आई, चल बाय करायला! (कथा)

आई, चल बाय करायला!
लेखन: मानसी कुलकर्णी (काकतकर)
चित्रे: प्रज्ञा ब्राह्मणकर

 

आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस होता. बबू आणि त्याचा दादा नुकतेच सोसायटीच्या गणपतीची मिरवणूक संपवून घरी आले होते. दंगा करून दमलेले दोघं आता टीव्ही वर मिरवणूक बघण्यात रमले होते.

"आई, तिकडे सगळे बॉईज् का आहेत?", चिमुरड्या बबूने विचारले. अचानक आलेल्या प्रश्नाने गोंधळून गेलेली आई म्हणाली, "कुठे?" "ते टीव्हीमध्ये. गणपती पाण्यात बुडवतायत ते. बॉईज् आहेत फक्त." डोळ्यावर आठ्या आणत बबू म्हणाला. चार वर्षाच्या पोराला विसर्जनाला मुली नाहीत हे खटकतंय ह्याचं आश्चर्य आणि कौतुक वाटून, आई उत्तर देणार तोच शेजारी बसलेला दादा म्हणाला, "अरे त्यांच्याकडे गर्ल्स नसतील." "का? त्या काकाची काकू असेल की", बबू म्हणाला. परत मोठेपणाचा आव आणत दादा म्हणाला, "अरे ती घरी मोदक करत असेल. गणपतीला मोदक आवडतात की नाही, काय?" "पण आता तो घरी चाललाय ना! गणपतीला बाय करायला सगळ्यांनी जायचं असतं. आपण कसे जातो?"

तेवढ्यात डिनोसॉरवर स्वार झालेला गणपती टीव्हीवर आला आणि दोघे अवाक होऊन ते बघू लागले. बबुला डिनोसॉर जवळ येताना जाणवत होता. एवढा मोठा डिनोसॉर त्याने कधीच पहिला नव्हता. "काय बबूशेठ, तुम्ही डिनोसॉरला घाबरत नाही वाटतं." "डिनोसॉर खरे नसतात दादा, ते कधीच ‘मरले’. ते ज्यूरासिकपार्कमधलं सगळं खोटं होतं. बाबा म्हणाला होता की कॉम्प्युटरवर चित्र काढून मग ते ॲमिनेट करतात. सारखं चिडवलंस तर, मी पण एक मोठा डिनोसॉर बनवीन आणि तुझ्या..." असे म्हणत बबू दादाशी मारामारी करणार तेवढ्यात डिनोसॉरवरून गणपती उतरून येताना दिसला. बबू जरा घाबरला. टीव्हीमधून कोणी बाहेर येऊ शकत नाही, असं ३डी  सिनेमा बघताना मागे बाबानी सांगितलं होतं, पण हा गणपती जवळ येताना दिसत तर होता. 

"डिनोसॉरला ना घाबरणारा मुलगा मला घाबरतो की काय?"
आता गणपती चक्क बबूशेजारी येऊन बसला. "हं, मोदक ?"
"नको "
"बापरे! चिडला-बिडलास की काय माझ्यावर? अरे, पुढच्या वर्षी येणार आहे मी परत", गणपती समजूत काढत म्हणाला.

एकदा का बबू रागावला की, त्याला समजावणं तसं अवघड असे.  "तू घरी चालला आहेस ना? मग त्या काकूला मोदक करायला का सांगितलेस? तुझ्यामुळे ती तुला बाय करायला येऊ नाही शकली!" जरा गुश्यातच बबू म्हणाला. "तुझी आई देते ना घरी गेल्यावर?"
"मी नाही बुवा त्या काकूला मोदक करायला सांगितले. माझी तर ढेरी टम्म आहे, हे बघ. मला पण आवडतं सगळे बाय करायला आलेले! तीच नाही आली."

"का? घरी बसून बोअर होईल ना ती! सगळे मजा करणार, ढोल ताशे बघणार, तुला बाय म्हणणार, आणि ती घरी एकटी बसणार? मला नाही आवडलं." बाबू म्हणाला. "बरोबर आहे रे तुझं. मी सांगायचा प्रयत्न केला. ‘चला सगळे’, पण माझं ऐकताय कोण. देवाला असं लागतं, तसं आवडत नाही असं बिनधास्त ही मोठी माणसं ठरवून रिकामी झाली. आम्हाला कुणी विचारलंच नाही! आणि आम्ही सांगावं म्हंटलं तर मोठमोठ्यांदा गाणी वाजवून, दंगा करून आमचा आवाज कुणापर्यंत पोहचू देत नाही. कधी कधी वाटतं पुढच्या वर्षी येऊ नये, पण तुझ्यासारख्या निरागस मुलांना दुखावून न येणं जमत नाही. आणि मनात वाटत राहतं ह्यावर्षी तरी ती काकू, ती आत्या, ती आई सगळ्यांसोबत माझ्याकरता केलेले मोदक सगळ्यांबरोबर खातील, न की दमून भागून सगळ्यात शेवटी गार करून. ह्यावर्षी तरी ती ताई माझी पूजा करेल आणि सगळे तिच्या मागे उभे राहून आरती म्हणतील.” 

“असो, आई वाट पाहत असेल, मला गेलं पाहिजे. निदान तिलातरी माझ्याबरोबर गरम मोदक खाउ दे. तू पण तुझ्या आईला तुझ्याबरोबर जेवायची आठवण करशील ना? खूप खुश होईल ती! माझ्याकडे दरवेळी हात जोडून चांगली बुद्धी दे म्हणते सगळ्यांना, ह्या वर्षी थोडी दिली आहे सांग तिला." असं म्हणत गणपती परत डिनोसॉरवर जाऊन बसला. "पुढच्या वर्षी येईन तेव्हा आपण दोघं जाऊन सांगू त्या काकूला, तू येशील ना?"

"अरे बबू, येतोयस ना? आजी आजोबा घरी निघालेत" दादा बबुला हलवत म्हणत होता. बबू इकडे तिकडे बघू लागला. गणपती परत टीव्हीत गेला होता. "बाय बबूली," आजी म्हणाली "येतोयस ना खाली?" 

"हो, हो थांब. आई, चल , सगळे जाऊया बाय करायला!"