जंगल आजी २: आजीच्या जवळी घड्याळ कसले

लेखन: डी.व्ही.कुलकर्णी 
चित्र: प्राची केळकर भिडे

याआधीची गोष्ट: ससोबा का आयतोबा
--------------------------------------

गोष्ट दुसरी: आजीच्या जवळी घड्याळ कसले.

आजी काठी टेकीत जंगलातून चालत होती. थोडी पुढे गेली तोच तिला हरीणदादा दिसला. मान खाली घालून चालला होता.
“काय रे हरणा काय झालं ? असं तोंड का उतरलंय?”
आजीने त्याला जवळ घेतलं. चेहऱ्यावरून हात फिरवला. हरिणाच्या डोळ्यात पाणी होतं.
“आजी, मी खूप अडचणीत आहे.मला मदत कर’’
“काय झालं?”
“आजी, या जंगलचा राजा सिंह सध्या म्हातारा झाला आहे.त्याला शिकार करणं आता झेपत नाही. त्याची उपासमार होऊ नये, म्हणून जंगलवासी त्याला फळं, कंदमूळं रोज आणून देतात. परंतु आता त्याला मांसाहार खायची इच्छा झाली आहे. त्याला हरणाचं लुसलुशीत मांस हवं आहे. वयापरत्वे शिकार तर झेपत नाही.”
“बरं मग?”,आजीने विचारलं.
“मलाच त्याने निरोप पाठवला आहे, ‘संध्याकाळी सहा वाजता’ भेटायला बोलावलंय. खूप दिवसात भेटलो नाही, जरा गप्पा मारू म्हणे. काही नाही! हा सगळा कावा आहे. मी गुहेत शिरलो की, तो मला ठार मारणार.”
“मग जाऊ नकोस”, आजीने सल्ला दिला.
“आजी, तसं करून कसं चालेल? राजाची आज्ञा मोडल्यासारखं होईल. जंगलचा कायदा मी तोडला, असा अर्थ होईल. शिक्षा म्हणून मला सिंहाच्या तोंडी देण्यात येईल. लबाड कोल्ह्याशी संगनमत करून हा डाव रचला आहे. आजी, तू एवढी शिकलेली आहेस. मला वाचव या संकटातून.”


आजीने विचार केला आणि नंतर हरिणाला युक्ती सांगितली, “तू एक काम कर. कबुतराबरोबर निरोप पाठव .सिंहाला सांग ‘महाराज ,आपला निरोप मिळाला मी यायला तयार आहे; परंतु कोणत्या घड्याळात सहा वाजले की येऊ? म्हणजे असं की, गीरच्या वनात सहाचे ठोके पडले की येऊ का आफ्रिकेच्या जंगलातील घड्याळात सहा वाजले की येऊ?”

हरिणाचा निरोप कळताच सिंह चक्रावून गेला. “हा काय प्रकार आहे? जगात सर्वत्र एकच वेळ नसते का? का नसते?”
हरिणाच्या प्रश्नाला त्याच्याकडे उत्तर नव्हते . तो गोंधळला. सिंहाला समजेना आता काय निरोप पाठवावा. आपल्या इथे रात्र असली तरी त्याच्या काही सिंह मित्रांच्या जंगलात दिवस असायचा. सिंह विचार करीत बसला.
परिणामी हरिणाचा जीव वाचला. त्याने आजीचे आभार मानले.


“परंतू आजी, मला एक सांग, घड्याळ अशी वेगळी वेळ का दाखवतं?”
“अरे हरणा,जगात ठिकठिकाणी घड्याळं वेगळी वेळ दाखवतात, याचं मूळ कारण म्हणजे, पृथ्वी सूर्याभोवती फिरताना स्वतःच्या अक्षाभोवती देखील फिरते. त्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्रीचं चक्र सुरू असतं. पृथ्वीच्या काही भागात दिवस, तर काही भागात रात्र असते. यामुळेच जगात सर्वत्र वेळ सारखी नसते. जगाचा नकाशा काढल्यानंतर अक्षांश आणि रेखांशांच्या मदतीने प्रत्येक ठिकाणाचे स्थान निश्चित करण्यात आले आहे.”
“अक्षांश आणि रेखांश म्हणजे?", लगेच हरिणाने विचारले.
“अक्षांश आणि रेखांश या काल्पनिक रेषा आहेत. पृथ्वीच्या गोलाला बरोबर मध्यावर विभागणारी रेषा म्हणजे शून्य अक्षांश किंवा विषुववृत्त. हिलाच नंतर उत्तर आणि दक्षिण ध्रुवा पर्यंत काटकोनात समांतर रेषांना रेखांश असे म्हणतात. इंग्लंडमध्ये ‘ग्रीनविच’ येथे एक वेधशाळा आहे. या शहरावरून जाणाऱ्या रेखांशाला शून्य रेखांश असे मानतात. येथील वेळ हि शुन्यवेळ/ मूळ वेळ मानली जाते. या शहरा पासून पूर्वेकडे गेले असता प्रत्येक पंधरा अंशांकरता एक तास वाढवावा लागतो. तसेच पंधरा अंश पश्चिमेकडे गेलो तर एक तास कमी करावा लागतो. ग्रीनविच शहरापासून एकशे ऐंशी अंश पूर्वेकडे अथवा पश्चिमेकडे गेल्यास तारीख बदलते.”


दीनवाणा चेहरा करून बसलेल्या हरिणाच्या चेहऱ्यावर आता हसू फुटले होते. झाडाची हिरवीगार पाने आनंदाने चघळत तो म्हणाला, “आजी तू महान आहेस.”
आजी स्वतःशीच हसली, “मी कुठली महान? रात्रंदिवस मेहनत करून, जे शोध लावतात ते शास्त्रज्ञ महान.”

(क्रमश:)

----------------------

लेखक शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर असून, आजवर अनेक बालकथांचे लेखन केले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांच्या या आधुनिक जंगल आजीच्या कथांना कोसामप आणि बालकुमारसाहित्य परिषदेने पुरस्कार दिले होते. या कथासंग्रहाबद्दल पु.ल. देशपांडे यांनीही लेखकाचे कौतुक केले होते.
अटक मटक.कॉम'ची घोषणा होताच मोठ्या मनाने आपणहून त्यांच्या कथा साईटवर प्रकाशित करण्याची परवानगी त्यांनी दिली - त्याबद्दल त्यांचे आभार