”
“काय सांगतेस?”
“हो ना! आम्हाला खालून चंद्रावर सशासारखा आकार दिसायचा. मागे नील आर्मस्ट्राँग चंद्रावर गेला तेव्हा त्याला म्हटलं, बघ दिसतोय का!”


छायाचित्र: मितेश सरवणकर

“भेटले पणजोबा?”
“छे रे! त्या चंद्रावर काहीसुद्धा नाही. मुळात प्राणीमात्रांच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली हवाच नाही.”
“अरेच्च्या! मग आहे तरी काय तिथे?”
“दगड धोंडे आणि माती. प्रत्यक्षातला चंद्र अगदीच कुरूप आहे. तिथे मोठमोठी विवरं आहेत. मोठाले खडक आहेत. तुझा तो खापर पणजोबा काय खाणार होता? तिथे गवताच पानदेखील नाही.”
“आजी, तिथे हवा नाही, झाडी नाहीत, म्हणजे खूप उकडत असेल.”, सशाने विचारलं.
“चंद्राच्या प्रकाशित भागाच्या पृष्टभागाचं तापमान १३० डिग्री सेंटीग्रेड इतकं असतं. म्हणजे उकळत्या पाण्यापेक्षा जास्त. अप्रकाशित भागात कडाक्याची थंडी असते.”
“आजी, पण चंद्राचा प्रकाश किती शीतल असतो!”, ससा भावुक होत म्हणाला. आजीने त्याला उचलले. हळुवार हात फिरवला. “अरे सोन्या, तो प्रकाश चंद्राचा नाहीच मुळी! चंद्र परप्रकाशित आहे. सूर्याचाच परावर्तित प्रकाश आहे तो.”
“आजी, म्हणजे माणसाची चंद्रावरची फेरी फुकट गेली म्हणायची”, कुत्सितपणे ससा म्हणाला.

आजी कातावली. सशाला खाली सोडले. “मुळीच नाही! माणसाने तिथल्या मातीचे नमुने गोळा केले. त्या मातीत असलेल्या खनिजांचा अभ्यास सुरू केला. माणूस तुझ्यासारखा आळशी नाही. तो मेहनत करतो. विविध विषयांचा अभ्यास करतो, म्हणूनच त्याची प्रगती सुरू आहे. हे जग चालणाऱ्यांचं आहे. तुझ्यासारख्या आयतोबाचं नाही.”

आजी उठली. या आयतोबाशी बोलून वेळ दवडण्यात अर्थ नाही हे तिने जाणलं. काठी टेकीत ती शहराच्या दिशेने तरातरा चालू लागली!

(क्रमश:)

 

----------------------

लेखक शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर असून, आजवर अनेक बालकथांचे लेखन केले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांच्या या आधुनिक जंगल आजीच्या कथांना कोसामप आणि बालकुमारसाहित्य परिषदेने पुरस्कार दिले होते. या कथासंग्रहाबद्दल पु.ल. देशपांडे यांनीही लेखकाचे कौतुक केले होते.
अटक मटक.कॉम'ची घोषणा होताच मोठ्या मनाने आपणहून त्यांच्या कथा साईटवर प्रकाशित करण्याची परवानगी त्यांनी दिली - त्याबद्दल त्यांचे आभार