नदीतला चहा (कथा)

नदीतला चहा

लेखन: अश्विनी बर्वे
चित्रे: ऋषिकेश
---------------------

एके दिवशी घरातील सगळे टेन्शनमध्येहोते. प्रत्येक जण घड्याळाकडे पाहायचे नंतर दाराकडे पाहायचे पण एकमेकांकडे अजिबात पाहायचे नाहीत. शेवटी न राहवून आजोबांनी विचारलं की, “सकाळी जाताना रिंकू तुम्हाला काही सांगून गेली होती का?” आजीने फक्त ‘नाही-नाही’ अशी मान हलवली आणि हळूच म्हणाली, “ती आज शाळेत जाताना मोठी किटली घेऊन गेलीय.”
“काऽय?” आजोबा आश्चर्याने किंचाळलेच.
तेवढ्यात स्वयंपाकघरातून बाहेर येत आई वैतागून म्हणाली, “काय करावं या रिंकूचं मला काही कळत नाही. एवढा पाऊस पडतोय, पण तिला काही शुद्धआहे का पहा.”
तिला समजावत आजोबा म्हणाले, “अगं रिंकूला बघायला गेलाय ना, तिचा काका? येईल हो इतक्यात.”

सकाळी शाळेत गेलेली रिंकू चार वाजले तरी घरी आली नव्हती. तिची शाळा सुटून दोन तास जास्त झाले होते. म्हणून तर घरातल्या सगळ्यांना काळजी वाटत होती. रिंकू ही एक अत्यंत उद्योगी मुलगी होती. तिला सतत काही ना काही वेगळे करावे वाटायचे. ती एका छोट्या गावात राहत होती. त्या गावाला छानशी नदी होती. या नदीला बारा महिने पाणी असायचे. त्यामुळे गावातल्या सगळ्यांना गावच्या नदीबद्दल जरा जास्तच कौतुक वाटायचे. रिंकूची शाळासुद्धा नदी जवळच होती. ती दहा वर्षाची झाल्यामुळे, तिला आता एकटीला शाळेत जाण्याची परवानगी मिळाली होती. एरवी तिचा काका, नाहीतर आत्या, शाळेत सोडायला येत असत. खरंतर, गावातील कितीतरी मुले एकटीच शाळेत जात, पण रिंकू सतत कुठेतरी धडपडायची, म्हणून तिला घरातली मोठी माणसे सोबत करत. तिला मात्र ते अजिबात आवडत नव्हते, म्हणून ती आता एकटीच शाळेत जात असे.

त्याही दिवशी ती अशीच शाळेत गेली होती. ते पावसाचे दिवस होते. पाऊस खूप पडत होता. रिंकूला पावसात भिजायला खूप आवडायचं. त्यामुळे तसाही तिला रमतगमत घरी यायला उशीर व्हायचा, पण आज नेहमीपेक्षा जरा जास्त उशीर झाला होता. तेवढ्यात रिंकू काकाबरोबर उड्या मारत आली. रिंकुच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून सगळ्यांनी फक्त एकमेकांकडे पाहिलं आणि ‘सुखरूप आहे हो’ अशा अर्थाने माना डोलावल्या. काका तर खुसुखुसू हसत होता, पण तो काहीच बोलला नाही.

शेवटी आईला काही धीर धरवेना. आईने जराशा कमी आवाजात विचारलं, “रिंके, कुठे होतीस इतका वेळ?”
“अगं आई, मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले आहे.चहा!”
असं रिंकूने म्हणताच आई करवादली, “काऽय?”
“हो! अगं मी शाळेत जाते ना, तेव्हा रोज बघते, नदीतून चहा वाहत असतो. तो खळाळणारा चहा पाहून, मला तो प्यावासा वाटायचा. मी एकदा ओंजळीने प्यायलेसुद्धा! टेस्टी लागला. तू एरवी मला चहा पिऊ देत नाहीस ना?”
“असं गं काय रिंकू?” आई अगदी नरमाईच्या सुरात म्हणाली.
“पण आई, आज तर वेगळीच मजा झाली. नदीतून वाहणार्‍या चहाभोवती आज खूप माणसे गोळा झाली होती, म्हणून मीही नदी जवळ गेले. तिथे एक ट्रक उलटला होता. लोकं सांगत होती की, त्यात साखरेच्या गोण्या होत्या. मला खूप मजा वाटली. शाळेत जाताना, चहा आणायला मी घरातून एक किटली घेऊनच गेले होते. घरी आल्यावर चहात साखर घालून घेऊ, असं ठरवलं होतं. पण आज तर त्याच्यात साखरसुद्धा पडलेली दिसली. मग काय! मी तो चहा या किटलीत भरायचं ठरवलं. मला नीट भरता येत नव्हता. किटली माझ्या हातून सारखी निसटायची, म्हणून वेळ लागला गं आई मला.”

“अगं रिंके! ते गढूळ पाणी आहे.” डोळे मोठे करत आजी म्हणाली.
“असू दे, पण मी आज हाच चहा पिणार!”
“अगं पण?” असं आजीने म्हणताच कंबरेवर हात ठेवत रिंकू ठामपणे म्हणाली,“आजे, मला काही होत नाही. मी हा चहा पिणारच.”
रिंकूला जवळ घेत काका म्हणाला, “मलाही चालेल हा नदीतला चहा, पण थोडा गरम करून.”
आजीकडे तिरक्या नजरेने बघत आजोबा म्हणाले, “मीही दोन घोट घेईन म्हणतो! कसें?”
आजोबांकडे पहात हसतच आजी म्हणाली, “मी पण घेईन हो चवीपुरता.”
आई काही बोलण्याआधीच, रिंकूने नदीतला ओंजळभर चहा आईला चाखवलाच आणि म्हणाली, “कसा आहे चहा?”
पदराला तोंड पुसत, रिंकूला जवळ घेत आई म्हणाली, “तुझ्यासारखाच गोड-गोड!”