सिद्दूची डोकॅलिटी (गोष्ट)

सिद्दूची डोकॅलिटी

लेखन: अमृता गोटखिंडीकर
चित्रं: गीतांजली भवाळकर

सिद्दूला समुद्र खूप आवडतो आणि समुद्रात तरंगणारे रंगीबेरंगी जहाज तर प्रचंड आवडते. तो ज्या गावात राहतो ते गाव अगदी समुद्र किनारी वसले आहे. मोठ्या मोठ्या बोटी, जहाजे त्या गावाजवळच्या बंदरात नेहमी दुरुस्तीला येतात. एकदा सिद्दूने बाबाबरोबर जहाजावर जायचा हट्ट धरला. त्याला जहाजाच्या कॅप्टनकाकांना भेटायचे होते. मग एके दिवशी बाबाने त्याला जहाजावर न्यायचे कबूल केले, तेव्हा कुठे सिद्दू खुश झाला.

त्या दिवशी सकाळी सिद्दू लवकर उठून पटकन तयार झाला. सॅकमध्ये त्याने थोडे कपडे आणि खाण्याचं सामान भरले. सिद्दूने काकांना भेटायची जंगी तयारी केली होती. स्वतःचे नाव इंग्लिशमधून पाठ केले होते. समुद्राची एक कवितासुद्धा पाठ केली होती. त्याच्या घरात त्याला एक जुना कागद सापडला होता. त्याच्यावर कसली तरी नकाशात दिसणारी चित्रे काढलेली होती. सिद्दूला खात्री होती की, हा खजिन्याच्या नकाशा आहे. तो कागद त्याने जपून सॅकमध्ये ठेवला कॅप्टन काकांना दाखवायला.

थोड्या वेळाने कॅप्टनकाकांना भेटायला बाबांबरोबर निघाला. बंदरावर एका बोटीच्या दुरुस्तीचे काम चालले होते. कॅप्टनकाका तिथे उभारून काम करवून घेत होते. सिद्दूला पाहताच कॅप्टन काका जोरात म्हणाले, “अरे सिकंदर, ये ये!” त्यांचा आवाज इतका मोठा होता, की सिद्दू दचकलाच. त्यांनी जवळ येऊन त्याच्या पाठीवर थाप मारली. केवढे मोठ्ठे आहेत कॅप्टनकाका आणि केवढा त्यांचा हात! अबब! मोठ्या मोठ्या भरदार मिशा आणि पोनी घातलेले केस, पांढऱ्या रंगाचा मळकट टीशर्ट, खाली गुडघ्यापर्यंत विजार आणि लोखंडासारखे पाय! सिद्दू बघतच राहिला. मग कॅप्टनकाकांनी सिद्दूचं नाव, कविता आणि खजिना शोधायचा प्लॅन ऐकून घेतला. त्या खजिन्यातला हिस्सा सिद्दूने त्यांना द्यायचा कबूल केला, तेव्हा ते पोट धरून हसायला लागले. मग ते बाबाकडे बघून म्हणाले, “आज आपण समुद्रात एक चक्कर मारायला जाऊ, बोटीचे कामपण आहे. वाटेत खजिना सापडला तर तोही घेऊ, काय सिद्दू तयार? पण मी सांगितलेली कामं करायची काय?” सिद्दू काय, एका पायावर तयार होता.

कॅप्टनकाका, सिद्दू, बाबा आणि अजून एक दोन खलाशी एका लहान बोटीवर चढले. थोड्याच वेळात पांढऱ्या रंगाची ती बोट झरझर पाणी कापत निघाली. सिद्दुने लगेच खलाश्याची टोपी चढवली. गळ्यात लाल रुमाल अडकवला आणि कॅप्टनकाकांचे काम करायला तयार झाला. काका म्हणाले, मागच्या डेकपाशी छोटे किचन आहे. किचनमध्ये काम करणाऱ्या काकांकडून माझ्यासाठी चहा घेऊन येशील?
“किती सोपे काम, आत्ता घेऊन आलो”
सिद्दू लगेच उड्या मारत निघाला. दोन तीन उड्या मारत थोडा पुढे गेला. पण तेवढ्यात बोट जरा कलांडली आणि सिद्दू धप्पदिशी घसरून पडला.
“हाहा हाहा!” बाबा पोट धरून हसू लागला आणि म्हणाला “अरे, डोकं आहे का खोकं. जरा डोकॅलिटी लाव की!”
सिद्दुने इकडेतिकडे पाहिले, लाटांच्या जोराने बोट हिंदकळत होती. जिकडे तिकडे धरून जाण्यासाठी दोर आणि बार लावले होते. त्या बारला धरून-धरून सिद्दू हळूहळू स्वयंपाकघराकडे निघाला. लाटा बोटीला धडकल्या की त्याचे थेंब सिद्दूच्या अंगावर उडत होते. सिद्दूला मजापण वाटत होती आणि थोडी भीतीसुद्धा. वाऱ्याने त्याची टोपी आणि गळ्यातला रुमाल फडफडत होते. हळूहळू धरत धरत सिद्दू एकदाचा स्वयंपाकघरात पोचला. तिथे एक काका काम करत होते.
त्यांना सिददूने विचारलं, “कॅप्टन काकांसाठीचा चहा तयार आहे? मी घेऊन जातो.”


खलाशीकाकांनी मान डोलावून तिथल्या एका थर्मास कडे बोट दाखवलं. तिथे एका कोपऱ्यातल्या टेबलावर एक थर्मास आणि चहा प्यायचे कप, पाण्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या. खलाशी काका काही म्हणतायत तोवर सिद्दूने एका कपात चहा भरून घेतला आणि लगेच परत निघाला.
खलाशीकाका मागून ओरडले, “अरे सावकाश! घाई नुसती”सिद्दू बोटीवरच्या बारला धरून धरून निघाला. एका हातात तो चहाचा पोळणारा कप, हिंदकाळणारी नाव, दुसऱ्या हाताने कसाबसा धरलेला तो बार. बोटीवर काम करायचं म्हणजे सोप्पे नाहीए. सिद्दूच्या डोक्यात वेगवेगळे विचार यायला लागले. समुद्रातल्या लाटा किती वेगवेगळया रंगाच्या दिसतात. असं का बरं होते? मध्येच त्याला अगदी बोटी शेजारून जाणारे मासे दिसले. माश्यांना बोटीची भिती नाही वाटतं? तो तिथेच थांबून पाण्याकडे बघत बसला लाटेत अजून काय काय काय दिसत आहे ते पाहायला.

सिद्दू मध्येच कुठेतरी रेंगाळलेला पाहून बाबाने त्याला हाक मारली, तेव्हा कुठे तो भानावर आला. हळूहळू बारला धरत धरत कॅप्टनकाकांपर्यंत पोहचला आणि त्याने चहाचा कप उंचावला. पण, त्यात चहा कुठाय? चहाचा एकच घोट त्या कपात उरला होता, बाकी चहा तर केव्हाच सांडून गेला होता. ‘अरे! असं कसं झालं माझ्या लक्षात सुद्धा आलं नाही.’ सिद्दू हिरमुसला. सिद्दूचा बाबा गालातल्या गालात हसत होता .कॅप्टनकाका त्याच्याकडे बघत म्हणाले, “परत आणशील?”
सिद्दूचा चेहरा खुलला. तो म्हणाला “हो, लग्गेच!”
सिद्दू परत स्वयंपाकघराकडे निघाला. आता मात्र बार धरून धरून चालायची, त्याला जरा सवय झाली होती. जाता जाता सिद्दुच्या डोक्यात एक मस्त गाणे चालू झालं.

नौका चाले कशी जलावरी जलावरी
आहे सारा भार मुलांवरी मुलांवरी
लहान वीर, महान धीर
रोखीत वादळ, वल्हवा रे वल्हवा रे

बोट तर डोलत होतीच, तरी फक्त एक-दोन वेळा पडत सावरत तो स्वयंपाकघराजवळ पोचला. तिथे थर्मास ठेवला होता तिथे काही प्लास्टिकच्या बाटल्यापण पडल्या होत्या. तिथली एक बाटली त्याने उचलली. थर्मासमधला चहा त्यात ओतला. एक कप बरोबर घेतला आणि परत निघाला. एका हातात गरम चहा असलेली बाटली, एक कप , हिंदकाळणारी नाव, दुसऱ्या हाताने कसाबसा धरलेला तो बार. बोटीवर काम करायचं म्हणजे सोप्पे नाहीए!

बोट डौलात निघाली होती. वारा पण भन्नाट होता.

मोकाट पिसाट वारा आला..येऊ द्या रे
डोंगर मापाच्या लाटा आल्या . येऊ द्या रे
छाती अफाट.. झेलेल लाट
रोखीत वादळ.. वल्हवा रे

गाणे गुणगुणत सिद्दू कॅप्टनकाकांपर्यंत पोचला. त्याच्या बाटलीतला चहा जरासुद्धा सांडला नव्हता. सिद्दू खुश झाला. त्याने बाटली मधला चहा कपात ओतला आणि कॅप्टन काकांना दिला. त्यांनी मोठ्या मौजेने चहाचा घोट प्यायला आणि “शी!! थू थू थू..” कॅप्टनकाका ओरडले आणि तोंडातला चहा त्यांनी थुंकून दिला. “आता काय झाले?” बाबाने सिद्दूने आणलेल्या बाटलीचा वास घेतला आणि जोरजोरात हसायला लागला. म्हणाला, “अरे काय होते या बाटलीत? बघायची तरी!” सिद्दूने ऑईलच्या बाटलीत चहा आणला होता. ओहो! सिद्दूचा चेहरा पडला. त्याला वाटलं की ‘कॅप्टनकाका आता रागावणार. मला साधंसोप्पं काम येत नाही खजिना कसा शोधणार?’
तेवढ्यात कॅप्टनकाका त्याच्याकडे बघत म्हणाले, “परत आणशील?”
सिद्दूचा चेहरा खुलला. तो म्हणाला “हो, लग्गेच”
सिद्दू परत स्वयंपाकघराकडे निघाला. जाताना त्याने पाठीवरची सॅक नेली. बार धरून चालायची आता त्याला चांगलीच सवय झाली होती. स्वयंपाकघरात पोचल्यावर त्याने खलाशीकाकांकडे दोन स्वच्छ बाटल्या मागितल्या. त्या बाटल्या परत एकदा विसळून त्यात चहा भरला आणि त्या सॅक मध्ये टाकल्या. परत जाताना त्याचे दोन्ही हात रिकामे होते. त्यामुळे त्याला सहज कॅप्टनकाकांकडे जाता आले. त्यांच्याजवळ पोचल्यावर त्याने सॅकमधल्या दोन बाटल्या काढून कॅप्टनकाका आणि बाबासमोर धरल्या.
काकांनी विचारले, “कप कुठे आहे?”
सिद्दूचा बाबा म्हणाला, “मी आणतो, विसरला असेल सिद्दू!”


तेवढ्यात सिद्दू म्हणाला, “बाबू, थांब रे, लावलीय्ये मी डोकॅलिटी…” असे म्हणून त्याने सॅकच्या वरच्या कप्यात असलेले दोन स्ट्रॉ काढले आणि त्या दोघांच्या बाटल्यांत टाकले आणि म्हणाला, “आता प्या....”
कॅप्टनकाका खो खो हसायला लागले आणि बाबाने खुश होऊन सिद्दूकडे बघत डोळे मिचकावले.