एक होती कळी (कविता)

एक होती कळी
लेखन: वैशाली सूर्यवंशी
चित्रं: रमा वायसे

एक होती कळी
वाऱ्यासोबत खेळलेली
खेळून खेळून दमलेली
गवतामधे निजलेली
दवामधे भिजलेली

मग आली थंडी
एक दिवस हुडहुडी
दोन दिवस फूडफुडी
तीन दिवस गुडगुडी
चार दिवस भुडभुडी
थंडी लागली वाढू
कळी लागली कुडकुडू

मेंढी मावशी आली होती तळ्याच्या रानात
मनसोक्त हुंदडली
भटक भटक भटकली
कळीजवळ मग निवांत बसली

कळीला दिसली मग मेंढीची लोकर
दे ना ग शिवून मला छानसा स्वेटर
एक दे कानटोपी, एक दे स्कर्ट
शिवून दे मला एक हातमोजांचा जोड

मेंढी फक्त हसली
काही नाही बोलली
कळी मग रुसली
गाल फुगवून बसली

मेंढीने सांगितलं किरणांच्या कानात
पळवा कळीच्या थंडीला जोरात
दवथेंबांना जरा काही सांगा
हिरव्यागार गवताला जरा छान सजवा

फुगलेल्या गालावर किरणांनी
मारली हळू एक टिचकी,
दवथेंबांवर मुकुट सोनेरी
रुसलेली कळी गोड हसली.
सोनेरी फूल मग झालं कळीचं
हिऱ्यांत रूपांतर दवथेंबांचं

मेंढी मावशी आता गात होती गाणे..
कोवळ्या उन्हासोबत ... सोनेरी फुलासोबत...
हजार हजार हिऱ्यासोबत ...
सजलेल्या गवतासोबत...

आली आली थंडी
एक दिवस हुडहुडी
दोन दिवस फूडफुडी
तीन दिवस गुडगुडी
चार दिवस भुडभुडी
थंडीच थंडी थंडीच थंडी