वारुची गोष्ट

वारुची गोष्ट
लेखन: मंदार शिंदे
चित्र: दिव्या गवासने


एक होतं विमान, नाव त्याचं वारु;
उडण्याचं काम अजून व्हायचं होतं सुरु.
चकचकीत पोलादाची होती त्याची बॉडी;
वयाच्या मानानं मात्र बरीच होती जाडी.
जाडजूड लांब-रुंद वारु सुखात होता;
उडण्याची वेळ येऊच नये, विचार करत होता.
बसवलेले होते त्याला जरी मोठ्ठे पंख;
हवेत उडायच्या विचारानं डोकंच व्हायचं बंद.
खरंच सांगतो वारुचं हे वागणं होतं विचित्र;
हवेत उडायला घाबरणारं हे विमान होतं भित्रं.

बनवणारे, चालवणारे थकले सांगून सांगून;
उडायची वेळ आली की वारु बसलाच बघा रुसून.
पायलट सगळे वैतागलेले, काम अडलेलं त्यांचं;
न उडणाऱ्या विमानाचं काय घालायचं त्यांनी लोणचं?
एवढी भीती वाटत होती तर विमान कशाला व्हायचं;
रस्त्यावरचे ट्रक, बस, किंवा सायकल तरी व्हायचं.
रस्त्यावरुन कुणीपण धावेल, त्यात कसली गंमत;
विमान व्हायला लागते मित्रा खरंच जास्त हिंमत.
भरभर भरभर वारा येतो, घुमतो गोल गोल;
आधाराशिवाय तरी स्वतःचा सांभाळायचा तोल.
पन्नास शंभर दोनशे माणसं घ्यायची पोटात भरुन;
भुर्रकन जायचं आणि यायचं त्यांना दूरवर सोडून.
कळणार कशा रे आकाशातल्या तुला गमती-जमती;
तुझ्यापेक्षा लहान विमानं उडतायत बघ अवती-भवती.



वारु त्यांना सांगायचा मग त्याला काय वाटतं;
हवेत उडायच्या विचारानंच इंजिन धडधड करतं.
नाकासमोर जेव्हा माझ्या पंखा फिरतो गरगर;
खरंच सांगतो उडण्याआधीच येते मला चक्कर.
चित्र-विचित्र आवाज माझ्या कानांमध्ये घुमतात;
गुदगुल्या व्हायला लागतात जेव्हा पोटात माणसं शिरतात.
हसताय काय, तुम्ही माझे हाल समजून घ्या जरा;
भीती वाटते हो आकाशाची, मी जमिनीवरच बरा.

दिवसांमागून दिवस गेले पण वारु काही उडेना;
बिनकामाच्या विमानाचं ह्या काय करावं कळेना.
म्युझियममध्ये ठेवू त्याला, एकाने दिला सल्ला;
भंगारातच घालायचं का, दुसरा हळूच बोलला.
जुने जाणते लोक मात्र थांबले धीर धरुन;
वाईट वाटलं नवं विमान वाया जाताना बघून.
ते म्हणाले, काहीतरी नक्की सापडेल यावर उपाय;
थोडे दिवस अजून थांबू, मग ठरवू करायचं काय.

थोड्याच दिवसांत त्यांच्याकडं एक नवीन पायलट आली;
वयानं लहान, स्वभावानं छान, नाव तिचं लिली.
जुन्या लोकांनी नव्या लिलीला मोठ्ठंच काम लावलं;
न उडणारं वारु विमान ताब्यात तिच्या दिलं.
बाकीचे पायलट म्हणाले तिला, अवघड आहे काम;
भित्रं विमान दिलंय तुला, निघणार तुझा घाम.
हसत हसत लिली म्हणाली, काहीच हरकत नाही;
अवघड असेल पण कुठलंच काम मी अशक्य मानत नाही.
सगळ्यांना पक्कं ठाऊक होतं, लिलीची होणार फजिती;
इंजिन चालू करेल पण वारुची घालवणार कशी ती भीती?


लिलीनं एकदा बघून घेतलं वारुला सगळीकडून;
एवढं सुंदर विमान उगीचच राहिलंय इथं पडून.
इंजिन, पंखे, चाकं, सगळं घेतलं तिनं तपासून;
मग वारुला म्हणाली, आपण उडायचं उद्यापासून.
वारुच्या डोळ्यांत आलं पाणी, काचेवर जमली वाफ;
मला नाही उडता येणार दोस्त, करशील का मला माफ?
लिली म्हणाली, तुझ्यात मित्रा काहीच प्रॉब्लेम नाही;
एवढं फिट विमान मी खरंच कधीच पाहिलं नाही.
वारु म्हणाला, बॉडी माझी खरंच असेल गं फिट;
पण मनात माझ्या भीती दडलीय, होऊ कसा मी धीट?

 


लिलीनं ओळखली वारुची अडचण, केला विचार थोडा;
केबिनमध्ये शिरली गुपचूप, त्याला काही न सांगता.
इंजिन चालू झालं तसा वारुला फुटला घाम;
लिली म्हणाली, घाबरु नकोस, मला करु दे माझं काम.
आज मी पायलट असले तरी, लहानपणी होते भित्री;
आपल्याला काहीच जमणार नाही, वाटायची मलाही खात्री.
मित्र-मैत्रिणी चिडवायचे मला, खूप-खूप रडू यायचं;
नवीन काही करायचं म्हणजे जीवावर माझ्या यायचं.
विमान चालवायचं स्वप्न होतं लहानपणीच बघितलं;
पण सायकलसुद्धा चालवताना छातीत धडधड व्हायचं.
पण बाबा माझे खांद्यावरती हात ठेवून म्हणायचे;
स्वतःवरती विश्वास असेल तर कारण नाही भ्यायचे.
पहिल्यांदा तू करशील जे जे, अवघड नक्की वाटेल;
पण अशक्य काहीच नसतं जगात, करशील तेव्हाच पटेल.



वारु हसला, पंखा फिरला, इंजिन धडधडू लागलं;
पहिल्यांदाच ते सुंदर विमान जागेवरुन हललं.
धावपट्टीवर चाकं त्याची दुडूदुडू पळायला लागली;
आश्चर्यानं जुनी-नवी सगळी माणसं बघायला धावली.
बघता-बघता वारुनं पकडला वाऱ्यासारखा वेग;
लिलीच्या साथीनं घेतली त्यानं आकाशात उंच झेप.
एका वाक्यानं जादू केली, बदलले दिवस त्याचे;
स्वतःवरती विश्वास असेल तर कारण नाही भ्यायचे…
स्वतःवरती विश्वास असेल तर कारण नाही भ्यायचे…!!!!