आठवण (कथा)

आठवण
लेखन: अश्विनी बर्वे
चित्र व संपादन: फारूक एस्. काझी 

शारदा आज हरवल्यासारखी झाली होती. तिची आई आज चालली होती. गावातली बरीच माणसं जाणार होती. आईने दिवाळीला लाडू केले होते. शारदा आईच्या आसपासच घुटमळत होती. आईने तिला स्वतःच्या मांडीवर बसवलं आणि तिला लाडू भरवला. आईच्या मांडीची ऊब लागून शारदाला रडू यायला लागलं. तिला आजचा दिवस उजाडूच नये असं वाटत होतं. आई घरात असली की किती मजा यायची. त्या दोघी मिळून सागरगोटे, नाहीतर चकलस खेळायच्या. मध्ये मध्ये आजीही यायची. हे सगळं आठवून शारदाला रडू यायला लागलं. पण रडू गिळून ती आईला म्हणाली,

“आयं, मी येवू का गं तुज्यासंगं? मी सगळं काम करीन.”
“मलाबी लय वाटतं गं तुला माज्याबरोबर न्यावं म्हणून, पण मी दिवसभर कामावर, मग तुला एकटीलाच रहावं लागन.”
“झोपडीपासनं तुला लांब जावं लागतं का?”
“व्हय, बरंच लांब. कधी कधी तेवढं अंतर चालत जावं लागतं. कधी कधी गाडी मिळते.”
“मी चालेन की, अगं माजं पाय अजिबात दुखणार न्हाईत.” शारदा म्हणाली. तिला आईबरोबर रहायचं होतं.
“असं करून कसं चालन? तुला साळंत गेलं पायजे, ती बुडवून चालणार न्हाई.” आई म्हणाली.
“तुजं पाय न्हाई का दुकत?” शारदाने विचारलं.
“न्हाई गं, पाय दुकून कसं चालन? आन मला चालायची सवय हाय आन मी पण मजा करत करत चालते.” आई हसत म्हणाली.
“म्हंजे कशी चालते तू? तू तर बैलगाडीत जाती ना?”
“आगं, बैलगाडी हरेक शेतापर्यंत जात न्हाई, तुम्हाला रस्त्यावर उतरून आत बक्कळ चालावं लागतं.”
“मग तुला त्यात मजा कशी येती? सांग की. आयं मला पण येऊ दे की तुझ्यासंगं.” शारदा परत म्हणाली.
“तू आता गप बस. मला सामान भरायला मदत कर चल,” आई शारदाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाली.
“शारदे, तू तुझं दप्तर नीट स्वच्छ धुवून ठेवलं ना?”
“व्हय, अगं त्यात पुस्तकंपण ठीवली.”
“ते बेस केलं. आनि बघ, रोज एकदाच पाणी आणत जा. नायतर लई दमणूक हुईल.” आईला शारदाची काळजी वाटत होती.
“अगं मी न्हाई दमत. म्हणून तर तुझ्यासंगं यायचं म्हणते.” शारदा आपला हट्ट सोडायला तयार नव्हती.
“पण आयं, तू दमतच असशील की? मग तू चार-पाच महिने कशी राहणार?”
आईने शारदाला आपल्या जवळ घेतलं आणि तिची पापी घेत म्हणाली.
“आगं मला काम करायची सवय हाय. दमून कसं चलन. घर चालवायचं तर पैसा पाहिजे. तुला शाळा शिकवायची हाय.”
“मग तुला माझी आटवन येत न्हाई का?” शारदाने विचारलं.


“येती की. माझी गुणाची बायडी. लय आटवन येती. पण काम तर करायलाच पायजे.”
“मग आटवन आल्यावर तू काय करती?” शारदाला हे जाणून घ्यायला फार आवडायचं. तिची आई ते इतकं रंगवून सांगायची की शारदा ते सगळं पुन्हा पुन्हा आठवून त्यात रमून जायची.
“आगं मी रोज पाटं उठते ना कामाला जायाला तवा तुलाच हाक मारते. शारदे ऊठ, आवरून घे.” असं म्हणून आई हसली.
“पण मी तर तितं नसते ना?”
“व्हय,पण मला वाटतं तू माझ्या आजूबाजूलाच हाईस. माज्या जवळ झुपलीय.”
'“मग तू उटून काय करती?”
“मग मी पाणी आणते, ते लांबनं, हापश्यावरनं आणावं लागतं. तवा आजूबाजूच्या पोरी येत्यात पाण्याला. त्यांना बगून तुजी आटवन येती. मग मी लई खुश होती बग.”
“ते का?”
“आगं त्या पोरीसुदा तुझ्यासारकं आईला मदत करतात. मग तर तूच माज्याजवळ हाय असं मला वाटतं.”
“आयं, आजी मला लवकर उटायला हाक मारती ना, तवा मलापण असंच वाटतं. आजीच्या हातात पण लय जादू हाय.”
“व्हय गं, खरं हाय तुजं. म्हातारी लय खमकी हाय.” आईच्या डोळ्यात कौतुक दाटलं होतं.
“माजी आटवन आल्यावर तू अजून काय काय करतीस?”
“मी तुला आवडत्यात तशा छोट्या छोट्या भाकरी करते आणि लसनाच्या चटणी बरोबर खाते. तवा ती भाकरी लय गोड लागते.”
“आयं, मला पण आजीनं भाकरी शिकवल्यात. चांदक्या.”असं म्हणून ती गोडसं हसली.
“माजी शाणी बायडी! आजीकडं आणि बाळाकडं लक्ष देशील का?” आई म्हणाली.
“व्हय गं! तुला आजून काय आटवतं तिथं?” शारदा आपला मुद्दा सोडत नव्हती.
“तुला वाचायला आलं तवा तू मला वाचून दाकवलेली कविता,

उटा उटा चिऊताई,
सारीकडं उजाडलं,
डोळं तुमचं मिटलेलं,
अजूनबी.

“तुला अजून आटवती ती कविता?”
“व्ह्य तर, तुला वाचतांना बघून माज्या आन तुज्या आजीच्या डोळ्यात पानी आलेलं.” आई हे म्हणताच शारदानं परत आईला मिठी मारली.
“आयं, मी तुज्यासंगं पुस्तक घिवून येती की, तुला लय लय वाचून दाकवीन.” शारदा म्हणाली.
“आगं, तुला लय लय वाचायला मिळावं, शिकायला मिळावं म्हणून तर सगळा आटापिटा. तुला शाळेला दांडी मारून कसं चालन?” आई म्हणाली.
“काय  गं आयं.” शारदा रुसून बसली.
“शारदे तुला माहित हाय का, मला अजून काय काय आटवतं ते?” आई शारदाचा मूड बदलावा म्हणून म्हणाली.
शारदाने “च्यॅक!” केलं. 
“तू कशी भितीवर चित्रं काडते, आजीला पाडं शिकवती.” आई कौतुकानं हसली.
“मंजे मी म्याडम होऊ का?”
“तुला जे होऊ वाटतं ते हू” आई म्हणाली.
“आयं, तू बगितली का गं साकर तयार होताना?”
“व्हय, एकदा आम्हांला मुकादमानं तिथं नेलं होतं. आगं ती गरम गरम साखर खायाला लय मजा येती. म्या बाय बकानं भरलं नुसतं!”
“आमची सहल जाणार हाय. तवा मी पण खाऊन बगीन.” शारदा पुढे म्हणाली, “आयं, खरंच का गं तुला माजी सारकी आटवण येती?”
“व्हय तर, आगं म्या तिथं कामात  असले तरी सारका तुजाच इचार करते. आज साळंत तू काय शिकली असशील? कसं वाचत असशील? आणि तुजा आवाज माझ्या कानात येतो. आणि माजं मन भरून येतं. हात सपासप कामाला लाग्तेत. तू शिकाय पायजे. एवडं एकच मोटं सपान हाय माझं.” शारदा आईच्या मांडीवर बसली आणि तिच्या गळ्यात हात घालून म्हणाली, “मी तुज्यासंगं आल्यावरबी शिकणारच की.” शारदा म्हणाली.
“तितं नुसतं राबवं लागतं पोरी. तू इतंच बरी हाय. आता उट. निगायची येळ झाली. माणसं आली असत्याल.”

शारदाला माहीत होतं की आता आईची निघण्याची वेळ झाली आहे. ही वेळ कधीच येऊ नये असं तिला वाटत होतं. पण गावातले सगळे लोक चौकात जमा झाले होते. आईला हाका मारत होते. काही लहान बाळं आयांबरोबर जाणार होती, शाळेत जाणाऱ्या काही मुलीसुद्धा आईबरोबर बाळांना सांभाळायला जाणार होत्या. पण आईनं  शारदाला ऊसतोडीसाठी कधीच नेलं नव्हतं. तिने शिकलं पाहिजे हा आईचा हट्ट होता आणि शारदालासुद्धा शाळा आवडत असे. शारदाने आईला मिठी मारली आणि म्हणाली, “तुला माहित हाय ना इकडे येतांना काय आटवायचं ते?”
आई शारदाकडे बघत हसली आणि म्हणाली, “न्हाय ओ म्याडम, काय ते तुमीच सांगा”
“तुजी शारदी तुजी वाट बगतीय. लवकर लवकर यायचं” शरदाच्या डोळ्यात पाणी आलं. 
व्ह्य गं बाये, ही आटवन इसरल व्हय म्या? येती गं बाये. म्हातारे पोरीची काळजी घे.” 

आई पाठमोरी झाली. शारदा डोळ्यात पाणी घेऊन तिला निहाळत उंब-यावरच उभी राहिली. आईच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत.