अलफाजची दुर्बीण (कथा)

अलफाजची दुर्बीण
लेखन: समाधान पुजारी
चित्र: योगिता धोटे

“अरे मला काय पुजायला आणलंय का तुम्ही? इथं सोफ्याखाली नुसतं बसून बसून बोअर झालंय मला!” असं कोपऱ्यातून कुणीतरी बोलल्याचा आवाज आला. गजल आणि अलफाज अब्बूच्या पुस्तकांच्या रूममध्ये काहीतरी खटपट करत बसले होते.
इथं आपण दोघंच आहोत आणि मग तिसरं कोण बोलतंय म्हणून त्या दोघांनीही सोफ्याखाली पाहिलं, तर अलफाजला त्याच्या अब्बूनी वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून दिलेली दुर्बीण जांभई देत होती. ते बघून गजल जाम घाबरली आणि “अब्बू, अब्बू” ओरडत तिने तिथून धूम ठोकली.

अलफाज घाबरला नाही. तो दुर्बिणीला म्हणाला, “तू तर निर्जीव आहेस, मग तरीपण कशी काय बोलतेयस ?"
“मग काय झालं! आम्हाला बोलू वाटलं तर आम्ही बोलायचं नाही का?”, दुर्बीण डाफरली.
“अगं तसं नव्हे. बोल तू. पण तुम्ही लोक बोलत नाही असं शिकलोय ना मी शाळेत.”

“असो. असो. पण मी बोलते हे फक्त तुझ्यामाझ्यात राहू दे. कुणाला हे समजलं, तर मी पुन्हा बोलणार नाही तुझ्याशी.”, दुर्बीण दबक्या आवाजात म्हणाली.

तेवढ्यात गजल अब्बूला घेऊन तिथे आलीच. “अब्बू, ये देको दुबीन बोलती.”
“येडी, दुर्बीण कभी बोलती क्या? कूच बी बोलती रेहती. हिप्पो बोलता. वो सजीव रेहता वासते. दुर्बीण निर्जीव रेहती. वो नही बोलती.” असं बोलून अलफाज मोठमोठ्याने हसू लागला.

“मेरी येडी ढुमशी” म्हणत अब्बूनी तिला उचलून घेत तिची एक पापी घेतली. गजलने ती तशीच एका हाताने पुसली आणि कड्यावरून निसटून अम्मीकडे पळाली. तिला पकडायला अब्बूपण तिच्या मागे पळाला.
इकडे दुर्बिणीने अलफाजला डोळा मारला.
दुर्बीण अलफाजला म्हणाली की, ‘आज रात्री आठ वाजता मी तुला चंद्र दाखवते. त्यामुळे लवकर लवकर जेवण कर आणि ये.’

अलफाज बरोबर आठ वाजता दुर्बीण घेऊन अंगणात आला. त्याने तिचं तोंड चंद्राकडे केलं. आज पौर्णिमा होती. दुर्बिणीतून चंद्र अजूनच जवळ दिसत होता. चंद्रावरचे पर्वत, डोंगर सगळं सगळं अगदी जवळ दिसत होतं. हे सगळं बघून अलफाज जाम हरखला होता.
“मजे बी देकना, मजे बी देकना.” म्हणत गजल तिथे आलीच.
अलफाजला बाजूला ढकलून तिने डावा डोळा बंद केला आणि तो दुर्बिणीला लावला.
“अरे भय्या, चांद पे तो रात हुई. देक तो कितना अंधेरा है.” - गजल बंद केलेलाच डोळा दुर्बिणीला लावून बोलत होती.
“अग येडी, खुली आख लगा दुर्बीणको. बंद आख बाहर रख.” , अलफाज गजलला समजावत म्हणाला.
“जाने दे बाबा. मुजे नै देकना चांद. मैं जाती टीवी देकती.”, म्हणत गजल तिथून सटकली. दुर्बीण आणि अलफाज दोघेही हसले.
दुर्बीण अलफाजला म्हणाली, “इथे बघ खाली, मला दोन बटन आहेत. एक लाल आणि एक हिरवं. त्यातलं लाल बटन दाबलंस तर तुला चंद्र अजून जवळ दिसेल.”

अलफाजने दुर्बिणीला डोळा लावला आणि लाल बटन दाबलं. तसं तो दुर्बिणीमधून आतमध्ये खेचला गेला आणि काही कळायच्या आत डायरेक्ट चंद्रावर जाऊन पडला. दुर्बीण जादूची होती. त्या दुर्बिणीला लहान मुलं अजिबात आवडत नव्हती. लहान मुलं तिला कशीही फिरवायची. तिचे स्क्रू लूज व्हायचे मग. त्यामुळे तिची मान खूप दुखायची. अलफाज आणि गजलने तिचे खूप हाल केले होते. आणि तिला सोफ्याखाली टाकून दिले होते. त्यांना शिक्षा म्हणून त्यांना कायमचं सरळ चंद्रावरचं पाठवायचं असं तिनं ठरवलं होतं.

चंद्रावर आल्यामुळे अलफाज जाम खुश झाला. त्याने चंद्राबद्दल खूप काही वाचलं होतं. चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरतो. त्याच्यामुळे पृथ्वीवरचं हवामान संतुलित राहतं शिवाय समुद्राला भरती-ओहोटी चंद्रामुळेच येते. पृथ्वीवरच्या सजीवसृष्टीसाठीही चंद्र खूप महत्वाचा आहे हेही त्याला माहित होतं.

इकडे अलफाज कुठे दिसेना म्हणून घरातल्यांची सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. अम्मी, अब्बू, अम्माजी, अब्बाजी सगळे मिळून त्याला इकडे-तिकडे, शेजारी-पाजारी शोधू लागले. सगळ्यांना जाम टेन्शन आलं होतं.

इकडे गजलला माहीत होतं की अलफाज दुर्बिणीतून चंद्र बघत होता ते. ती दुर्बिणीजवळ आली आणि दुर्बिणीला म्हणाली, “ए दुबीन, भय्या कहा है बता?”

आता ही पण तावडीत सापडलीय हे दुर्बिणीला कळलं.
“तुमारे भय्या को मैं चांद भेजी. एक काम करो. तुम बी चांद जावो और तुमारे भय्या को ले आवो”, दुर्बीण म्हणाली.
“वो भय्या चांद पे केसे गया? बताव.”, गजलने विचारलं.
“ये मेरा लाल बटन दबावो तो तुम भी चांद जावोगी.”, दुर्बीण धुर्तपणे म्हणाली.
“रुको जरा. मेरी किट्टूको बी ले के आती मैं. उसे बी चांद दिकाते”, गजल दुर्बिणीला म्हणाली.
किट्टू म्हणजे गजलची मांजर. ती दूध पिऊन एखाद्या आडोशाला निवांत ताणून द्यायची. मग तिला शोधण्यात गजल आणि अलफाज या दोघांचेही तास दोन तास जायचे. तरीही ती सापडायची नाही. आणि मग भूक लागली की हळूच कुठूनतरी बाहेर यायची. मग तिचे खूप लाड व्हायचे. परत दूध प्यायला मिळायचं. दूध पिऊन परत कुठेतरी ती लपून बसायची. हा लपंडाव अगदी दिवसभर चाललेला असायचा.

तिकडे घरातले सगळेजण अलफाजला शोधत होते तर इकडे गजल किट्टूला. शेवटी तिला किट्टू बेडच्या खाली सापडलीच. दुर्बीण, अलफाज सगळं विसरून ती किट्टूसोबत खेळत बसली. तिने किट्टूला दूध पाजलं. किट्टूसाठी बॉक्सचं घरसुद्धा बनवलं होतं. तिने किट्टूला त्या घरात ठेवलं. पण किट्टू काय घरात बसली नाही. ती अंगणात पळाली. तिच्यामागे गजलपण पळाली. किट्टू दुर्बिणीजवळ येऊन खेळू लागली. गजलने तिला पकडलं आणि “रुक तेरेकू चांद दिखाती” म्हणाली.

दुर्बिणीने आपल्याला कुठलंतरी बटन दाबायला सांगितलं होतं पण कुठलं ते नक्की तिला आठवेना. तिने किट्टूला दुर्बिणीच्या तोंडाशी धरलं आणि हिरवं बटन दाबलं.
हिरवं बटन दाबलं तसा अलफाज चंद्रावरून दुर्बिणीत माघारी खेचला गेला आणि सरळ येऊन अंगणात पडला. त्याला बघून गजल “अब्बू अब्बू” ओरडत पळाली. तिने अब्बूला पळतच जाऊन सांगितलं की 'भय्या मिल गया.'

अलफाजला बघून सगळ्यांच्या जीवात जीव आला. अब्बूने त्याला कुठे गेलता म्हणून विचारलं तर तो म्हणाला की ‘चंद्रावर गेलो होतो.’
“झुठी बाता करेंगा तो मारंच खायिंगा.”, अब्बू ओरडला.
“अरे सच में अब्बू. गज्जोसे पुछो.”, अलफाज म्हणाला.

“अब्बू, चलो ना. मेरेकू निंद आयी. ए दुबीन खराब है. इस्से कूच नहीं दिकता.” गजल अब्बूला घेऊन झोपायला गेली.

इकडे गजलमुळे आपला प्लॅन फ्लॉप झाला म्हणून दुर्बीण चांगलीच चिडली होती. अलफाज तर चंद्रावर जाऊन आला होता तरीपण त्याच्यावर कुणी विश्वास ठेवला नाही. अलफाजने दुर्बीण गुंडाळून परत सोफ्याखाली सरकवली. कपाटातलं एक पुस्तक काढून त्यात ग्रहांबद्दल दिलेली माहिती वाचू लागला. उद्या प्लूटोवर जायचं असं त्याने ठरवलं. पुस्तक वाचत वाचत त्याला तिथेच गाढ झोप लागली.