वाकडबुद्धे (कथा)

वाकडबुद्धे
लेखनः ज्योती गंधे । चित्रे: शंतनू शिंदे


हत्ती, ससा, हरीण, मोर, कासव असे जंगलातले काही प्राणी पाणी प्यायला म्हणून तळ्यावर आले होते. पाणी पितापिता एकमेकांशी खेळतही होते. हत्तीदादा असला, की सगळ्यांवर सोंडेतून पाणी फेकून खूप मजा करायचा. सगळ्यांना खूप आवडायचं ते. मोर मस्तपैकी नाच करून दाखवायचा. ससा, हरीण पकडापकडी खेळायचे. एकंदरीत सगळे मजेत, आनंदात होते. तेवढ्यात लांबून कोल्हेकुईचा आवाज आला आणि वातावरणच बदललं. सगळेचजण त्याच्याबद्दल बोलायला लागले. सगळ्यांची एकच तक्रार, हा कधी आपल्याला नीट नावानी हाक मारत नाही. अशा नावानी आणि अशा चेष्टेच्या सुरात हाक मारतो, की त्याच्याशी काही बोलावेसेच वाटत नाही. हत्ती म्हणाला, “मला ‘जाड्या’ म्हणतो.” मोर म्हणाला, “मला ‘नाच्या’ म्हणतो.” हरीण म्हणाले, “मला पळपुट्या!” ससा म्हणाला, “मला भित्र्या” “आणि तुला रे कासवा,तुला काही म्हणतो की नाही?”, हत्तीने विचारलं. “हो,मलाही ‘मंद’ असं म्हणतो.”

“असं हाक मारण्यात त्याला काय आनंद मिळतो?” हरणाने विचारले. “हो नं, जसं काही ह्याच्यात आपल्याला असं काही सापडणारच नाही, की ज्यावरून आपण त्याला ‘नावं’ ठेवू शकत नाही!”, मोर म्हणाला.
ससा म्हणाला, “पण आपल्याला असं कोणाला हिणवायला आवडत नाही!”


“पण त्याची ही सवय आपण मोडलीच पाहिजे. काय करता येईल आपल्याला?”, कासव म्हणाले. सगळे विचार करू लागले.खूप वेळ विचार केल्यावर हत्तीला एक कल्पना सुचली. त्याने सगळ्यांच्या कानात काहीतरी सांगितलं, तेवढ्यात कोल्होबांची स्वारी तिथे येऊन धडकली. आल्याबरोबर त्याने सुरवात केली, “काय जाड्या, पाणी ठेवलं आहेस नं माझ्यासाठी? का संपवलंस सगळं? तुझ्या भल्या मोठ्या पोटात सहज मावेल या तळ्यातलं पाणी. ए नाच्या! तुझा नाच झाला का? आणि ससोबा, आज पान पाठीवर पडून जंगलात आकाश नाही कोसळलं वाटतं, भिऊन पळून नाही गेलास म्हणून विचारलं.” अशी सगळ्यांची चेष्टा करून मोठ्या मोठ्याने हसायला लागला.
हत्तीने सांगितल्याप्रमाणे कोणी न चिडता,त्याच्या नकळत त्याच्याच भोवती फेर धरला आणि म्हणायला लागले,
“वाकडबुद्धे तुम्ही, हो, वाकडबुद्धे तुम्ही,
धूर्त कोल्होबा तुम्ही, हो, लबाड कोल्होबा तुम्ही,
… हो वाकडबुद्धे तुम्ही
दुसऱ्यांमध्ये काहीतरी असं तुम्ही शोधता,
त्याच्यावरून चेष्टेचं नाव तुम्ही ठेवता,
चिडवून,चिडवून किती बेजार करता तुम्ही,
... हो वाकडबुद्धे तुम्ही
आठवतेय का चव आंबट द्राक्षांची?
झोंबतेय न अजून जखम, टेरी भाजल्याची?
सुरईतली खीर विसरलात का तुम्ही
... हो वाकडबुद्धे तुम्ही
चिडवताना लोकांना, आनंद तुम्हाला होतो,
आतून रडू येऊन जीव त्यांचा जातो,
कधीच का तुम्हाला त्याचं वाईट वाटत नाही?
... हो,वाकडबुद्धे तुम्ही
फजिती विसरावी म्हणूनच न असा खेळ तुम्ही खेळता
मुखवटा बेफिकिरीचा, दु:ख झाकण्यासाठी लावता ,
चुकीच्या औषधांनी कधी रोग बरा होत नाही
... हो,वाकडबुद्धे तुम्ही
वाकडबुद्धे तुम्ही हो, वाकडबुद्धे तुम्ही, वाकडबुद्धे , वाकडबुद्धे


असं सगळे म्हणत असताना कोल्होबाला खरंच रडू फुटलं. तो तिथून पळून जाऊ लागला, पण हत्तीने त्याला जाऊ दिले नाही. हत्ती म्हणाला, “कोल्होबा, लक्षात आलं तुमच्या, कोणी चेष्टा केली की काय वाटतं ते?”
कोल्हा म्हणाला, “खरंच माझं चुकलं, माझ्या लक्षात नाही आलं की माझ्या चिडवण्यामुळे तुम्हाला एवढं वाईट वाटत असेल. मला कळलं आता, की असं कोणी चिडवलं की खरंच खूप वाईट वाटतं. आता नाही मी कुणाला असं चिडवणार.” मग सगळे प्राणी म्हणाले, “असं असेल तर आजपासून, अगदी आतापासून आपली मैत्री.”

 

 

“काय रे, गोष्ट ऐकता ऐकता झोपलात का सगळे?” आजीनं हसून विचारलं आणि सगळ्यांनी “नाही,नाही आजी.” असं एकसुरात म्हटलं.
उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती म्हणून आरव, आयुष, पीयुष, प्रणीत असे अथर्वचे मित्र दिवसभर आणि रात्रीसुद्धा रहायला आले होते. दिवसभर मुलांनी भरपूर धुडगूस घातला होता. आजीने बनवलेल्या पुरणपोळ्या, व्हेज पुलाव, टोमॅटोचं सार ह्याच्यावर ताव मारला होता. संध्याकाळी दहीवडे, थालीपीठ-लोणी आणि झोपताना घरी बनवलेलं ‘मँगो आइसक्रीम’ अशा मेनूवर तर बच्चे कंपनी खूश होती. संध्याकाळी आजी आजोबांबरोबर नकाशातील ठिकाण ओळखणे, मौखिक फुली कबड्डी, हँगमॅन (फळ्यावर लिहिलेला dash dash करून दिलेला शब्द स्पेलिंगसह ओळखणे) असे वेगवेगळे खेळही आजीआजोबांबरोबर खेळल्यामुळे मुलांशी त्यांची अगदी गट्टी जमली होती. आता अथर्वचा झोपतानाचा आवडीचा, गोष्टीचा कार्यक्रम चालू होता. तल्लीन होऊन मुलं ऐकत होती. आजीनी विचारलं आणि सगळे एकदम सावरून बसले आणि एकसुरात म्हणाले , “नाही गं आजी.”
“मग गोष्टीचं तात्पर्य काय?”, आजीनी विचारलं.
”तात्पर्य? म्हणजे?”, मुलांनी विचारलं.
”म्हणजे गोष्टीतून तुम्ही काय शिकलात?”
“कोणाला चिडवायचं नाही.” प्रणीत म्हणाला.
“नाही,चिडवायचं नाही असं नाही”, आजी सांगू लागली, “कोणाला वाईट वाटेल असं चिडवायचं नाही किंवा अशा पद्धतीने हाक मारायची नाही. एखाद्या जाड मुलाला तुम्ही ‘जाड्या’ म्हणता, काळ्या मुलाला ‘काळ्या’ बुटक्या मुलाला ‘देडफुट्या’ अशी नावे ठेवता? वाईट वाटत असेल न त्यांना त्याचं?”
“हो आजी, खूप वाईट वाटतं.” आरव म्हणाला, “मला जाड्या,जाड्या म्हणतात. मी पळायला लागलो, की ‘काय जाड्या, जमतंय का पळायला?’ असं काहीतरी बोलतात आणि हसतात. मग मला काहीच करावंसं वाटत नाही. मग मी आपला खात बसतो, तर त्याच्यावरूनही चिडवतात.”
“अरे आरव, पण मघाशी तू इंग्लिश शब्द किती पटापट ओळखलेस! इंग्रजी छान आहे तुझं,” आजी म्हणाली. “हो का? मला नाही माहीत.” आरव स्वतःशीच पुटपुटला.
“मलापण कमी उंचीवरून बोलतात. ते आवडत नाही, पण मी गप्प बसतो.” आयुष म्हणाला.
“आयुष, तुला जगातल्या सगळ्या देशांची किती माहिती आहे. आत्तापर्यंत हा खेळ इतक्या वेळा आणि इतक्या जणांशी खेळलोय पण तुझ्या माहितीमुळे खेळात जी आज रंगत आली, ती कधीच नव्हती आली”, आजी म्हणाली.
“पण आजी, सुरवातीला खूप वाईट वाटतं मग नंतर सवय होऊन जाते.” पीयुष म्हणाला.
“सवय होते असं वाटतं. समजा कोणी अनोळखी लोकांसमोर हाक मारली तर?” आजीनी विचारलं.
“मग परत वाईट वाटतं .” आयुष म्हणाला.
“कारण का माहितेय? प्रत्येकाच्या मनात स्वतःबद्दल एक आत्मसन्मान असतो, तो दुखावतो. आपल्याला सवय झाल्यासारखी वाटते, पण आतून वाईट वाटतच असत. जेव्हा तुम्ही दुसऱ्यासमोर पुन्हा त्याला अशी हाक मारता, त्यावेळी त्याला आतून दुखावल्यासारखं वाटतं. आपण ह्या नावानी ओळखलं जावं, ह्या नावानी लोकांच्या लक्षात रहावं असं वाटतं का आपल्याला? वाईट हे वाटतंच न? आणि एखाद्याचं टोपणनाव ठेवताना तुम्ही अशा गोष्टीची निवड करता की ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यात आपण बदल करू शकत नाही आणि दुसरं म्हणजे हे असच असलं पाहिजे हे कोणी, कधी आणि का ठरवलं?”
“म्हणजे काय आजी ?” एकसुरात मुलांनी विचारलं.

“म्हणजे असं की प्रत्येकांनी गोरं, उंच, बारीक असलं पाहिजे हे कोणी ठरवलं? असं लोक ठरवतात म्हणून आपण तसे असावं असं आपल्याला वाटतं. आपण तसे नसलो की मनातून वाईट वाटत असतं, दु:ख पण होत असतं. लोकांना आपण असे असल्याने आवडत नाही, ह्या गोष्टीमुळे लोकांना आपल्याशी बोलायला, मैत्री करायला आवडत नाही असं सतत मनात येतं आणि आपणच आपल्याला कमी लेखू लागतो. पण आपण माणसं आहोत. प्रत्येक जण वेगळा आहे म्हणून तर खरी मजा आहे. तुम्ही डोळ्यापुढे आणा, आरव, अथर्व, आयुष, प्रणीत, पीयुष सगळे एकसारखेच आहेत. कसं वाटतंय?”
मुलं हसायलाच लागली. “कसं वाटतंय रे?”आजीनी विचारलं. “आजी, सगळे माझ्यासारखेच झाले तर मला कोणी जाड्या म्हणून नाही म्हणणार,” आरव म्हणाला, “कारण सगळेच जाडे.”
“अरे, पण सगळे सगळ्या बाबतीत तुझ्यासारखेच असते तर, तू आता इंग्लिश शब्द किती छान ओळखलेस, तसे सगळ्यांनीच ओळखले असते, कारण सगळे सारखेच. मग तुझं काय कौतुक?”
“आणि पीयुष, तू उंच आहेस म्हणून फळीवरचे डबे काढून दिलेस की तुला आई ‘thank you,बाळा’ म्हणते तेव्हा छान वाटत न तुला? सगळे सारखेच उंच असते तर तुझं काय वेगळेपण?”आजीनी विचारलं.
“पण मला जास्त उंचीवरून चिडवतात तेव्हा वाटतं, आपण नसतो एवढे उंच तर बरं झालं असतं,” पीयुष म्हणाला.
“अरे, आपण सगळे वेगळे आहोत म्हणून आपली अशी स्वतंत्र ओळख आहे. आणखी एक सांगा, आरव बारीक असता ‘तरच’ आपल्याला आवडला असता का? आता आवडत नाही का?”
“नाही आजी, त्याचं बारीक असण्याचा आणि आवडण्याचा काय संबंध? उलट आरव असतो तेव्हा खूप मजा येते.”

“हो न? प्रत्येकाबद्दल असा विचार करा, मग तुमच्या लक्षात येईल आपले मित्र आहेत तसेच आपले छान मित्र आहेत. पण जेव्हा, आपला मित्र दुखावला जाईल अशा काही गोष्टीचा आपण त्याचं टोपण नाव ठेवण्यासाठी वापर करायला लागतो, तेव्हा तो स्वतःतील चांगली गोष्ट लक्षातच घेणार नाही आणि मनातून दु;खी, उदास राहील हे आपण लक्षातही घेत नाही. म्हणून, सुरवातच अशी नाही करायची. जो जसा आहे तसाच छान आहे. कोणाचंही ‘दिसणं’ महत्त्वाचं नसतं,’असणं’ महत्त्वाचं असतं. त्यांचं वागणं, बोलणं, स्वभाव, त्याचं आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं असतं. प्रत्येकात काहीतरी चांगलं नक्कीच असतं त्याचं कौतुक करायचं. बरोबर न?”आजीनी विचारलं
“हो आजी.”मुलांनी एका सुरात सांगितलं.
हे सगळं चालू असताना अथर्वला आठवत होतं की त्याला चष्मा लागला तेव्हा मुलं त्याला ‘ढापण्या’ म्हणायला लागली होती म्हणून तो चष्माच लावायचा नाही. आजीनी समजूत काढली तेव्हा तो लावायला लागला पण त्याला वाईट हे वाटायचंच. आता त्याला खात्री होती, की आता नाही कोणी चिडवणार. आजीचं बोलणंच तसं होतं, गोष्ट सांगून बरोबर पटवून द्यायची आजी. त्याच्या एकदम मनात आलं ,”My aaji is the ‘best’ aaji in the world! I am proud of you aaji!”
त्याला खूप भरून आलं. पण परत मित्रांच्या गप्पा सुरू झाल्या आणि नंतर सगळे गाढ झोपून गेले. अथर्व तर जास्तच गाढ आणि शांत!