झंपूची सायकल (गोष्ट)

झंपूची सायकल
लेखन: अभिगंधशाली
चित्रं: ज्योती महाले

चंपकवनातले सगळे प्राणी एकत्र जमले होते. गोलू अस्वल समोर येऊन म्हणाला, “चलो सब लोग ताली बजाओ. माझ्याकडे तुमच्या सगळ्यांसाठी एक गंमत आहे. तीन म्हणायच्या आत डोळे मिटा बरं सगळ्यांनीच.एक, दोन, तीन! हंअअ! हळूचसुद्धा नाही बघायचं बरं का! ए चिमडे, तू बघते आहेस बरं का डोळे मिचमीच करून”
गोलू जमलेल्या प्राण्यांची उत्सुकता ताणत होता. गोलूचा चंपकवनात कारखाना होता. तिथे तो माणसांकडे असलेल्या, प्राण्यांनाही उपयोगी पडणाऱ्या नवनवीन वस्तू बनवायचा. त्या निसर्गाला त्रास होणार नाही अशा वस्तू असत.
त्यामुळे सगळ्यांच्या मनात एकच, आज काय नवे बघायला मिळणार!

इतक्यात गोलूने विचारले,“सगळे तय्यार?”
“हो तय्यार !”
“उघडा आता डोळे.”गोलूचा आवाज काहीसा लांबून आला.
डोळे उघडून बघतात तर काय!गोलू गायब. इतक्यात कुठून तरी खडखड आवाज व त्यासोबत ऐकू आले,
“झुम्म झुम्म झुईईईई झुम्म झुम्म झुईईईई.....
देखो देखो गोलू की सायकल आयी!!”

झाडामागून सायकल चालवत गोलू सगळ्यांसमोर आला. सायकलविषयी याआधी गोलूने सगळ्यांना सांगितले होते. प्रत्येक प्राण्याच्या वजन, उंचीनुसार बनवून द्यायचे ठरलेही होते. मात्र प्रत्यक्षात गोलूला सायकलवर बघून सगळ्यांनी आनंदाने गलका सुरू केला.
“हुर्यो!हुर्यो! सायकल! सायकल!!”
“गोलू मला सायकल?”
“मला?”
“मला!”, सगळे प्राणी एकामागून एक ओरडू लागले.

गोलू म्हणाला, “अरे हो! ठरल्याप्रमाणे आज सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या सायकली मिळतील. त्याआधी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका बरं. सगळ्यांनी एकमेकांना सायकल चालवायला शिकवूया. चालवताना स्वतःची आणि आपल्या सायकलीची नीट काळजी घ्यायची. अधूनमधून माझ्याकडे येऊन तिला ऑइलिंग करायचे, ब्रेक दुरुस्त करून घ्यायचे.”

“आम्ही हे सगळे नीट लक्षात ठेवू.” सर्वांनी वचन दिले. गोलूने सर्वांना त्यांच्या सायकली दिल्या.

गोलूने सांगितल्याप्रमाणे सगळे प्राणी स्वतःची आणि सायकलचीही काळजी घेत होते. संध्याकाळी तिला वारा, पाऊस किंवा ऊन लागणार नाही अशी नीट ठेवायचे. थोड्याच दिवसात सगळे सायकल छान चालवू लागले. पंधरा दिवसांनी गंमत म्हणून सायकलची शर्यत घ्यायची ठरली. सगळे जोमाने तयारीला लागले. छान सायकल चालवण्याचा रोज सराव करायचे.

या सगळ्या प्राण्यात माकडं जरा जास्त उड्या वगैरे मारायची. त्यातही झंपू माकड म्हणजे सगळ्यात खोडकर! त्याने सवयीनुसार सायकल चालवतानाही खोड्या करायला सुरुवात केली. कशीही सायकल चालव, दगडावरून, वाळूमधून जोराने ने, यात त्याला मजा वाटत होती. उगाचच ब्रेक लाव, सायकल एका चाकावर उभी कर, दगडावरून हवेत उंच उडव हे त्याचे आवडीचे खेळ झाले. शिवाय सायकलची काळजीही घ्यायचा नाही, मग सायकल बिघडायची. कोणी ना कोणी त्याला समजवायचे. तेवढ्यापुरते तो हो सुद्धा म्हणायचा, नि एखादा दिवस गेला की पुन्हा खोड्या सुरू करायचा.

एकदा तर तो दगड चुकवताना पडला. फार लागले नाही, पण सायकलचे हँडल वाकडे झाले. नीट करायला गेल्यावर गोलू त्याला म्हणाला, “अरे जरा नीट चालवत जा, असे करू नकोस. कधीतरी जास्त लागेल, सायकलही पूर्ण मोडून जाईल. बघ, आताही ब्रेक नीट लागत नाहीयेत.”
ऐकेल तर तो झंपू कसला. तो उलट म्हणाला, “असू दे रे, ते ब्रेकबिक मला लागतच नाही. तू आता फक्त हँडल सरळ कर आणि दे बरं लवकर माझी सायकल. मी ब्रेकसाठी येईन नंतर. आज जरा अंदाज चुकला म्हणून पडलो. असं नेहमी नाही होत काही. तू नको उगाच चिंता करू. चंपकवनात मीच सगळ्यात भारी सायकल चालवतो. शर्यत पण मीच जिंकणार. बघच तू.”
गोलू बिचारा काय करणार. झंपूची गडबड बघून त्याने ब्रेक नीट न करताच सायकल दिली.
शर्यतीचा दिवस जवळ येऊ लागला. सगळे गोलूकडे येऊन सायकल तपासून गेले होते पण झंपू विसरून गेला.

बघता बघता शर्यतीचा दिवस उजाडला.
१..२...३...सुरू असे म्हणत शर्यत सुरू होताच, झंपू जोराने सगळ्यांच्या पुढे गेला. नीट, सरळ सायकल चालवणे त्याला माहीतच नसल्यामुळे मध्येच हात सोडत होता. एका चाकावर येत होता. मधूनच सायकल हवेत उडवत गात होता,
“हुलाला हुलाला! मीच आहे सायकलचा राजा.”

उताराच्या रस्त्यावर त्याच्या सायकलीचा वेग खूप जास्त होऊन ती वेडीवाकडी जाऊ लागली. झंपूने ब्रेक दाबले, पण ते आता अजिबातच काम करत नव्हते. काळजीने काहीजण त्याच्या मदतीला धावले पण वेग खूप होता.
मग त्याने पायाने सायकल थांबवायचा प्रयत्न केला. सायकल रस्ता सोडून खाली उतरली. तिथे काटेरी झुडपे होती. त्याचे काटे पायात, टायरमध्ये घुसले. टायर पंक्चर झाले. खूप वेग असल्यामुळे खर्र्र्रर्र्र्र खुर्रर्र्र्रर्र्र्र खर्र्रर्र्र्रर्र्र्र धम्म्म धडाम करत, सायकलसकट बरेच अंतर घसरत जाऊन झंपू एका झाडाला धडकला. धडक इतक्या जोराची होती, की सायकलची पुढची बाजू वाकडीतिकडी झाली. चाक निखळले.


सगळे धावत त्याच्याकडे गेले. त्याला खूप लागले होते. थोडक्यात डोळा वाचला होता. त्याला पटकन डॉक्टरांकडे नेले. त्याचा एक हात आणि एक पाय फ्रॅक्चर झाला होता म्हणजे हाड तुटलं होतं. या सगळ्यामुळे झंपू चांगलाच घाबरून गेला होता. तो रडत माफी मागू लागला.

“गोलू तू किती बजावून सांगितले होते तरी मी ऐकले नाही म्हणूनच मला अशी शिक्षा झाली. माझं चुकलं खरंच चुकलं.”
गोलू थोडा रागवून म्हणाला, “झंपू, अरे सायकल ही जरी वस्तू असली ना, तरी तिची मित्राप्रमाणे काळजी घ्यायला हवी. वेळोवेळी तिची दुरुस्ती करायला हवी. शिवाय चालवतानाही नीट रस्त्यावरून चालवायला हवी. ऊन, पाऊस यापासून जपून ठेवायला हवी. हे सगळे केले तरच ती नीट राहून आपली काळजी घेईल. हो की नाही? तू नीट चालवायचे वचन देणार असशील तर मी लवकरच तुझ्यासाठी नवीन सायकल बनवेन. नाहीतर आता तुला सायकल मिळणार नाही.”
“मी यापुढे असे कध्धी कध्धी करणार नाही. सायकलची नीट काळजी घेईन. जपून चालवेन.” झंपूने वचन दिले.