बदाम राजा आणि काजू राणी (कथा)

बदाम राजा आणि काजू राणी
लेखन: अमृता गोटखिंडीकर
चित्रे: श्रीनिवास बाळकृष्ण

एक असतो बदाम राजा आणि एक असते काजू राणी. एकदा सकाळी राजा-राणी गप्पा मारत, चहा पीत, बागेमध्ये निवांत बसले होते. तेवढ्यात त्यांना गलका ऐकू आला. बाहेर कसला गोंधळ चालु आहे, हे बघायला राणीने खिडकीबाहेर डोकावले, तर बाहेर राजाला भेटायला बरेच लोक आले होते. राजाने टाळ्या वाजवल्या, “कोन्नाहे रे तिकडे.”
राजा इकडेतिकडे बघतोय, तोच प्रधानजी धावतधावत आले.
“महाराज!”
“अरे प्रधानजी तुम्हालाच बोलावणार होतो.कसला गोंधळ आहे हा? का बरं आपली प्रजा बाहेर जमली आहे?”


“त्यांना शिरा खायचा आहे.”, प्रधानजी धाडकन बोलून गेले.
“कायऽऽ!”, राणी जोरात म्हणाली.
“आपल्या राज्यातले काही लोक शेजारच्या राज्यात गेले होते. तिथे त्यांनी शिरा खाल्ला. आणि त्यांनी त्या गोड-गोड शिऱ्याचं इतकं खुमासदार वर्णन केलं आहे, की ज्याचं नाव ते. ते वर्णन ऐकून आता सगळ्यांना शिरा खायचा आहे. पण, तो येतो कुठे बनवायला!”
“म्हणून हे लोक इथे आलेत?”, राणीने विचारलं.
“आमच्या प्रजेला शिरा खायचा आहे आणि तो त्यांनी आमच्याकडे मागितला, तर चुकलं कुठे राणी सरकार?”, राजाने विचारले.
“पण इतक्या लोकांचा शिरा?”
“बनवू आपण!”
राणीने मान डोलवली. खरंतर राजालाच शिरा खायचा आहे, हे तिने ओळखलं होतं.

हा हा म्हणता, ‘राजा राणी आपल्यासाठी शिरा बनवणार!’ ही बातमी नगरात वाऱ्यासारखी पसरली. राजाने सगळ्यात आधी माकडांना बोलावलं. टणाटण उड्या मारत माकडं आली. राजा म्हणाला, “पिकलेली भरपूर केळी घेऊन या”. माकडांना आधीच केळी किती आवडतात. त्यात राजाने त्यांना फुल्ल परमिशन दिली होती. माकडं दंगा करत, केळी आणायला निघून गेली.

मग राजाने गाईंना आणि गवळ्यांना बोलावलं. घागरी भरून तूप घेऊन यायला सांगितलं. गाई ‘हम्मा हम्मा’ ओरडत मान हलवत निघून गेल्या, पण जायच्या आधी ‘भरपूर शिरा खायला देणार’ हे राजाकडून कबूल करून घेतलं.

राजा शिरा करून सगळ्यांना खायला देणार, हे ऐकताच शेजारच्या राज्याच्या राजाने रव्याची पोती पाठवली.

आता राहिली साखर. राजाने शेतकऱ्यांना ऊसाची साखर बनवायला सांगितली. हळूहळू सगळ्या गोष्टी जमा झाल्या.

एके दिवशी भल्या सकाळी राजा आणि राणीने शिरा करायला सुरुवात केली. तुपावरती रवा भाजण्याचा खमंग वास सुटला, तशी बातमी सगळीकडे पसरली- 'आज शिरा खायला मिळणार'. मग काय! जो तो राजवाड्याकडे निघाला. कोणी ताटली घेऊन, वाटी घेऊन, कोणी ताट घेऊन, तर कोणी परात घेऊन. कोणी एकजण तर नुसता चमचा घेऊन निघाला होता, कारण तो थेट शिरा तयार करायच्या पातेल्यातूनच शिरा खाणार होता.

राजवाड्याच्या समोर चांगलीच गर्दी झाली होती. सैनिक सगळ्यांना रांगेत उभे करत होते. लहान मुलांना बसायला जागा करत होते. जे लागेल ते सामान, प्रधानजी धावपळ करून राजाला आणून देत होते.
रवा भाजून झाल्यावर, राणीने त्या पातेल्यात उकळतं गरम पाणी घातलं. मग, त्याला वाफ आल्यावर साखर आणि तुपावर परतलेली केळी घातली. त्यानंतर वेलदोड्याची पूड घातली. झाकण लावून वाफ दिली आणि मस्त शीरा तयार झाला.

सगळे अगदी सरसावून बसले. कधी एकदा शीरा मिळेल, असं झालं होतं सगळ्यांना.
मग, प्रधानजींनी एका वाटीत थोडा शीरा वाढला आणि राजा-राणीला चव बघायला दिला. राणीने एक घास खाल्ला आणि तोंड वाकडे करत म्हणाली, “उं हू!”. राजाने एक घास खाल्ला. राजानेही तोंड वाकडे केले. ‘ओहो! शिरा बिघडला की काय?’ सगळे विचारात पडले.

राणी हसली आणि राजाच्या कानात काहीतरी कुजबुजली. राजा हसला.
राजा म्हणाला,
"अडम तडम तडतड बाजा
शिऱ्यामध्ये घालतो बदाम राजा"
आणि त्याने आपली मूठ शिऱ्याच्या पातेल्यात उघडली. तर त्यातून बदाम बाहेर यायला लागले.


राणी म्हणाली.
"अडम तडम तडतड गाणी
शिऱ्यामध्ये घालते काजू राणी"
आणि तिने आपली मूठ शिऱ्याच्या पातेल्यात उघडली. तर त्यातून भराभर काजू बाहेर यायला लागले.

मग काय! सगळे जोरजोरात हे गाणं म्हणायला लागले. मज्जाच मज्जा!
भरपूर बदाम, काजू घालून झाल्यावर, शिरा चांगलाच खुमासदार झाला होता.
भरपूर शिरा खाऊन सगळे ढाराढूर झोपून गेले.

-----
चित्रकाराचे इतर काम या वेबसाईटवर बघता येईल.