मातीची वाटी (कथा)

मातीची वाटी. 

मूळ हिंदी कथा: डॉ. मोहम्मद अरशद खान.

स्वैर मराठी भावानुवाद: फारूक एस.काझी

चित्रेः योगिता धोटे

 

हजला जाण्यासाठी दादींना अजून दोन महिने बाकी होते, पण आत्तापासूनच त्यांनी तयारीला सुरुवात केली होती. एका जुन्या सुटकेसला ऊन दाखवून त्यात वर्तमानपत्राचा कागद अंथरून, दादींनी त्यात रोज काहीबाही साहित्य ठेवायला सुरुवात केली होती. 

अब्बूूपण त्यांच्यासोबत हजला जाणार होते. दुकानाच्या व्यापामुळे त्यांना तयारीकडे जास्त लक्ष देताच येत नव्हतं. जाण्याआधी थोरल्या चाचूंना सगळं काही समजावून सांगावं असं त्यांना वाटत होतं. तसं पाहायला गेलं, तर थोरले चाचू अब्बूंच्या बरोबरच दुकानात बसत होते. हिशोब पाहत होते. परंतु, अब्बू सगळं पाहतात म्हणून ते थोडे निवांतच असायचे. दुपारी जेवायला म्हणून आले, की थोडी झोप घेऊन जायचे. आता अब्बू नसल्यावर त्यांना असं करता येणं शक्य नव्हतं. अब्बूंना त्यांची सवय माहीत होती, त्यामुळे त्यांच्यात थोडी जबाबदारीची जाणीव यावी असं त्यांना वाटत होतं. 

अब्बू रात्री घरी आले, की दादी त्यांना दुसऱ्या दिवशी आणायच्या साहित्याची यादी द्यायच्या. लहान आकाराचं कुराण, पंजसुरा, तस्वीह(जपमाळ), जा-नमाज(ज्यावर नमाज अदा केली जाते ते कापड) आणि अजून बरंच काही.

एक दिवस यादी देतादेता दादी बोलल्या, “बेटा युसूफ, येताना एक मातीची वाटी घेऊन ये.” 
“मातीची वाटी? आणि ती कशासाठी?” अब्बूनी चमकून विचारलं. 
“पाणी प्यायला.” 
“पण तुम्ही तर नेहमी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिता?” 
“हां, पण मी ऐकलंय की अरब देशात जास्त झाडंबिडं नाहित. तिथं ऊनही जास्त असतं. वाळवंटातील गरम हवा भयंकर असते. अशात मातीच्या वाटीत पाणी थंड राहील.” 
अब्बू हसू लागले. “अम्मी, तिथं खूप चांगली व्यवस्था आहे. ते लोक हाजी लोकांना काहीही त्रास होऊ देत नाहीत. तुम्हाला प्रत्येक वेळी थंड पाणी दिलं जाईल. आणि असं सांगतात, की काबे शरीफची फरशी तर, कडक उन्हातही थंडगार राहते. न जाणो काय व्यवस्था आहे, की तळव्यांना चंदनाचा गारवा जाणवतो.” 
“ते काहीही असू दे. मला मातीची वाटी आणून दे. तुला जमत नसेल तर तसं सांग, मी जाऊन आणते.” दादी नाराजीने बोलल्या आणि तस्बीह फिरवू लागल्या. 
“मी असं कधी म्हणालो? तुम्हाला हवी आहे तर आणून देतो.” अब्बू असं म्हणून खोलीकडे निघून गेले.

तीन वर्षांचा माहताब बराच उशीर अब्बू आणि दादीचं बोलणं ऐकत होता. त्याला काहीच कळेनासं झालं. त्याने दादींजवळ जाऊन विचारलं, “दादीजी तुमी कुतं ताल्लाय?” 
“हजला चाललेय बाळा.” 
“हज काय अशतं?” माहताब आपल्या बोबड्या बोलांनी विचारत होता. 
“बाळा, हज हे इस्लाममधील पाच कर्तव्यांपैकी एक कर्तव्य. ज्यांनी आपली संसारातील सर्व कर्तव्य, जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि ज्यांच्याजवळ पुरेसा पैसा आहे, त्यांच्यासाठी हज आवश्यक केलं आहे.” 

माहताबला काहीच समजलं नाही. तो निघून गेला. पण दादीचं बोलणं ऐकून मला मात्र रहावलं नाही. मी विचारलं, “दादीजी, इस्लामची इतर चार कर्तव्य कोणती आहेत?” 
दादी खूश झाल्या. घरात अशा चर्चा व्हाव्यात असं त्यांना वाटायचं. त्या खूश होऊन सांगू लागल्या, “पहिलं कर्तव्य, तौहिद. म्हणजे ईश्वर एकच आहे; फक्त त्याचीच प्रार्थना केली जावी आणि महम्मद त्यांचा प्रेषित आहेत. दुसरं कर्तव्य, पाच वेळची नमाज. तिसरं रमजानचे रोजे(उपवास), आणि चौथे कर्तव्य जकात म्हणजेच वर्षभराच्या खर्चातून जेवढी रक्कम शिल्लक राहील, त्याच्या अडीच टक्के रक्कम गरीब आणि गरजू लोकांना दान करणे.” 

दादींचं बोलणं ऐकून अब्बूही बाहेर आले आणि म्हणाले, “बघ, तुझ्या पुस्तकात तू वाचतोस ना ‘वसुधैव कुटूंबकम’. हजचा त्याच्याशी संबंध आहे.” 
“असं आणि तो कसा काय!”, मी आश्चर्याने विचारलं. 
“बघ, जेव्हा एखादा माणूस शेजारच्या मस्जिदमध्ये नमाज अदा करतो तेव्हा गल्लीतील लोकांशी त्याची गाठ-भेट होते. तो जेव्हा जुम्माची (शुक्रवारची सामुहिक प्रार्थना) नमाज अदा करतो तेव्हा मोहल्ल्यातील लोकांशी भेटून त्यांच्या सुखदुःखाची त्याला माहिती मिळते. ईदच्या नमाज वेळी तो शहरातील असंख्य लोकांना भेटतो. तसंच हजच्या वेळी तो जगभरातील लोकांना भेटतो. त्यावेळी त्याच्या मनात ही जाणीव निर्माण होते की अल्लाहजवळ कोणीच उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, काळा-गोरा, लहान-मोठा असत नाही. सगळे समान आहेत.” 
मग तर काय बैठकच जमली. अम्मी, थोरले चाचू, लहान चाचू सगळेच येऊन बसले. खूप उशीरापर्यंत गप्पा रंगल्या.


एक दिवशी हज्जीन (ज्या हजला जाऊन आल्या आहेत अशा) दादी घरी भेटायला आल्या. त्या गल्लीत सर्वात वयस्कर होत्या. दादी त्यांना बज्जो या नावाने बोलवत. बज्जो म्हणजे बाजी; मोठी बहीण. त्या हजला जाऊन आल्या होत्या. वय साधारण ७०-७५. मात्र त्यांचा उत्साह पाहता सगळेच कोड्यात पडत. सडपातळ शरीर, बत्तिशी एकदम ठाकठीक, केस पांढरे जरूर झाले होते मात्र ते अजूनही तसेच दाट होते. कमरेत वाकलेल्या असल्या तरीही चालणं असं, की पाच मिनिटांत किलोमीटर पार करतील. कुठे जायचं असेल तर कुणाच्या मदतीविना निघत. एक मळकासा नकाब, हातात पानाची चंची घेऊन त्या बाहेर पडल्या, की सगळेच लोक त्यांना सलाम करत असत. 

आल्या आल्या त्या दादींना बोलल्या, “हे बघ बिलकीस, कपडालत्ता जो काही न्यायचा तो ने. पण लहान-सहान गोष्टी मात्र अजिबात विसरू नको. चप्पल, वजूचा तांब्या, जा-नमाज, अंघोळीचा- कपडे धुण्याचा साबण, टॉवेल, मिसवाक(दात घासण्याची विशिष्ट काडी), खाण्यासाठी म्हणून काही कोरडा खाऊ, या वस्तू खुप कामाला येतात. घेऊन जायच्या वस्तूंची एक यादी बनव. जसजशा वस्तू ट्रंकेत ठेवशील तसतशी खुण करत जायची.” हज्जीन दादी बोलायच्या फार भारी. त्याच बोलणं सुरू झालं की अख्खं घर त्यांच्याभोवती गोळा व्हायचं. छोटा माहताब तर त्यांच्या मांडीवरच जाऊन बसायचा. 

हज्जीन दादींनी चंचीतलं पान काढलं, तोंडात टाकलं आणि बोलू लागल्या, “आणि हो, ट्रंकेत सगळं खचाखच नको भरूस. तिकडून आणायच्या वस्तूंना पण जागा असू दे. खारीक, आबे-जमजम, जा-नमाज, तस्बीह यांच्यासाठी जागा राहुदे. हजवरून परत आल्यावर, लोकांना तबरूक (प्रसाद) द्यावं लागेल. नाहितर इथुनच ट्रंका ठासून भरून घेऊन जाशील आणि तिथून काही आणायला जागाच नाही असं व्हायचं.” असं म्हणून दादी हसू लागल्या. त्यांना हसताना पाहून माहताबही हसू लागला. 

बघता बघता हजला जाण्याची तारीख जवळ येऊन ठेपली. अब्बूंनी शेवटचं साहित्य भरताना दादींना विचारलं, “अम्मी, मातीची वाटी तुम्ही घेतली खरी, पण येण्याजाण्यात ती टिकेल असं वाटत नाही.” दादींनी मातीची वाटी सोबत घेऊ नये असं त्यांना वाटत होतं. “तू नको त्याची चिंता करू. मी माझ्याजवळच्या थैलीत ठेऊन दिलीय ती. मी देईन लक्ष.” 
अब्बू यावर काहिच बोलले नाहीत. 
हजला निघायच्या दिवशी सगळे पाहुणे आणि गल्लीतील लोक भेटायला आले. सर्वांनी त्यांना फुलांचे हार घातले, मिठाई भरवली आणि स्वत:साठी प्रार्थना करण्याची विनंती केली. 

दादी घरातून निघताना अम्मी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. दादीपण स्वत:ला आवरू शकल्या नाहीत. भरल्या गळ्याने त्या बोलू लागल्या, “बाळा, जगले वाचले तर भेटूच चाळीस दिवसांनी. पण, माझ्याकडनं जर काही चुका झाल्या असतील, कधी जर जाणते-अजाणतेपणी तुझं मन दुखावलं असेल, तर मला मोठ्या मनाने माफ कर.” “अम्मी तुम्हीपण...” अम्मी फक्त एवढंच बोलू शकली आणि रडू लागली. त्यांची गाडी नजरेआड होईपर्यंत अम्मी पाहत राहिली. 

हज हाऊसच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून अब्बू आणि दादी एअरपोर्टला पोचले. त्यांचं सर्व सामान विमानात ठेवण्यासाठी पुढं पाठवलं गेलं. खांद्यावरची थैली सोडली तर त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. विमानात बसण्यासाठी म्हणून, जेव्हा दोघं गेटवर गेले तेव्हा त्यांची थैली तपासली गेली. थैलीत मातीची वाटी पाहिल्यावर तपासणी अधिकारी छद्मीपणे हसला. अब्बूंना शरम वाटली, मात्र दादींवर काहीच परिणाम झाला नाही. त्या बोलल्या, “पाणी पिण्यासाठी घेऊन चालल्लीय.” 
अधिकाऱ्यानं त्याच्या बोलण्याकडे फारसं लक्ष नाही दिलं. थैली परत केली. 

मक्कामघ्ये त्यांना काबा शरीफच्या शेजारीच खोली मिळाली. खिडकीतून काबा दिसायचा. दादी हात उचलून सर्वांसाठी दूवा करत होत्या. खोलीच्या बाहेरच फ्रीजर लावला होता. अब्बू रोज सकाळी थंड पाणी कूलरमध्ये भरत. ते आल्यापासून पाहत होते, दादींनी सोबत आणलेल्या मातीच्या वाटीतून एकदाही पाणी प्यायलेलं नव्हतं. पण, ती वाटी रोज बाहेर काढून तिला एखाद्या लहान मुलाला कुरवाळावं, अगदी तसंच कुरवाळून आत ठेऊन द्यायच्या. 

हजच्या दिवशी, म्हणजे काबाला प्रदक्षिणा घालण्याच्या दिवशी, दादींनी मातीची वाटी आपल्या थैलीत घातली आणि थैली खांद्याला अडकवली. अब्बू चिडले. “अम्मी, हे सगळं ओझं कशासाठी घेताय? तिथं प्रचंड गर्दी असणार आहे. आजपासूनचे तीन दिवस प्रार्थना आणि खूप मेहनतीचे आहेत. कित्येक किलोमीटर चालावं लागेल. सफा-मरवा टेकड्याच्या मधून धावावं लागेल. राक्षसांना खडे मारावे लागतील. खूप प्रवास करावा लागेल. किती परेशानी होईल याची तुम्हाला साधी कल्पनाही नाही.” 

दादी काहीच बोलल्या नाहीत. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी स्पष्ट होते की, त्यांना याबाबत काहीच बोलायचं नाहीये. अब्बू गप्प बसले. दादींचे गुडघे दुखत असत. परंतू हजचे सगळे सोपस्कार त्यांनी अत्यंत उत्साहाने पार पाडले. एखाद्या लहान मुलासारखा उत्साह आला होता त्यांच्यात. 

हज झाल्यावर एकेक करून सर्व हाजी लोकांचे जथ्थे परत येऊ लागले. दादी आणि अब्बू परत आले. थोरले चाचू, लहान चाचू त्यांना आणायला गेले होते. घरी परत आल्यावर सर्व सामान काढलं गेलं. अम्मीला दादींची मातीची वाटी सापडली.

“अम्मीजी, तुमची वाटी ठेऊन द्या. नाहीतर सामान इकडे तिकडे हलवताना एखादवेळी फुटून जाईल.” 
“असू दे. आता नाही तिची काळजी.” दादी एकदम बेफीकीर होऊन बोलल्या. 
अब्बूंना आश्चर्य वाटलं. त्यांना अजिबात राहवलं नाही. 
“अम्मी, आम्ही नको म्हणतानाही तुम्ही ही वाटी सोबत नेली. तिची इतकी काळजी घेतली. आणि आता तिची गरज नाही म्हणताय? जर गरज नव्हती तर सोबत नेलीच होती कश्यासाठी?” 

दादी क्षणभर नि:शब्द झाल्या. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. गळा दाटून आला.
आवंढा गिळून त्या बोलायला लागल्या, “अरे, ही मातीची वाटी जगासाठी असेल. माझ्यासाठी तर ही माझ्या भारत देशाची पवित्र मातीये. आपल्या देशापासन इतक्या दिवस दूर राहूनसद्धा त्याची आठवण माझ्यासोबत होती. परमुलखात माझं काही बरं वाईट झालं असतं तर? माझ्या नशिबी देशाची माती आली नसती. म्हणून ही वाटी मी जीवापाड जपली होती.” दादींनी आवंढा गिळला, “ज्या मातीत माझं बालपण, तरुणपण गेलं आणि आता म्हातारपण चाललंय त्या मातीशी असलेलं माझं नातं कसं विसरू? माझी नाळ जोडली गेलीय या मातीशी. मी नाही दूर राहू शकत या मातीपासून. ज्या मातीत खेळून आमच्या पिढ्या घडल्या त्या मातीला असं कसं सोडून देईन?” 

दादींनी दुपट्टा आडवा धरून रडायला सुरुवात केली. सगळेजण क्षणभर सुन्न झाले. डोळ्यांच्या कडांतून पाणी खाली ओघळत होत. दादींनी अजूनही मातीची वाटी हातात घट्ट धरून ठेवलली होती.