यानको मुझिकांत : संगीतकार यानको

मूळ पोलिश लेखक - नोबेल पारितोषिक विजेते हेब्रिक शिएनकिएविच - कथेचं प्रकाशन साल १८७९
अनुवाद: मंदार पुरंदरे
चित्रः गीतांजली भवाळकर
------------------
हेन्रिक शिएनकिएविच हे पोलिश साहित्यातील एक फारच महत्त्वाचे नाव. पॉजिटीव्हीजम या युगातील कथाकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. ही कथा या युगातील साहित्यामधील एक अग्रणी कथा मानली जाते आणि गेली अनेक वर्षे ही कथा पोलिश शाळांमध्ये शिकवली जाते. एकोणिसाव्या शतकातील ग्रामीण जीवनाची, त्यातल्या जमीनदारी व्यवस्थेची, लोकांमधील अज्ञानाची, गरिबीची चित्रं या कथेत उमटलेली दिसतात. युरोपियन ग्रामीण कथा या भारतीय वाचकाला शक्यतो फारशा ओळखीच्या नसतात. या कथेमधील पोलिश भाषादेखील अर्थात जुनी आहे.
------------------

यानको मुझिकांत : संगीतकार यानको

अशक्त आणि आजारी असाच तो या जगात आला. बाळंतिणीच्या पलंगाभोवती बाया जमा झाल्या होत्या आणि आई आणि बाळाच्या अवतीभवती त्यांची लगबग सुरू होती. त्यातली सर्वात अनुभवी, शहाणी कोवाल्का शमानोवा म्हणाली, ”हं! दे गं ती मेणबत्ती! बाई आता मेणबत्ती पेटवते गं! म्हणजे काय असतील नसतील ती पापं संपून जातील आणि त्या जगाची सोय होऊन जाईल”.
दुसरी म्हणाली, “या बाळाचा बाप्तिस्मा लगेचच केला पाहिजे. पाद्रीबाबा येईपर्यंत हा जीव काही टिकणार नाही, त्याआधी बाप्तिस्मा करून घेतला पाहिजे, नाही तर याचा आत्मा भटकत राहील!”
असं बोलून तिनं मेणबत्ती पेटवली. त्या तान्ह्या बाळाला जवळ घेऊन त्यावर हलकं पाणी शिंपडलं. तान्हं मूल त्या पाण्याने डोळे मिचकावू लागलं. ती पुढं बोलू लागली, “मी तुझा आता आकाशातल्या बापाच्या, त्याच्या मुलाच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा करते. तुझं नाव यान ठेवते. आणि हे-ख्रिश्चन आत्म्या - आता जिथून तू आला आहेस तिथे परत जा!”
मात्र ते अशक्त शरीर सोडायला आणि जिथून आला आहे तिथे परत जायला तो ख्रिश्चन आत्मा तयार नव्हता. आता तो छोटा जीव कसाबसा पाय झाडू लागला आणि जमेल तशा अशक्त आवाजात रडू लागला. जमलेल्या बायका म्हणाल्या, ”जणू एखादं मांजरच बारीक आवाजात म्यांव म्यांव करतंय की!”
मग पाद्रीबाबांना बोलावणं धाडलं. पाद्रीबाबा आले, त्यांचं कर्मधर्म करून निघून गेले. तान्ह्या आजारी जीवाला जरा बरं वाटू लागलं. एका आठवड्यातच आई कामावर जाऊ लागली. पोराचा श्वास फार जड होता, तो वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत तसाच राहिला. चौथ्या वसंतात चंडोल गाऊ लागला आणि तब्येतीत थोडी सुधारणा झाली. होता होता दहाव्या वर्षाचा होईपर्यंत त्याची तब्येत जरा ठीकठाक झाली.

शरीर काटकुळं, वर्ण सावळा, पोट फुगलेलं, गालफडं आत गेलेली, केस उजळ रंगाचे - जवळजवळ पांढरेच, डोळ्यांची बुबुळं प्रमाणापेक्षा बाहेर आलेली आणि आजूबाजूच्या जगात अगणित दूर अंतरावर कुठेतरी पाहणारी! कधी चुलीत (शेकोटीत) आणि भांड्यात टाकण्यासाठी आईजवळ काहीही नसायचं, तेव्हा तो थंडीच्या दिवसात चुलीच्या (शेकोटीच्या) मागे बसून कधी थंडीनं तर कधी भुकेनं मूक रडत असे. उन्हाळ्यात विणलेल्या पट्ट्या लावलेला कुडता आणि गवताची एक हॅट घालत असे, त्या हॅटच्या फाटलेल्या किनारीतून तो एखाद्या पक्ष्याने मान वर करून पहावं तसं पाहत असे. आई गरीब शेतमजूर होती, हातावर तिचं पोट होतं, स्वतःचं घर नव्हतं. तिचं यानेकवर एका अर्थाने प्रेम होतंही पण ती त्याला पुष्कळदा मारत असे आणि ‘बदललेला मुलगा’ म्हणत असे. आठ वर्षाचा असल्यापासून गायींची राखण करण्यासाठी मदतनीस म्हणून तो जंगलात जाऊ लागला. कधी घरी खायला काही नसलं तर जंगलात जाऊन कुत्र्याच्या छत्र्या शोधत बसत असे. त्याला जंगलात लांडग्याने खाल्लं नाही ही एक देवाची कृपाच म्हणायची! हा मुलगा फार हुशार नव्हता, इतर लोकांशी बोलताना ग्रामीण मुलासारखा तोंडात बोटं घालायचा. असा मुलगा आईला काय आनंद देणार! लोकांचीदेखील त्याच्या आईकडून फारशी अपेक्षा नव्हतीच; अगदीच बिनकामी नसलेल्या अशा मुलाला या आईनं नुसतं सांभाळावं, बस! या मुलाकडे एक गोष्ट मात्र कुठून आली होती कुणास ठाऊक, ती म्हणजे संगीत. त्याला सगळीकडे संगीत ऐकू येत असे. कधी इतर पोरांबरोबर रानमेवा गोळा करायला हा जंगलात जाई आणि रिकाम्या हाताने परत येई. आल्यावर आईला म्हणत असे, “आई, जंगलात काहीतरी सुरेख वाजत होतं! अहाहा!” आई त्यावर म्हणत असे, “वाजवून दाखवते हं तुला, थांब! वाजवून दाखवते, घाबरू नकोस!”. असं म्हणून ती घरातले मोठे लाकडी चमचे त्याच्या पाठीवर, पोटावर वाजवे. यानेक त्याने किंचाळे, ओरडे आणि म्हणे, की पुन्हा रिकाम्या हाताने परत येणार नाही. जंगलात काहीतरी ऐकू आल्याचा भास झाला असं म्हणे.
किंवा कुणास ठाऊक, कदाचित त्याला काही दिसत असावं. भूर्जवृक्ष, पाईन, देवदार सगळं जंगलच त्याच्यासाठी गात असावं अन काय!

यात वेगवेगळे प्रतिध्वनीसुद्धा आलेच. शेतामधली मक्याची झुडपं, बागेतल्या चिमण्या, इतकंच नव्हे तर चेरीची फळेदेखील थरथर करीत असत. संध्याकाळी तो गावातले सगळे आवाज ऐकत असे. त्याच्यासाठी अख्खं गाव गात असे. शेण स्वच्छ करण्याचं काम करतानादेखील, त्याला बेळक्यातून जाणार्या वार्याचा आवाज येत असे. एकदा त्याला असाच वार्याने केस फेंदारलेल्या अवस्थेत, बेळक्यातून येणारा वारा ऐकताना ठेकेदारानं पाहिलं. ठेकेदारानं मग कमरेच्या पट्ट्याचा एक जोरदार फटका लावला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. लोकांनी त्याचं टोपणनाव ‘यानको मुझिकांत अर्थात संगीतकार यानको’ ठेवलं. वसंतात तो लाकडाची बासरी बनवण्यासाठी जंगलात पळून जात असे. रात्री बेडूक डरांव डरांव करू लागले, टिटव्या गवतात भटकताना आवाज करू लागल्या, बगळे आवाज करू लागले, कोंबडे कुकूच करू लागले, की त्याला झोप लागत नसे. त्याला या आवाजांमध्ये नक्की काय ऐकू येत असे हे एका देवालाच ठाऊक. आई त्याला चर्चमध्ये घेऊन जाऊ शकत नसे. चर्चमधल्या ऑर्गनचा आवाज ऐकला, लोकांचं गाणं ऐकलं, की याच्या डोळ्याला कुठल्या निराळ्याच जगातल्या पाण्याच्या धारा लागत.

गावात रात्रीचा पहारा देणारा पहारेकरी झोप येऊ नये म्हणून आभाळातले तारे मोजत असे किंवा गावातल्या कुत्र्यांशी बारीक आवाजात बोलत असे. अधूनमधून यानेकचा पांढरा कुडता खानावळीच्या आजूबाजूच्या अंधार्या परिसरात त्याच्या दृष्टीस पडत असे. पण यानेक खानावळीत तर जात नसे. खानावळीच्या भिंतीला टेकून, कान देऊन यानेक ऐकत असे. आत लोक ओबेरेक गात आणि नाचत असत, अधूनमधून एखादा शेतमजूर “ऊ! हा” असं ओरडे. फरशीवर बुटांचे टापटाप आवाज होत असत, मुलींचं गाणं ऐकू येई: ‘याक बूग दाउ, याक बूग दाउ!’. व्हायोलिनवर धून वाजत असे, ‘बेन्जएम येदली, बेन्जएम पिली, बेन्जएम श्ये वेसेलीली’ चेलो (‘बासेटला’ असं या जुन्या वाद्याचं नाव आहे, हे चेलोसारखं वाद्य आहे.) त्याच्या जाडसर मंद्र आवाजात साथ करीत असे, ‘याक बूग दाउ, याक बूग दाउ!’. खानावळीच्या खिडक्या प्रकाशात मंद चमकत असत आणि प्रत्येक वासा थरथरतोय, गातोय, वाजवतोय असं वाटत असे आणि यानेक ते दंग होऊन ऐकत असे. पण त्याला असं पातळ आवाजात ‘बेन्जएम येदली, बेन्जएम पिली, बेन्जएम श्ये वेसेलीली’ गाणारं व्हायोलिन कुठून मिळणार? अशी वाद्ये कुठे बनवतात? असं वाद्य या मुलाला कधी हाताळायला मिळणार? नुसतं ऐकणंच फक्त त्याच्या हाती होतं. हे ऐकणंदेखील पहारेकर्याने हाक देईपर्यंतच! एकदा का पहारेकर्याची हाक आली, “तुला घरी जायचं नाही का रे ए XXX!”, की तो आपल्या अनवाणी पायांनी घराकडे पळत असे आणि त्याच्यामागोमाग व्हायोलिनचा आवाज, ‘बेन्जएम येदली, बेन्जएम पिली, बेन्जएम श्ये वेसेलीली’ आणि चेलोचा गंभीर खर्जातला आवाज ‘याक बूग दाउ, याक बूग दाउ!’ त्याचा पाठलाग करीत असे.

एखाद्या लग्नात, किंवा सुगीच्या हंगामात व्हायोलिन ऐकायला मिळणं हाच त्याच्यासाठी मोठा उत्सव असे. अशावेळी तो चुलीच्या (शेकोटीच्या) मागे मौन बसून राही, आणि अंधारात चमकत्या डोळ्यांनी मांजर जसं पाहत राहतं, तसा पाहत राही. एक प्रकारच्या लाकडी कौलांपासून आणि घोड्याच्या केसांपासून मग तो स्वतःचं व्हायोलिन बनवायचा. पण त्याचं व्हायोलिन खानावळीतल्या व्हायोलिनसारखं गात नसे. डासांच्या गुणगुणण्याप्रमाणे किंवा एखाद्या माशीसारखं अगदी हळू, अशक्त आवाजात हे व्हायोलिन वाजत असे. तरीही या व्हायोलिनवर तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाजवत राही. हे उद्योग करण्याबद्दलचा मार खाऊन तो एखाद्या वेड्यावाकड्या कच्च्या सफरचंदासारखा दिसू लागला होता. पण त्याची प्रकृतीच तशी होती. तो अधिकच काटकुळा होऊ लागला होता, पोट मात्र फुगीरच होतं, केस अधिकच दाट आणि डोळे अधिकच बाहेर येऊ लागलेले, त्यात कायमच अश्रू वस्ती करून असत, गालफडं आणि छाताड अधिकच खोल जाऊ लागलेलं.


इतर मुलांसारखा हा मुलगा अजिबातच नव्हता; लाकडी कौलांपासून बनवलेल्या, कसंबसं कुरकुरणार्या त्याच्या व्हायोलिनसारखा होता तो! सुगीच्या हंगामाआधी नुसत्या कच्च्या गाजरावर त्याचं भुकेलं जीवन सुरू होतं आणि सोबतीला होती व्हायोलिन घेण्याची भूक. या इच्छेचं मात्र काही चांगलं फळ मिळालं नाही त्याला.

जमीनदाराच्या वाड्यावरच्या (हवेलीत) एका खास मर्जीतल्या नोकराकडे व्हायोलिन होतं आणि मोलकरणींना आकर्षित करण्यासाठी तो अधूनमधून वाजवत असे. यानेक कधीकधी जंगली मोहरीमधून रांगत रांगत उघड्या कोठीपर्यंत जात असे आणि व्हायोलिन पाहत असे. उघड्या कोठीच्या बरोबर समोरच्या भिंतीवर व्हायोलिन टांगून ठेवलेलं असे. त्या भिंतीवर त्याची नुसती नजर जात नसे तर त्या नजरेतून त्याचा आत्माच जणू तिथे पोहोचत असे. त्याला व्हायोलिनकडे पाहून वाटत असे, की हे कुठलंतरी दुर्लभ असं प्रेम आहे. त्याच्या मनात ते व्हायोलिन घेण्याची फार प्रबळ इच्छा दाटून आली होती. एकदा तरी त्याला ते हातात घेऊन पहायचं होतंच, कमीतकमी एकदा तरी. ते हातात घेण्याच्या नुसत्या कल्पनेनंच त्याच्या साध्या सरळ मनावर आनंदाचे तरंग उमटत.
एके रात्री त्या कोठीमध्ये कोणीही नव्हतं. कोठीतले लोक कधीच परदेशी गेले होते. वाडा रिकामा असल्याने नोकरही दुसर्या बाजूच्या खोलीत राहत होता. जंगली मोहरीच्या झुडुपांतून रांगत रांगत आलेल्या यानेकला समोर कोठीच्या उघड्या दारातून समोरच्या भिंतीवर ती दुर्लभ वस्तू दिसत होती. खिडकीतून येणार्या पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशानं कोठीच्या भिंतीवर परावर्तित प्रकाशाचा एक चौकोर तुकडा दिसत होता. तो चौकोर तुकडा हळूहळू व्हायोलिनच्या दिशेने सरकू लागला आणि एका क्षणी त्याने संपूर्ण व्हायोलिन उजळून टाकलं. आजूबाजूच्या अंधार्या पार्श्वभूमीवर जणू त्या व्हायोलिनमधून चंदेरी प्रकाश आल्याचा भास होत होता, आणि त्या प्रकाशात त्या वाद्याला ठिकठिकाणी असलेले बाक, त्यावरची कलाकुसर, त्याची वळणे हे सर्व इतकं सुस्पष्ट दिसत होतं, की यानेकचे डोळे दिपून गेले. व्हायोलिनच्या चमकत्या तारा, त्याचा बाकदार वळण असलेला हात, तारांसाठी असलेल्या धातूचे खिळे जणू काजव्यांप्रमाणे चमकत होते आणि बाजूला लटकवलेली धनुकलीदेखील चंदेरी चमचम करीत होती...
हे सर्व अगदी जादुई भासत होत. जंगली मोहरीच्या झुडुपात गुडघ्यावर कोपरं टेकवून वाकून बसलेला यानेक, तोंडाचा आ वासून अगदी अधाशीपणे या दृश्याकडे पाहत होता. भीती त्याला मागे खेचून घेत होती तर इच्छा पुढे ढकलत होती. जणू काही जादूच होत होती. त्या प्रकाशात ते व्हायोलिन अगदी जवळ आल्याचं भासत होतं. कधी हे दृश्य अगदी क्षणासाठी लुप्त होत होतं आणि पुन्हा दिसत होतं. जादू! आसमंतात जादू होती! आता वारा वाहू लागला होता, झाडं मंदपणे सळसळ करू लागली होती, आणि यानेकला स्पष्ट ऐकू आलं: जा यानेक, पुढे जा! कोठीत कोणीही नाहीए! जा.

रात्र उजळ होती. कोठीसमोरच्या बागेत कोकीळ मंद आवाजात गाऊ लागला आणि शीळ घालू लागला आणि “जा! पुढे जा!“ हा आवाज वाढू लागला. इतक्यात एक घुबड यानेकच्या अगदी डोक्याजवळून गेलं आणि त्याला म्हणालं, “नाही यानेक! नको!”. पण आता घुबड दूर गेलं होतं आणि कोकिळेची शीळ अजूनही आसमंतात होती; ती शीळ आणि जंगली मोहरीची झुडुपं पुटपुटली, “तिथे कोणीही नाहीए!” अन पुन्हा एकदा व्हायोलिन उजळलं...
कुबड आलेलं ते बिचारं लहानखुरं शरीर सावधपणे हळूहळू पुढे सरकू लागलं. कोकिळेचा मंद स्वर पुन्हा घुमला, ”जा! यानेक, पुढे जा!” तो पांढरा कुडता हळूहळू कोठीच्या दरवाजाच्या दिशेने सरकू लागला. आता जंगली मोहरीची झुडुपं त्याच्या आजूबाजूला नव्हती, कोठीच्या दरवाजाच्या अगदी जवळ आता आजारी फुफ्फुसांची धाप ऐकू येऊ लागली. पुढच्याच क्षणी पांढरा कुडता आत अदृश्य झाला. कोठीच्या उंबर्याच्या बाहेर एकच अनवाणी पाऊल दिसू लागलं. पुन्हा एकदा घुबडाने उडून हाळी दिली, “नको यानेक, नको!” पण यानेक आता कोठीत होता.

कोठीच्या बागेतल्या तळ्यातले बेडूक आता जणू भीती वाटल्यासारखे जोराने डरांव डरांव करू लागले; नंतर शांत झाले. कोकीळही थांबला, झुडुपं शांत झाली. आता यानेक अगदी हळुवारपणे रांगत पुढे जाऊ लागला, पुन्हा एकदा त्याला भीतीनं गाठलं. झुडुपात असताना, एखाद्या जंगली श्वापदासारखं, अगदी आपल्या वातावरणात असल्यासारखं त्याला वाटे; आणि आता एकटंच कोठीत, जंगली श्वापदाला जाळ्यात अडकल्यावर वाटत असेल, तसं त्याला वाटू लागलं. त्याच्या हालचाली नियंत्रणात नव्हत्या, श्वास तुटू लागला, पुन्हा कोठीतल्या अंधार्या कोपर्यांचा त्याला अंदाज येईना. उन्हाळ्यातील पूर्व आणि पश्चिमेच्यामध्ये चमकणार्या अबोल विजेने पुन्हा क्षणभरासाठी कोठी उजळून टाकली, आणि रांगणार्या स्थितीत व्हायोलिनकडे मान वर करून पाहणारा यानेक दिसून गेला. पुढच्याच क्षणी वीज अदृश्य झाली, चंद्राला अभ्रांनी झाकून टाकलं आणि आता काहीच दिसेनासं आणि ऐकू येईनासं झालं.
आता एक अगदी अस्फुट असा रडवेला सूर ऐकू येऊ लागला, तारांवर जपून जपून धनुकली फिरवल्यावर येतो तसा. आणि अचानक...
एक जाडाभरडा, झोपाळू असा आवाज कोठीच्या कोपर्यातून आला. त्या आवाजात राग होता, “कोण आहे रे?”. यानेकने श्वास छातीतच पकडून ठेवला, तरीही पुन्हा एकदा जाडाभरडा आवाज ओरडलाच, “कोण आहे रे?” भिंतीच्या बाजूला आगकाडी जळू लागली आणि कोठीत किंचित प्रकाश उजळला. आणि त्यानंतर... अरे देवाsss! शिव्या, मारण्याचे आवाज, मुलाच्या रडण्याचे आवाज, कुत्र्यांचं भुंकणं, काचेच्या तावदानांवरून अस्ताव्यस्त फिरणारा प्रकाश, संपूर्ण कोठीमध्ये होणारा गलका...
दुसर्याच दिवशी बिचारा यानेक गावच्या सरपंचासमोर उभा होता.
“हा काय चोरी करीत होता का?”, सरपंचानं विचारलं.

सरपंच आणि बाकीचे पंच लोक त्या छोट्या पोराकडे पाहत होते. तोंडात बोट घातलेला, डोळ्यांची बुबुळं प्रमाणापेक्षा बाहेर आलेला, काळसर चेहर्याचा, लहानखुरा, अशक्त, फटके खाल्लेला आणि आत्ता नक्की काय चाललंय याची सुतराम कल्पना नसलेला मुलगा. अशा जेमतेम दहा वर्षे उमर असलेल्या, आपल्या पायांवर धड उभंही न राहू शकणार्या अशक्त मुलाचा निवाडा काय आणि कसा करणार? मुलांबद्दल थोडी तरी कणव असली पाहिजे. त्याला पहारेकर्याकडून दोन तीन फटके द्यायला लावूयात म्हणजे पुन्हा चोरी करणार नाही, बास!

स्ताशला, म्हणजे पहारेकर्याला बोलावलं. “याला दोन चार फटके दे रे!”

स्ताशने आपली एखाद्या श्वापदासारखी असलेली मान मूर्खपणे हलवली, एखाद्या मांजरीला पकडावं तसं छोट्या यानेकला आपल्या काखोटीला मारलं आणि तबेल्याकडं घेऊन गेला. पोराला भीती वाटली की त्याला काहीच समजेना, काही माहीत नाही, पण त्याच्या तोंडून एक शब्द फुटेना आणि आता एखाद्या पक्ष्याच्या डोळ्यांनी तो आजूबाजूला पाहू लागला. की आता त्याचं काय होणार हे त्याला माहीत होतं? तबेल्यात पहारेकर्याने त्याला ओणवं उभं केलं, त्याचा कुडता वर केला आणि त्याच्या कानफडात जोरात लगावली तेव्हा त्या पोरानं आकांत केला, “आईsss”. नंतर पडणार्या प्रत्येक फटक्यावर तो फक्त “आईsss, आईsss” एवढंच ओरडत होता, त्याचा आवाज हळूहळू दुबळा होत गेला आणि कोणत्यातरी फटक्याला त्याच्या तोंडून “आईsss” हे फुटलंच नाही. बिचारं चुरडलेलं व्हायोलिन!

आई आली, “अरे लहान पोरांना इतकं मारतात का रे मूर्खा? आधीच तो बिचारा अशक्त आहे.” असं म्हणून ती त्याला उचलून घरी घेऊन गेली. दुसर्या दिवशी यानेक उठला नाही. तिसर्या दिवशीच्या संध्याकाळी पलंगावर एका चित्राखाली शांतपणे पहुडला.
चेरीच्या झाडांमध्ये चंडोल गात होता, खिडकीतून सोनेरी सूर्यप्रकाश आत झिरपत होता आणि यानेकच्या अस्ताव्यस्त केसांवर आणि पांढर्याफट्क चेहर्यावर पसरला होता. जणू या किरणांचा हा हमरस्ता या जीवाला इथून जाण्यासाठीच बनला होता. चला, निदान मृत्यूच्या वेळी तरी एक विशाल, प्रकाशमय रस्ता मिळाला! आता त्याच्या अशक्त फुफ्फुसांमध्ये दुबळ्या श्वासाची हालचाल झाली आणि अचानक त्याचा छोटा चेहरा जणू उघड्या खिडकीतून आत येणारे ग्रामीण जीवनाचे आवाज टिपतो आहे असं वाटू लागलं. संध्याकाळची वेळ असल्यानं शेतावरून परतणार्या मुली ‘ओ! ना झिएलोनेय, ना रुनी..’ गात होत्या, ओढ्याकडून बासरीची धून ऐकू येत होती. या शेवटच्या क्षणात यानेकनं गावाचं गाणं ऐकलं. जवळच्याच भिंतीवर यानेकनं बनवलेलं लाकडी व्हायोलिन टांगलेलं होतं. अचानक मरणार्या त्या मुलाच्या पांढयाफट्क पडणार्या ओठातून अस्फुट उच्चार आला, “आई?”
“काय रे पोरा?” अश्रूंचा येणारा पूर कसाबसा रोखत आई म्हणाली.
“मला आकाशात देव खरंखुरं व्हायोलिन देईल?”
“देईल पोरा, देईल” यापेक्षा जास्त ती काही बोलू शकली नाही. तिच्या टणक झालेल्या वक्षांमधे अचानक दुःख फुटलं, ती हंबरडा फोडत म्हणाली, “येशू! येशू!”. ती खाली कोलमडून पडली आणि आत्यंतिक रडू लागली, किंवा खरंतर मृत्यूच्या दाढेतून आपल्या आवडत्या जीवाला परत आणता येत नाही, हे कळल्यावर मनुष्य जसा रडतो तशी रडू लागली. ती उठली आणि पोराच्या चेहर्याकडे पाहू लागली. छोट्या संगीतकाराचे स्तब्ध डोळे सताड उघडे होते, चेहरा गंभीर आणि गोठून गेलेला होता. सूर्यप्रकाश निघून गेला तर...
----------

दोन दिवसांनी इटलीहून वाड्यातले लोक परतले. येताना त्याच्याबरोबर एक इटालियन सुंदर तरुणी होती. इतके दिवस तो तिच्या मागे होता. तो म्हणाला
*- Quel beau pays que l'Italie/ इटली फार सुंदर देश आहे.
-. On est heureux de chercher lá-bas des talents et de les protéger/ आणि कलाकारांचा देश आहे, आम्ही गुणी कलाकारांच्या शोधातच असतो... - ती म्हणाली.
यानेकच्या थडग्यावर भूर्जवृक्ष सळसळत होते.

***********************************
तळटिपा:
१. चूल (शेकोटी) ही वास्तविक एक प्रकारची भट्टीच. हिंदीमध्ये याला अलावघर असा शब्द आहे. घरात लाकडे जाळून ऊब निर्माण करण्यासाठी बनवलेली खास शेकोटीची जागा. इथे याला नक्की काय म्हणावं हा माझा प्रश्न आहे.
२ लोकरीच्या विणलेल्या पट्ट्या : हा खास स्लाव्ह पारंपरिक प्रकार आहे. छोट्या-मोठ्या लोकरीच्या रंगीत पट्ट्या विणून त्यांचा वेषभूषेमध्ये वापर हा खास स्लाव्ह संस्कृतीचा भाग होता. याला Krajka - क्रायका - म्हणतात.
३ ओबेरेक : पोलिश लोकसंगीताचा एक खास प्रकार. याला एका अर्थाने - घुमर - ही म्हणता येईल. कारण ओबेरेक शब्दाच्यामागे मूळ धातू आहे - ओब्रात्साच - अर्थात गिरक्या घेणे. हा नाचाचा द्रुत प्रकार आहे. यात नर्तक पारंपरिक पोशाख करून उड्या मारतात, फेर धरतात, गिरक्या घेतात.
४ ‘बेन्जएम येदली, बेन्जएम पिली, बेन्जएम श्ये वेसेलीली’ - खाऊ, पिऊ मजा करू! ‘याक बूग दाउ’ - देवानं दिलं आहे तसं. - पोलिश लोकसंगीतात हमखास येणार्या ओळी आहेत या.
मूळ कथेमधली पात्रेदेखील इटालियन भाषेत बोलतात, त्यासोबत कंसात त्या वाक्यांचा पोलिश अनुवाद दिला आहे. यातून लेखकाला वर्गभेद सूचित करायचा आहे हे स्पष्ट दिसते. अनुवादामध्ये तो तसाच ठेवला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------
@ मंदार पुरंदरे
पोझनान : ०३.०१.२०१९