दोन दिवसांचे बुद्ध (कथा)

दोन दिवसांचे बुद्ध
लेखन: राहुल शिंदे
चित्र: डॉ. अपर्णा कमलाकर


काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. सहावीच्या वर्गात इतिहास विषयात आम्हाला गौतम बुद्धांचा धडा होता. आमचे सर आम्हाला बुद्धांच्या गोष्टी सांगत असत. आम्ही त्या गोष्टींत रंगून जायचो. एकदा माहिती सांगताना सर म्हणाले, “आज फक्त भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही अनेक ठिकाणी बुद्धांची शिकवण दिली जात आहे.”
यावेळी मला एक प्रश्न पडला, “सर, जर बुद्धांची शिकवण एवढ्या ठिकाणी दिली जाते, तर ते शिक्षण घेतलेले लोक स्वत: बुद्ध का होऊ शकत नाहीत?”
सर काहीवेळ काहीच बोलले नाहीत. ते आमच्याकडे बघून नुसतेच स्मित करायला लागले. ते कधीकधी असंच स्मित करतात, त्याचा अर्थ मला कळतच नाही.
“अरे, बुद्ध बनणं एवढं सोपं नसतं. हो ना, सर?”, सुशांत म्हणाला.
“आपण सगळा अभ्यास केला की, पास होऊन पुढच्या वर्गात जातो ना? मग बुद्धांची शिकवण घेऊन बुद्ध का नाही बनू शकत?” मी लगेच पुढे विचारले.
सरांनी पुन्हा स्मित केले.
“प्रश्न चांगला आहे बरं, पण तुझ्या या प्रश्नाचं उत्तर तूच शोधू शकतोस सर काय म्हणताहेत हे मला पटकन कळले नाही, पण पुढे त्याचा उलगडा झाला. ते जरासा विचार करून म्हणाले, “म्हणजे खरंतर, तुम्ही सगळेच त्याचं प्रात्यक्षिक करून बघा ना! हे बघा, बुद्धांची शिकवण तर आता तुम्हाला माहीत आहेच. त्याचं तुम्ही फक्त आचरण करायचं - तेही फक्त दोन दिवस. थोडक्यात काय, तुम्हाला दोन दिवस बुद्ध बनायचं आहे. आता उद्याच शनिवार आहे, म्हणजे दोन दिवस सुट्टी. तेव्हा हे दोन दिवस तुम्ही बुद्ध बनायचं. मग मला तुमचे अनुभव पुढच्या तासाला सांगा.”


“सर, पण बुद्ध बनायचं म्हणजे नक्की काय काय करायचं?”, सुनीलने विचारले.
“तसं बघा, बुद्ध दिवसातून एकदाच जेवायचे, हे तर आपल्याला माहित आहेच.” हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम बारा वाजले. हे बघून सर हलकेच हसून म्हणाले,पण, तुम्हाला दोन वेळा जेवण्याची परवानगी मी देतो. बाकी अध्येमध्ये काही खायचे नाही. नाष्टा नाही. आता पुढची गोष्ट म्हणजे, तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक-एक तास ध्यानधारणा करायची. मधल्या वेळातही जितकी ध्यानधारणा करता येईल तितकी करायची. भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार न करता वर्तमानात जे चालू आहे, त्यात शंभर टक्के सहभागी होण्याचा सराव करायचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, मोबाईल-लॅपटॉप-टी.व्ही या सगळ्यापासून लांब राहायचं.” हे सगळं ऐकून मला एकट्यालाच हुरूप आला. बाकी सगळ्यांच्या तोंडावर ‘हे अशक्यप्राय आहे’ असेच भाव होते.
“सर, पण प्रश्न अथर्वने विचारलाय. त्यालाच करून बघू दे ना हे सगळं.”, श्रुती नाराजीच्या स्वरात म्हणाली. काहींनी तिच्या या बोलण्याला “हो, हो” म्हणत प्रतिसाद दिला.
“हे बघा, मी कोणावरही सक्ती करणार नाही. पण, हे कृत्य करण्यात खूप मोठी गंमत आहे. मग मला सांगा, कोण कोण घेणार हे चॅलेंज? हात वर करा.” सरांची ही नेहमीची ट्रिक. कोणावर सक्ती करत नाही म्हणाले, पण आता जर कोणी हात वर केला नसता, तर त्याला दहा प्रश्नांना सामोरे जावे लागले असते. मी पाहिले तर सगळ्यांचे हात वर होते.
माझ्या ‘अतिहुशार’ प्रश्नामुळे हा अवघड गृहपाठ त्यांनाही नाईलाजाने करायला लागत असल्याचे, माझ्या काही सवंगड्यानी मला मधल्या सुट्टीत सांगितले..
मी मात्र मनोमन ठरवले होते, काहीही झाले तर मी बुद्ध होऊन दाखवणारच.

**
शाळा संपल्यावर मी घरी आल्याआल्या उत्साहाने आईला हे सगळे सांगितले.
“जमू शकेल का तुला हे इतकं?”, आईच्या या शंका घेणाऱ्या प्रश्नावर मला थोडा रागच आला.मी जमवून दाखवेनच.” जरासा आवाज चढवून मी म्हणालो. तिथे असलेली माझी बहीण मला म्हणाली,“हं. क्रोध! क्रोध आवर. बुद्ध आणि क्रोध?”मला चिडवण्याचा स्वर माझ्या लगेच लक्षात आला.
“ताईसाहेब! माहितेय मला. पण, अजून नाही झाली सुरुवात. उद्या आणि परवा बुद्ध व्हायचंय. कळालं ना?”, मीही म्हणालो.
रात्री बाबा घरी आल्यावर, त्यांनाही ही गोष्ट कळली. जेवताना पोट भरलं, तरी आई मला वाढतच होती.
“आई, पोट भरलं आहे माझं. काही नको मला आता.”, मी आईला म्हणालो.
“अरे, असुदे. खा रे थोडं. उद्या नाष्टा नाही करू शकणार.”बाबाही गमतीच्या सुरात म्हणाले.

रात्री मला पटकन झोप येत नव्हती. दुसऱ्या दिवशी काय काय करावे लागेल आणि कसं करायचं याचे विचार डोक्यात चालू होते. शेवटी कधीतरी माझ्या नकळत झोप आली.

***
सकाळी सहालाच जाग आली. आवरून झाल्यावर घरातल्या सगळ्यांना "मी माझ्या स्टडीरूममध्ये ध्यानधारणा करतोय, कोणीही डिस्टर्ब करू नका.” असे सांगितले.
“आणि नाष्टा कधी करणार?” आईने विचारले.
“अगं विसरलीस का आई? बुद्ध नाष्टा नाहीत करणार.” माझ्याकडे बघत ताई हसत म्हणाली. नेहमीप्रमाणे तिला उत्तर देण्यासाठी मी तोंड उघडणार इतक्यात ‘क्रोध आवर’ असा माझ्या आतून आवाज आला आणि मी शांतपणे तिथून काढता पाय घेतला.

शाळेत योगाच्या तासाला १० मिनिटे ध्यान धरून बसायचं तरी नको वाटायचं. आता मात्र, मला एक तास बसायचं होतं. स्टडीरूम मध्ये गेल्यावर एका जागी बसलो, डोळे मिटले. एकेका अवयवाचं निरीक्षण करायला लागलो. डोके, मान, कपाळ, छाती, दोन्ही हात, पोट....पोट. पोटापर्यंत आल्यावर अचानक लक्षात आलं, की आपल्याला भूक लागली आहे. नाही,नाही. जेवणाच्या वेळेपर्यंत थांबावंच लागेल.
‘बापरे, म्हणजे अजून ३-४ तास?’ पोटातून आवाज आला. त्यावर नियंत्रण मिळवत पुढच्या अवयवांचे निरीक्षण करायला लागलो.
थोड्यावेळाने एकाग्रता साधते आहे असं वाटायला लागलं, इतक्यात स्वयंपाकघरातून सुवास आला. ‘आई नक्कीच इडली बनवतेय नाष्ट्याला. तुझा आवडता पदार्थ आणि तू नाष्टा नाही करणार!’ त्या वासाचा माग घेत माझ्या आतून आवाज आला. भूक तर लागलीच होती. वाटलं पटकन उठावं आणि पळत जाऊन नाष्टा करावा. मात्र, मोठ्या प्रयत्नाने त्याला आवर घातला. पुन्हा श्वासांवर लक्ष केंद्रित केले.
हा एक तास म्हणजे खूप मोठा वेळ वाटला. ध्यानधारणा झाल्यावर मी शांतपणे दिवाणखान्यात गेलो, तर आई-बाबा आणि ताई ईडली-चटणीचा नाष्टा करत होते. सोफ्यावर बसलो.
“काय, झाली का तुमची ध्यानधारणा?”, आईने विचारल्यावर मी संथपणे मानेनेच होकार दिला.


“पण तुझा चेहरा फ्रेश वाटत नाहीये. काय रे?” बाबा म्हणाले. आता मी कसं सांगणार माझं सगळं ध्यान पोटातल्या भूकेवर आहे आणि तीच भूक चेहऱ्यावर आली आहे. तोंडाला पाणीच सुटलं. असं वाटलं, ‘जाऊ दे हे बुद्ध बनणं आणि आता पोटभरून खाऊन घ्यावं. पण नाही, हे चॅलेंज आपल्याला पूर्ण करायचंच आहे.’ मी मनाला आवर घातला. बसल्यावर बाबांचा मोबाईल दिसला आणि सवयीनुसार गेम खेळण्यासाठी माझा हात तिकडे वळला.
“अथर्व, काय करतोयस?” ताईच्या या सावधानतेच्या इशाऱ्याबरोबरच मला सरांचे ‘दोन दिवस मोबाईल वापरायचा नाही.’ हे शब्द आठवले आणि मी लगेच हात मागे घेतला. दोन दिवस मोबाइल आणि टीव्ही नाही. बाप रे!
‘आता काय करावं बरं? खेळ? हो, मैदानावर खेळायला तर जाऊच शकतो.’

मी घरी सांगून मैदानावर गेलो. तिथे काही मित्र होते, त्यांच्यासोबत खेळू लागलो.खेळताना दोन वेळा भांडण होण्याचे प्रसंग आले, मात्र प्रयत्नपूर्वक मी क्रोधावर खूप आवर घातला आणि भांडण टाळले. खेळून पुन्हा घरी आलो, घड्याळात पाहिले तर दहा वाजले होते.
“राहिलेल्या इडल्या खातोस का? बुद्ध बनण्याच्या नादात शुद्ध हरवून बसशील.” आई माझ्या कासावीस चेहऱ्याकडे बघत म्हणाली.
“नाही. मी थांबेन.” उसना निर्धार करत मी म्हणालो. स्टडीरूममध्ये गेलो. गृहपाठ करायला घेतला. एकाच विषयाचा होता. एक तासात संपण्यासारखा. गृहपाठ झाल्यावर घड्याळात बघितले तर १०:५० झाले होते. हा वेळ का जात नाही.?
‘जी गोष्ट छळते, बुद्ध त्याचे निरीक्षण करत.’ हे मला आठवले. आपणही तेच करावे. हीच वेळ आहे आता वर्तमानात राहण्याचा सराव करण्याची. मी डोळे झाकून माझ्या आत बघायला लागलो. डोळे झाकल्यावर सगळे पदार्थ माझ्या डोक्याभोवती नाचू लागले. ही भूक किती डेंजर असते! डोळे झाकल्यावर आता नेमका मोबाइलकडे हात वळवावासा वाटू लागला. टीव्हीची चित्रं डोळ्यासमोर दिसू लागली.
“चला, झालं सगळं तयार आईच्या तोंडातून हे वाक्य ऐकताच किती आनंद झाला! मी स्वतःहून चौघांसाठी चार ताटं, वाट्या, चमचे पटापट जमा केले. आईला वाढण्यासाठी मदत करू लागलो.
सगळ्यांना वाढून झाल्यावर ‘वदनी कवळ घेता’ प्रार्थना झाली आणि मी पहिला घास तोंडात टाकला. अहाहा! काय ते सुख! अगदी एकाग्रपणे मी जेवण करू लागलो. ताटात कोणती आवडती-नावडती भाजी आहे याकडे लक्ष नव्हते. जेवताना माझ्याकडे बघून सगळे गालातल्या गालात हसत होते, याचेही मला भान नव्हते. अगदी आठवणीत राहील असे भरपेट जेवण झाले.

जेवण झाल्यावर स्टडीरूममध्ये काही वेळ वज्रासनमध्ये बसलो. पुन्हा ध्यान करण्यासाठी डोळे झाकले. मात्र भरल्या पोटी, झाकलेले डोळे कधी ध्यानातून निद्रेत गेले ते कळलंच नाही. जाग आली तेव्हा साडे-तीन वाजलेले.
झोपेतून उठल्यावर हात पुन्हा मोबाईलकडे आपसूक वळू पाहत होते, त्याला आवर घातला. आता काय करावे बरे? दप्तरातून वाचनालयातून आणलेले गोष्टींचे पुस्तक काढले आणि ते वाचायला घेतले. तासभर ते वाचले, तोपर्यंत इतरांचीही दुपारची झोप झाली होती. आता पुन्हा भूक लागल्यासारखे वाटू लागले.
‘नाही. आता रात्रीच्या जेवणाशिवाय काही खाणे नाही म्हणजे नाही.’ मी स्वतःच्या मनाला बजावले. विचार करत गॅलरीमध्ये गेलो. खूप दिवसापासून तिथली झाडं, फुलं व्यवस्थित पाहिलीच नाहीत, असे वाटले. कितीतरी वेळ त्याकडे पाहत राहिलो. अगदी शांत आणि मस्त वाटू लागले. आता आपण पूर्ण वर्तमानात आहोत म्हणून शांततेचा अनुभव होतोय, याची जाणीव झाली.
“आई, मी ध्यानधारणा करायला गार्डनमध्ये जातोय.” सुमारे सहा वाजत आल्यावर मी आईला म्हणालो.
“ध्यानधारणा करायला गार्डनमध्ये? बुद्धांना स्टडीरूममध्ये काही व्यत्यय येतोय का?” ताई म्हणाली, ती तिथेच होती. तिच्या या बोलण्याचा यावेळी मला राग आला नाही, याची मला गंमत वाटली. मनोमन मी स्वतःची पाठ थोपटली.
“ इथे ध्यानधारणा होणार नाही. एकतर भूक लागलेली असते आणि जेवण बनू लागलं की त्याच्या वासाने लक्ष सगळं तिकडेच लागून राहतं.” मी खरे उत्तर दिले आणि दोघेही हसायला लागले.

खाली गार्डनमध्ये एका कोपऱ्यात, जिथे कोणी शक्यतो येत नाही, अशी जागा मी ध्यानधारणेसाठी निवडली. डोळे झाकले. श्वासांवर लक्ष केंद्रित केले. हळूहळू एकाग्रता साधली जात आहे, असे वाटू लागले.
थोड्या वेळाने, अंधार गडद होऊ लागला, तसा डासांनी माझ्याजवळ प्रवेश केला. मला चावायला सुरुवात केली, तसे माझे ध्यान भंग होऊ लागले. कानाभोवती त्यांचा गुणगुणाटही सुरु झाला. 'बुद्ध सुद्धा जंगलात ध्यानधारणा करायचे, तेव्हा त्यांनी कशी बरे या डासांच्या त्रासावर मात केली असेल?' असा प्रश्न मनात आला नि कुतुहूल वाटू लागले.
डासांशी सामना करून पुन्हा डोळे झाकायचा प्रयत्न केला. 'अंधार पडलाय. तू जिथे बसला आहेस तिथे जवळपास कोणी नाही. साप इथे आला तर?' मनात हा विचार कुठून आला आणि भीतीची एक कळ अंगातून गेली. आपोआप डोळे उघडून आजूबाजूला पाहिले. काही नव्हते. पुन्हा डोळे झाकण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा तोच सापाचा विचार. तिथून उठलो. 'आता ध्यानधारणा बास' या विचाराने घराच्या दिशेने निघालो.
घरात जेवण बनतच आले होते. थोड्यावेळाने जेवण केले. बुद्ध बनण्याचा एक दिवस पूर्ण केला म्हणून आई -बाबा आणि ताई माझ्याकडे आश्चर्य आणि कौतुकाने पाहत असल्याचे मला जाणवत होते.
'खूप अडथळे आले तरी आजचा दिवस पूर्ण केला, आता फक्त उद्याचा दिवस.' रात्री विचार करून झोपी गेलो.

***
सोमवारी इतिहासाचा दुसराच तास होता. वर्गात आल्या आल्या सरांच्या चेहऱ्यावर हसू होते.
“केले का बुद्ध होण्याचे प्रात्यक्षिक? अनेकांचे चेहरे बघून मला समजतंय, तुमचे अनुभव सांगण्यासाठी तुम्ही उतावीळ आहात. बोला कोण सांगतंय पहिलं?” सरांनी विचारताच अनेकांचे हात वरती आले. एकेकाने बोलायला सुरुवात केली.
“सर, सकाळी उठल्या उठल्या भूकच आवरेना. शेवटी चक्कर येईल का काय असे वाटायला लागले. मग नाष्टा केला.”
“अर्धा दिवस खूप कष्टानं सगळं केलं, पण नंतर बैचेन वाटायला लागलं. मग मोबाईल हातात घेतला. शेवटी दुपारी चारला कडकडून भूक लागली, तेव्हा खाल्लेपण. "
“पहिला दिवस जमला सर. दुसऱ्या दिवशी मात्र भूक आवरली नाही. वर्तमानात राहणं किती अवघड असतं हे समजलं. पण खूप छान अनुभव आला.”
प्रत्येकजण आपापले अनुभव सांगू लागला. काहींना सुरुवातीलाच बुद्ध होणे जमले नाही, काहींना अर्धा दिवस जमले, काहींना एक दिवस. माझ्यामुळेच ही कृती घडल्यामुळे, माझी बारी आल्यावर मी काय सांगतोय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले. मी पहिल्या दिवशीचा संपूर्ण अनुभव सविस्तर सांगितला. भूक नियंत्रित करताना काय काय अडचणी आल्या,ध्यानधारणा करताना कसे मन विचलित होत होते ते सांगितले. तरीही तो दिवस पार पाडला हे सांगितले. पुढे म्हणालो,
“दुसऱ्या दिवशी हे करणे तुलनेने सोपं गेलं. भूक फारशी अनावर झालीच नाही, कारण आदल्या दिवशी सवय बसली होती. संध्याकाळी ध्यान करताना काही वेळ मन अगदी एकाग्र झाल्यासारखे वाटले, पण तो अनुभव एकदम जबरदस्त होता.”
सरांनी ऐकून कौतुक केले. वर्गात अजून दोघेजण होते, ज्यांनी दोन्ही दिवस कृती पूर्ण केली होती. त्यांचेही अनुभव थोड्याफार फरकाने माझ्यासारखेच होते.
सर म्हणाले, “तुम्हा तिघांचे अभिनंदन, शिवाय बाकी ज्यांना दोन्ही दिवस ही कृती पूर्ण करणे जमले नाही, त्यांचेही अभिनंदन. कारण, हे करताना तुम्हाला बुद्ध जे 'मनाबद्दल' सांगतात त्याचा अनुभव आला असेल. खायचे नव्हते, पण मनाने कारण बनवले. मोबाईल, टीव्ही पाहायचा नव्हता, पण मन आड आले. वर्तमानात राहण्याने शांतता मिळते, पण मन आपल्याला भूतकाळात आणि भविष्यकाळात झुलवते. ह्या मनावरती नियंत्रण मिळवणं हा खूप मोठा सराव आहे. मनाशी जेव्हा तुम्ही मैत्री कराल आणि त्यावर नियंत्रण ठेऊ शकाल , तेव्हा बुद्ध होण्याचा प्रवास सोपा होईल.”
सगळेजण अगदी लक्ष देऊन ऐकत होतो.

***
ह्या दोन दिवसांचा बुद्ध होण्याचा अनुभव कधीच विसरला जाणार नाही. दोन दिवसांत सरावात उणिवा होत्याच. ध्यानधारणा जशी ठरवली, तशी घडली नाही. काही गोष्टी जशा ठरवल्या, तशा घडल्या नाहीत. पण, या सगळ्यात स्वतःची एक नवी ओळख घडत गेली. आपण जर ठरवले, तर कितीही संकटं आली तरी ती पार करू शकतो, हा आत्मविश्वास आला.
आता मागे वळून पाहिले की, या दोन दिवसांच्या आठवणीने गंमत वाटते. बघूया, आता मोठं झाल्यावर सरावाने बोधी अवस्था प्राप्त होईल का?