दोस्ती ससा आणि कासवाची

दोस्ती ससा आणि कासवाची
लेखन - ज्योती गंधे 
चित्रकार- गीतांजली भवाळकर

ससा हरला म्हणून खूप खूप दुःखी झाला होता त्याला हरण्याचे दुःख तर होतेच, पण स्वतःचा त्याला खूप राग आला होता. आपण असे का वागलो? नेहमीसारखे ‘जिंकायचेच’ असं नव्हतं मनात येत, तर ‘आपण काय जिंकणारच!’ असच वाटत होतं - नव्हे खात्रीच होती. एका अत्यंत मंद कासवाने आपल्याला हरवावं? नेहमी जिंकणाऱ्या आपल्याला, आपल्या नेहमीच्या लुसलुशीत गवताचा आणि कोवळ्या गाजरांचा मोह व्हावा? आईला सांगतानाही लाज वाटत होती, कारण ती नेहमीच आपल्यासाठी छान छान गोष्टी आणते, बनवते. तिला किती लाज वाटली असेल आपली. तरी आईबाबा दोघेही काही बोलले नाहीत.’होतं असं कधी कधी, हारसुद्धा स्वीकारता यायला हवी”, असं बरंच बोलत होते. पण रागवत नव्हते, ओरडत नव्हते.त्याचाच सशाला जास्त त्रास होत होता. आतल्याआत ससा रडत होता. पुन्हा पूर्वीची ‘सर्वात वेगवान धावपटू’ म्हणून ओळख मिळवायला आता खूप कष्ट करावे लागणार होते ,पण आता शर्यतीच नको वाटत होत्या. नाही जमणार आपल्याला, पुन्हा शर्यतीत भाग घ्यायला. पुन्हा भाग घेतला आणि हरलो तर? नकोच ते!
असे किती दिवस गेले कोणास ठाऊक? पण ससा हसत नव्हता, बोलत नव्हता. रोजचं काम करायचा, शाळेत जायचा, अभ्यास करायचा. सगळं नेहमीसारखं करायचा, पण त्याच्यात नेहमीचा उत्साह, मजा, मस्ती काहीच नसायचं. आईला खूप काळजी वाटू लागली. तिला, बाबांना काय करावं सुचत नव्हतं. ते हरप्रकारे त्याला खूश करायचा प्रयत्न करायचे, पण ससा आपला शांतच. शाळेत राजन सिंह या मुख्याध्यापक सरांशी, मिस्टर जेराफ्रेन या क्रीडा शिक्षकांशी बोलल्यावर असंही कळलं की शाळेतही तो तसाच शांत असतो.



असे थोडे दिवस गेल्यावर, शाळेच्या मुख्याध्यापकांचा ‘पालक-शिक्षक सभे’संदर्भात फोन आला. शाळेत ‘सहभावना सप्ताह’ साजरा करण्याच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे ,स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यासाठी पालकांच्या,शिक्षकांच्या कल्पनांवर चर्चा करून कार्यक्रमाचे स्वरूप ठरवणे असे सभेचे स्वरूप होते. विद्यार्थ्यांच्या मनात एकमेकांबद्दल असूया निर्माण न होता ,सहकार्याची, परस्परांचा विचार करण्याची वृत्ती वाढीस लागावी, हा सप्ताह आयोजनामागचा मुख्य उद्देश होता. नृत्य,नाट्य,खेळ अशा विविध कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली.

कार्यक्रमांच्या तयारीला सुरवात झाली. शाळेतील वातावरण उत्साहाने सळसळू लागले. ‘मिळून सारे आपण’ या नृत्यनाट्यात सशाने भाग घेतला होता . जंगलातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सगळे प्राणी एकत्र येऊन प्रयत्न करतात अशी त्या नृत्य-नाट्याची कल्पना होती. जंगलात दिवसेंदिवस पाण्याचा होणारा अतिरिक्त व चुकीचा वापर कोणाच्या लक्षातच येत नव्हता. त्यासाठी सर्वांना त्याची जाणीव करून देणे, पाण्याचा योग्य पद्धतीने वापर कसा करायचा, पाणी साठवून कसं ठेवायचं,सर्वांनी मिळून कालवा खणून, कमी पाणी असणाऱ्या भागाकडे पाणी कसं पोचवायचं? अशा विविध पैलूंना स्पर्श करणारं नाटक सर्वांना खूप आवडलं. मिस मयूरीटीचर नी तर एकेक बीटचा एकेक शब्दाचा त्यातील भावार्थाचा सखोल विचार करून अतिशय मेहनतीने अप्रतिम नृत्य नाट्य बसवलं होतं.ससा तर नृत्य नाट्याचा हिरो होता.सगळ्यांनी मिळून काम केल्यास कोणतीच गोष्ट अशक्य नसते,हे त्याला समजायला लागलं होतं. त्याच्या मनात सतत कासवाचेच विचार असायचे. शर्यत हरल्यापासून तो कासवाशी नीट बोललाही नव्हता. त्याला त्याच्याशी बोलावे असं वाटायला लागलं होतं. “आपण दोघं मिळून किती मजा करायचो, सगळीकडे एकत्र असायचो. शाळेतल्या कितीतरी चांगल्या गोष्टी दोघं मिळून करायचो. आपली मैत्री ही सर्वांसाठी कौतुकाची ठरली होती हेही त्याच्या मनात सतत येत होतं.

विविध क्रीडाप्रकारांकडे सशाने ढुंकूनही पाहिले नव्हते. नृत्य-नाट्यात मात्र छान रमला होता. मनापासून यायचा, सरांच्या सूचना मनापासून ऐकायचा, हळूहळू पूर्वीसारखा आनंदी दिसायला लागला होता.

एक दिवस अचानक क्रीडा शिक्षकांकडे आपणहून जाऊन धावण्याच्या शर्यतीत स्वतःचे नाव देऊन आला. आईबाबांना ते कळले. आता खऱ्या अर्थाने तो पूर्वीसारखा होतोय, असं त्यांना वाटू लागल. बघता बघता सप्ताह सुरू झाला. एकपात्री प्रयोग , पथनाट्य, नृत्यनाट्य, भारुड, समूहगान, वेशभूषा स्पर्धा असे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. सर्व कार्यक्रम फारच उत्कृष्ट झाले होते. सशाच्या नृत्यनाट्याने तर सर्व कार्यक्रमांवर अक्षरशः कळस चढवला.नृत्य -नाट्याची प्राक्टिस चालू असतानाच नाटकात सहभागी असणाऱ्या सगळ्या प्राण्यांच्या वागण्यात फरक पडायला लागला होता. ते एकमेकांशी तर चांगले वागायला लागलेच होते; पण पाण्याचा थेंबही वाया जाणार नाही अशी काळजीही घ्यायला लागले होते. नाटक झाल्यावर आईबाबांनी सशाला जवळ घेऊन त्याचे खूप कौतुक केले मात्र सशाचे तिकडे लक्षच नव्हते, त्याचे डोळे कासवाला शोधत होते पण कासव त्याला दिसेचना. त्याचे मन आणखीनच अस्वस्थ झालं. त्याला कळल, की कासवाची मावशी आल्यामुळे तो कार्यक्रम संपल्याबरोबर घरी गेला होता.
विविध समूह क्रीडाप्रकारच्या स्पर्धाही फार जोशात झाल्या. सप्ताहाच्या सांगता समारंभाच्या दिवशी पाहुण्यांसमोर खास प्रदर्शन म्हणून धावण्याच्या स्पर्धा ठेवल्या होत्या.

सकाळपासून सशाचे आईबाबा बोलत नव्हते, पण त्यांचे सगळं लक्ष त्याच्याकडे होतं. त्याने टेन्शन घेतलं आहे का, त्याचा मूड कसा आ? याचा ते सारखा अंदाज घेत होते. ससा मात्र एकदम नेहमीसारखा होता. जणू तो त्याचा पराभव विसरला होता. “आज धावण्याची शर्यत आहे, हे तरी त्याच्या लक्षात आहे नं?” असा आईबाबांना प्रश्न पडत होता. नेहमीसारखं आवरून ससा शाळेत गेला. आईबाबाही धावण्याची शर्यत आणि समारोप समारंभासाठी तयार होऊन शाळेत गेले.शर्यत सुरु झाली. धावण्याच्या .शर्यतीत भाग घेतलेले सर्व प्राणी आपापल्या जागेवर येऊन पळणे सुरु करण्यासाठी सज्ज झाले.सशाच्या आईच्या काळजाचा ठोकाच चुकला; कारण शर्यतीत ससा तर होताच, पण कासवही होते. आईने सशाकडे पहिले. तो मात्र अगदी व्यवस्थित होता.आई धडधडत्या हृदयाने पाहू लागली. सशाने खूप जोरात पळण्यास सुरवात केली. तो कधीच सर्वांच्या पुढे गेला. सगळ्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवत सशाचा जयघोष करायला सुरवात केली.आईच्या मनात आलं, “बस,आता तो नक्की जिंकणार आणि पूर्वीचा तिचा जेता तिला मिळणार!”
...आणि अचानक ....
ससा थांबला. त्याने मागे वळून पाहिलं, कासव अपेक्षेप्रमाणे सगळ्यात शेवट होतं, सुरवातीच्या रेषेच्या थोडंच पुढे आलं होतं. अगदी एक क्षणभर ससा थांबला आणि परत जोरात पळू लागला पण उलट्या दिशेने. त्याने धावत येऊन कासवाला उचललं, पाठीवर घेतलं आणि जीवाच्या आकांताने पुन्हा समोर जोरात पळायला सुरवात केली. कोणाला कळायच्या आत शर्यतीच्या सीमेपार पोचला देखील.सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करायला सुरवात केली.सगळे अवाक् झाले होते, पण त्यांचे हात मात्र टाळ्या वाजवत होते. 

बक्षीस समारंभाच्यावेळी सरांनी सशाला पुढे बोलावलं. ते म्हणाले, “बाळा, अशी स्पर्धा नसते. एकानेच पळायचं असतं आणि जिंकायचं असतं.”
ससा म्हणाला, “मला जिंकायचं नव्हतंच,सर! मागच्यावेळी मी हरलो, हरण्याचं दुःख काय असतं ते तेव्हा मला समजलं. माझ्या गर्वामुळे कासवाला मी शर्यतीचं आव्हान दिलं, मला माहित असूनसुद्धा की, माझ्यात वेगाने धावण्याची क्षमता आहे,कासवात ती नाही.तेव्हा त्याच्याबरोबर मी शर्यत लावणंच चुकीच होतं. त्यालाही ते कळत होतं, पण त्याच्यातील उपजत समंजसपणामुळे तो तयार झाला. माझ्या अहंकाराला त्याने त्याच समंजसपणाने, शांतपणे शर्यत खेळून उत्तर दिलं. आजच्या ह्या शर्यतीत त्याला जिंकवून मला त्याची माफी मागायची होती .मला बक्षीस नकोय,सर. ह्या सप्ताहात मी हेच शिकलो की, ‘प्रत्येकाकडे काही नं काही खास असतं आणि काहीतरी कमी असतं. खास असल्याचा गर्व करू नये की, कमी असल्याचं दुःख करू नये. ज्याच्यात जे खास असतं त्याचा त्याने ते कमी असणाऱ्याला पूरक म्हणून मदत करण्यासाठी उपयोग करायचा असतो, त्याला त्यावरून हिणवायच नसतं.”

परत एकदा टाळ्यांचा जोरात कडकडाट झाला. सर्वांच्या मतांचा विचार करून, बक्षीस अर्थातच ससा आणि कासवाला दोघानाही दिलं. शाळेच्या ‘सह भावना’ सप्ताहाचा उद्देश सफल झाला होता,आणि आईबाबांना त्याचा ससा परत मिळाला होता, अधिक परिपक्व होऊन!