लिहितं व्हा २०२५: लेखन स्पर्धा निकाल

नमस्कार,

उन्हाळी अंकात घोषित केलेल्या लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करत आहोत. पण तत्पूर्वी एकूणच निकालापर्यंत पोचायच्या प्रक्रियेबद्दल लिहिणं अगत्याचं आहे.

यंदा लेखन करण्यासाठी प्रत्येक लेखनप्रकारांतर्गत काही विषय दिले होते. ठराविक विषयावर लिहायचं असल्यानं मुलांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या आवडीच्या विषयावर केलेलं लेखन पाठवायला वाव नव्हता. त्यामुळे कदाचित कमी प्रतिसाद येईल की काय अशी भीती होती. पण प्रत्यक्ष प्रतिसाद उत्साह वाढवणारा होता. यावेळी एकूण २०८ मुलांनी आपलं लेखन पाठवलं, एकूण २२ एक वेगवेगळ्या जिल्ह्यातून, ६३ शाळांतून लेखन आमच्यापर्यन्त पोचलं. दिलेल्या विषयावर इतक्या मुलांनी या निमित्ताने विचार केला, त्याबद्दल इतक्या शाळांत/घरांत बोलणं झालं आणि प्रत्यक्षात ते लेखन झालं याचं समाधान मोठं आहे. कित्येक शिक्षकांनी, सामाजिक संस्थांनी मुलांना लिहायला उद्युक्त केलं. आलेल्या प्रतिसादात मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणाच्या बाहेरूनही खूप मुलांनी (जवळजवळ ५०%) लेखन पाठवलं. शहरी मोठ्या कॉर्पोरेट शाळा, प्रयोगशील शाळा, समांतर शिक्षण देणाऱ्या संस्था, शाळेनंतर वस्त्यांवर वर्ग घेणाऱ्या संस्था, जिल्हा परिषद शाळा, खाजगी अनुदानित ग्रामीण शाळा, आदिवासी भागात काम करणाऱ्या संस्था अश्या वेळवेगळ्या ठिकाणाहून लेखन आलं ही आनंदाची गोष्ट. याचं प्रतिबिंब यावेळच्या निकालातही आपोआप दिसून येतं आहे.

आता लेखनाच्या दर्जाबद्दल सांगायचं, तर गेल्यावर्षीपेक्षा यंदा लेखन विषयाला धरून, विचारपूर्वक केलेलं वाटलं. त्यासाठी घेतलेले कष्ट बऱ्याचदा दिसून येत होते. मात्र अजूनही अनेकांनी 'निबंध' लिहिले आहेत. कथा लेखन, ललित लेखन, अनुभव लेखन वगैरे लिहिताना काही फरक असतो हे मुलांपर्यंत अजूनही फारसं पोचलेलं दिसलं नाही. यावेळी सर्वाधिक संख्येने कथा किंवा कल्पनाविस्तार या प्रकारातले साहित्य आले. त्यातही 'पाळलेला प्राणी सोडून गेल्यानंतर', 'मला शिक्षा झाली तेव्हा...', 'आमच्या शेजारचं बाळ' या तीन विषयांवर विपुल लेखन आलं. पैकी, 'पाळलेला प्राणी सोडून गेल्यानंतर' या विषयातलं बहुतेक लेखन हे तो प्राणी आपल्याला किती आवडतो आणि तो असताना आम्ही किती खेळायचो आणि मजा करायचो या स्वरूपाचं आहे. प्रत्यक्षात त्या प्राण्यांचं जाणं आणि त्यानंतर आपल्यात, आपल्या कुटुंबियांत किंवा एकूणच वातावरणात झालेले बदल क्वचितच कुणा मुलांनी टिपले आहेत. वारी किंवा मोबाइल गेम्स अशा विषयांवर लिहितानाही उत्स्फूर्तपणे सहज लेखन करण्याऐवजी निबंध स्पर्धेत जसं लिहिलं जातं तशा प्रकारचं - वारीची माहिती सांगणारं, वर्णन करणारं किंवा मोबाइल गेम्समुळे होणारी हानी अशा स्वरूपाचं लेखन बहुतेकांनी केलं आहे. वारीतला स्वत:चा अनुभव, एखादी घटना, आपल्याला दिसणाऱ्या गमती किंवा आपल्याला मोबाइल खेळ का आवडतात किंवा आपडत नाहीत अशा स्वरूपाचं लेखन फारसं कुणी केलेलं नाही. अनुभव लेखनात आलेला 'अनुभव' ही सर्वात महत्त्वाची गोष्ट अनेकांच्या लेखनात नव्हती. या लेखनाच्या तुलनेत प्रशांत सोनी यांच्या चित्राला धरून केलेल्या लेखनात मात्र मुलांनी कल्पनेचे वारू छान उधळू दिले आहेत. या प्रकारात लेखन खूप कमी जणांनी केलं पण जे आलं आहे ते रंजक, कल्पक आणि रसदार आहे.

अर्थातच यातील त्रुटींचा दोष एकट्या मुलांचा नाही. त्यांना सातत्याने वेगवेगळे विषय देऊन त्यावर निबंध लिहिण्याचे साचे (टेंप्लेट) उपलब्ध करून देणारे काही शिक्षक, काही गाईडस आणि पालक यांचाही यात मोठा वाटा आहे. मुळातच आपल्या अनुभवांना मांडणं, एखाद्या कथेची कल्पना करणं, कथेचा घाट कसा आहे, त्यात पात्रं कोणती आहेत् वगैरे चर्चा वर्गात होणं हे क्रमिक शिक्षण, प्रश्नोत्तरं आणि धडे शिकवण्यापेक्षाही महत्त्वाचं आहे असं जेव्हा लोकांना पटेल तेव्हा काही बदल दिसतील असं म्हणावं लागेल. मुलांना अधिकाधिक सकस लेखन वाचायला मिळेल, त्यातलं सौन्दर्य कुणीतरी उलगडून दाखवेल तितकं मुलांच्या लेखनातही त्याचं प्रतिबिंब दिसेल.

अर्थात चित्र पूर्णत: नकारात्मक नाही. याही वेळी कित्येकांनी खूप छान लेखन केलं. इथे दिसणाऱ्या या नावांव्यतिरिक्त, आणखी पन्नास एक मुलांचं लेखन सर्वसाधारण लेखनापेक्षा चांगलं (अबव्ह अॅवरेज) होतं. पण त्यातही लेखन शैली, भाषा, वाक्यरचना, सहजता आणि कल्पकता या गोष्टींचा एकत्रित विचार करून हे विजेते काढले आहेत.

सगळ्या विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

येत्या काळात या विजेत्यांची एक अनुभवशाळा पुण्यात संपन्न होईल. त्यात या चांगलं लेखन करणाऱ्या मुलांना जगभरातल्या बालसाहित्याचा, चित्रांचा, इतर काही कलाकृतींचा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असेल, शिवाय माधुरी पुरंदरे आणि वसीम मणेर या मुलांना मार्गदर्शन करतील जेणेकरून त्यांना आणखी चांगलं लेखन करायला सुयोग्य दिशा मिळू शकेल.

ज्यांची नावं या यादीत नाही, त्यांनी हुरूप न सोडता पुढल्या वर्षी पुन्हा प्रयत्न करू या.