छोटी मुलगी आणि हंस (गोष्ट)

छोटी मुलगी आणि हंस
अनुवाद व चित्रे: अंजोर वृषाली आनंद (इयत्ता सहावी, अक्षरनंदन)
मूळ कथा: रशियन लोककथा | इंग्रजी अनुवाद: ईरीयन झ्हेलेझानोवा | पुस्तक: आल्योनुष्का (Alyonushka) | प्रकाशन: रादुगा पब्लिशर्स

कोणे एके काळी एक लाकूडतोड्या आणि त्याची बायको होती, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती.
“मुली”, आई नि तिच्या मुलीला हाक मारली, “आम्ही कामासाठी बाहेर चाललो आहोत, तर तुझ्या धाकट्या भावावर लक्ष ठेव. जर एका शहाण्या मुलीप्रमाणे रस्त्यावर खेळायला न जाता तुझ्या भावावर लक्ष ठेवलंस, तर आम्ही येताना तुला नवीन रुमाल आणू.”
आई बाबा कामाला गेले आणि मुलगी सगळे विसरून भावाला गवतावर बसवून रस्त्यावर खेळायला गेली. तेवढ्यात तिथे काही हंस उडत आले आणि त्यांनी भावाला उचलून नेलं.
मुलगी घरी आली आणि अरेच्च्या! भाऊ गायब झालेला. तिने सगळीकडे शोधलं, पण तो कुठेच सापडला नाही. तिने त्याला हाक मारली, पण त्याचं उत्तर नाही आलं. ती बाहेर आली तेव्हा दूरवर काही हंस उडत होते. तिला माहीत होतं की त्यांनीच तिचा भाऊ नेला होता. शेतकरी म्हणायचे की, हंस लहान मुलांना पळवून नेतात! म्हणून मुलगी त्यांच्या मागे पळायला लागली.

पळता पळता थोड्या वेळाने तिला एक ‘ओव्हन’ दिसला. तोपर्यंत ते हंस तिच्या नजरेआड गेले होते.
“ओव्हन, ओव्हन, ते हंस कुठे गेले ते सांग ना रे, प्लीज”
“आधी माझे क्रीम केक खा, मग मी तुला सांगेन” ओव्हन म्हणाला.
“काय? क्रीम केक? घरी तर आम्ही केक पण खात नाही.” मग त्याने तिला सांगितलं नाही.

ती परत पळायला लागली. पळता पळता थोड्या वेळाने तिला एक सफरचंदाचे झाड दिसलं.
“झाडा, झाडा ते हंस कुठे गेले ते सांग ना रे, प्लीज.”
“तू आधी माझी जंगली फळे खा.”, झाड म्हणाले.
“घरी आम्ही साधी फळे पण खात नाही, तर जंगली काय?”
मग झाडाने तिला हंस कुठे गेले ते सांगितलं नाही.

ती उदास होऊन चालायला लागली. चालता चालता थोड्या वेळाने तिला एक दुधाची नदी दिसली.
“दुधाची नदी, दुधाची नदी मला ते हंस कुठे गेले ते सांग ना गं, प्लीज.”
“आधी तू माझं थोडं दूध पी मगच मी सांगेन.”, नदी म्हणाली.
“घरीतर आम्ही दूधही पीत नाही.”
म्हणून दुधाच्या नदीने तिला काहीही सांगितलं नाही.

मुलगी खूप वेळ पळत राहिली. आता दिवस मावळायला आलेला. तिला आता घरी जायलाच पाहिजे होतं. पण आणखी एकदा बघण्यासाठी ती निघाली. थोड्या वेळातच तिला दूरवर एक झोपडी दिसली. झोपडीला एकच खिडकी होती. झोपडीच्या आत बाबायागा* गोलगोल फिरत होती आणि बाहेर तिचा छोटा भाऊ खेळत होता. मुलगी झोपडीच्या आत गेली.

“शुभ संध्या, आज्जी.” ती म्हणाली.
“शुभ संध्या, मुली. इकडे का आलीस?” बाबायागा म्हणाली.
“मी अख्खा दिवस फिरते आहे आणि माझा फ्रॉक खूप ओला आहे, म्हणून कोरडी व्हायला आले.” मुलीने सांगितलं.
“आधी बसून घे, मग गोल गोल फीर.” बाबायागा म्हणाली.

बाबायागाने मुलीला खीर दिली आणि स्वतः बाहेर गेली. अचानक एक छोटा उंदीर सोफ्याखालून बाहेर आला.


“तू मला थोडीशी खीर दे, मग मी तुला काहीतरी महत्त्वाचं सांगेन.”, उंदीर म्हणाला.
मुलीनी त्याला थोडी खीर दिली. खीर खाऊन उंदीर म्हणाला, “बाबायागा वटवाघुळाच्या घरामध्ये उजेड करायला गेली आहे. ती घरी आल्यावर तुला बांधून ठेवेल आणि नंतर तुझ्याकडून खूप काम करून घेईल आणि तुला खूप त्रास देईल. तुझ्या भावाला पण हे सगळं करायला लावेल.”
मुलगी भीतीने अर्धमेली होऊन बसली. तिने हुंदका दिला. उंदीर पुढे म्हणाला,“एक काम कर, पटकन तुझ्या भावाला घेऊन पळून जा. मी तुझ्यासाठी फिरत बसतो.”

थोड्या वेळाने बाबायागा आली. तिने बाहेरूनच विचारलं “फिरतेयस का अजून?”
उंदीर म्हणाला, “हो आज्जी.”
बाबायागा आत आली आणि तिला कळलं की झोपडी रिकामी आहे. ती म्हणाली, “हंसांनो, जा त्यांना पकडून आणा पटकन.”

पळत पळत मुलगी आणि तिचा भाऊ दुधाच्या नदीपाशी पोचले आणि मुलगी म्हणाली, “नदी नदी, मला लपव.”
“आधी माझं दूध पी.”, नदी म्हणाली.
मुलगी दूध प्यायली आणि नदीने त्यांना लपवलं. हंसांना ते दिसलेच नाही. ते नदीजवळून उडून गेले.

ते दोघं नदीबाहेर पडून पळायला लागले. तेव्हा हंस त्यांच्या मागे लागले.
मुलगी सफरचंदाच्या झाडाला म्हणाली, “झाडा, झाडा, मला लपव.”
“आधी माझी फळं खा.”, झाड म्हणालं.
मुलीनी फळ खाल्लं आणि झाडाने त्यांना लपवलं. हंस जेव्हा झाडाकडे आले तेव्हा त्यांना ते दिसले नाहीत आणि ते पुढे निघून गेले.

मुलगी आणि भाऊ झाडाबाहेर येऊन पळायला लागले, तेव्हा हंस त्यांच्यावर चाल करून आले. पळत, पळत ते दोघं ओव्हनकडे पोचले.
“ओव्हन ,ओव्हन, लपव ना मला!”, मुलगी म्हणाली.
“आधी तू माझे क्रीम केक खा” ओव्हन म्हणाला. मुलीने केक खाल्ला आणि ओव्हनने त्यांना लपवलं. परत हंसांना ते दिसले नाही. मग हंस कंटाळून बाबागायाकडे निघून गेले.

मुलगी आणि भाऊ घरी गेले आणि थोड्याच वेळात त्यांचे आई-बाबापण घरी आले. आणि नंतर ते खूप आनंदात राहिले.

 

---०००----

 

बाबायागा ही रशियन लोककथेत असणारी एक चेटकीण आहे.