फोन आला (कथा)

फोन आला
लेखन: अदिती केसकर
चित्रे: कल्पेश समेळ

स्वराज, रोशन, कबीर, स्नेहा, ओवी सगळे सहावीत शिकत होते. कोरोनामुळे शाळा नेहमीसारखी शाळा भरत नव्हती. एके दिवशी ओवीच्या आईने, स्वराजच्या आईला निरोप द्यायला, तिला स्वराजच्या घरी पाठवलं.
“काकी, मम्मी म्हनत व्हती, की आज संध्याकाळच्या टायमाला ते मास्क शिवून टाकू.”
“बर, बर. ओवी मम्मीला सांग म्या येईल दुपारचं आवरून.” स्वराजची आई म्हणाली.
“ओके काकी, बाय, हॅव नाईस डे!” ओवी म्हणाली.
“काय गं ओवी, ह्ये काय? नाईस डे म्हंजी?” स्वराजच्या आईने विचारलं.
“काकी, नाईस डे म्हंजी, तुमचा दीस बेस जाओ. विंग्रजीच्या मॅडमनी सांगितलं हाये विंग्रजी बोलायचं. स्वराज तुला आला व्हता की न्हाई मॅडमचा फोन?” ओवीने स्वराजला विचारलं.
“मॅडम? कोन मॅडम?”, स्वराजला काही कळेचना, साळा तर बंद हाये, मग या कोन विंग्रजीच्या मॅडम?”


“अरे, मला किनई, त्या मॅडमचा फोन आला व्हता. त्या म्हटल्या या वरसी कोरोणामुळे साळा भरणार न्हाई. म्हनून ते सरकार का कोन हाये न, त्यांनी या मॅडमना आपल्याला फोनवर विंग्रजी शिकवायला सांगितलं हाये. लई ग्वाड बोलत्यात बघ त्या मॅडम. रोशनला पन आला व्हता त्यांचा फोन. तुला का न्हाई आला त्यांचा फोन?” ओवी स्वराजला चिडवत म्हणाली.
“माझं विंग्रजी झाक हाये! मला नको विंग्रजीच्या मॅडम-बीडम.” स्वराज असं म्हणाला खरं, पण मनातून त्याला ओवीचा राग येत होता.

थोड्या वेळात स्वराज गाईना चरायला माळ रानावर गेला. सध्या शाळा बंद असल्यामुळे गाई, म्हशी, बकऱ्या यांना चरायला न्यायचं काम स्वराजकडे होत. स्वराजचं खूप प्रेम होतं या सगळ्यांवर. तांबी गाय तर त्याची दोस्तच होती. ती तांबडट रंगाची होती म्हणून स्वराजनेच तिचं नाव ठेवलं होतं -तांबी!. तांबीला चरायला नेलं की हिरव्या गवतात लोळून तांबीशी गप्पा मारायला स्वराजला खूप आवडे. तो तिला मनातलं सगळं सांगत असे.


स्वराज गवतावर पहुडला आणि तांबीला म्हणाला, “ए तांबे, मला का आला नसल फोन त्या मॅडमचा? विसरल्या असतील का? का फोन लागला नसल? का बॅलंस संपला असल?” तांबीने स्वराजकडे बघितलं, एकदा ‘हम्माऽऽ’ केलं, शेपटीने माशा हाकलल्या आणि ती परत गवत खाण्यात गुंग झाली.

दुपारी घरी आल्यावर स्वराजने आईकडे चौकशी केली, “मम्मे, माझ्यासाठी कुनाचा फोन आला व्हता का गं? फोनला बॅलंस हाये नवं?”
आई म्हणाली, “मनीषा मावशीचा फोन आला व्हता, ती आठवन काढत होती तुझी. म्या म्हटलं तिला, राखीच्या वेळला नाय जमलं पन आता दिवाळीच्या टायमाला भेटू. या कोरोणामुळे कुठं जायची पंचाईत झाली बघ. त्या दिशीच तुझ्या पप्पानी ५० रुपयाचं रिचार्ज मारलं होतं. हाय की अजून बॅलंस. का रं इचारीत व्हतास बॅलंस हाये का म्हनून?”
स्वराज नुसतंच ‘हूं’ म्हणाला आणि, “मम्मे, मी रोशनकडे चाललो गं”’, असं सांगून घराबाहेर पडला. “आरं भूक न्हाई का लागली का तुला? चार घास खाऊन जा.”
“नको, आल्यावर खातो.”, असं म्हणून रोशनच्या घराच्या दिशेने सटकला.

गल्लीच्या टोकाशी गेला आणि परत फिरला. मधल्या गल्लीतून ओवीच्या घराचा रस्ता त्याने पकडला. दोन गल्ल्या पार केल्या आणि ओवीच्या घरी येऊन पोहोचला. ओवी मैत्रिणीबरोबर अंगणात खेळभांडी खेळत होती. “ए ओवी, तुझ्या त्या मॅडमचा नंबर दे न. म्हंजी म्या नाय, मम्मीनं मागितलाय.”
“आस्सं का? बरं. थांब, मम्मीने लिहून ठेवलाय.” असं म्हणून ओवीने एका कागदावर मॅडमचा नंबर लिहून स्वराजला दिला.

स्वराज पळत पळत घरी आला. आई आता मास्क शिवायला जाणार हे त्याला माहीत होतं. तो आईला म्हणाला, “मम्मे फोन घरीच ठेवून जानार न तू? म्हंजी तुला भीती वाटते न, कुटं फोन हरीवला कामाच्या गडबडीत तर? म्हनून म्हटलं म्या.”
आई म्हणाली, “व्हय रे खरच हाये. फोन घरीच राहू दे. तू लक्ष ठेव बर का?”
“व्हय मम्मे.” असं म्हणताना स्वराज गालातल्या गालात हसला.
आई मास्कचं काम करायला बाहेर पडली तशी लगेच स्वराजने फोन घेतला. ओवीकडून आणलेला नंबर फिरवला. रिंग वाजत होती, पण कोणी उचलेना. शेवटी पलीकडून कोणीतरी एकदाचा फोन उचलला, “हॅलो, कोण बोलतंय?”
स्वराज एक मिनिट चपापला. धीर गोळा करून म्हणाला, “तुमीच त्या सरकारच्या विंग्रजीच्या मॅडम का? अव तुमी मला फोन का नाय केला? म्या स्वराज बोलतोय किरकटवाडीहून.”
“कोण सरकार? कोण इंग्लिशच्या मॅडम? रॉंग नंबर लागलाय.” असं म्हणून पलीकडच्या माणसान वैतागून फोन ठेवून दिला. आता मात्र स्वराजला रडूच फुटलं.

आई आल्यावर स्वराजने रडतच आईला झालेला सगळा प्रकार सांगितला. आईने स्वराजला जवळ घेतलं त्याच्या केसातून मायेनी हात फिरवला आणि म्हणाली, “आरं करतील त्या तुला फोन. वेळ नसल झाला त्यांना.” स्वराज फुरंगटून बसला. त्या दिवशी रडत रडत स्वराज कधी झोपी गेला हे त्याचं त्यालाच कळल नाही.

सकाळ झाली. ओसरीवर उन्हाची तिरीप आली. तशी स्वराजला जाग आली. तो तांबीकडे जाऊन म्हणाला, ‘जाऊ दे नाय तर नाय.’ त्याने सकाळचं आवरलं. न्याहरी केली. तांबीला घेऊन तो रानाकडे निघाला. तेवढ्यात आईचा फोन वाजला. आईने फोन उचलला, “स्वराज आहे का? मी स्वरदा ताई. त्याला इंग्रजी शिकवण्यासाठी फोन केला आहे.” पलीकडून आवाज आला.
आईने घाईघाईने स्वराजला फोन दिला आणि म्हंटली, “तुझ्या विंग्रजीच्या मॅडमचा फोन हाये. बोल.”
स्वराज खुश झाला आणि म्हणाला, “हॅलो मॅडम, गुड मोर्निंग!”