भटोबा (गोष्ट)

भटोबा
लेखन: अमृता गोटखिंडीकर
चित्र: पारूल समीर

वाऱ्याची एक मोठी झुळूक अंग घुसळत भटोबाच्या जवळून गेली. झुई झुई आवाजाने भटोबाला जाग आली. त्याने आळसावून इकडे तिकडे नजर टाकली. पावसाच्या शिडकाव्याने आजूबाजूचे डोंगर हिरवेगार झाले होते. त्याने स्वतःकडे पाहिलं. अंगावरच्या एखाद्या कपारीतून थोडंफार गवत उगवलं होतं, पण त्याच्या पलीकडे काही नाही. त्याला वाईट वाटलं.  पोपटांचा एक सुंदर थवा भटोबाच्या जवळून गेला. भटोबाने त्यांना आवाज दिला, पण तो थवा काही भटोबावर विसावला नाही.  त्याने विचार केला, ‘ह्या गड्या, हे असलं कसलं नशीब आपलं राव! निस्ता उभाच्या उभा डोंगर. जरा झाडं नाहीत की माती नाहीत. झरे नाहीत की धबधबे नाहीत. ह्यो मधल्यामध्ये उभा सुळका’

तेवढ्यात भटोबाला आवाज ऐकू आला, “वाचवा, वाचवाऽऽऽऽ”.

भटोबाला आश्चर्य वाटलं. कितीतरी दिवसांनी त्याने माणसाचा आवाज ऐकला होता. त्याने इकडे तिकडे पाहिलं, तर त्याला दिसलं की चिमचिम राक्षस पायात शिकार धरून सुळक्याच्या टोकावर उतरलाय आणि त्याचं सावज चक्क माणसाचं पिल्लू आहे. चिमचिम त्या सावजाला मारणार तोच भटोबाने स्वतःला इतक्या जोरात थरथरवलं, की चिमचिम घाबरून पसार झाला.

भटोबाने पाहिलं, ते माणसाचे पिल्लू - एक छोटीशी मुलगी -  तिला ‘गोडुशी’ म्हणायचं असं त्याने ठरवलं. ती घाबरून थरथर कापत होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. त्यात भयंकर ऊन आणि भणाण वारा. 

भटोबाने एका गोलमटोल ढगोबाला बोलवलं आणि गोडुशीवर सावली धरायला पाठवलं. अचानक हा एकटा ढग कुठून आला ते तिला कळेना. ती उठून इकडे तिकडे पाहायला लागली, फिरायला लागली. तसा तो ढगोबासुद्धा तिच्या मागे मागे फिरायला लागला. ते पाहून गोडुशी खुदकन हसली. ते पाहून भटोबा हसला. त्याने वाऱ्याला पाठवलं ढगोबाशी बोलायला. वारा ढगोबाच्या कानात कुजबुजला आणि काय आश्चर्य! ढगोबातून पाण्याच्या धारा वाहायला लागल्या. गोडुशीने भरपूर पाणी प्यायलं. ढगोबाने काही घारींना आवाज दिला, तर त्या भरपूर फळं घेऊन आल्या आणि गोडुशीच्या हातात टाकून निघून गेल्या. पाणी पिऊन, फळं खाऊन गोडुशीला चांगलीच हुशारी आली. 

ती विचार करू लागली, ‘कोण बरं माझी इतकी काळजी घेतंय? हा ढग? हा वारा? की आणखी कोणी?’  मग ती उभा राहिली आणि जोरजोरात हाका मारू लागली, “कोणी आहे का?? हॅलो???” पण घोंघावणाऱ्या वाऱ्याचा आवाज सोडला, तर कोणीच उत्तर दिलं नाही. 

गोडुशीच्या लक्षात आलं, की इन मीन काही लोक मावतील इतकी जागा या सुळक्याच्या टोकावर आहे. इथे रात्र रात्री कशी काढणार? तेवढ्यात तिला दिसलं की सुळक्याच्या खालच्या बाजूला एक गुहा आहे. कपारीचा आधार घेत ती त्या गुहेच्या दिशेने उतरू लागली. भटोबालाच  भीती वाटली ही पडली तर! पण गोडुशी मोठी धाडसी. कपारीचा आधार घेत ती त्या गुहेत शिरली. एक-दोन माणसं मावतील इतकी जागा होती. एका खड्यात प्यायला स्वच्छ पाणी होतं.  गोलमटोल ढगोबा गुहेबाहेर अवघडल्यासारखा उभा होता. गोडुशीने फळे खाल्ली. ढगोबाशी गप्पा मारल्या. सूर्य मावळतीला आला तसे आकाशातले रंग पहिले. रात्र झाल्यावर चांदण्या मोजल्या. गुहेतले काजवे पकडून पानामध्ये दिवा तयार केला. भटोबाला भारी कौतुक वाटलं तिचं. त्याला वाटलं, ‘आता ही इथेच राहील, काय मजा! माझ्या अंगाखांद्यावर खेळू दे, इकडे तिकडे फिरू दे. गाणी म्हणू दे. खायला प्यायला मी देईन हिला.. ढगोबा, वारा माझे मित्र आहेत, पण गोडुशी आणि मी घट्ट मित्र होऊ. बेस्ट फ्रेंड्स! आम्ही कायम एकत्र असू.’ असा विचार करत करत भटोबाला झोप लागली.  

दुसऱ्या दिवशी भटोबाला जाग आली, तेव्हा गुहेच्या तोंडाशी पाय पसरून गोडुशी निवांत बसली होती. भटोबाला कळेना, ‘कसला बरं विचार करते आहे ही?‘ आणि अचानक हिय्या करून तिने खालीच उतरायला सुरुवात केली. 

'ओय...ओय...अगं, कुठे निघाली ही बया? आपलं बेस्ट फ्रेंड व्ह्यायचं ठरलं होतं ना?. भटोबाला वाईट वाटलं, आणि खूप राग पण आला. 'कशाला जायला पाहिजे खाली? पाहिजे ते आणून देईन मी. ही गेली की परत मी एकटाच. मी हिला जाऊच देणार नाही'. भटोबा मनात म्हणाला आणि मग भटोबाने कपारीतून लहान लहान दगड हलकेच सुटे केले. इकडे गोडुशीला खाली उतरताना खूप भीती वाटत होती. काही ठिकाणी पावसाने निसरडं झालं होतं. काही ठिकाणी कपारीमधून दगड निसटत होते. तिला नीट उभं राहायला अवघड जात होतं. 

दगड निसटतले, तरी गोडुशी थांबत नाही, हे पाहून भटोबाला अजून राग आला. चेव येऊन त्याने हलकंच स्वतःला थरथरवलं. वरून काही मोठे दगड निसटून गोडुशीच्या अगदी जवळून गेले. ढगोबाने डोळे मोठे करून आश्चर्याने भटोबाकडे पाहिलं, काय हे वागणं? भटोबाला नवीनच झालेल्या मैत्रिणीला थांबवू वाटत होतं. ती फक्त माझीच मैत्रीण असावी असं त्याला वाटत होतं. पण माणसाचं मुल ते. एका जागी कसं बरं थांबेल! हेही त्याला कळत होतं. शेवटी त्याने ठरवलं, तिला जायचं आहे ना, जाऊ दे.

मग भटोबाने घारी आणि गिधाडांना बोलावलं आणि त्यांना चांगल्या जाड चिवट वेली गोडुशीला द्यायला सांगितल्या. पक्षांकडून अशी अचानक मदत कशी मिळाली हे गोडुशीला कळेना. पण तिला त्यामुळे चांगलीच उमेद मिळाली. वेलीच्या गाठी मारत मारत ती खाली उतरायला लागली. ढगोबा, वारा तिच्या अवतीभवतीच घुटमळत होते. हळूहळू गोडुशी खाली उतरली. उतरल्यावर एकदा तिने भटोबाकडे मागे वळून पाहिलं आणि झपाझप निघून गेली.

ती निघून गेली त्या वाटेकडे भटोबा बऱ्याच वेळ डोळे लावून पाहत होता.

काही दिवस असेच गेले. एके दिवशी भटोबाला जाग आली ती ‘खण् खण्’ अश्या आवाजाने. पाहतो तो काय, गोडुशी तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर भटोबाच्या पायापाशी उभी होती. शिवाय ते सगळे भटोबाच्या अंगावर चढत होते. चढताना भटोबाच्या अंगावर खिळे मारत होते. त्याला दोर बांधून त्याच्या मदतीने वर चढत होते.  भटोबाला खिळ्यांमुळे गुदगुल्या होत होत्या. चढता चढता मुलं मजेशीर गाणं पण म्हणत होती 

जंगलातला भटोबा ...आलो  रे आलो

जंगलातला भटोबा, भटोबाची घार  ...आलो रे आलो 

जंगलातला भटोबा, भटोबाची घार, घारीची फळं...आलो  रे आलो

जंगलातला भटोबा, भटोबाची घार, घारीची फळं, भटोबाचा ढगोबा...आलो रे आलो

जंगलातला भटोबा, भटोबाची घार, घारीची फळं, भटोबाचा ढगोबा, ढगोबाचा पाऊस  ...आलो  रे आलो

असलं ते लांबच्या लांब गाणं. भटोबाला गालातल्या गालात हसू येत होतं.

हा हा म्हणता म्हणता सगळी पोरं वर अगदी टोकापर्यंत चढली. पोरांना टोकावरचा सुस्साट वारा, गुहा, हाताशी येणारे ढग खूपच आवडले. भटोबाला मज्जा वाटायला लागली, कारण आता त्याला एक-दोन नाही, तर चांगले ढीगभर नवीन मित्रमैत्रीणी मिळाले होते.