तू माझी चुटकी आहेस (कथा)

................................................................................................................

तू माझी चुटकी आहेस
लेखन: फारूक एस.काझी, नाझरा, ता. सांगोला, जि.सोलापूर
चित्रे: शाम वानरे, मुंबई

................................................................................................................

 

सकाळी सकाळी मुसा खूप घाईत होता. आज सगळे होडीवाले मासे पकडायला जाणार होते. मासळीला चांगला भाव आला होता. मुसानेही होडी बाहेर काढली होती. आठवड्यासाठीचे काही पैसे जमा होतील असा त्याचा अंदाज होता.

मुसा म्हणजे एक आडदांड शरीराचा माणूस. ताकद जबरदस्त. चुटकीला तर तो तळहातावरच ठेवेल. चुटकी म्हणजे मुसाची मुलगी. पाच वर्षांची होती चुटकी.अब्बा चुटकीवर खूप प्रेम करतो. पण ते कधी दाखवून देत नाही. सगळे लोक त्याला ‘जडबुद्धी’ म्हणतात. जडबुद्धी म्हणजे एकदम बुद्दू माणूस !

आपल्या अब्बाला असं बोललेलं चुटकीला अजिबात खपत नाही. ‘ माझा अब्बा जगातला ‘सर्वात बेस्ट अब्बा’ आहे. कारण तो माझी खूप काळजी घेतो. मी शाळेत जाईपर्यंत माझं खाणं-दूध-अंघोळ-दप्तर भरणं ही सगळी कामं तोच करतो.’ चुटकी एका दमात हे बोलून मोकळी होते. अब्बा नसला की शेजारच्या चाची हे सर्व काम करतात.

चुटकीला अम्मी नाही. खूप वर्षापूर्वी ती अल्लाहला प्यारी झाली. चुटकीने तिला पाहिलं ही नाही, तरीही तिला तिची खूप आठवण येते. तिच्या कुशीत शिरावं, हट्ट करावा, तिच्याकडून वेणी घालून घ्यावी असं सतत वाटत राहतं. पण, ती असं नाही करू शकत.

तिचा अब्बा तिची खूप छान वेणी घालतो. तो मांडी घालून बसतो आणि चुटकीला एका छोट्या स्टूलवर बसवतो. करणार काय ? त्याच्या समोर ती बसली तर त्याला दिसणारही नाही. त्याची ढेरीच एवढी मोठी आहे. मग तो सावकाश तिच्या डोक्याला तेल लावतो. भांग पडतो. मग केसं मागे घेऊन छानशी रिबिन बांधतो. झाली वेणी तयार. चुटकीच्या बाजी म्हणजे तिच्या शाळेतील शिक्षिका . त्यांना सगळी मुलं बाजीच म्हणतात. बाजी म्हणजे मोठी ताई.तिच्या बाजी लगेच ओळखतात, आजची वेणी अब्बानं घातलीय. त्यांना फार कौतुक वाटायचं तिच्या अब्बाचं.चुटकीही हरकून जायची.

चुटकी अम्मीच्या आठवणीत रडू लागली की अब्बा दोन बोटांनी छानशी चुटकी वाजवतो. तिला ती खूप आवडते. ‘चुटुक चुटुक’ असा आवाज मस्त वाटतो. चुटकीही वाजवायला शिकली चुटकी. पण अब्बासारखी नाही जमत. चुटकीचा आवाज ऐकून ती खुदूखुदू हसू लागली की अब्बा तिला वर उचलून घेतो, गोल गोल फिरवतो. आपली खरबरीत दाढी टोचवत तिची पापी घेतो आणि आपल्या गडगडाटी आवाजात म्हणतो, “तू माझी चुटकी आहेस.तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आहे. नाहीतर मी जडमेंदू कसा जगणार एकटा?” असं म्हणताच चुटकी पटकन त्याची पापी घ्यायची. दाढी टोचायची. पण ती आपल्या अब्बाला घट्ट बिलगायची. “तू नहीं है जडबुद्धी. तू मेरा अब्बा है.”

असा हा तिचा अब्बा एक नावाडी आहे. खूप तापट स्वभावाचा. राग तर जणू त्याच्या नाकावरच असतो. त्याच्या नावेवरचे लोक मात्र सांगायचे ‘आमचा मालक देव माणूस आहे.’ अब्बाचा स्वभाव कुणालाच समजला नव्हता. तो कधी रागवेल आणि कधी प्रेमाने बोलेल काही समजत नसे. असा हा अब्बा खूप अबोल. कमी बोलायचा. त्याला काय सांगायचंय हे आपणच ओळखून घ्यायचं. नाहीतर खूप ओरडायचा. चुटकीवर मात्र तो कधीच चिडला किंवा ओरडला नाही.का? ते माहीत नाही. कितीही रागावलेला असला तरी, कितीही दमला असला तरीही.

एके दिवशी तिने शेजारच्या चाचीना कुणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं. “मुसा पागल है. कुठली कोण अनाथ पोर त्यानं सांभाळलीय. जीव लावून ठेवलाय. सांगितलं तर ऐकत नाही.” हे ऐकून चुटकीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती अनाथ होती. पण अब्बाने हे कधीच तिला कळू दिलं नव्हतं. आता तिच्या लक्षात आलं की तिच्या अम्मीचा फोटो घरात का नव्हता ते. तिच्या अम्मीच्या आठवणी अब्बा तिला का सांगत नव्हता. तिला अब्बाचा रागही आला आणि नंतर तो तिला देवदूतच वाटू लागला.

ती खूप रडली. कुणाशी काही बोलेना की पहिल्यासारखी हसेना. अब्बाच्या ही गोष्ट लक्षात आली होती. पण त्याला वाटलं काहीतरी विचार करत असेल. त्यामुळे बोलत नसेल.

चुटकीने तिच्या बाजींना एकदा हे सर्व सांगितलं. त्याही ऐकून सुन्न झाल्या. तिला सतत परकं परकं वाटू लागलं होतं. चुटकी आणि बाजींचं बोलणं कुणीतरी ऐकलं आणि ‘चुटकी अनाथ आहे’ ही बातमी सगळ्या शाळेत पसरली. शिक्षक तिला सहानुभूती दाखवू लागले तर शाळेतील मुलं तिला चिडवू लागली होती. तिला काहीच कळेना. बाजी तिच्यासोबत होत्या म्हणून तिला थोडा आधार तरी होता.बाजी तिची समजूत घालत. पण तिचं मन सतत रडत होतं. आपण अनाथ आहोत ही भावना काही केल्या कमी होत नव्हती.

चुटकी मुकीच झाली. अब्बा काळजीत पडला. त्याला काय करावे कळेना. ती सतत रडायची . बाजींनी अब्बाला सर्व सांगितलं. अब्बा शेजारच्या चाचीला खूप बोलला-ओरडला. तो ही खूप रडला. पहाडासारखा माणूस रडल्याचं पाहून चुटकीला फार वाईट वाटलं. अब्बाने तिच्या बाजींना ‘चुटकी माझ्याशी बोलत नाही.सारखी रडते.’ असं सांगितलं.

तो स्वत: हे सांगताना रडला.चुटकीला हे सर्व समजत होतं. पण अनाथ असल्याची भावना तिला सतत त्रास देत होती. हा मोठा धक्का होता तिच्यासाठी. अब्बाला काही समजत नव्हतं की तिची समजूत कशी काढावी. काय करावं की ती रडणार नाही. पहिल्यासारखी हसेल, मज्जा करेल. आपल्या अब्बाच्या पाठीवर बसून घरभर फिरेल. 

चुटकीच्या बाजी हे सर्व पाहत होत्या. त्यांना बाप लेकीतलं प्रेम माहीत होतं. त्यांनीच काहीतरी करायचं ठरवलं.

चुटकीच्या बाजींनी एकदा तिच्या अब्बाला शाळेत बोलावलंय असं सांगितलं. अब्बा गडबडून गेला.त्याला धड नाही म्हणता येईना ना होकार.पण चुटकीविषयीच काहीतरी असणार असं ओळखून त्याने येणं कबूल केलं.चुटकीसाठी तो काहीही करू शकत होता.

तो आलाही.

तो अवघडला होता शाळेत आल्यावर.शाळेतल्या खुर्चीत त्याला बसता येईना. त्याच्यासाठी एक मोठा स्टूल आणला. त्यावर तो बसला.

“बच्चों, आज हमारे यहां इक मेहमान आये हैं, ते व्यवसायाने नावाडी आहेत. ते आज तुम्हाला नावेवरच्या गमती जमती सांगणार आहेत. नावेवरची गीतं गाऊन दाखवणार आहेत.”

हे ऐकताच अब्बा गडबडून गेला. त्याने बाजींकडे पहिले. त्यांनी हलकेच डोकं हलवून “सुरवात करा” असं सुचवलं. त्याने काही क्षण शांत बसून सुरवात केली. चुटकीही गडबडून गेली. अब्बाला नाही जमलं तर? सगळे त्याला हसतील. आणि तिच्या अब्बाला कुणी हसलेलं तिला अजिबात आवडणार नव्हतं. तिने मनातच प्रार्थना केली. ‘या अल्लाह माझ्या अब्बाला पास कर”.

मुसाने आपल्या घोगऱ्या आवाजात दोन तीन नावाड्यांची गाणी गायली. नावेवरच्या गमती जमती सांगितल्या. मुलांनी जोरात टाळ्या वाजवल्या.

शेवटी तो म्हणाला, “सींप में असमान से पाणी गिरता. मगर सींप उसे अपना बनाता. शिंपल्याला माहीत नसतं ते पाणी कोण आहे ? कुठून आलं ? ते फक्त त्याला आपल्यात सामावून घेतं. त्याचा मोती बनवतं. चुटकी, तू माझ्यासाठी मोती आहेस. माझी चुटकी. तू जन्मानं माझी पोर नाहीस म्हणून काय झालं. पण हा तुझा अब्बा तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो. जगाची पर्वा तू नको करूस. हा तुझा येडा अब्बा समर्थ आहे. तू जगासाठी अनाथ असशील पिल्या , पण माझ्यासाठी तू माझी चुटकी आहेस. माझी इटुकली पिटुकली चुटकी आहेस.” असं म्हणून तो हमसून हमसून रडू लागला.

चुटकी सुन्न होऊन ऐकत होते. इतक्यात बाजींनी तिच्या खांद्यावर थोपटलं आणि अब्बाकडे बोट केलं. तिला काय करावं हे कळेना. तीही रडत होती. शेवटी मनाशी काहीतरी ठरवून ती धावतच अब्बाकडे गेली. अब्बाला मिठी मारली. त्याच्या खरबरीत दाढीच्या गालाची पापी घेतली. त्याच्या गालावरून वाहणाऱ्या आसवांची खारट चव तिला आज खूप आवडली.

गाल फुगवून, "अब्बा, तू रडताना एकदम बाद दिसतोस. रडत जाऊ नकोस.” असं म्हणताच अब्बा हसायला लागला. त्याने चुटकीला अलगद उचलून खांद्यावर घेतलं. बाजींची परवानगी घेऊन ते घराकडे चालायला लागले.

ती अजूनही अब्बाच्या खांद्यावर होती. तिचं आकाश जणू तिच्या हातात होतं. तिचं आकाश आणि जमीन अब्बाच तर होता.

................................................................................................................