आजी - आजोबांच्या वस्तु ५: शिवणयंत्र

आजी - आजोबांच्या वस्तु ५: शिवणयंत्र
लेखन: ऋषिकेश

 

काल मी आजी बरोबर फुलं वेचायला गेलो होतो, नंतर देवळातही गेलो. आजीने त्या वेलीवरच्या गुंजादेखील दाखवल्या. मस्त लाल चुटुक गुंजा! मी काही शेंगा तोडल्या आणि खिशात भरल्या. शाळेत बाईंना दाखवणार आहे.

मी खूश होतो, कारण आजी म्हणाली, "आज कदाचित आपले ब्रह्मकमळ फुलणार आहे." हे फूल कधीतरीच उगवते म्हणून ते बघायला मी सुट्टी असूनही आज घरातच थांबलो होतो. पण ती कळी उमलतच नव्हती; आई म्हणाली, "जा आधी, हात पाय धुऊन घे आणि उपमा खायला बस. ती कळी संध्याकाळी उमलेल. उगाच तिच्या शेजारी बसून राहू नकोस."
मग काय तिथे थांबण्यात उपयोग नव्हताच. मी उठणार इतक्यात, मला खिशातल्या गुंजांची आठवण झाली. मी खिशात हात घातला आणि शेंगा बाहेर काढल्या. पाहतो तो काय! बर्‍याच शेंगांमधल्या गुंजा हरवल्या होत्या. मग कळलं की माझ्या चड्डीचा खिसा थोडा उसवला होता.
आजी म्हणाली "जा सुई-दोर्‍याचा डबा घेऊन ये. शिवून टाकूया."
"काय हो आई, या शिवण्यावरून आठवलं, घरचं चालू आहे का शिवणयंत्र?" आईने आजीला विचारलं
"नाही गोऽ बर्‍याच महिन्यात हातही नाही लावलाय. आजकाल हे देखील तयार कपडे वापरायला लागल्यापासून काही गरजच पडत नाही"
"तू स्वतः कपडे शिवायची" मला एकदम मजा वाटली.
"सगळे कपडे नाही रे, पण पोलकी, यांचे सदरे, झालंच तर पिशव्या आणि हल्लीच्या मुलींना फॉल वगैरे लावून द्यायचे त्यावर."
"पिशव्या कशाला? गावात मिळत नाहीत पिशव्या?"
"आता प्लॅस्टिकव बंदी आली की नाही? त्यामुळे हल्ली बरेचजण बाजारात कापडी पिशव्या घेऊन जातात. तशाही, तुमच्या या प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणं चांगलं नाहीच. त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या गुरं खातात, विहिरींमध्ये-पाण्यात जातात, गटारांत जातात, पाणी साचतं. अगदी जमिनीत पुरल्या तरी जमीन खात नाही त्यांना!"
"मग तू आता नाही वापरत ते मशीन?"
"दमली रे आता आजी तुझी" असं म्हणून आजी गप्प झाली.

"चल रे जा बाहेर, आजोबा बघ काय सांगताहेत. इथे लुडबुड करू नकोस मध्ये"
आईने मला बाहेर पाठवलं. तसा मी हुशार आहे ते सुईंग मशीन मी गावाला गेलो असताना बघितलं आहे. पण मला ते चालतं कसं हे कळलंच नव्हतं.
"आबा, सुईंगमशिन चालतं कसं?"
आजोबा पेपर वाचत होते. तो बाजूला ठेवत ते म्हणाले "म्हणजे शिवणयंत्र!"
"तु बघितलं आहेस ना आपल्याकडचं यंत्र? आपल्याकडे जे यंत्र आहे ते जरा जुनं आहे. त्यावर शिवायला पायाने खालची फळी हालवत बसावी लागते. थांब तुला त्याच्या भागाचं चित्रच दाखवतो." असं म्हणून आजोबांनी मोबाईलवर हे चित्र दाखवलं

 

"तर हे शिवणयंत्र. याला एक खास पुढे भोक असलेली सुई वापरतात त्यात दोरा घातलेला असतो. हा दोरा इथे वरच्या रिळातून येतो. ही सुईच्या खालची चीर असलेली पट्टी पाहिलीस? याला हवंतर कपड्याची धावपट्टी म्हणता येईल. त्याच्या खाली अजून एक छोटंसं रीळ असतं त्याला बॉबिन म्हणतात. बॉबिनीवर मुख्य रिळावरच्या रंगाचाच दोराचा असतो. ही सुई या आतल्या उभ्या दांड्याला आणि तो एका आडव्या दांड्याला जोडलेला असतो. हे चित्र बघ म्हणजे समजेल तुला"


तसा मी हुशार आहे, तरी नक्की शिवलं कसं जातं हे काही मला कळलं नाही. पण आबा बोलतच होते, अगदी मन लावून.
"आता तू हे पॅडल वर खाली केलंस की हे चक्र पट्ट्यामुळे फिरतं हा आतला दांडा फिरतो. हा दांडा सुईला सतत वरखाली वरखाली हलवतो. कापडामागून बॉबिनीच्या दोर्‍याबरोबर गुंफली जाते आणि टाका बसतो. या धावपट्टी वरून आपण कापड पुढे पुढे न्यायचं नाहीतर सगळे टाके एकाच ठिकाणी पडून गुंताही होईल नी कापडही फाटेल."
"पण त्यात बॉबीनीचा दोरा कशाला हवा. आपण तर सुईने शिवतो त्याला एकच दोरा लागतो."
"यासाठी, एक ॲनिमेशन बघुयात आपण. पूर्वी मला माझ्या एका मित्राने फॉरवर्ड केलं होतं. हे बघ."
आबांनी मोबाईलवर एक फाइल उघडली. त्यात पुढील चित्र होतं:


"वॉव.!" आबांना काही सांगायची गरजच पडली नाही मला हे चित्र पाहूनच कळलं की टाका कसा पडतो.
आबांनी मात्र मला अजून थोडी माहिती शोधायला सांगितली. हे शिवणयंत्र कधी वापरात आले? सिंगर कोण होता? नंतर आलेले इलेक्ट्रॉनिक शिवणयंत्र कसे चालते?
तसा मी हुशार आहे. पण मी ही माहिती इंटरनेटवरून शोधणार आहे. दादाने शिकवलंय कसं शोधायचं ते. तुम्हीपण नक्की शोधा.

अरे हो विसरलोच, आमचं ब्रह्मकमळ देखील संध्याकाळी छान फुललं.

(क्रमश:)

-0-0-0-0-0-0-0-

आधीच्या भागात: टाईपरायटर

चित्रस्रोत: सर्व छायाचित्रेआंतरजालावरून साभार. सर्व चित्रे क्रिएटिव्ह कॉमन्स प्रताधिकाराअंतर्गत उपल्ब्ध आहेत