मनःचक्षु (कथा)

मनःचक्षु

लेखनः विद्याधीश केळकर

चित्रेः संज्ञा घाटपांडे - पेंडसे

 

विनायक त्याच्या गाडीतून लॅबकडे निघाला होता. तो वरवर जरी शांत वाटत असला तरी तो आज फार अस्वस्थ होता. त्याच्या शेजारीच रोहिणी म्हणजे त्याची बायको बसली होती. आजचा दिवस त्या दोघांसाठीही फार महत्त्वाचा होता. गेली दहा वर्षं चालू असणार्‍या त्यांच्या एका प्रयोगाची आज फार महत्त्वपूर्ण अशी चाचणी होती, ती सफल झाली तर एक मोठा शोध लागणार होता, मानवाच्या विज्ञान-प्रवासातला हा एक फार मोठा टप्पा ठरणार होता. विनायकाने ड्रायव्हरला जरा घाई करायला सांगितली त्याला आता कधी एकदा लॅबमध्ये पोहोचतो असं झालं होतं.

प्रा. डॉ. विनायक चक्रवर्ती, भारतातला एक नावाजलेला तरुण शास्त्रज्ञ होता. वयाच्या अवघ्या २५-२६व्या वर्षी त्याने जीवशास्त्रात, खास करून मेंदूच्या रचनेच्या आणि कार्याच्या अभ्यासात Ph.D. मिळवली होती. तर त्याची बायको रोहिणी ही देखील एक अशीच बुद्धिमान शास्त्रज्ञ होती. तिचा अभ्यासाचा विषय होता भौतिकशास्त्र. रोहिणी पुण्याची अन विनायक कलकत्त्याचा. लंडन मधील एका मोठ्या कॉन्फरन्समध्ये या दोघांची भेट झाली. त्यावेळी विनायकने त्याच्या या प्रयोगाबद्दल सांगितलं, कारण त्या प्रयोगात त्याला नुसतं जीवशास्त्र माहीत असून चालणार नव्हतं तर भौतिकशास्त्राची त्याला खूप गरज होती, आणि त्यावेळी भौतिकशास्त्रातील एक उगवता तारा अशी रोहिणीची जगभरात ओळख होती. आता त्या गोष्टीला दहा वर्षं झाली तरी विनायकला तो प्रसंग जसाच्या तसा आठवत होता. 

“नमस्कार डॉ. गोखले, मी विनायक, डॉ. विनायक चक्रवर्ती.”

“नमस्कार, डॉ. चक्रवर्ती. मी ओळखते आपल्याला. तुमच्या कामाबद्दल ऐकून आहे मी.”

“मला विनायकच म्हणा, मी तुमच्याच वयाचा आहे.”

“बरं. पण विनायक मग तुम्हीही मला रोहिणीच म्हणा.”

“ओके! तर रोहिणी मला जरा तुमच्याशी माझ्या मनातल्या एका कल्पनेविषयी बोलायचं होतं. मला एक प्रयोग करायचा आहे पण त्यासाठी मला एका अतिशय हुशार अशा भौतिकशास्त्राच्या जाणकाराची गरज आहे. आणि तुमच्याशिवाय दुसरं कोण इतकं सक्षम असू शकणार?”

“हे बघा विनायक, तुम्ही उगाच मला मस्का मरू नका. काय असेल ते सरळ सांगा. मग मी ठरवेन तुम्हाला मदत करायची की नाही ते”, रोहिणी खास पुणेरी ठसक्यात म्हणाली. 

“ठीके ठीके, ऐका तर मग. मी स्वतः मेंदूच्या कार्यावर आणि रचनेवर खूप अभ्यास केला आहे. मेंदूतील विचारांचं आणि निर्णयांचं वहन कसं होतं यावर माझा अभ्यास आहे. तर हे करताना मला एक कल्पना सुचली की समजा हे मेंदूतील विचार आपल्याला एखाद्या यंत्रात पकडता आले तर? म्हणजे समजा समोरच्या माणसाच्या मनातले विचार जर आपल्याला केवळ एका क्लिकवर समजू शकले तर?”

“विनायक, ही कल्पना भन्नाट आहे खरी. पण हे विचार तुम्ही पकडणार कसे यंत्रात?”

“अहो त्याचसाठी तर मला तुमची गरज आहे! असं पहा कुठल्याही सजीवाच्या मेंदूतील संदेश त्याच्या शरीरातील सर्व भागांपर्यंत ‘न्यूरॉन्स’या खास पेशींद्वारे पोहोचवले जातात. आणि हे सर्व संदेश हे विद्‍युतचुंबकीय लहरींच्या रूपात असतात. पण सर्वच संदेश काही शरीराकडे जात नाहीत, काही मनातच विचारांच्या रूपात राहतात. हे विद्युत लहरींच्या रूपात असलेले विचार आपण पकडायचे. विद्युतचुंबकीय लहरी पकडता येणं असं किती अवघड आहे? जर रेडिओ या लहरी पकडू शकतो तर तसंच काहीसं एक यंत्र आपण का नाही बनवू शकत?”

“विनायक, तुम्हाला वाटतंय तितकं हे सोपं नाही. पण तरीही मला ही कल्पना आवडली. मला आवडेल काम करायला तुमच्यासोबत यावर!”

“रोहिणी किती लगेच तयार झाली होती माझ्यासोबत या प्रयोगात काम करायला!”, विनायकच्या मनात विचार चालूच होते. “पण हे काम अजिबात सोपं नव्हतं. मला वाटलं होतं, की प्राथमिक स्वरूपात यंत्र बनवायला फारफार तर एखादं वर्ष लागेल, पण नाही. साधा प्रोटोटाईप तयार करायलासुद्धा आम्हाला चार वर्षं लागली. मेंदूतल्या त्या विद्युतचुंबकीय लहरी इतक्या क्षीण होत्या की कितीही क्षमतेचा ग्राहक वापरला तरी देखील त्या पकडता येत नव्हत्या मग त्या आपल्याला समजेल अशा भाषेत बदलता येणं तर शक्यंच नव्हतं. मग त्या लहरींचा आवाका आणि त्यांची शक्ती वाढवण्यासाठी आम्ही एक प्रक्षेपक बनवला. तो कानाजवळ फिट करावा लागे. मग तो मेंदूतल्या क्षीण लहरी एकत्रित करून जास्त शक्तीच्या लहरी ग्राहकाकडे पाठवे, त्यामुळे हळू हळू आम्हाला त्या विचार लहरी पकडता येऊ लागल्या. प्रथम आम्ही स्वतःवरच याचे प्रयोग करून पाहिले, स्वतःवरच म्हणजे माझ्यावर! रोहिणीनी कधीच तो प्रक्षेपक मला तिच्या जवळदेखील आणू दिला नाही.”

विनायकाने हलकेच रोहिणी कडे पाहिले. ती शांतपणे पुस्तक वाचत बसली होती. लॅब यायला अजून बराच अवकाश होता म्हणून विनायक परत मागे टेकला आणि डोळे मिटून परत एकदा आठवणींच्या राज्यात हरवून गेला. 

“लहरी पकडता येऊ लागल्या तरी त्या लहरींचं रूपांतर आपल्याला समजेल अशा भाषेत कसं करता येईल हा प्रश्न होताच. कारण त्या शिवाय विचार समजणार तरी कसे? त्यावेळी काय भन्नाट कल्पना वापरली रोहिणीनी! तिनी टेलिफोनच्या पद्धतीचा वापर केला. टेलिफोन किंवा मोबाईल मध्ये जे आपण बोलतो ते दुसर्‍यांपर्यंत कसं पोहोचतं? विद्युतचुंबकीय लहरींद्वारेच ना? आणि दुसर्‍या बाजूला त्या लहरींचं रूपांतर परत आपल्या नेहमीच्या बोलण्यात होऊन ते आपल्याला ऐकू येतं! तीच पद्धत तिनी इथे वापरली. आम्हाला मनातले विचार ऐकता येऊ लागले. आमचं यंत्र खर्‍या अर्थाने आता तयार झालं होतं. त्याला नावही किती समर्पक सुचलं होतं, मनःचक्षू. मनाचा डोळा, विचार वाचणारा. त्याच्या ताकदीची प्रचितीही किती लगेच आली. खरंतर यामुळेच मला रोहिणीच्या मनातलं समजलं नाही का?” ,विनायकला तो दिवस आठवला. त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दुसराच दिवस. त्याने सहज गंमत म्हणून रोहिणी झोपली असताना तिच्या कानावर प्रक्षेपक बसवला. तिने जागेपणी हे त्याला करूच दिलं नसतं. पण तिच्या मनातले विचार ऐकून तो चाटच पडला. रोहिणी त्याच्या प्रेमात पडली होती. त्याला केवढा आनंद झाला होता. पण त्यानी तिला हे कधीच कळू दिलं नाही. दुसर्‍याच दिवशी त्याने तिला लग्नाची मागणी घातली आणि तिनेही लगेच होकार दिला. विनायक स्वतःशीच हसला. त्यांचे स्वतःवरचे असे प्रयोग तर यशस्वी झालेच. पण आजपासून त्यांच्या इतर लोकांवर चाचण्या सुरू होणार होत्या. या चाचण्या यशस्वी व्हायलाच हव्या होत्या. विनायकने एक खोल श्वास घेतला आणि स्वतःला धीर देत तो डोळे मिटून शांत बसला.  

 

इतक्यात ब्रेकचा कर्कश्श आवाज होत गाडी थांबली आणि विनायक भानावर आला. त्याने दचकून रोहिणीकडे पाहिलं. ती भेदरलेल्या नजरेनी समोर पहात होती. एक काळ्या कोटातला इसम समोर रस्ता अडवून उभा होता. डोक्यावर काळी हॅट आणि डोळ्यावर गॉगल. त्याच्या मागे अनेक बंदुकधारी लोक होते. त्या इसमाने खूण करताच त्यातले दोनजण विनायकच्या गाडीजवळ आले आणि गाडीचं दार उघडून त्यांनी खुणेनेच दोघांना बाहेर पडायला सांगितलं. विनायक आणि रोहिणी घाबरत गाडीतून उतरले. तसं त्या इसमानी खुणेनंच त्यांना जवळ बोलावलं. 

“नमस्कार डॉ. चक्रवर्ती, नमस्ते रोहिणीताई. मी निशांत भारद्वाज. मला जरा तुमची मदत हवी आहे.”

“आमची मदत?”, विनायक आश्चर्याने म्हणाला.

“हो डॉक्टर, तुम्हा दोघांची. त्याचं काय आहे, की दहा वर्षांपूर्वी तुम्ही रोहिणीताईंना तुमची कल्पना ऐकवल्यापासून मी तुमच्या प्रयोगांवर लक्ष ठेवून आहे. लोकांचे विचार वाचायची तुमची कल्पना छानच आहे पण मला त्यात एक छोटासा बदल करायची गरज वाटते आहे आणि तो सत्यात उतरवायला मला तुमची मदत हवी आहे?”

“तुला ती कल्पना काय माहीत?”,विनायकने विचारलं.

“चक्रवर्ती, तुम्ही फारच भोळे आहात बुवा. अहो, कॉन्फरन्स हॉलच्या मधोमध उभं राहून तुम्ही रोहिणीताईंना कल्पना ऐकवली होतीत. भिंतींनाही कान असतात आणि इथे तर तुमच्या आजूबाजूला जिवंत शास्‍त्रज्ञ होते आणि तरीही तुम्ही विचारताय की हे मला कसं समजलं? असो, गप्पा खूप झाल्या डॉक्टर आता कामाला लागायला हवं. आता शहाण्या मुलासारखे तुम्ही दोघंही गाडीत बसा आणि माझ्यासोबत चला. आपल्याला भरपूर काम आहे!”, असं म्हणून मोठ्याने हसत निशांत वळून आपल्या गाडीकडे निघाला. विनायक आणि रोहिणी नाईलाजाने त्याच्या पाठोपाठ गाडीत बसले आणि गाडी भरधाव निघाली.

साधारण तास-दीड तास गेल्यानंतर गाडी एका जुन्या वेअरहाऊसपाशी थांबली. विनायक-रोहिणी गाडीतून उतरले आणि निशांतच्या पाठोपाठ त्या वेअरहाऊसमध्ये शिरले. बाहेरून जुनाट, पडझड झालेलं असलं तरी वेअरहाऊसच्या आतमध्ये अत्याधुनिक यंत्रे आणि सोयी होत्या. एखाद्या हाय-टेक लॅबमध्ये असणार्‍या सगळ्या गोष्टी तिथे होत्या. विनायक-रोहिणी काही काळ थक्क होऊन त्या उपकरणांकडे पहातच राहिले. 

“काय? कशी वाटली आमची ही छोटीशी लॅब? खास तुमच्यासाठी बनवून घेतली आहे. तुम्हाला लागणारं एकनएक उपकरण इथे आहे. तुमच्या उजव्या बाजूला तुमची रहाण्याची खोली आणि डाव्या बाजूला तुमच्या खाण्या-पिण्याची सोय करण्यासाठी २४/७ चालू असणारं कॅंटीन. आमचा कूक दौलतसिंग उत्कृष्ट स्वयंपाक करतो. तुम्ही फक्त पदार्थाचं नाव सांगा तो लगेच हजर करेल. तुम्हाला कंटाळा आला तर मागच्या बाजूला जिम, फिरायला लॉन सगळं काही आहे. आणि हो, तुम्ही अचानक काही दिवसांसाठी परगावी गेल्याचं तुमच्या लॅबला कळवलं आहे. तेव्हा तुम्ही निश्चिंत रहा.”, निशांत हसत हसत म्हणाला. “ओके, आता आपण आपल्या मुख्य कामाकडे वळू. पण त्याआधी माझा एक प्रश्न आहे, आजच्या चाचण्या यशस्वी झाल्या असत्या तर तुम्ही पुढे काय करायचं ठरवलं होतंत?”

“त्याच्याशी तुझा काहीएक संबंध नाही.”, विनायक ताडकन्‌ उत्तरला. 

“नाही कसा? अहो त्याच उपकरणावर तर माझी कल्पना उभी राहिली आहे”, निशांत शांतपणे म्हणाला. 

“आम्ही त्याचं पेटंट रजिस्टर झाल्यानंतर ते उपकरण सरकारच्या स्वाधीन करणार आहोत. त्याचा वापर कसा करायचा हे सरकारच ठरवेल”, रोहिणी उत्तरली. 

“हं, सरकारला स्वाधीन करणार आहात म्हणे आणि त्याबदल्यात तुम्हाला काय मिळणार? चार रुपडेसुद्धा मिळायचे नाहीत. फारफार तर काय एखादं पदक देऊन गौरव करतील. त्यापेक्षा आता मी सांगतो तसं करा. या उपकरणाने तुम्ही विचार फक्त वाचू शकता. पण मला ते विचार बदलता यायला हवे आहेत. दुसर्‍याच्या विचारांना आपल्याला कंट्रोल करता यायला पाहिजे. Total Mind Control. कशी आहे कल्पना? तुम्ही असं यंत्र बनवलंत की तुम्ही जायला मोकळे. अर्थात तुमच्या कामाच्या योग्य मोबदल्यासह! चला तर मग कामाला लागा.”, एवढं बोलून निशांत झपाझप पावले टाकीत दारातून बाहेर पडला. विनायक-रोहिणी त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे सुन्न होऊन बघत राहिले.

दुसर्‍या दिवसापासून विनायक-रोहिणी दिवसरात्र लॅबमध्ये काम करू लागले. त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. निशांत दररोज येउन त्यांच्या प्रयोगांची प्रगती तपासून जाई. त्याची माणसं दोघांवर चोवीस तास पहारा ठेवून असत. निशांतची कल्पना कितीही डोकेबाज असली तरी अतिशय भयंकर होती. दुसर्‍या विचार कंट्रोल करता येणं ही कल्पनाच धडकी भरवणारी होती. जितकी ही कल्पना भयानक होती तितकीच ती सत्यात उतरवणं अवघड काम होतं. विचार वाचता येण्यासाठी प्रक्षेपक-ग्राहक पुरेसे होते पण विचार बदलायचे तर त्यासाठी त्या माणसाच्या मेंदूतले विचार-प्रवाह त्या विद्युतचुंबकीय लहरी बदलाव्या लागणार होत्या, आणि नुसत्या बदलाव्या नाही तर आपल्याला पाहिजे तशा बदलता यायला लागणार होत्या. सोप्या शब्दात एका माणसाचे विचार दुसर्‍या माणसाच्या मेंदूत भरवायचे होते आणि त्याचे स्वतःचे विचार नष्ट करायचे होते. हे अजिबातच सोपं काम नव्हतं. पण तरीसुद्धा विनायक आणि रोहिणीनी दीड-महिना अथक मेहनत घेऊन एक प्राथमिक स्वरुपातलं यंत्र तयार केलं.

यंत्राचे दोन भाग होते एक होता Controller आणि दुसरा होता Manipulator. Controller हा दिसायला एखाद्या हेडफोनसारखा होता, ज्याला विचार कंट्रोल करायचे आहेत त्याने तो डोक्यावर घालायचा. त्यातील इयरपीसमधून समोरच्याचे विचार ऐकता येण्याची सोय होती तर प्रत्येक इयरपीसच्या वरच्या बाजूला असणर्‍या दोन छोट्या प्रक्षेपकांद्वारे कंट्रोलरच्या/ नियंत्रकाच्या मनातले विचार समोरच्या माणसाकडे प्रक्षेपित करण्याची सोय होती. हे विचार Manipulator द्वारे पकडले जात. हा नियंत्रणाखालील व्यक्तीच्या डोक्याला कानाच्या मागे बसवलेला असे. हा manipulator अतिशय छोटा साधा ५x५ मिमीचा चौकोन होता. जो अतिशय सहजपणे कोणाचाही डोक्याला त्याला नकळत लावता येणं शक्य होतं. नियंत्रकाचे पकडलेले विचार manipulatorद्वारे नियंत्रिताच्या मेंदूत शिरत. अशी साधारण योजना होती.

 

निशांत ते यंत्र पाहून खूप खूश झाला. “वा! वा! विनायक, रोहिणीताई तुम्ही कमाल केलीत. आता लवकरात लवकर याच्या चाचण्या घ्या आणि याला अंतिम रूपात आणा. म्हणजे तुम्हीही मोकळे आणि आम्हीही.” असं म्हणून निशांतने रोहिणीशी हस्तांदोलन केले आणि विनायकला चक्क मिठी मारली. पण त्या आनंदाच्या भरात विनायकचा त्याच्या कानावरून फिरलेला हात त्याच्या लक्षात आला नाही. 

पुढच्या तीन-चार दिवसात यंत्राच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या. त्यासाठी निशांतने त्याच्याच माणसांचा उपयोग केला. सर्व चाचण्या अगदी व्यवस्थित पार पडल्या. निशांत भलताच खूश होता. पण आश्चर्य म्हणजे विनायक आणि रोहिणीसुद्धा खूप खूश दिसत होते. 

होता होता यंत्राला त्याचं अंतिम स्वरूप प्राप्त झालं. विनायकनी त्याला असं काही रूप दिलं की इतर कोणालाही तो साधा हेडफोनच वाटावा. रोहिणीनी त्याचं नामकरण ’विचार-मंथक’ असं केलं होतं. विनायक आणि रोहिणीनी विजयी थाटात ते यंत्र राजाप्रमाणे खुर्चीत बसलेल्या निशांत समोर ठेवलं. 

निशांतने तो हेडफोन कानाला लावला. त्याच्या माणसांना manipulators लावलेले होतेच. निशांतच्या चेहर्‍यावर एक विजयी हास्य होतं. आपण जणू देवच असल्यासारखं त्याला वाटत होतं. त्याला काय करू काय नको असं झालं होतं. तो वेड लागल्यासारखा हसत होता. त्याच आनंदात तो उडी मारून आपल्या खुर्चीतून उठला. त्याबरोबर त्याच्या सर्व माणसांनी अचानक त्यांच्या बंदुका निशांतकडे वळवल्या. निशांतला काही कळेचना. त्याने त्यांना यंत्राद्वारे बंदूका खाली घ्यायला सांगून पाहिलं. काही घडलं नाही. त्याने ओरडून सांगितलं, काही घडलं नाही. 

“ओरडून काही उपयोग नाही निशांतबाबू”, मागून विनायकचा आवाज आला. तसं निशंतचं लक्ष त्याच्यामागे उभ्या असलेल्या विनायक आणि रोहिणी कडे गेलं आणि तो सुन्न झाला. रोहिणीनी हुबेहुब निशांतसारखा हेडफोन घातला होता आणि ते दोघही त्याच्याकडे पाहून हसत होते. “तू जो डोक्यावर घातला आहेस ना तो माझा हेडफोन आहे. महिन्याभरापूर्वी मीच तो गाणी ऐकायला मागवला होता आणि तुझ्या माणसांनी हसत हसत तो आणूनही दिला.” विनायक पुढे म्हणाला, “आणि रोहिणीकडे जो आहे तो आहे खरा ’विचार-मंथक’. म्हणूनच तुझी माणसं आमचं ऐकतायत. आणि आता तू सुद्धा. कारण आठवड्याभरापूर्वी तुला प्रोटोटाईप दाखवल्यावर मी तुलाही एक manipulator लावला होता आणि हो, तो शोधायचा प्रयत्न करू नकोस तो तुला कानामागे नाही सापडणार. तो तुझ्या कानाच्या आत आहे.”

“तू मला ताई म्हणतोस ना? मग चल निशांतदादा आता शहाण्या मुलासारखा गाडीत बस आणि पोलीस स्टेशनला चल” ,रोहिणी म्हणाली.

---

आणि मग काय, निशांतला अटक झाली. विनायक आणि रोहिणी सुखरूप आपल्या घरी परतले. लागलीच त्यांनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या सर्व प्रयोगांचे पुरावे नष्ट केले. इतकंच नव्हे तर आत्तापर्यंत त्यांनी तयार केलेली नवी-जुनी सर्व यंत्रसुद्धा नष्ट केली. पुन्हा या विचार वाचायच्या भानगडीत कधीही न पडण्याचा त्यांनी निश्चय केला आणि आपलं उर्वरीत आयुष्य आपल्या इतर प्रयोगात मग्न राहून दोघांनी सुखानी व्यतीत केलं.