बिनचपलेची सहल (कथा)

 
बिनचपलेची सहल
लेखनः संज्ञा घाटपांडे -पेंडसे | चित्रेः चिनाब 

 

“तुमची ट्रीप कुठे जाणार यावेळी?”, रियानी मला विचारलं.
“आमची एस. एल. वर्ल्डला!”, शौनक खुशीत म्हणाला. प्रत्येकाची शाळा कुठे ना कुठे ट्रीपला नेणार होती. आमच्या शाळेनी कुठे जायचं, काहीच सांगितलं नव्हतं.

घरी येऊन मी बाबाला म्हटलं, “सगळ्यांची शाळा घेऊन चाललीये कुठे ना कुठे सहलीला. आमची कुठेच नेत नाहीये!”
“नेतीये की! अनवाणी सहलीची सूचना वाचली कालच्या डायरीत मी.”
“हॅ! ती काय सहल आहे का? फडतूसपणा नुसता!” मी वैतागाने जोरजोरात मान हालवली, “नुसतं चालायचं. तेही चप्पल न घालता! बोरिंग!”


“करायच्या आधीच कसं कळलं, भारी आहे का बोरिंग?”, आई चष्म्यातून वर बघत म्हणाली. अलोकदादा सोफ्यावर फतकल मारून काम करायची 'ऍक्टींग' करत होता. त्याचं लक्ष मात्र आमच्या बोलण्याकडे होतं. आता जाड्या काहीतरी पचकणार, असं मला वाटलं आणि तो पचकलाच, “जा जा! बिनाचप्पल फिरायला जा. किती मजा येईल नाही! खूपच 'इंटरेस्टिंग' आहे हे!”
आईनी परिस्थितीच गांभीर्य ओळखलं. “चल बाळा, आपण तुझी तयारी करू सहलीची.” मला आतल्या खोलीत ओढत नेत आई म्हणाली. आमच्यात ठिणगी कधी पडणार हे आईला बरोब्बर कळत.

पुढचे २-३ दिवस मी निराशेत घालवले. आमच्या वर्गातली पोरं जाम खूश होती. माझ्या डोक्यात मात्र वॉटरपार्क घुमत होतं. ‘काय बावळट मुलं आहेत ही. शाळेनी स्वस्तात कटवलं आपल्याला, हे लक्षात नाही येते मूर्खांना!' मी मनातल्या मनात चरफडत होतो. या ट्रीपकडून मला कुठल्याही 'होप्स' नव्हत्या आणि न जाण्याचा काही बहाणाही सापडत नव्हता. आई-बाबांनी मला पाठवलंच असतं.

शेवटी सहलीचा दिवस उजाडलाच. नेहेमी ट्रीप असेल तेव्हा मला रात्रभर झोप येत नाही, पण यावेळच्या भंगार ट्रीपच्या कल्पनेमुळे मला उठवत नव्हतं. आईनी हलवून उठवलं. कधी नव्हे दादाही उठला होता. अर्ण्याला मदत करायला उठणार म्हणे! माझं असलं डोकं फिरत होतं ना! पण सांगणार कुणाला? आई माझी बॅग भरत होती. कपड्यांचा एक जोड, उपम्याचा डबा, सफरचंद, पाण्याची बाटली, टॉवेल, छत्री - यादी बघून एक एक गोष्ट आत जात होती. मी पूर्ण असहकार दाखवायचं ठरवलेलं. त्याचा उपयोग काही होणार नव्हता, पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. “चड्डी घ्यायला विसरू नकोस बरका! बिनचपलेऐवजी 'बिनचड्डी'ची सहल व्हायची नाहीतर!” दादा दारामागून हेल काढत म्हणाला. मी हातातला बूट त्याला फेकून मारला.

शाळेत सोडायला आईबाबा दोघही आले होते. बऱ्याच मुलांचे पालक आणि मुलं मिळून बराच गोतावळा जमला होता. सगळ्यांचे चेहरे उत्साहानी ओसंडत होते. मी सोडून अर्थात. आईबाबा वर्गताईशी बोलत होते. “फार छान आहे हो तुमची कल्पना. अशी सहल कधी कुठल्या शाळेनी नेली नसेल.” ताई हसल्या, “मुलांना एक वेगळा अनुभव मिळेल. खात्री आहे मला.” मी एकदा आईकडे आणि एकदा ताईंकडे रागानी पाहिलं. 'शाळेच्याच आवारात कसला आलाय वेगळा अनुभव! शाळेत तर आम्ही दर रोज येतो!'

“चला सगळे जण या इकडे.” ताईंनी शिट्टी वाजवून सगळ्यांना बोलावलं. आमच्या बरोबर आमच्या वर्गताई, खेळाच्या ताई आणि एक सर असे तिघं येणार होते. बाकी दोघांना तसं गुंडाळता येतं पण खेळाच्या ताई थोड्या कडक आहेत. “सगळ्यांनी आपापल्या चपला इथे ओळीत काढून ठेवा. आणि मी पालकांना विनंती करते की त्यांनी आपापल्या मुलांना संध्याकाळी ठरलेल्या वेळी याच ठिकाणी आणायला या. आज आम्ही दिवसभर नुसती दंगामस्ती करणार आहोत.” ताई म्हणाल्या. “ये! हुर्रे!” पोरांचे वेगवेगळे चित्कार उमटले.
चपला काढायला सगळ्यांनी एकच झुंबड केली. मी आपलं थोडं लांब जाऊन बूट काढायचं ठरवलं. उगाच या लोकांमध्ये आपले चांगले बूट हरवायला नको. बूट काढून मी खाली पाय ठेवला आणि गुदगुल्यांची एक लहर पायातून डोक्यात गेली. अर्धवट भिजलेली मऊ मऊ माती पावलांना गुदगुल्या करत होती. मी पायांची बोटं हलवून पहिली. मस्त गारगार वाटलं. “अर्णव ये लौकर.” ताई ओरडल्या. मला मातीतच पाय खुपसून बसायला जाम आवडलं असतं, पण नाईलाजानी मी वळलो. एक पारदर्शक काहीतरी झाडावरून लटकत होतं. मी जवळ जाऊन बघितलं. आईशप्पथ! आतमध्ये काहीतरी हलत होतं. रंगीत.
“ताई, हे बघा काय आहे!” मी जोरात ओरडलो. ताई आल्या. सगळी पोरंपण धावत आली.
“हा कोश आहे फुलपाखराचा.”


“एवढ्या छोट्या घरात कसं काय राहतं फुलपाखरू? कसंबसं मावलंय त्यात ते.” नेहा कुतूहलानी म्हणाली.
“त्यात राहत नाही काही ते.” ताई हसत म्हणाल्या. “अळीचं बनतं फुलपाखरू. पहिले अळी असते, मग ती असा कोश बनवते आपल्याभोवती आणि मग काही दिवसांनी फुलपाखरू बनतं तिचं. अगदी एखाद दोन दिवसात उडेल आता ते.” ताई कोश निरखत म्हणाल्या.
“आपण इथेच थांबूया ते बाहेर निघेपर्यंत.” नेहा हवेत गिरकी घेत म्हणाली. “अगं, असं सहजासहजी दिसत नसतं ते बाहेर पडताना. किती वेळ थांबशील अशी?” मी तर आयुष्यभर असा उभा राहायला तयार होतो फुलपाखरू बाहेर पडताना बघायला. जगातली सगळ्यात भारी गोष्ट सगळ्यात आधी मला दिसली होती.”
“चला आपल्याला अशी बरीच मजा बघायची आहे आज. सगळी पोरं आरडाओरडा करत गेटच्या दिशेने पळाली. मी तर एकदम हळूहळू चालत, मऊ मऊ मातीला बोटांनी कुस्करत मजा घेत निघालो. माती इतकी सॉलिड असते, हे माहीत नव्हतं आधी मला.

आमची शाळा शहरी भाग संपतो, तिथे आहे साधारण. मेन रस्त्यापासून थोडी आत. त्यामुळे मस्त हिरवागार आणि शांत असतं इथे. शाळेच्या आवाराला चक्कर म्हणजे १-२ किलोमीटरची पायपीट असतेच. डांबरी रस्ता सुरू व्हायला १० मिनटं तरी चालावं लागतं. तोपर्यंत मातीचा कच्चा रस्ता आहे. सुरुवातीला आजी म्हणत होती, 'एवढ्या लांबच्या शाळेत कशाला?' वगैरे. पण आता खूश आहे शाळेवर. मी पण शाळेचं एवढं नीट निरीक्षण नव्हतं केलं याआधी कधी. आज शाळा खूपच भारी वाटत होती. इमारत साधीच होती. बाकी शाळांसारखी मोठ्ठी आणि चकाकती नव्हती. पण भरपूर झाडं, गवत. खेळायला भरपूर जागा. अशी शाळा माझ्या सगळ्या मित्रांमध्ये कुणाचीच नसेल.

मित्रमैत्रिणींचे घोळके इकडे तिकडे पसरले होते. कुणी झाडावर चढायचा प्रयत्न करत होतं, कुणी फुलं गोळा करत होतं, अदितीचा ग्रुप मुंग्यांच्या मागे लागला होता. “ए, हे बघा मला काय सापडलंय!” अदिती ओरडली. आम्ही सगळे धावलो. एक खूपच सॉलिड मोठं वारूळ होतं.


“बघा मुलांनो, एवढ्याश्या मुंग्या काय काय करू शकतात.” ताई म्हणाल्या. “काय धडा घ्याल यातून?”
“घर एकदम मोठ्ठं बनवायला हवं.” रोहित हवेत हात पसरत म्हणाला.
“नाही! मेहनतीला काही शॉर्टकट नसतो.” ताई डोक्यावर टपली मारत म्हणाल्या. “अशा हजारो चकरा मारतात मुंग्या अन्नाचे लहान लहान कण घेऊन आणि वारुळात साठवून ठेवतात. म्हणून, थंडीत, पावसात त्यांना सुरक्षित आत राहता येतं.”
'आईशप्पथ! आपले आईबाबा यासाठी पैसे साठवून घर बांधतात तर! म्हणजे आम्ही सगळे सुरक्षित राहू! ते पण अशीच मेहनत करत असतील म्हणजे रोज.' मी वारुळाकडे लहान लहान कण घेऊन जाणाऱ्या मुंग्यांकडे बघत विचार करायला लागलो. 'आपण पण मोठं होऊन खूप मेहनत करायची आणि आई-बाबांसाठी मोठ्ठं वारूळ बांधून त्यांना आत सुरक्षित ठेवायचं.' मी मनात ठरवूनच टाकलं.

आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो आणि पावला-पावलावर भन्नाट गोष्टी दिसत होत्या. वेगवेगळ्या रंगांची, आकाराची, वासाची फुलं, पान, पक्षांची घरटी, कीटक, पिसं. कबीरला तर सापाची कात सापडली. तो अगदी जीवापाड जपून ती हातात घेऊन येत होता पण ती उडून खाली पडली आणि त्याचाच पाय त्यावर पडून ती तुटली. त्याच्या डोळ्यात अगदी पाणी आलं. “हरकत नाही. ती नाजूकच असते. तुला पुन्हा सापडेल कधीतरी.” ताई त्याला म्हणाल्या.
जाताजाता मला मला चिंचेसारखं लांबुळक्या पानांचं झाडं दिसलं. मी मज्जा म्हणून त्याला बोट लावलं आणि काय आश्चर्य. ती सगळी पानं आपोआप फटकन् बंदच झाली! मला एक मिनिट कळेना काय झालं. मी सरांना बोलावलं. “सर, हे मी मुद्दाम नाही केलं. मी हळूच बोट लावलेलं. पानाला मी आवडलो नाही बहुतेक.” ती पान माझं बोट लागल्यानी बंद झाली याच मला भयंकर वाईट वाटलं.
सर गडगडाटासारखे हसले. “अरे वेड्या, तुझ्या बोट लावण्यानी नाही काही बंद झालं ते. मी बोट लावलं तरी असंच बंद होईल. हे बघ.” सरांनी २-४ पानांना बोट लावलं. सगळी पानं फटाफट बंद झाली. लाजाळूचं झाड आहे ते. बाकी पोरांना तोपर्यंत सुगावा लागला की काहीतरी चमत्कारिक घडलं आहे. सगळी पटापट गोळा झाली. लाजाळूबद्दल कळताच प्रत्येकांनी बोटं लावायला सुरुवात केली. सगळ्यांना हा इतका भन्नाट प्रकार वाटला की बोटं लावून लावून झाडावरचं एकही पान मुलांनी उघडं राहू दिलं नाही.

“चला मुलांनो! एक वाजत आला आहे. जेवायची वेळ झाली. आपल्याला परत शाळेत जायचंय आता.” ताईंनी जोरात शिट्टी वाजवून सगळ्यांना बोलावलं. मला तर निसर्गाच्या या शाळेची कधी सुट्टीच होऊ नये असं वाटत होतं. आता ही सगळी झाडं-झुडुप, प्राणी-पक्षी, आकाश, माती, वारूळ, लाजाळू, कात सगळं सोडून परत आपल्या सिमेंटच्या घरात जायचं या कल्पनेनेच नकोसं झालं.

मनाशी मला मान्य करावंच लागलं की जगातलं कुठलंही वॉटरपार्क, या सहलीपुढे फिकं पडलं असतं. माझ्या बिनडोकपणामुळे मी या सहलीला मुकणार होतो. पण वाचलो! आजी नेहेमी म्हणते, "जितकं निसर्गाच्या जवळ, तितकं आनंदी, शांतं आणि समाधानी!" खरंच आहे! परत जाता जाता मी मनातल्या मनात या सहलीबद्दल शौनक, रियाला सांगितल्यानंतर त्यांची काय रिअॅक्शन होईल याचा अंदाज लावत होतो. त्यांना यातली मजा कळेल का नाही माहित नाही, पण मला निसर्गातली मजा कळलेली!


बिनचपलेची ही सहल ही जगातली नं. १ ची सहल होती. चप्पल न घातल्यामुळे फक्त पावलांनाच नाही तर मनाला पण गुदगुल्या होतं होत्या आणि मला खरंच खूप आनंदी समाधानी आणि शांत वाटत होतं.