सोयरा (गोष्ट)

सोयरा

लेखन: राजश्री तिखे
चित्र: मैत्रेयी मुजुमदार
ठाकर संवाद सहाय्य - काशिराम गौरू निरगुडे

सारिका वेलची आंब्याखाली उभं राहून पाड निरखत होती. तेवढ्यात गावातले तानाजीकाका आणि कणशांचा भिवा बाजारातून येताना सारिकाच्या घराशी टेकले. आईने पाण्याचा तांब्या आणून तानाजीकाकांच्या हातात दिला. तेवढ्यात छपरावर खसफस झाली.
“आरं काय ह्ये काशिराम. तू तर अस्तनीतला निखाराच पाळतोय हायेस जनू. येखांद वेळेस जनावर डोसक्यात पडलं तर काय करता काय व्हायचं.” तानाजीकाका म्हणाले. 

एका जनावराचा वावर त्यांच्या घरात असतो, हे सगळ्या गावाला माहिती होतं. दामले खोताच्या बागेच्या आणि घराच्या देखरेखीचं काम सारिकाच्या बाबाला मिळालं, तेव्हा जवळच असलेली त्यांची ठाकरवाडी सोडून ते या गावात येऊन राहिले होते. खोताने त्याच्या जुन्या घराजवळचं हे एक छोटं कौलारू घर त्यांना रहायला दिलं होतं. 

“आवं तानाजीकाका, तो आपला तोटा तर कायच करत नाय. आपन त्याला खोड केली नाय तर काहाला तो आपल्या वाटंला जातोय? आपन जीव लावला तर जनावरदिखिल काय करत नाय, तानाजीकाका”, सारिकाचा बाबा हसत म्हणाला.
“ह्ये आसलं आक्रीत बोलनं कवा आयकल न्हाय.” मान हलवत तानाजीकाका म्हणाले, “आरं निदान घरात बायामानसं हायेत याची तरी पर्वा कर. तुजा हिरामन शिकायला बाहेरगावी. तू सदान्कदा कामात. वेळ आली तर या दोगींनी काय करावं?” 
“आव काका. तो वाडवडिलांपासून हितं रहत आसल, म्हंजे आपलाच नाय का? म्हंजे सोयराच म्हना की. मंग आता घरातल्या पोरीबाळींची काळजी त्याला आसतेच.” सारिकाच्या बाबाचं बोलणं ऐकून तानाजीकाका हताशपणे उठले. तो कोणाचं ऐकणार नाही हे त्यांना माहिती होतं.
“आरं दामले खोत आला तर काय म्हनंल. आता कानोकान खबर पोचतेच का नाय?” जाता जाता भिवाने जणू काही दामले खोताला चुगली करायची धमकीच दिली.

सारिकाच्या पोटात खड्डा पडला. खरंच भिवाने किंवा तानाजीकाकांनी दामले खोताला सांगितलं तर काय होईल? बाबाचं आणि दामले खोताचं भांडण होईल का? पण दामले खोत फारसा येतच नाही इकडे. पुण्याला त्याचा मोठ्ठा कारखाना आहे म्हणे. कधी आला तरी एक-दोन दिवसाच्या वर राहात नाही. आणि त्याचा बाबावर विश्वास पण आहे. सारिकाचं डोकं विचारांनी भणभणून गेलं. तिचं आंब्यातून मनच उडालं. 

सगळ्या गावकऱ्यांना आपल्या घरातलं हे आक्रीत म्हणजे जीवाला घोर वाटतो हे सारिकाला माहिती होतं. तसं कोकणातल्या या गावाला साप-किरडं काही नवलाची नव्हती. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात ८-१५ दिवसांमागं कुठेतरी एखादा नाग-साप दृष्टीस पडायचा. जनावर दूर असेल आणि माणसं घाईत असतील तर बिचारं आपल्या वाटेनं निघून जायचं. पण अगदीच पल्ल्यात असेल आणि हाताशी वेळ असलेली २-४ माणसं आसपास असतील तर लाठ्या-काठ्यांनी, नाहीतर कुऱ्हाड-फावड्यानं बिचाऱ्याचा जीव जायचा. पण घरातच जातीवंत जनावर वस्तीला असणं, ही काही गावाला मानवणारी गोष्ट नव्हती. 

खरं तर त्याचं अस्तित्व लक्षात आलं, तेव्हापासून त्याचं दडपण सतत मनावर असायचंच – तिच्या आणि तिच्या आईच्या पण. आई म्हणायची, “कहाला ह्ये जोखीम?”
बाबा म्हणायचा, “अगं, तो अध्यात ना मध्यात. तो आपल्याला काय करायचा ना, काई ना. तो त्याच्या मनानं रहतोय्, आपन आपल्या मनानं. रहिना जाईना.”
एक दिवस सारिका पण त्याला म्हणाली होती, “बाबा, तू त्याला बाह्येर का काढून लावत नाय?”
“अगं सारके, हे गाव वसायच्या आदपासनं तो, त्याचे पूर्वज रहत असत्याल हित. हितं जाम रान आसल, ह्याच्या वाडवडिल नांगांचं घर आसल कवचित. आता मानसांनं त्याचं घर फोडून त्यांच्या जाग्यावं घरं केली, मंग तो कुनकं जईल? त्याला त्याच्याच जाग्यातून काढून लावायचं?” बाबा म्हणाला होता. सारिकालाही ते पटलं होतं पण सतत भीतीचं सावट असायचं मनावर.

एकदा सारिका मैत्रिणींबरोबर ठिकऱ्या खेळत असताना सोनीने हळूच खाजगी आवाजात विचारलं, “सारिक्ये, तुज्या बाबाला ती तसली इद्या येते का गं?” 
“ती तसली म्हंजे?” सारिकाने न कळून विचारलं.
“तसलीऽऽ म्हंजे.... ते मंतर घालतात...वशीकरण का काय म्हनं. नाऽऽय, गावातले बोलत हुते.” सोनी चाचरत म्हणाली.
“नाय. बाबाला तसलं काय येत नाय.” सारिकाने तुटक उत्तर दिलं. 
“नाय, म्हंजे तुमी ते जनावर पाळलं हाय ना.” सोनी विषय पुढे रेटत म्हणाली. 
“आमी ते पाळलं नाहा. आपला आपन रहतोय तो. बाबा म्हंतो का आपल्या वाडवाडलांच्या आधीपासून तो वस्तीला हाय हितं. मग त्याच्याच घरातून त्याला कसं काढून देनार?” सारिकाने उसळून उत्तर दिलं.
“सारिक्ये, तुला भीती न्हाय वाटत का गं?” सोनीने डोळे मोठे करून आणि शहारून विचारले.   
सारिका काहीच बोलली नाही. सोनीला काय उत्तर द्यावं हे तिला समजेना. ती फक्त पाठ फिरवून घराकडे चालायला लागली. 

घरी आली तो बाबा चुलीच्या सरपणासाठी लाकडाच्या ढलप्या काढत होता. सारिका त्याच्याभोवती चुळबुळत घुटमळत राहिली. मग अखेर तिनं त्याला विचारलं, “बाबा ती सोनी सांगं का...” बाबानं नुसतीच मान तिच्याकडे वळवून पाहिलं आणि भिवया उंचावल्या. सारिका पुढे सांगू लागली, “ती म्हनाली का,  ‘आमच्या घरची म्हनतात की घराण्याचा पुरूष असा नागाच्या रूपात राखनदार होऊन घराच्या आसपास ऱ्हातो. त्याच्या अंगावर बोटबोट केस आसतात आणि डोक्यावर मनीपन आसतो.’” सारिकेनं सोनीची नक्कल करत सागितलं. हातातली कुऱ्हाड खाली ठेवून सारिकाचा बाबा थांबला. तो शांतपणे म्हणाला, “सारिक्ये, उभ्या जिंदगीत केस असलेला आन् डोक्यावं मनी आसलेला नाग-साप माहा दिखला नाहा. हा राखनदार हाय का काय ते माल ठाव नाहा. ही जिमिन खोताची. त्याचं हायच काय हितं, समोरचं जुनं घर आन् ही मागची बाग. त्याची सगली इष्टेट तिकं पुन्यात. बागेची राखन करायला मी हायेच. मंग कोन कशाची राखन करनार?” 
जरा उसंत घेऊन तो पुढं म्हणाला, “माल इतकं ठावं हाय का येकाच देवान् त्याला जलम दिला आन् आपल्याला पन्. आपन त्याच्यासंगत समजुतीनं रहातंव हे त्याला समजतंव. आपन चांगलं वागलो तर तो पन् चांगलंच वागनार.”
सारिकाला थोडं समजलं आणि थोडं नाही समजलं. पण ती काही बोलली नाही.  

एक दिवस आईला तालुक्याला काम निघालं. ती आणि गावातली तारामावशी बचत गटातून कर्ज घेऊन गिरणीचा व्यवसाय चालू करणार होत्या. बँकेचे सोपस्कार पूर्ण करायला तालुक्याला जायचं दोघींचं केव्हाच ठरलं होतं. त्यातच आदल्या दिवशी दामले खोतानं बाबाला नवी कलमं न्यायला अचानक पुण्याला बोलावून घेतलं होतं. आईनं लवकर उठून पटापट स्वयंपाक केला आणि ती आणि तारामावशी लवकरच ८ च्या बसने तालुक्याला गेल्या. सारिकाच्या मनात उगाच धडधड सुरू झाली. ती एकटीच घरात आहे अशी वेळच आली नव्हती, कारण बाबा आसपास बागेत असायचाच. ती धास्तावल्या मनानं कानोसा घेत पटपट शाळेत जायची तयारी करू लागली. आवरून, गणवेश घालून ती जेवायला बसली. आईने टोपलीत भाकऱ्या ठेवल्या होत्या. चुलीवर सुकटीची चटणी होती. सारिका भरभर जेवू लागली. 

तेवढ्यात मागल्या आवारात ‘धपाक्’ असा एखादं मोठं धूड पडल्यावर येईल तसा आवाज आला. सारिका तशीच उठली. धडधडत्या छातीने स्वयंपाकघराच्या मागच्या दारात उभी राहिली. 

तरअगागागागा! सारिकाचे डोळेच क्षणभर पांढरे झाले. बाबा ज्याला सोयरा म्हणायचा तो तिथं अंगणात होता. फणा काढून, वेटोळं घालून उभा होता. चांगला दंडाएवढा जाड आणि बाबाच्या पंजाएवढा तर त्याचा फणा असेल. काळ्या ढगाच्या आडून आलेली उन्हाची तिरीप त्याच्या पिवळ्याधम्मक अंगावर पडली होती आणि त्यात ते चमचमत होतं. सारिका खिळल्यासारखी पाहात उभी राहिली. तेवढ्यात “चींचीं” असा एक बारीक आवाज आला. समोर एक गलेलठ्ठ उंदीर पायातली शक्ती गेल्यासारखा बसला होता. इतक्या वेळ सारिकाला तो दिसलाच नव्हता. दोन-तीन मिनिटं तशीच गेली. जणू मंतरच घातला होता त्या उंदरावर त्याने. अन् क्षणार्धात त्याचं वेटोळं सुटलं, चपळ हालचाल झाली आणि पुढच्याच क्षणी उंदीर त्याच्या तोंडात होता. त्यानं तो गिळून टाकला. त्याचं जेवण झालं. 

आता पुढे? आता कुठल्या दिशेने वळेल तो? सारिका गळाठली.

“सारिके, येती ना गं शालेत. आमी चाललाव.” बाहेरून सोनीचा आवाज होता.
सारिका भानावर आली. मागल्या दारातूनच ती ओऱडली. “जा हो, सोने. मी मागून येते.” 
“बरं, लवकर ये हो.” म्हणून सोनी निघून गेली. 
सारिका त्याच्या हालचालींकडे पाहत राहिली. आज पहिल्यांदाच ती त्याला पाहत होती. खरं तर एकाच घरात राहत होते ते. तो छपरावर आणि ती छपराखाली. 

आता त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या. सारिका उकिडवी बसली. हनुवटीखाली दोन हात देऊन त्याच्याकडे बघत राहिली. बऱ्याच वेळाने तो घराच्या दिशेने वळला. सारिका दचकून उठली. आता हा पायरीवरून आत येणार की काय? पण तो भिंतीकडे वळला. घराच्या वीटा-मातीच्या खडबडीत भिंतीवरून हळूहळू वर सरकू लागला. आता सारिका आवारात येऊन उभी राहिली होती. तो छपरापाशी पोहोचेपर्यंत सारिका पाहत राहिली. छपरापाशी पोचल्यावर त्याने पुन्हा एकदा फणा काढला. चारी दिशांना बघितल्यासारखं केलं. सारिका दचकून मागे सरकली. पण तो शांतपणे कौलांत शिरला. हळूहळू त्याच्या शरीराचा बाहेर दिसणारा भाग कमीकमी होत गेला. त्याच्या शेपटीचं शेवटचं टोक दिसेपर्यंत सारिका बघत राहिली. 

“तो आपल्या अध्यात ना मध्यात. त्याला ठावं हाय का आपन त्याची खोड काढनार नाहा का काढून लावनार नाहा. काय नाय करनार तो.” बाबाचे शब्द तिला आठवले.
मग एक उसासा सोडून ती घरात शिरली. शांतपणे उरलेलं जेवू लागली. अचानक तिच्या मनातलं इतक्या दिवसांचं वादळ शांत झालं होतं. तिला अजिबात भीती वाटेनाशी झाली होती. उलट एका उबदार आपलेपणाच्या भावनेने तिचं मन भरून गेलं होतं.