अंतराळातील संकट (कथा)

अंतराळातील संकट

लेखनः विद्याधीश केळकर | चित्रेः चिनाब

या कथेची सुरुवात होते, २०३१ सालात. अमेरिकेच्या एका वेधशाळेमध्ये...

प्रा. अल्बर्ट मार्शल त्यांच्या निरीक्षणांमध्ये गुंग झाले होते. अमेरिकेतील आत्ताच्या घडीचे ते अतिशय प्रसिद्ध असे खगोलशास्‍त्रज्ञ होते. विशेषतः धूमकेतू आणि उल्कांचा अभ्यास हा त्यांचा आवडता विषय होता. धूमकेतूच्या कक्षेचा अंदाज बांधणे आणि त्याचा मार्ग ओळखणे यावरील अद्ययावत तंत्रांवर त्यांनी अनेक प्रबंध लिहिले होते. आत्ताही ते एका धूमकेतूचेच निरीक्षण करत होते. गेला महिनाभर ते या धूमकेतूचा अभ्यास करत होते. त्यांनी मांडलेली समीकरणं आणि गणितं ते पुन्हा पुन्हा तपासून पहात होते. त्यांच्या चेहर्‍यावर आता काळजी दिसत होती. त्यांच्या गणितानुसार त्या धूमकेतूची कक्षा पृथ्वीच्या कक्षेला छेदत होती. येत्या काही वर्षांत तो पृथ्वीवर आदळणार हे नक्की होते. मार्शल यांना काय करावे सुचेना. त्यांनी भराभर सर्व निरीक्षणे नोंदवली, आणि त्याच्या प्रती जगभरातील सर्व प्रमुख वेधशाळांना पाठवल्या आणि एक तातडीची बैठक बोलावली.

या बैठकीत जगभरातील सर्व प्रमुख वेधशाळांचे अध्यक्ष उपस्थित होते. म्हणजे ते सर्व काही एका ठिकाणी जमले नव्हते, तर सर्वजण आपापल्या देशातून व्हर्च्युअली उपस्थित होते. पण, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्क्रीन्सद्वारे ते आपल्या समोरच बसले आहेत असा भास निर्माण होत होता. प्रा.मार्शल यांनी थेट मुद्द्याला हात घातला. त्यांनी घेतलेली सर्व निरीक्षणे त्यांनी सविस्तरपणे या सर्वांसमोर मांडायला सुरुवात केली. अर्थात, सर्वांनी ती यापूर्वीच पाहिली आणि पडताळली होती, पण तरीही सर्वजण नीट कान देऊन ऐकू लागले.

"हा धूमकेतू -ज्याला मी ‘ल्युसिफर’ नाव दिलं आहे- येत्या ३२ वर्षांत पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. त्याचा एकूण आकार पाहता, तो पृथ्वीवर आपटला, तर बर्‍याच मोठ्या भागाला हानी पोहोचण्याची शक्यता आहे. हा पृथ्वीवर आदळेलच असेही नाही, पण तरीदेखील आपल्याला सर्वात वाईट परिणाम ग्राह्य धरूनच पुढील पावले उचलायला हवीत. माझ्याकडे आत्तातरी या प्रश्नाचं काहीही उत्तर नाही. माझ्यामते सध्यातरी ल्युसिफरची अजून सविस्तर निरीक्षणे घ्यावीत आणि त्याचा अजून खोलात अभ्यास व्हावा. त्यानंतर काय पावले उचलावीत हे ठरवता येईल."

या माहीतीने सर्वजण काही काळासाठी सुन्न झाले. सर्वजण विचारात गढून गेले होते. कोणालाच काही सुचत नव्हतं. काही वेळाने अमेरिकन वेधशाळेचे प्रमुख, डॉ. एडवर्ड हेस्टिंग्ज म्हणाले,"हे संकट भयानक आहे यात शंका नाही. पण यावर उपाय शोधण्यास आणखी अभ्यास हवा या प्रा. मार्शल यांच्या मताशी मी सहमत आहे."

"तुम्ही म्हणता ते बरोबर आहे डॉ. हेस्टिंग्ज. प्रा. मार्शल, हा धूमकेतू जर, पृथ्वीवर आपटला तर साधारण कोणत्या भागाला त्याचा सर्वाधिक धोका आहे? म्हणजे आपण तेवढा प्रदेश रिकामा करू शकतो, जेणेकरून जीवितहानी होणार नाही.", चीनचे डॉ. वेन चँग उद्गारले.

"डॉ. चँग, नक्की किती जीव तुम्ही त्या प्रदेशातून हलवणार? तिथल्या सर्व प्राणी अन पक्षांचे काय? नाही नाही, यावर केवळ परिसर रिकामा करणे हा मार्ग असू शकत नाही. काही तरी अजून ठोस उपाय हवा.", डॉ. हार्डी म्हणाले, "म्हणजे, समजा आपण तो धूमकेतूच नष्ट केला तर?"

"डॉ. हार्डी तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तो धूमकेतू आहे, एखादं खेळणं नाही की तुम्ही मनात येईल तेव्हा ते नष्ट कराल.", ऑस्ट्रेलियन वेधशाळेचे डॉ. डेव्हिस म्हणाले.

डॉ. हार्डी हसले. "माझ्या बोलण्याचा तुम्ही चुकीचा अर्थ घेताहात डॉ. डेव्हिस. मला माहीत आहे, की आपण धूमकेतू असा नष्ट करू शकत नाही, पण ते आज. आपल्याकडे अजून ३२ वर्षं आहेत. एवढ्या काळात अनेक गोष्टी बदलू शकतात. कोण जाणे कदाचित आपण यात सफल देखील होऊ." "माझी कल्पना तुम्ही ऐकून घ्या",हार्डी पुढे म्हणाले,"एखाद्या स्वयंचलित यानाद्वारे आपण हे घडवून आणू शकतो. त्यात फक्त मिसाइल्स असतील ज्यांचा स्फोट आपण पृथ्वीवरून घडवून आणू शकू."

"एकवेळ तुमची कल्पना मान्य जरी केली तरी स्वयंचलित यान इतक्या दूर पाठवण्यात बराच धोका आहे", डॉ. इव्हानोविच हार्डींना म्हणाले.

"मग मानव नियंत्रित यान पाठवू. निवडक माणसांची एक टीम तयार करू जी अंतराळ सफरीत मुरलेली असतील. जे त्या धूमकेतूला नष्ट करू शकतील किंवा त्याची कक्षा बदलतील.", इतक्या वेळ गप्प असलेला तरुण डॉ. विनायक चक्रवर्ती म्हणाला. सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. त्या सर्वांच्याच चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होतं. काहींच्या चेहर्‍यावर विनायकला वेड लागलं आहे असे भाव होते. "मानव नियंत्रित यान? कोण तयार होईल इतक्या दूर जायला?", डॉ. हेस्टिंग्जनी सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न विचारला.

"आपण इतक्या लांब यान पाठवू असं मी म्हणालोच नाही." विनायक हसत म्हणाला. सगळ्यांच्या चेहर्‍यावरच्या वाढत्या आश्चर्याकडे मजेत पहात  विनायक पुढे म्हणाला,"मी म्हणतो आहे, की धूमकेतूला आपल्याकडे येऊ दे. इतक्यात आपण काहीही करायची गरज नाही. जर ल्युसिफर पृथ्वीच्या कक्षेत येणार असेल तर त्याला मंगळ आणि गुरु मधला Asteroid Belt म्हणजे लघुग्रहांचा पट्टा पार करावाच लागेल हो ना? मग समजा त्यामधली एखादी शिळा त्याच्या मार्गात आली तर?"

"विनायक, तुझ्या वयाला आणि धडाडीला शोभेल असाच उपाय तू सुचवला आहेस. मला मान्य आहे.", डॉ. डेव्हिस म्हणाले. या त्यांच्या बोलण्यावर सर्वांनी पटल्याप्रमाणे माना डोलावल्या. पुढील सर्व बोलणी झटपट झाली. पुढील मोहीम आखली गेली. सर्व देशांना या मोहिमेची कल्पना देणार्‍या विस्तृत मेल रवाना झाल्या. सर्वांनी एकमताने विनायकला या मोहिमेचं नेतृत्व बहाल केलं. धूमकेतू  Asteroid Beltजवळ पोहोचेपर्यंत त्यांच्याजवळ २९-३० वर्षं होती. अर्थात मोहिमेसाठी लागणारी सर्व अद्ययावत यंत्रणा तयार करायला तेवढा वेळसुद्धा कदाचित पुरेसा नव्हता. वर्षभरातच सर्व सहभागी देशांच्या अध्यक्षांच्या परवानगी नंतर एकत्रितपणे सर्व हेवेदावे विसरून यान तयार करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली.  

सतत २५ वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर मोहिमेसाठीचं अवकाशयान तयार झालं. उड्डाणाला अजून जवळपास दोन वर्षं होती. विनायक चक्रवर्ती आता साठीचे झाले होते. आता मोहीम शेवटच्या टप्प्यात आली होती. सर्व प्रक्रियांना आता वेग आला होता. डॉ. चक्रवर्तींनी लगोलग यानाच्या चाचण्या सुरू केल्या. त्याचबरोबर मोहिमेवर जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या चाचण्यासुद्धा सुरू झाल्या. यातूनच आपले तीन शिलेदार निवडले गेले. नीरज, डेव्हिड आणि सेरा.

तिघांनाही अवकाश यात्रेचा अनुभव होता. हे साल होतं २०५६. मानवाने तंत्रज्ञानात आता भरपूर प्रगती केली होती. सामान्य माणसांना देखील आता अवकाश यानातून अवकाशयात्रा करून येता येत असे, अगदी बसमधून फिरल्याप्रमाणे. पृथ्वीच्या कक्षेतील अवकाशस्थानकांवर आता वसाहती उभ्या रहात होत्या. त्याचबरोबर चंद्रावरही वसाहत स्थापण्याची कामे चालू होती. नीरज हा अशाच एका अवकाशस्थानकावर काम करत असे. तर डेव्हिड आणि सेरा हे अमेरिकन जोडपं चंद्रावर वसणारे पहिले रहिवासी होते. त्यांनी जवळपास एक वर्ष चंद्रावर काढलं होतं आणि आता ते या मोहीमेसाठी पुन्हा पृथ्वीवर परतत होते. ‘मिशन ल्युसिफर’च्या हेडक्वार्टर्समध्ये या तिघांचं पुढील ट्रेनिंग सुरू झालं.

आणि अखेर तो दिवस उगवला, उड्डाणाचा दिवस. २८ मार्च २०५८. नीरज, डेव्हिड आणि सेरानी सर्वांचा निरोप घेतला आणि ते यानाकडे निघाले. तिघांच्या चेहर्‍यावर निश्चय दिसत होता, पण आतून मात्र तिघेही अस्वस्थ होते. एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. "चलो, आता पुढची तीन वर्षं हेच आपलं घर." डेव्हिड सेराकडे पहात म्हणाला. सेरा हसून म्हणाली,"हो, पण म्हणून इथेही घरातल्या सारखा दिवसभर काही न करता पडून राहू नकोस!" या तिच्या बोलण्यावर तिघेही खळखळून हसले. "आता इथेच बोलत बसणार आहात की आतही जायचंय? मला तर कधी एकदा यान उड्डाण करतंय असं झालं आहे" नीरज म्हणाला. "इतकाही उतावीळ होऊ नकोस, तुला वाटतोय तितका काही आपला प्रवास रोमांचकारक नसणार आहे. आपल्या अनेक अवकाश मोहिमांसारखीच ही पण." सेरा म्हणाली. "हे मात्र खरं नाही हं सेरा. आपण प्रत्येक अवकाश मोहिमेत थोडेच धूमकेतू फोडत फिरतो? काय?" डेव्हिड म्हणाला. तिघेही हसत हसत यानाच्या नियंत्रण कक्षात शिरले.

"हॅलो नीरज, डेव्हिड आणि सेरा! अ‍ॅझ्राएल-५ वर मी गिडियन तुमचं स्वागत करते.", यानाच्या AIने (कृत्रिम बुद्धिमता असणाऱ्या प्रणालीने) तिघांचं स्वागत केलं. "पुढील तीन वर्षांच्या प्रवासात मी देखील तुमच्यासोबत असणार आहे. तुम्हाला या काळात काहीही मदत लागली, तर तुम्ही मला निःसंकोच सांगू शकता. पुढील १५ मिनिटांत यान उड्डाण करेल, तुम्ही आपापल्या सीटवर बसून घ्या."

"धन्यवाद गिडियन!", तिघेही म्हणाले आणि सीटवर बसले. समोरच्या स्क्रीनवर काउंटडाऊन सुरू झाले. नीरजने डोळे बंद केले. डेव्हिड आणि सेरानी एकमेकांचे हात हातात घेतले.  १०...९...८...७...६...५...४...३...२...१...० आणि यानाने उड्डाण केले. हळूहळू वेग पकडत यानाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सुटण्याच्या वेगाला पार केले, आणि यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सुटून खुल्या अंतराळात दाखल झाले. "आपण आता खुल्या अंतराळात आहोत", गिडियनचा आवाज आला. तिघांनी डोळे उघडले. समोर मिट्ट काळे अवकाश पसरले होते. दूरवर तळपणारा सूर्य होता. हे दृश्य या तिघांनाही तसे नवीन नव्हते, पण तरीही ते त्या सुंदर दृश्याकडे काही काळ पहातच राहिले. "गिडियन, आम्ही सीटवरून आता उतरू शकतो का?",नीरजनी विचारलं. "हो, नक्कीच. यानात तुम्ही सहज हिंडू-फिरू शकता, इथे यंत्रांमार्फत पृथ्वीसारखेच गुरुत्वाकर्षण राखलेले आहे. अर्थात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाहिजे तेव्हा शून्य गुरुत्वाकर्षणाचा आनंद घेऊ शकता.", गिडियन उत्तरली. सेरानी इतर दोघांकडे एक मिश्किल कटाक्ष टाकला आणि म्हणाली,"गिडियन आम्हाला शून्य गुरुत्वाकर्षण हवं आहे."

"ओके!"

तिघांनाही अचानक एक हलकेपणा जाणवू लागला. तिघांनी आपापले सीटबेल्ट सोडले आणि हळूच खुर्चीतून उतरले. पण त्यांचे पाय जमिनीला टेकलेच नाहीत. ते तिघही त्या नियंत्रण कक्षात हळुवार तरंगू लागले. त्यानंतर बराच वेळ तिघांनी भरपूर मजा केली आणि शेवटी थकून खुर्चीला धरून जमिनीवर बसले. "गिडियन, गुरुत्वाकर्षण परत पहिल्यासारखं कर", नीरज म्हणाला. "ओके!" तिघांना परत पहिल्यासारखा जडपणा जाणवला.

"गिडियन", नीरज पुढे म्हणाला,"आता मजा बास. एकदा परत प्लॅनवर नजर टाकूया."

"येस नीरज.", गिडियन म्हणाली. "तुम्हाला आधी पूर्ण प्लॅन सविस्तर ऐकायचा आहे? की त्याआधी तुमचे काही प्रश्न आहेत?"

"नाही, तू आधी प्लॅन ऐकव. आम्हाला प्लॅन माहीत आहे, पण परत एकदा सगळ्या डिटेल्ससकट ऐकव.", डेव्हिड उत्तरला.

"प्लॅन साधा सोपा आहे. पुढील साधारण ५०० दिवसांत आपण मंगळ आणि गुरुमध्ये असलेल्या लघुग्रहांच्या पट्ट्याजवळ म्हणजे asteroid beltजवळ पोहोचू. त्यानंतर त्या बेल्टमधून आपण ’ल्युसिफर’च्या कक्षेला समांतर असे पुढे जाणार आहोत. तेथील शिळा आणि उल्कांचे निरीक्षण करून ३ शिळा आधीच निवडल्या गेल्या आहेत. त्यांची नावे आणि त्यांचे स्थान, अंतर वगैरे इतर माहीती स्क्रीनवर आहे. या तीन शिळा ल्युसिफरच्या कक्षेच्या सर्वांत जवळ आणि त्याच्या आकाराशी मिळत्या-जुळत्या आहेत. आपण तिथे वेळेवर पोहोचणे खूप आवश्यक आहे. जर आपण उशिरा पोहोचलो, तर आपली एकमेव संधी हुकेल आणि मग त्या धूमकेतूला कोणीही अडवू शकणार नाही. एकदा आपण तिथे पोहोचलो, की आपल्याला या तीन शिळा आपल्या यानातील स्फोटक मिसाईल्सचा वापर करून ल्युसिफरच्या कक्षेत आणून उभ्या करायच्या आहेत. जेणेकरून त्यांना आपटून ल्युसिफर एकतर नष्ट तरी होईल किंवा त्याचा मार्ग तरी बदलेल."

"अगदीच सोपा प्लॅन आहे", सेरा चेष्टेने हसली. "पण, गिडियन आपण या शिळा हलवणार कशा?"

"सेरा, या शिळांच्या काही अंतर अलीकडे आपण मिसाइल्सचा स्फोट घडवून आणू, ज्याच्या धक्क्याने त्या शिळा पुढे ढकलल्या जातील.", गिडियन म्हणाली. "चला, आता अजून काही प्रश्न नसतील तर तुम्ही विश्रांती घ्यायला जा, अजून तीन वर्षं तुम्हाला इथेच काढायची आहेत." तिघेही हसत हसत त्यांच्या रूमकडे गेले. त्यांचा प्रवास सुरू झाला होता.

आता पुढचे ५०० दिवस यानाची देखरेख करण्यापलीकडे त्यांच्याकडे तसे काहीच काम नव्हते. प्रत्येकजण ८ तासांच्या (पृथ्वीवरचे) शिफ्टमध्ये नियंत्रण कक्षात काम करत. यानात अगदी बास्केटबॉल कोर्ट पासून ते छोट्या पूल पर्यंत सर्व सुविधा होत्या त्यामुळे एकजण काम करताना इतर दोघे यानात इथेतिथे भटकत मजा करत. किंवा काही डागडुजीची कामे असल्यास ती करत असत. त्यांचे दिवस आनंदात जात होते. गिडियनसुद्धा आता त्यांची चांगली मैत्रीण झाली होती. ती बोलण्यात चांगलीच तरबेज होती, त्यामुळे तिघेजण तिच्याशी तासंतास गप्पा मारत बसत. त्याचसोबत ती सांगितलेली सर्व कामेसुद्धा अगदी चोख करे. होता होता ते asteroid beltजवळ पोहोचले. आता पुढचा मार्ग तसा लहान असला, तरी अतिशय कठीण होता. वाटेतल्या शिळांना चुकवत जाणं अजिबात सोपं काम नव्हतं. हळूहळू पुढे सरकणार्‍या मोठमोठ्या शिळा सहज चुकवता येत. पण काही लहान (म्हणजे यानाहून मोठ्या पण तुलनेनी लहान) आणि वेगाने सरकणार्‍या शिळा चुकवणं खूप अवघड होतं. तिघंही जण आता डोळ्यात तेल घालून वावरत होते. जास्तीत जास्त काळ ते नियंत्रण कक्षातच घालवत. कोणाचीही शिफ्ट असली तरी तिघेही नियंत्रण कक्षातच बसून रहात. नीरज तर नियंत्रण कक्षातच झोपायला लागला.

पण तरी एके दिवशी घात झालाच, डेव्हिड आणि सेरा खूप थकवा आल्यामुळे त्यांच्या खोलीत परतले होते. नीरज नियंत्रण कक्षातच बसला होता. एक शिळा अचानक यानाच्या मार्गाच्या आड आली, गिडियननी आणि नीरजनी यान वळवायचा प्रयत्न केला पण तरीही ती शिळा यानाच्या उजव्या बाजूला घासून गेली. त्या बाजूच्या मिसाइल्सना त्यामुळे धक्का बसला, तिकडची यंत्रणा हलली. यानात जोरजोरात अलार्म वाजू लागले. डेव्हिड आणि सेरा त्या आवाजाने दचकून जागे झाले आणि लगोलग नियंत्रण कक्षाकडे निघाले. वाटेत त्यांना नीरज भेटला आणि तिघे मिळून यानाच्या उजव्या बाजूकडे निघाले. तिथे पोचून त्यांनी पहाणी करायला सुरुवात केली. फारसे नुकसान झाले नव्हते, पण दोन मिसाइल निकामी झाली होती. त्यानंतर त्या तिघांनी मिळून सतत १५ तास (पृथ्वीवरचे) खपून ती सर्व यंत्रणा परत पूर्ववत केली. एक संकट तर टळले, पण खरे संकट अजून बाकी होतेच. कारण यान आता अपेक्षित ठिकाणी जवळपास पोहोचलेच होते.

तिघेही लगेच नियंत्रण कक्षात आले. गेले १५ तास त्यांना झोप नव्हती, पण आता त्यांची झोप पूर्ण उडाली होती. त्यांनी लगेच पुढच्या कामांना सुरुवात केली. सर्व यंत्रणांची एकदा चाचणी घेतली. सर्व काही व्यवस्थित होते. तिघांनी आपापल्या जागा घेतल्या. नुसत्या डोळ्यांना दिसत नसला तरी स्क्रीनवर ’ल्युसिफर’ स्पष्ट दिसत होता. त्या तीन शिळा त्यांच्या समोर होत्या. गिडियननी काउंटडाऊन सुरू केले. ३...२...१..आणि शून्यावर मिसाइलची पहिली बॅच सुटली. ती पहिल्या शिळेच्या थोडी अलीकडे डोळे दिपवणार्‍या प्रकाशाने फुटली. त्यानंतर अजून एक काउंट आणि अजून एक स्फोट, अजून एक स्फोट, आणि तीनही शिळा त्या धक्क्यांनी पुढे सरकल्या.  "गिडियन, शिळा बरोबर ठिकाणी पोहोचल्या का?",डेव्हिडनी उत्साहानी विचारलं. "हो डेव्हिड, त्या शिळा आता त्यांच्या अपेक्षित ठिकाणी पोहोचल्या आहेत. आपला पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. आता पुढचा टप्पा यशस्वी होणं ’ल्युसिफर’च्या हातात आहे. आता आपण मागे वळलं पाहिजे.", गिडियन म्हणाली.

"पण आम्हाला ल्युसिफर या शिळांना धडकताना पहायचं आहे गिडियन",सेरा म्हणाली.

"आपण ते पाहूच सेरा पण योग्य अंतरावरून. आपण इथे थांबलो तर आपल्याला धोका आहे. धडक झाल्यास निर्माण होणार्‍या स्फोटातून अनेक लहान लहान शिळा इथे येऊन आपल्याला धडकू शकतात आणि ल्युसिफर इथे पोहोचायला अजून दोन दिवस आहेत.", गिडियन उत्तरादाखल म्हणाली.

यान मागे वळले आणि सुरक्षित अंतरावर जाऊन थांबले. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. त्या शिळा आता अगदी लहान दिसत होत्या आणि त्यांच्या मागोमाग वेगाने त्यांच्याकडे सरकणारा ल्युसिफर. तो काही त्या शिळांपेक्षा वेगळा दिसत नव्हता, पण तरी त्या अवकाशात उठून दिसत होता. त्या तिघांचेही श्वास रोखले गेले होते. नियंत्रण कक्षात पूर्ण शांतता होती. इतकी की त्यांना आपल्या हृदयाची वाढती धडधडही ऐकू येत होती. ल्युसिफर पुढे सरकत होता. पहिली टक्कर, दुसरी टक्कर, तिसरी टक्कर. शिळांचे असंख्य छोटे छोटे तुकडे अवकाशात उधळले गेले. ल्युसिफरचा तर नामोनिशाणाही उरला नव्हता. मोहीम यशस्वी झाली होती.

नीरज, डेव्हिड आणि सेरा आनंदाने नाचू लागले, एकमेकांना टाळ्या देऊ लागले, मिठ्या मारू लागले. "अभिनंदन धाडसी वीरांनो, मोहीम यशस्वी झाली आहे. तुम्ही आज अखंड पृथ्वीचे प्राण वाचवलेत. मी आत्ताच पृथ्वीवरील मिशन कंट्रोलला मोहीम पार पडल्याचा संदेश धाडला आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत.", गिडियन अत्यानंदाने म्हणाली. हुर्रे! तिघांनी आरोळ्या ठोकल्या. "थॅंक यू गिडियन, तुझी खूप मदत झाली. आता लवकरात लवकर आपण परत फिरूया!", नीरज म्हणाला.

त्यांचा कंटाळवाणा, पण विजयाच्या आनंदामुळे आणि घरी परतायच्या ओढीमुळे सुसह्य झालेला, परतीचा प्रवास सुरू झाला. पूर्ण प्रवासात, ते आता फक्त आराम करत होते. खात पीत मजा करत, गप्पा मारत आणि झोपा काढत त्यांचा प्रवास चालू होता.

बीप्‌...बीप्‌...बीप्‌...

अशा सततच्या आवाजानी नीरजला जाग आली. तो वैतागून उठला. तो जरा नाखुशीनीच यानाच्या नियंत्रण कक्षाकडे निघाला. वाटेत त्याला त्याचे सहकारी सेरा आणि डेव्हिड भेटले. तेही वैतागलेले होते. तिघेही नियंत्रण कक्षात शिरले. "गिडियन काय झालं? अलार्म का वाजला?" डेव्हिडनी यानाच्या AI Systemला प्रश्न केला. "सर, आपला गेल्या ३ वर्षांचा हा प्रवास लवकरच संपणार आहे. आपण येत्या दोन दिवसांत पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करत आहोत", गिडियन कडून उत्तर आलं. त्या तिघांना प्रचंड आनंद झाला, त्यांनी एकमेकांना टाळ्या दिल्या. यानाच्या पडद्यावर आता पृथ्वी स्पष्ट दिसत होती.

~~~०००~~~