नवा सवंगडी (कथा)

नवा सवंगडी 

लेखन: एकनाथ आव्हाड
चित्रे: संज्ञा घाटपांडे

बाळूला वर्गात पोहचायला तसा आज थोडा उशीरच झाला. भागवत सरांचा मराठीचा पहिला तास केव्हाच सुरू झाला होता. 'भूतदया' हा पाठ ते शिकवत होते. तास सुरू होऊन दहा मिनिटे झाली असतील. तेवढ्यात बाळू वर्गाच्या दाराशी उभा राहून, “सर! सर, वर्गात येऊ का?” हलकेच म्हणाला. एकाच वेळी सरांचे आणि वर्गातील मुलांचे लक्ष पटकन दाराशी गेले. शाळेचा गणवेश काहीसा खराब आणि काहीसा ओला झालेल्या अवस्थेत बाळू दाराशी उभा होता. पाठीवर दप्तर, केस विस्कटलेले आणि चेहरा घामाने थबथबलेला.  खरंतर, बाळू कधीच उशिरा शाळेत येत नसे. नेहमीच सर्वांच्या आधी तो वर्गात हजर, पण आज त्याला उशीर झाला होता. भागवत सरांनी बाळूला शाळेत उशीरा येण्याचे कारण विचारताच बाळू लगेच बोलता झाला, “सर, शाळेत येताना वाटेत एका कुत्र्याच्या पिल्लाचा कर्णकर्कश केकाटण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. आजूबाजूला पाहिलं तर, एक कुत्र्याचं पिल्लू रस्त्याच्या बाजूच्या मोठ्या गटारीत पडलं होतं. वर येण्यासाठी ते जिवापाड धडपडत होतं. मोठमोठ्याने ओरडत होतं. सर कुणीच त्याला बाहेर काढेना. मग मीच दप्तर बाजूला ठेवून गटारीतून त्याला बाहेर काढलं. बाहेेर आल्यावर ते माझ्या मागंमागंच यायला लागलं. सुदैवाने थोड्या अंतरावर एक सार्वजनिक नळ होता. तिथं त्या कुत्र्याच्या पिल्लाला मी धुतलं. म्हणून मला शाळेत पोहचायला उशीर झाला सर.” बाळूने घडलं तसं धडाधड सांगितलं. बाळूचा वर्ग तळमजल्यावरच होता आणि काय आश्चर्य! तेच कुत्र्याचं पिल्लू  चक्क दारातून डोकावलं ना वर्गात. बाळूकडंच टकमका पाहत राहिलं. बाळू घाबरतच म्हणाला, “सर मी नाही बरं आणलं त्याला शाळेत. जा म्हटलं, हाकललं, तरी माझ्या मागं मागंच आलं बघा. आता मी तरी काय करू सर?” 

भागवत सर गालात हसले आणि पिल्लाकडं पाहून म्हणाले, “काय रे लब्बाडा, तुलाही शाळा शिकायचीय होय?  एकदम घुसलास वर्गात. पळ बरं इथून. शिकवू दे मला. आत्ता तास संपेल.” मुलं खळखळून हसली. एकच हशा. पण पिल्लू भांबावलं. दारातून हळू हळू मागं सरकत क्षणात दिसेनासं झालं. बाळू जागेवर जाऊन बसला.

भागवत सर म्हणाले, “मुलांनो, मी तुम्हाला भूतदया म्हणजे काय ते समजावून सांगत होतो, पण आज बाळूने भूतदयेचा वस्तुपाठच आपल्यापुढे उभा केला. त्या कुत्र्याच्या पिल्लाचे त्याने प्राण वाचवले. मुलांनो, भूतदया म्हणजेच प्राणिमात्रांवर दया दाखवणे. त्यांना मदत करणे. त्यांच्यावर प्रेम करणे. आपल्या प्रेमाची परतफेड हे प्राणी आपल्यावर भरपूर प्रेम करून व्यक्त करतात. आता मला सांगा बाळूच्या मागं मागं ते पिल्लू का बरं आलं असावं?” मुलांकडून विविध उत्तरे आली. कुणी म्हणालं, त्याला जवळचं  कुणी असेल. कुणी म्हणालं, त्याला घर नसेल. कुणी म्हणालं, कुणीतरी त्याला गटारात फेकून दिलं असेल आणि बाळूने त्याला गटारातून बाहेर काढलं म्हणून त्याला बाळूचा लळा लागला असेल. सर म्हणाले, “बाळांनो, हे प्राणी आपल्यावर फक्त प्रेमच नाही करत बरं, तर ते आपल्याला पदोपदी उपयोगीही पडतात. ते आपले खरेखुरे सवंगडी होतात. आपण एक खेळ खेळूया का? मी तुम्हाला काही प्राणिमित्रांची माहिती कोड्यात सांगतो. तुम्ही त्यांची नाव ओळखायची, बरं? करूया खेळ सुरू?”

मुलांनी होय होय म्हणून वर्ग डोक्यावर घेतला.

सर म्हणाले, "

पाठीवर बसवून, फिरवून आणतो

पोटात पाणी तो, साठवून ठेवतो

रुंद जाड तळवा, लांब लांब पापण्या

उंच त्याची मान ,फटीसारख्या नाकपुड्या

अंगाने धिप्पाड , डोंगरासारखी पाठ

रखरखीत वाळवंटात, काढीत जातो वाट

शरीराची ठेवण त्याची,  वेगळी जरी

वाळू आणि वा-यापासून, संरक्षण करी

वाळवंटातले जहाज, म्हणतात याला

सांगा बरं कोण हा, आला भेटीला ?"

मुलं पटकन, “उंट ...उंट …” म्हणाली.


सर म्हणाले, “शाबास!  आता पुढचा सवंगडी ओळखायचा हा..

अवाढव्य शरीर , मोठमोठे सुळे

चिडला की जंगलातून, सैरावैरा पळे

शाकाहारी आहे तो ,खादाडही खूप

त्याचे कान म्हणजे , भले मोठ्ठे सूप

नाक एवढे लांब की , जमिनीवर लोळे

खांबासारखे पाय ,चिमुकले डोळे

पाठीवरील अंबारीतून, फिरवून आणतो

पायाने ढकलत, ओंडके वाहून नेतो

ओळखलं का तुम्ही, अजून सांगू कित्ती?

बाळू लगेच उत्साहात म्हणाला, “हा तर आपला बलवान हत्ती!”

सर म्हणाले, “व्वा रे व्वा ! मस्त .आता पुढचा मित्र ओळखा हा! 

मुलांनो, काम करून, कंटाळा आला?

सर्जा राजाची गोष्ट, सांगू का तुम्हाला?

नांगर तो ओढतो, मोट चालवतो

श्रमाने अख्खे, शेत फुलवतो

वर्षभर शेतात, राब राब राबतो

कामात कधी ना, कुचराई करतो

कंटाळा त्याला कधी, माहीतच नाही

नेहमीच कामाला तो, जुंपून घेई

पोळ्याच्या सणाला, लाड होती फार

शेतकरीदादाचा हा, कोण जोडीदार?

मुलांनी बैल....बैल ....म्हणून एकच कल्ला केला. 

सर म्हणाले, " छान. छान!  आता पुढचा मित्र ओळखा बरं, पण हा मित्र आपल्या देशातला नाही बरं का! दुरून आलाय तो.

गवताळ प्रदेशात, दिसून येतो हमखास

आवडे त्याला झाडपाला, गवताचा घास

पुढचे पाय छोटे, मागचे लांब पाय

उंच उड्या मारून तो, क्षणात दूर जाय

शेपूट त्याचे मजबूत, लांब जाड मोठे

शरीराच्या मानाने, डोके मात्र छोटे

पोटाला पिशवी त्याच्या, पिशवीत पिल्लू बसे

अशा रूपात सांगा कोण ,भलतेच गोड दिसे?

मुलांनी पटकन सांगितलं... कांगारू....कांगारू.

           सरांचा आणि मुलांचा  खेळ छानच रंगला. सरांनी  गाय, बकरी ,म्हैस, हरीण, सिंह, याक, रेनडिअर,  वाघ...कितीतरी पाळीव आणि जंगली प्राण्यांवर कोडी घातली आणि मुलांनी ती कोडी चुटकीसरशी सोडवली. या कोड्यांतून मुलांना त्या प्राण्यांबद्दलची अधिकची माहिती हसत खेळत मिळत होती. ते प्राणी या खेळातून मुलांच्या अधिक परिचयाचे होत होते. खेळात तास केव्हा संपला ते मुलांना कळलंच नाही. कितीतरी प्राणी नकळत मुलांचे मित्र झाले होते. ही मोठीच गोष्ट या तासिकेतून घडली होती.

       त्या तासाने मुलांवर जणू गारुडच केलं होतं. मुलांनी पुढच्या रिकाम्या तासांना, मधल्या सुट्टीत, शाळा सुटल्यावर खूप नवे नवे प्राणी हुडकून त्यावर कोडी रचली. एकमेकांना घातली. एकमेकांवर हंडी चढवली. भागवत सरांची हीच तर खासियत होती. मुलांना ते बरोबर स्वतःहून नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी प्रवृत्त करत.

    बाळू शाळेतून घरी आला.दप्तर टेबलावर ठेवून त्याने कपडे बदलले. हातपाय, तोंड धुतले. शाळेतून आल्यापासून त्याच्याही डोक्यात केवढेतरी प्रेमळ प्राणी ठाण मांडून बसले होते. कागदावर कोड्यांच्या रूपात बाहेर येण्यासाठी आतूर झाले होते. बाळू पटकन वही पेन घेऊन बसला.आणि त्याला घरभर आजोळी फिरणारी मांजर आठवली. लगेच त्याची लेखणी कागदावर झरझर झरू लागली.

लांब लांब मिशा, गुबगुबीत अंग

कापसासारखा तिचा, पांढरा पांढरा रंग

अनोळखी कुणी दिसताच, रागाने गुरगुरते 

आपलं माणूस ओळखून, लाडे लाडे बोलते

मण्यांसारखे डोळे तिचे, चमके अंधारात

दूध प्यायला जाते, ती शेजा-यांच्या घरात

रात्रीचे जागरण हल्ली , तिला झेपत नाही

उंदीर पळतो घरभर, कोण झोपून राही ?

बाळूने लिहिलेले कोडे वाचले. भागवत सरांसारखे थोडेफार जमले आपल्याला या गोष्टीचा त्याला केवढा  आनंद झाला.

            तेवढ्यात दारातून कसला तरी आवाज आला. बाळू बाहेर आला आणि पाहतो तर काय तेच कुत्र्याचं पिल्लू बाळूचा माग काढत काढत घरापर्यंत पोहचलं होतं. बाळू मनात म्हणाला, “शर्थ झाली या पिल्लापुढं. एवढासा जीव पण केवढा धीट आहे.”  बाळूने पिल्लांला जवळ घेतलं. तसं ते पिल्लू एकदम बाळूच्या कुशीत शिरलं. खूप जवळचा परिचय असल्यासारखं. तेवढ्यात आई बाहेर आली.पाठोपाठ बाळूची धाकटी बहीण शमीही. बाळूच्या कुशीत पिल्लू पाहून शमीची आणि आईची आधी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. बाळूने घडलेली सारी हकीकत सांगितली. आणि शेवटी एवढंच तो म्हणाला, “कुणी नाही गं पिल्लाला.” आई म्हणाली, “कुणी नाही ना? असू दे मग आपल्याकडे. आपण आहोत ना आणि पिल्लू पिल्लू काय म्हणतोस रे! छानसं नाव दे त्याला. त्याचीही स्वतःची ओळख आहे ना”

बाळू पिल्लाकडे पाहून म्हणाला, “काय नाव देऊ रे तुला? मोती नाव ठेवू तुझं?” पिल्लू हसलं.

शमी लगेच म्हणाली, “बाळूदा ,गुलाम कसा हसतोय बघ. मोती नाव आवडलेलं दिसतंय त्याला. 

काही महिन्यातच मोती घरात सर्वांचा लाडका झाला. घरातला एक सदस्यच जणू होता तो.

एके संध्याकाळी दारातून भुंकण्याचा जोरजोरात आवाज आला. त्यापाठोपाठ कुणीतरी जीव मुठीत घेऊन पळाल्याचा आवाज झाला. शमी हसून म्हणाली, " बाळूदा,
वाकडी शेपटी हलवतो,इशारा करून बोलवतो

चोराला पाहून धरतो, घराची राखण करतो

बाबा बोलतात इमानी, कोण बरं हा फार गुणी?

आई, बाबा आणि बाळू एकसुरात म्हणाले, "मोती!!!"

आपलं नाव ऐकून दारात उभ्या असलेल्या मोतीने लगेच कान टवकारले आणि धावत लगेच तो घरात  हजर झाला.एकदम दत्तासारखा. बाळूने हसून लगेच त्याला मिठी मारली.