ध्येयघोषणा

कालसुसंगत, उदारमतवादी, लिंगाधारित साचे न मानणारं, ताजं, मुलांना आपलं वाटेल असं लेखन वा दृकश्राव्य निर्मिती मराठीतून प्रकाशित व्हावी यासाठी या साईटची निर्मिती केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना वेळोवेळी वाचायला/बघायला देण्यासारखे लेखन/दृक्-श्राव्य फिती/खेळ वगैरे बाबी या साईटवर प्रकाशित होतील.

मुलांबद्दलचे किंवा बालसंगोपन/विकास/पालकत्व वगैरे विषय या साइटच्या कक्षेबाहेर असतील.

उद्दिष्टे

- मराठीमध्ये उत्तमोत्तम बालसाहित्य निर्माण करणे.

- जगभरातील उत्तमोत्तम बालसाहित्य, कथा, कविता यांची ओळख मराठीतून करून देणे.

- लिंगभाव न बाळगणारे, कालसुसंगत, हिंसेला श्रेष्ठत्व न देणारे, आताच्या काळातील मुलांना आपलेसे वाटेल अश्या विषयांवर, शैलीत आणि भाषेचा वापर करून बालसाहित्याची निर्मिती

- ग्रामीण, आदिवासी मुलांना आपलेसे वाटेल अश्या विषयांवरील बालसाहित्याला प्रोत्साहन देणे

- वेगवेगळ्या मराठी बोलीभाषांतील बालसाहित्याला प्रोत्साहन देणे, मंच उपलब्ध करून देणे.

- शक्य तितकी हातांनी काढलेली रेखाटने/चित्रे यांच्याद्वारे विविध चित्रशैलींबद्द्ल भान, जाण आणि रुची यांना मुलांमध्ये पोषक वातावरण निर्माण करणे - त्यांची ओळख मुलांना करून देणे.

- महाराष्ट्रील मुलांनी केलेल्या उत्तम लेखनासाठी मंच उपलब्ध करून देणे

- वरील उद्दिष्टे गाठण्यासाठी खालील मार्गदर्शक तत्त्वे अंगिकारली जातील. ही तत्त्वे केवळ व्यवस्थापनासाठी नसून आपल्या सर्वांसाठीच आहेत हे ध्यानात ठेवावे.

मार्गदर्शक तत्त्वे

- प्रसंगी आपल्या विचारांना विरोध करणारे विषय/मते असणारे लेखन किंवा आपल्या रुचीला न मानवणारे चित्रांकन इथे येण्याची शक्यता आहे. मात्र तो लेखक/चित्रकाराचा वैयक्तिक दृष्टिकोन असेल. आपण सगळे मिळून अश्या प्रकारच्या लेखनाला त्याचा अवकाश देऊन मुलांसमोर सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे रक्षण करूयात.

- अर्वाच्य, असांसदीय शब्दप्रयोग चर्चांना व्यक्तिगत पातळीवर नेऊ शकतात, तेव्हा असे प्रयोग लेखनात टाळावेत. धार्मिक भावना दुखावणारे लेखन टाळावे मात्र धार्मिक कुप्रथांवर टिकात्मक लेखन करण्यावर मात्र बंधन नाही. अश्या लेखनातील दृष्टिकोन हा व्यापक समाजहिताचा असणे आवश्यक आहे.

- अटक मटकच्या वाचकांच्या अनौपचारिक भेटी, चर्चा करण्यासाठी सांस्कृतिक कट्टे/संमेलने आयोजित करण्याचा प्रयत्न व्यवस्थापन भविष्यात करू शकेल.

- उद्दिष्टांशी सुसंगत अशा पाहुण्यांना आंतरजालावर किंवा प्रत्यक्षात निमंत्रित करून त्यांच्याशी मुलांच्या औपचारिक/अनौपचारीक भेटी, चर्चा करण्यासाठी प्रत्यक्ष / ऑनलाईन संमेलने आयोजित करण्याचा प्रयत्नही व्यवस्थापन भविष्यात करू शकेल.

- लेखकांच्या विचारांशी, प्रकाशित होणाऱ्या मजकुराशी, व्यक्त झालेल्या मतांशी व्यवस्थापन, मालक, संपादक, मॉडरेटर्स सहमत असतीलच असे नाही. इथे प्रकाशित होणारे सर्व साहित्य यावर त्या कलाकृतीच्या निर्माणकर्त्याचा (जसे लेखकाचा/चित्रकाराचा/अनुवादकाचा) प्रताधिकार असेल. त्याच्या पुनर्प्रकाशनासाठी 'अटकमटक.कॉम'ची परवानगी घेणे आवश्यक नाही. मात्र त्याबद्द्ल 'अटकमटक.कॉम'ला पुर्वकल्पना देणे अपेक्षित आहे.

उद्दिष्टांचा पाठपुरावा मार्गदर्शक तत्त्वांनुसार होतो आहे याची काळजी घेण्यासाठी व्यवस्थापन खालील धोरणांनुसार कार्यवाही करेल.

धोरणे

- उद्दिष्टे व धोरणांमध्ये बदल करण्याचा अंतिम हक्क व्यवस्थापनाकडे आहे

- मार्गदर्शक तत्त्वांशी विसंगत लेखन/प्रतिसाद अप्रकाशित अथवा नष्ट केला जाईल.

- प्रत्येक निर्णयाबाबत खुलासा करण्याची जबाबदारी व्यवस्थापनावर नाही.

श्रेय

संस्थळावर आणि संस्थळाच्या प्रसिद्धीमध्ये वापरलेल्या ’लोगो’ची संकल्पना आणि रेखाटन 'स्नेहल नागोरी' यांचे आहे. 
संस्थळाच्या फेसबुक पेजवरील कव्हर फोटोमध्ये वापरलेल्या चित्राची संकल्पना आणि रेखाटन 'ज्योती महाले' यांचे आहे.
संस्थळाच्या तांत्रिक उभारणीचे श्रेय 'निखिल देशपांडे' यांचे आहे.