राजकन्या ऐश्वर्या (कथा)

राजकन्या ऐश्वर्या
लेखन: ज्योती गंधे
चित्र: रसिका काळे

एक आटपाट नगर होतं विजयनगर नावाचं. राजा विक्रम तिथे राज्य करत होता. तो अत्यंत चांगला राजा होता. राणीचं नाव होतं,विदयावती. तीही राजाच्या बरोबरीनं प्रजेच्या सुखासमाधानासाठी कष्ट करत होती. राजा,राणी दोघेही खूप शिकलेले होते. नवनवीन सुधारणा करून लोकजीवन कसं सुखाचं होईल याकडे दोघांचं खूप लक्ष असे. दोघांबद्दल प्रजेलाही खूप आपुलकी होती. त्या दोघांना एक अतिशय सुंदर, गोड अशी एक राजकन्या होती. तिचं नाव ऐश्वर्या. सगळं कसं छान होतं पण सारखा हट्ट. एक हट्ट पुरवेपर्यंत रडारड आणि तो पुरवला की दुसरा हट्ट!


एक दिवस, दरबारातून येतानाच राजा विक्रमला राजकन्या ऐश्वर्याचा रडण्याचा आवाज येत होता. ‘आता काय हवं असेल तिला?’ राजा विचार करत महालाकडे जात होता. काही दिवसांपूर्वी, शेजारच्या राज्याचा राजा त्याच्या राजकन्येला घेऊन आला असताना तर तिच्याकडची प्रत्येक गोष्ट ऐश्वर्याला हवी होती. एक हट्टीपणा सोडला तर राजकन्येत नाव ठेवायला जागा नव्हती. फार लाघवी होती. तिच्या बोलक्या डोळ्यात पाहिलं की राग कुठल्याकुठे पळायचा. पण, पाहुण्यांसमोर मात्र राजकन्या ऐश्वर्याच्या हट्टीपणामुळे राजाराणीला फारच शरमल्यासारखे होत होते.
महालात गेल्यावर राजाला रडण्याचे कारण कळले. राजा रोज संध्याकाळी वेष बदलून राज्यात फेरी मारायचा आणि राज्यात सगळं आलबेल आहे न, ते बघायचा. आज राजकन्येला त्याच्याबरोबर जायचं होतं. ती कोणताही हट्टीपणा करणार नाही असं वचन देत होती आणि राणीसाहेबाना ते काही पटत नव्हतं.
“राजे, त्या नेहमीच म्हणतात हट्ट करणार नाही, पण थोड्यावेळाने विसरून जातात आणि मग सुरु होतं परत तेच. काहीही केलं तरी पहिले पाढे पंचावन्न!”, राणीने जरा चिडूनच राजाला सांगितलं.


“पण बाबाराजे, ह्यावेळी आम्ही नक्की नाही हट्ट करणार. वचन देतोय आम्ही.” राणी ‘राजे’म्हणायची, म्हणून ऐश्वर्याही राजांना ‘बाबाराजे’ म्हणायची. हे ‘बाबाराजे’ ऐकलं, की विक्रम राजा सगळंच विसरून जायचा आणि ती म्हणेल ते करायला तयार व्हायचा.
“ठीक आहे, पण हे शेवटचं. पुन्हा हट्ट केलात तर कोणताच हट्ट पुरवणार नाही.” राजांनी बजावून सांगितलं. ऐश्वर्या खूप खुश झाली. तीही तयार झाली. राजांनी शेतकऱ्यासारखा वेश केला, म्हणून तीही शेतकऱ्याच्या मुलीसारखी तयार झाली. फेरफटका मारता मारता ते एका शेतकऱ्याच्या घरापाशी आले. तीन मुली तिथे खेळत होत्या. राजकन्येने ते पाहिलं आणि हट्ट सुरु केला, “मलाही जायचंय खेळायला त्यांच्याबरोबर” म्हणून.
राजा म्हणाला, ”सोनपरी,तू हट्ट करणार नव्हतीस न? मग?”
“पण बाबाराजे, किती मजा करताहेत त्या, जाऊ या न त्यांच्याकडे.”
शेवटी हो ना करता करता ते शेतकऱ्याकडे गेले. त्याने दोघांचं स्वागत केलं. तीनही मुलींची ओळख करून दिली, “ही थोरली धनश्री, ही दोन नंबरची आनंदी, त्यानंतरची सुखदा,सगळ्यात धाकटी.” त्यानी धनश्रीला ऐश्वर्याला आपल्याबरोबर खेळायला न्यायला सांगितलं आणि राजाबरोबर गप्पा मारायला सुरवात केली.
खूप वेळ झाला मुलींचे नुसते हसण्याचे,खेळण्याचे आवाज येत होते. ऐश्वर्या चांगलीच रमली होती. राजांनी तिला हाक मारली. ऐश्वर्या आली पण, “आज मी इथेच राहू?” असंच विचारायला लागली.
राजा शेतकऱ्याला घेऊन बाहेर गेला.त्याने त्याला खरी वस्तुस्थिती सांगितली. शेतकरी अवाक् झाला, समोर राजा आहे ह्यावर त्याचा विश्वास बसेना. राजा म्हणाला, “मी हे तुम्हाला का सांगितलं, तर इथे आल्यापासून राजकन्येने एकदाही हट्ट केलेला नाही. तुमच्या मुलींबरोबर राहिली तर आणखी शहाण्यासारखी वागेल असं वाटतंय,म्हणून तिला ठेवतो इथे. पण तिला राजकन्येसारखी वागणूक देऊ नका आणि मुलींनाही ती राजकन्या आहे म्हणून सांगू नका. मी तिचे कपडे व इतर सामान पाठवतो आणि तुमच्याकडेही काही फळे,खाऊ वगैरे पाठवतो.”
तो शेतकरी म्हणजे म्हणाला, “महाराज, तुम्ही एवढं करता आमच्यासाठी. तुम्ही काही पाठवू नका, मी आणि माझी बायको आमच्या पद्धतीने अगदी नीट त्यांची काळजी घेऊ. म्हणजे तुम्हाला वाटत तसा नक्की बदल होईल. त्यांना राहू दे.” शेतकऱ्याने, त्याच्या पत्नीनेही खूप आग्रह केला.
राजा म्हणाला, “कोणाच्याही नकळत माझा माणूस लक्ष ठेवेल, कोणाला काही त्रास होत असेल तर राजकन्येला परत नेऊ. तेव्हा माझा माणूस घराबाहेर दिसला तरी गैरसमज करून घेऊ नका.”
एक दिवस म्हणता म्हणता ऐश्वर्या तीन दिवस राहिली. मुलींबरोबर सागरगोटे, काचापाणी, कोण म्हणतं टक्का दिला, दोरीच्या उड्या, ठिक्कर, भेंड्या खूप वेगवेगळे खेळ खेळली. मुख्य म्हणजे हे खेळ खेळताना तिला अजिबात कंटाळा येत नव्हता, घरची केवढी खेळणी आहेत मोठी-मोठी, पण एकदोनदा खेळलं की कंटाळा येतो असं तिच्या मनात आलं. स्वतःची कामं स्वतः करणे, काकूला सगळ्यांबरोबर भाजी निवडून दे, जेवण्याची तयारी कर अशी कितीतरी कामंही केली. खेळताना, कामं करताना मजेशीर गाणी म्हणायच्या सगळ्याजणी.
ठिक्कर खेळताना...
“ए, माझी ठिकरी,
लाडकी,लाडकी ठिकरी,
पड ग आता पहिल्या घरी!” अगदी लाडाच विशेषण लावून पाहिजे त्या घरात तिला पडायला सांगायचं,
सागरगोटे खेळताना,
“एकाला वर फेकायचं ,
खालच्याला उचलायचं,
पटकन वरच्याला झेलायचं.”
भाजी निवडताना,
“भाजी,आपली भाजी.
ताजी ताजी भाजी.
भाजी आता निवडू या,
देठांच खत करू या,
पानांची भाजी करू या,
भाजी भाकरी खाऊ या,घट्ट मुट्ट होऊ या."
जेवायला बसलं की,
”गोल गोल भाकरी,
आईनी थापली,
तव्यावर टाकली,
चुलीवर शेकली,
कशी झाली ?
‘गोल मटोल, गोल मटोल.’
गरम गरम भाकरी,
पानात घेतली,
भाजीशी खाल्ली,
लोण्याशी खाल्ली,
गुळाशी खाल्ली,
कशी लागली?” असं विचारायचं आणि जीभ टाळूला लावून जोरात ‘टाऽऽक’असा आवाज करायचा आणि हसायचं.
सगळीच गंमत होती. ऐश्वर्याला खूप मजा आली. मस्त रमली ती.

जेवतानाही कसलाच हट्ट नाही, सगळ्या भाज्या, भाकरी सगळं व्यवस्थित खाल्लं. जेवताना गोड म्हणून भाकरीबरोबर गुळाचा खडा तर तिला खूप आवडला. आपापलं ताटसुद्धा घासायची. संध्याकाळी पाढे म्हणणं, शुभंकरोती म्हणणं, सगळ्यात अगदी गुंगून गेली. रात्री शेतकरी काका व काकू सगळ्यांबरोबर गप्पा मारायचे. दिवसभराच्या सगळ्या गोष्टी सांगायचे. शिवाय कधी हवामानाबद्दल, कधी पिकांबद्दल, कधी चंद्र, तारे, यांच्याबद्दल. राजकन्या त्यांच्या गप्पांमधून नकळतपणे काही नवं शिकत होती.

चौथ्या दिवशी, राजा शेतकरी बनून तिला न्यायला आला, तेव्हा तिने सगळ्यांचा निरोपही आनंदाने घेतला. महालात आल्यावर राजाला वाटलं, आता पूर्वीसारखं सुरु होईल. पण नाही. ऐश्वर्या खरच बदलली होती. हट्टीपणा तर सोडाच, पण स्वावलंबी झाली होती. राजाशी, राणीशी वेगवेगळ्या विषयांवर बोलायला लागली, “बाबाराजे,तुम्ही कसं ओळखलंत की सावकारच खोटं बोलतोय. तुम्हाला एवढ्या सगळ्यांमधे चोर कोण ते बरोबर कसं कळल?” “बाबाराजे, कावळ्याने घरटं किती उंच बांधलं यावरून कसं कळत की, पाऊस कधी येणार आहे, लवकर,की उशिरा असं?” वेगवेगळ्या विषयांवरचे किती-किती प्रश्न विचारायला लागली. राजा-राणी पण तिच्याशी खूप बोलायला लागले, तिला खूप नवीन नवीन माहिती देऊ लागले. ऐश्वर्याला आईबाबांशी खूप बोलावसं वाटायला लागलं, जे जे घडेल ते सर्व तिला त्यांना सांगावंस वाटायला लागलं. तेही तेवढ्याच उत्साहाने ऐकून घेत, कुठे ती चुकली आहे असं वाटलं तर समजावून सांगत.

ऐश्वर्याच्या लक्षात आलं,आपण सगळ्या गोष्टी आपल्या आपण करायला लागलो, तर आईबाबा तर खुश आहेतच, पण आपल्यालाही छान वाटतंय. मोठं झाल्यासारखं वाटतंय. आईला कामात मदत केली, तर आई म्हणते, “जबाबदारी कळायला लागली माझ्या सोनपरीला. माझी कामं आता लवकर पण होतात आणि मला दमायलाही कमी होतं.” आणि जवळ घेऊन पापा घेते. कसली जबाबदारी काय माहीत, पण आई खूष होते एवढं बघून खूप छान वाटतं हे मात्र खरं. आता आपल्याकडेही धनश्री, आनंदीच्या घरासारखं मस्त वाटतंय. आईबाबांना सगळं सांगावंसं वाटतं, त्यांच्याकडून खूप काही समजून घ्यावंसं वाटतंय.

राजाराणीलासुद्धा खूप शांत वाटायला लागलं होतं. तिने केलेला हट्ट पुरवल्याचा एवढा आनंद त्यांना कधीच झाला नव्हता. शेतकऱ्याला याचं बक्षीस म्हणून राजानी त्याच्या मुलींचा शिक्षणासाठीचा सगळा भार उचलला. आणि मुख्य म्हणजे त्याच्या मुलींना राजवाड्यावर मधून मधून खेळायला बोलावणं, राजकन्येचंही त्यांच्याकडे जाणं चालूच राहिलं.

अशी आपली राजकन्या खूप शहाणी झाली. आपली सगळी कामं स्वतः करायला लागली. प्रत्येक गोष्ट, अगदी अभ्यासपण, अगदी ‘मनापासून’, आणि ‘आनंदानी’ करायला लागली. मग काय आईबाबा खुश आणि आपली राजकन्याही खुश!
ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण ! इटुकली,मिटूकली गोष्ट सरो आणि सगळ्या छोटुल्यांचं पोट भरो.