शेवळाची भाजी (गोष्ट)

शेवळाची भाजी
लेखनः राजश्री तिखे 
चित्रेः प्रीता 

कातकरी संवांदासाठी सहकार्य – ऍड. सुरेखा दळवी, पेण

 

सुरकी आईबरोबर एका छोट्या पाटीत शेवळं घेऊन बसली होती. तेवढ्यात तिला पाटील मॅडम शाळेतून परत येताना दिसल्या. येतायेता काही भाजी मिळते का, ते बघत होत्या. “म्याडSSSमSS”, सुरकीने हाक दिली. “काय गं सुरेखा? आईबरोबर बसली आहेस होय? शाळेत का गं येत नाहीस?” सुरेखा उर्फ सुरकी त्यांच्याच वर्गात होती. सुरकी फक्त मान फिरवून लाजून हसली.
“अब्यास नाय आवडत तिला.” सुरकीच्या आईने परस्पर उत्तर दिले.
पाटील मॅडम पुढे काही बोलायच्या आतच आई म्हणाली, “घ्या की शेवळं मेडम.”
“मी पहिल्यांदाच पाहते आहे. ह्याचं काय करतात?” पाटील मॅडमनी विचारले.
पाटील मॅडम मागच्याच वर्षी एका दुसऱ्या जिल्ह्यातून या शाळेत आल्या होत्या. हा परिसर त्यांना नवीन होता.
“याची भाजी जाम बेस लागते, मेडम”, सुरकीची आई
“अगंबाई, मला नाही माहिती कशी करतात ते. आमच्या भागात नाही मिळत हे.” पाटील मॅडम
“इथं रानात पक्की भेटतात.” शेजारी उभ्या असलेल्या दिलीपने परस्पर उत्तर दिले.
“तुम्ही जाता रानात?” पाटील मॅडमनी विचारले. दिलीपला त्यांनी शाळेत पाहिले होते. तिसरीच्या पटावर त्याचे नाव होते.
“रोज जातो म्याडम. रानात जाम मज्जा असते.” दिलीपने नाक वर ओढत उत्साहाने सांगितले.
“खरंच!” पाटील मॅडम त्याच्याकडे नीट पाहत म्हणाल्या, “मग मला न्याल तुमच्याबरोबर एकदा रानात? दाखवा की शेवळं कशी गोळा करता ते.”
“उद्याच्याला या म्याडम.” सुरेखाला अचानक कंठ फुटला.
“अगं, उद्या शाळा आहे.” मॅडमनी सांगितले
“रविवारी या म्याडम” दिलीप समज दाखवत म्हणाला.
रविवारी ‘दांड कातकरवाडी’वरची मुले खूप खूष होती. आदल्याच दिवशी गावातून मजुरीहून परतणाऱ्या सुरेखाच्या आईबरोबर पाटील मॅडमचा निरोप आला होता. त्या खरंच मुलांबरोबर जंगलात शेवळं शोधायला येणार होत्या. मग मुलांनी जंगलातच शेवळाची भाजी करून, जेवायचा बेत ठरवला होता. मोहननं भगुलं नि कालथं घेतलं होतं. दिलीपनं बाटलीत तेल अन् कागदाच्या पुडीत मीठ, तिखट बांधून घेतलं होतं. प्रत्येकाने आपापली भाकर सोबत घेतली होती. मॅडमसाठीही घेतली होती.


पाटील मॅडम दांड कातकरवाडीचा डोंगर चढताना दिसल्या तसे हाकारे उठले. सगळी मुले वाडीच्या तोंडाशी जमा झाली. शाळेत साडी नेसून येणाऱ्या पाटील मॅडमनी, आज पंजाबी ड्रेस घातला होता, त्यामुळे त्या मॅडम वाटतच नव्हत्या. सुरकीनेसुद्धा मागच्या आठवडी बाजारात घेतलेला फ्रॉक घातला होता. मॅडम म्हणाल्या, “काय गं सुरेखा, नवीन फ्रॉक घातलास? मळणार नाही का जंगलात?” सुरकी नुसतीच मान फिरवून लाजून हसली. आज मॅडमना जंगलात फिरवून आणायचे म्हणजे खासच प्रसंग नव्हता का?
सगळे निघाले. उड्या मारत, बागडत. करंवदीच्या जाळीत अजूनही भरपूर करवंद होती. सगळ्यांनी करवंदीचा नाष्टा सुरू केला. किती किती प्रकारची करवंद – गोड, खूप गोड, आंबट, खूप आंबट, आंबट-गोड. मुले हाकारत, “म्याडमSSSS, अठं ये. जाम करूंदा आहात.” मुलांना बरोब्बर माहिती होतं, कोणत्या जाळीत गोड करवंद आहेत ते.

मग थोड्या वेळाने कोंबडा की कोंबडीचा खेळ सुरू झाला. लाल करवंद असेल तर कोंबडा आणि पांढरा गर असेल तर कोंबडी. “कोंबडाSSSS”, “कोंबडीSSSS”, “माना नव कोंबडे हीनात.” अशा आरोळ्यांनी रान दणाणून गेले. काही मुले तर वीसपर्यंत पोचली.

मग पुढचे हिशेब सुरू झाले. “माना इस अन् सातSS”
काहीजण तर चाळीसच्याही पुढे गेले. मग “माना दोन इसा तीन कोंबडे” अशी जाहिरात करून झाली. पाटील मॅडमनी पण मनातल्या मनात ६८ चे रूपांतर करून जाहिर केले, “माझे तीन वीसा आठ कोंबडे”.

तेवढ्यात झुडुपात काहीतरी बारकीशी खसफस झाली. साप असेल असे वाटून मॅडम जोरात किंचाळून तीनताड उडाल्या. शेजारी उभ्या असलेल्या कविताने झुडुपाकडे नजर टाकली आणि ती खदाखदा हसत सुटली. बाजूला गोळा झालेली मुले पण, मग झुडुपाकडे बघून हसायला लागली. त्यांच्या हसण्याचा तो कल्लोळ ऐकून, गोंधळलेल्या मॅडम विचारायला लागल्या, “काय झालं? काय होतं तिथे?”
मुले हसत-हसतच म्हणाली, “सरडा वं तो, तुना काय वाटला? जनावर असान ते? भेव नको. आमी समदे हाव ना संगतीलाSS?”
“कुठं? कुठं आहे सरडा?” मॅडम मुलांनी बोटाने दाखवलेल्या दिशेने पाहत म्हणाल्या, पण काही केल्या त्यांना सरडा दिसेना.
“तोSSS तठं वंSSS. हेर ना.” वेगवेगळी मुले दाखवण्याचा प्रयत्न करत होती पण छे! मॅडमना सरडा दिसेचना. बऱ्याच वेळाने झाडाच्या फांदीने बोट वर उचलल्याचा भास मॅडमना झाला. त्या दचकल्या. नीट पाहिले तर सरड्याने डोके उचलले होते. फांदीसारखाच तपकिरी-करडा होऊन तो पार लपून गेला होता फांदीत. “दिसला! दिसला!” मॅडमने आनंदाने उडीच मारली. मुलांना पण खूप आनंद झाला. चला, मॅडमना सरडा दिसला एकदाचा. सुरकी हसत म्हणाली, “म्याडम, लई बेस मारतंस उडी. पुन्ना मार ना.”


मॅडम आणि मुलांची मिरवणूक तशीच पुढे निघाली. वाटेत मॅडम मुलांना विचारत होत्या, “हे झाडं कोणतं?”
मुले सांगत, “म्याडम ये ऐन”.
मॅडमना तर कितीतरी झाडे ओळखताच येत नव्हती. मग मुलांनी स्वतःहूनच सांगायला सुरुवात केली, “म्याडमSS, हेर ह्यो कुडा! कुडयाला फुला येवाला लागली की भाजीसाठी खुडायची.”
“आन् ती कारवी.”
“कारवी म्हणजे ती सात वर्षांनी फुलते ती ना?”
“हां. पाचसा वरसातून एकदाच फुलते. कारवीचे फुलाचा मद काडून वायला इकतात ठाकरा. आमनी कुडानी घरा येच कारवीचे काटयांनी इनतान. आन वर शेनमातीने सारवाचा. कारवी भेटली की पुना नवीन कुड इनाचा.”
“म्याडमSSS, अठं शेवळा भेटतीन.” मोहनच्या या आरोळीने मॅडम भानावर आल्या. त्यांनी शेवळं कधीच पाहिली नव्हती. त्या उत्सुकतेने मोहनच्या दिशेने धावल्या. त्यांना फक्त हिरवं-मातकट गचपणच दिसलं. “यातली कुठली शेवळं?” त्यांनी विचारलं.
“गचपणात हुडकावी लागतान.” मोहननं गचपण हातानं चाचपत मान वर न करताच उत्तर दिलं.
थोड्याच वेळात त्यानं मातकट, किरमिजी रंगाचे शेवळाचे लांब दांडके उपसून काढले.
“तापलेल्या भुईवर पयला पानी पडला की, साताठ दिसात जादूसार रानान शेवळाचे कोंब भुईतून वर येवाला लागतान. ते हुडकावे लागतान. सर्व्यांना दिसत नाय.” मोहननं माहितगारासारखी माहिती दिली. त्याची मात्र नजर चांगलीच तयार होती. मॅडमनेही हौसेने एक-दोन उपटायचा प्रयत्न केला, पण त्यांना मुलांसारखं नीट जमत नव्हतं.


रानात कुठे कुठे शेवळं मिळतात, ती ठिकाणे मुलांना बरोबर माहिती होती. शेवळं गोळा करून सगळी गँग पुढच्या वाटेला लागली. बरीच उंच चढण चढून आल्यावर मोहन म्हणाला, “म्याडम ती दिसंह ती आंबा नदी. अन तिच्या पलिकडं परलीचा बाजार.” एरवी कागदावरचा नकाशा शिकवणाऱ्या मॅडमना परिसराचा नकाशा मुलं अगदी सराईतपणे वाचून दाखवत होती.
उंच चढण संपून आता ते उताराला लागले होते. उतरताना मॅडमना घसरायची भीती वाटत होती. त्या एक-एक पाऊल जपून उतरू लागल्या, आधाराला आजूबाजूची झुडूपे शोधू लागल्या. तशी एवढीशी सुरकी पुढे झाली. तिने मॅडमचा एक हात धरला. तरी त्या डगमगत होत्या. मग दिलीपने पुढे होऊन दुसरा हात धरला. बुटकबैंगण दिलीप. कधी शाळेत गेलाच तर दंगा-मस्तीने नाकी नऊ आणायचा. पण आज तो असा काही धीरगंभीर वागत होता, की जणू काही मॅडमना जंगलातून नीट परत आणायची जबाबदारी त्याचीच आहे. दोघांच्या मदतीने मॅडम डोंगर उतरून खाली पोचल्या.


ते उतरले त्या डोंगरावरूनच एक चिमुकला झरा खळाळत येत होता. सपाटीवर येऊन तो जरा स्थिरावला होता. त्याला पार करून गेल्यावर समोर एक मैदानासारखी जागा होती. तिथे मोहनने तीन दगडांची चूल मांडली. बाकीची मुले चुलीसाठी सरपण गोळा करायला पांगली. “शेवळा साप करूला आन् चिरूला पांडूला आख.” मोहन कविताला म्हणाला. “पांडू, कठं ग्यास वं?” कविता पांडूला हाका मारत शोधू लागली. “अरे, असू दे, मी सोलून देते. मला दाखव कशी सोलायची ते.”पाटील मॅडम मदत करायला पुढे सरसावल्या.
“शेवळा साप करीन शिजवना सोपा काम नाय. पक्की खाजतान ती सोलताना.”
“अरे बापरे!” शेवळं खाजतात हे ऐकून मॅडम चिंतेत पडल्या.
“शिजूला ठेवतांना त्यात बोंडाऱ्याचा पाला घालतान. मंग खाजत नाय.” मोहनने मॅडमना धीर दिला. तेवढ्यात हातात हिरवा पाला घेऊन पांडू आला. “एकूदा शेवूळ खराब निघतो, तेला पका घान वास मारतो. ज्याकडं आसन तेच्या बाजूस बिसंवं नाय.” पांडूने सांगितले.
पांडूने हाताला थोडं तेल लावून शेवळं सोलली. एका अणकुचीदार दगडाने चेचून त्याचे तुकडे केले. मुलांनी आणलेल्या काटक्या, वाळकी पाने चुलीत रचून, सोबत आणलेल्या काडेपेटीने ती पेटवून, तोवर मोहनने चुलीवर भगुलं चढवले होते.


तेवढ्यात मुलांनी मॅडमना ओढून झऱ्यावर नेले. झऱ्याचं पाणी इतकं निवळशंख होते, की पाण्याखालचे खडक, त्यावरचं हिरवट शेवाळ्याचे पांघरूण, पाण्यात पोहणारे छोटे, छोटे मासे, एखाद-दुसरं बारकं झुडुप सगळं काही स्पष्ट दिसत होतं. माशांवर डोळा ठेवून शेजारच्या झाडावर बसलेल्या खंड्याने तेवढ्यात पाण्यात सूर मारला. त्याचे निळे पंख उन्हात झळाळले. वर उडाला तेव्हा त्याच्या चोचीत एक बारकासा मासा फडफड करत होता. मुले आणि मॅडम झऱ्यात उभे राहिले. थंडगार पाण्याने त्यांना बरं वाटलं. त्यांनी चेहरा धुतला. उन्हाने तापलेलं डोकं नि डोळे निवले. मुलांनी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवलं. सुरकीच्या हातून चुकून पाटील मॅडमच्या अंगावर पण उडलं. तिनं जीभ चावली. पाटील मॅडमनी तिच्याकडे हसून पाहिले आणि उलटं तिच्या अंगावर उडवले. तिला ते फार आवडले. सगळ्याच मुलांना. मग सगळ्यांनी पाणी उडवून उडवून पाटील मॅडमना पार भिजवून टाकलं. मॅडम पण काही कमी नव्हत्या. त्यांनी पण जोरदार फेकाफेकी खेळली.


झऱ्यावर मज्जा करून मुले आणि पाटील मॅडम परत आले तोवर मोहनची शेवळाची भाजी तयार झाली होती. कोणीतरी पळसाची पाने आणली. मोहनने सगळ्यांना थोडीथोडी भाजी पानावर वाढली. प्रत्येकाने आपापल्या भाकऱ्या काढल्या. प्रत्येकाची कोरभर भाकर खाता-खाता मॅडमचे पोट फुटून जाईल इतके भरले. कसलाही मालमसाला न घातलेली ती शेवळाची भाजी पक्वान्नाच्या तोंडात मारेल इतकी चविष्ट लागत होती.
सगळे रमत-गमत परत आले. मुले पाटील मॅडमना सोडायला खाली गावापर्यंत गेली. त्यांना टाटा करून परतताना सुरकीनं विचारलं, “पुन्यांदा कदवा भेटशीन म्याडम?” हे ऐकल्यावर मॅडमचा चेहरा आनंदाने का फुलला हे मात्रं सुरकीला समजलं नाही.