अमेझॉनची झळ पुण्यापर्यंत

अमेझॉनची झळ पुण्यापर्यंत 

चित्रं: इयत्ता ५वी, ६वी चे विद्यार्थी, अक्षर नंदन शाळा, पुणे

संकलन आणि मार्गदर्शन: आभा भागवत

अक्षरनंदन शाळेमध्ये ५ वी आणि ६ वी च्या चित्रकलेच्या तासांना आम्ही - सध्या घडणाऱ्या काही जागतिक घटनांची चर्चा, माहिती आणि त्यावर चित्रातून प्रतिसाद असा विषय काही वेळा घेतो. अमेझॉन जंगलाचा प्रचंड मोठा भाग दोन आठवडे जळल्यामुळे जागतिक पर्यावरणाचा जो ऱ्हास झाला आहे, तो भरून काढणं सोपं नाही. मुलांना नकाशा दाखवून वर्गात सांगितलं की नेमका किती भाग जळला, तो औद्योगिकरणासाठी जाळला, तिथे प्राणी, पक्षी, झाडं, आदिवासी यांचे खूप हाल झाले. शेवटी आग विझवायला सैन्याची मदत घ्यावी लागली. जगातला जवळ जवळ २२% ऑक्सिजन त्या जंगलातून निर्माण व्हायचा.

चित्रकलेच्या तासाचा हेतू फक्त चर्चा करणं, खूप माहिती देणं हा कधीच नसतो. त्यापेक्षा मिळालेल्या, ऐकलेल्या आणि कल्पना केलेल्या विविध घटकांवर चित्रातून अभिव्यक्त होणं हे जास्त महत्वाचं असतं. मुलं फक्त प्रश्न विचारून थांबतच नाहीत, त्यांना उत्तरंही शोधायची असतात. मुलांना खूप प्रश्न आणि अनेक उत्तरं मांडायची होती. प्रक्रियेच्या ओघात ती चर्चा झाली, त्याचा आम्हा सगळ्यांवर परिणाम झाला आणि त्या परिणामाची झळ चित्रातून आम्ही कागदावर उतरवली. काहींना खूप वाईट वाटत होतं, काहींना स्वतःच्या मनात उपाय शोधल्याचा आनंद होत होता. काहींना ही घटना खरी असू शकते याचा हादरा बसला होता आणि त्यांनी जळण्यापूर्वीचं जंगलाचं चित्र काढलं. अनेकांनी जळतानाचं आणि जळून खाक झालेलं जंगल काढलं.

एवढ्या छोट्या मुलांना इतकी भयावह सत्य घटना सांगून घाबरवून टाकणं हा नक्कीच हेतू नव्हता. पण अमेझॉन जळणं ही जगात कोणीही दुर्लक्ष करण्यासारखी घटनाच नाही! त्या निमित्ताने मुलांची संवेदनशीलता, सर्जनशीलता वेगळ्या मार्गाने काम करू लागते. चित्र पाहून प्रेक्षकांनाही ती झळ पोचेल आणि एवढी छोटी मुलं पर्यावरणीय सत्यकथेवर चित्रातून काय विलक्षण दृश्य निर्माण करू शकतात याचं कौतुकही वाटेल. चित्रांबद्दल काही लिहिणं आवर्जून टाळलं आहे कारण चित्र ही बघण्याची गोष्ट आहे, बोलण्याची कमी. प्रत्येक प्रेक्षकाने स्वतःच्या मनाप्रमाणे चित्रांचा आस्वाद घ्यावा, अशी अपेक्षा आहे.

- आभा भागवत

मुलांनी काढलेली चित्रं पाहण्यासाठी घेण्यासाठी पुढिल व्हिडिओ फुल स्क्रीन मोडमध्ये सुरु करा. डेस्कटॉप/लॅपटॉपच्या मोठ्या पडद्यावर अधिक तपशील दिसतील. मोबाईलवर बघत असाल तर लँडस्केप (आडव्या) स्क्रीननवर बघितल्यास जास्त तपशील दिसतील: 

 

 

विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रं  प्रकाशित करण्यासाठी अटकमटकवर विश्वास दाखवल्याबद्दल आभाताईंचे विशेष आभार.